दसऱ्याची धुळवड!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • Sat , 08 October 2022
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray एकनाथ शिंदे Eknath Shinde शिवसेना Shivsena बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray आदित्य ठाकरे Aaditya Thackeray

शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी या वर्षीच्या दसऱ्याचा माहोल ‘हायजॅक’ केला. या मेळाव्यापुढे प्रकाश वृत्तवाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मुद्रित माध्यमांना या राज्यात इतर काही प्रश्न आहेत, याचा जणू विसरच पडला होता. गर्दीचा निकषावर एकनाथ शिंदे आणि भाषणाच्या आघाडीवर उद्धव ठाकरे बऱ्यापैकी उजवे ठरले. (दोन्ही गटांनी गर्दी ‘जमवलेली’ नसून ‘जमलेली’ आहे, असे केलेले दावे आपण ‘सहृदयतेनं’ समजून घ्यायला हवेत!) शाप, तळतळाट, तगमग, टोमणे, अशी एकमेकांची अंतर्वस्त्रं या दोन्ही गटांकडून जाहीररित्या धुवून वाळत घातली जाण्यातून दसऱ्याला धुळवडच साजरी झाली, असंच म्हणावं लागेल. राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणजे धुळवड, हा जो संदेश त्यातून गेला, हे लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या कुणाही संवेदनक्षम माणसाला अस्वस्थ करणारं आहे. या दोन्ही गटांनी यापुढे विजयादशमी धुळवड म्हणून साजरी करण्याचा ‘विचार’ मांडू नये म्हणजे झालं!

राजकारण हे नेहमीच व्यक्तीकेंद्रित असतं, पण त्यातून जनतेचं हित साधलं जायला हवं असतं. हे दोन्ही मेळावे मात्र व्यक्तिगत उण्यादुण्यांच्या चक्रातच अडकले. राज्याच्या आर्थिक धोरणात त्यांनी काय बदल केले आणि यांनी काय करायला हवेत, विकासाच्या आघाडीवर नेमकी स्थिती काय आहे, किमती  नियंत्रणात आणण्यासाठी कुणी काय केलं आणि काय करणार आहे, बेरोजगारीच्या आघाडीवर सकारात्मक असं काय घडलं, कोणते नवीन प्रकल्प आले, असा मूलभूत लेखाजोखा कुणीच मांडला नाही. या दोघांच्याही सरकारांच्या काळात जे काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आहेत, त्यात मुंबई पोरबंदर, ‘वंदे मातरम्’ द्रुतगती रेल्वे, मुंबई कोस्टल मार्ग, बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रोपोलोटीन रिजनचा विस्तार, मुंबईतील मेट्रोचं जाळं विस्तारणं, समृद्धी महामार्ग आदींचा समावेश आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

समृद्धी महामार्गाच्या कामाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाली आणि त्याच काळात हा प्रकल्प ८० टक्के पूर्ण झाला, त्यामुळे त्याचं श्रेय एकट्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला घेता येणार नाही. नाही म्हणायला, राज्यातील एक कोटी गरीब कुटुंबांना १०० रुपयांत दिवाळी गोड करण्याची योजना एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्याचं स्वागत करायला हवं, पण केवळ ‘टीआरपी’ मिळवून देणाऱ्या अशा योजना आर्थिक निकषावर राज्याच्या हिताच्या आहेत का, याचा विचार करण्याचं भान आपल्या देशातील राजकीय नेते आणि पक्ष कधीचेच गमावून बसले आहेत.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा, वरील सर्व योजनांत मुंबईतील प्रकल्पांना प्राधान्य आणि त्यांवरील योजनांत भांडवली गुंतवणूकही जास्त आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात येणाऱ्या प्रकल्पांतील गुंतवणूक कमी आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही मुंबईचाच विचार जास्त करतात, उर्वरित महाराष्ट्राचा नाही, असा संदेश त्यातून जातो आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या हिताचं काय, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. 

उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर होती, कारण ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या दीड तासाच्या रटाळ भाषणात राज्याच्या विकासाचं, जनहिताचं कोणतं नियोजन त्यांच्या मनात आहे, हे सांगणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी त्या संदर्भात काहीच सांगितलं गेलं नाही. शिंदे यांचा सगळा वेळ ठाकरे यांच्या म्हणण्याचं खंडन करण्यात गेला. ठाकरे यांनी रचलेल्या सापळ्यात ते पूर्ण अडकले. त्यातून शिंदे यांना केवळ शिवसेना ताब्यात घ्यायची आहे आणि त्यांची विकासाची दृष्टीही अल्प असल्याचा संदेश गेला.

स्वत:चीच शिवसेना खरी आणि धनुष्य बाण आपल्यालाच मिळायला हवा, याविषयी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली तळमळ अप्रामाणिक आहे, असं मुळीच म्हणता येणार नाही, मात्र भाषणाच्या ओघात ‘खरं आणि खोटं’ सिद्ध करण्यासाठी दोघांनीही काढलेले एकमेकांचे आई-बाप किंवा नातवाचा केलेला उल्लेख, दोघांनीही एकमेकांना लगावलेले टोमणे शिवसेनेच्या ‘ठाकरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभेसे असले, तरी लोकशाहीवादी राजकारणाला मारक आहेत. शिवाय ‘ती’ ठाकरी शैली बाळासाहेब ठाकरे यांना जाम शोभून दिसत असे, कारण त्यात बिनधास्तपणा, तसंच  रोखठोकपणा याचं टायमिंग साधलेलं मिश्रण असे.

आता ठाकरी भाषा म्हणजे केवळ टोमणे उरले आहेत! राजकारण म्हणजे केवळ शिमगा साजरा करणं हाच संदेश दसऱ्याच्या या धुळवडीतून व्यक्त झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर मुळीच उंचावलेला नाही. ही अशी बेसूर उणी-दुणी निघत गेली, तर उद्या हे दोन्हीही नेते एकमेकांच्या असल्या-नसल्या शारीरिक न्यूनाचाही उद्धार करायला मागेपुढे पाहणार नाहीत.

शिवाय एकनाथ शिंदे यांचा इतिहास पक्का नाही, हेही या निमित्तानं समोर आलं. ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जाणारे ठाण्याचे आनंद दिघे याचं निधन ऑगस्ट २००१मध्ये झालं. २००२मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सक्रिय झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे, २००३मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वरला झालेल्या बैठकीपासून उद्धव राजकारणात सक्रिय झाले. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून याच बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. हा घटनाक्रम जर लक्षात घेतला, तर आनंद दिघे याचं निधन झालं, तेव्हा सेनेत सक्रिय नसणाऱ्या उद्धव ठाकरे यांना  एकनाथ शिंदे कसे काय भेटले, असा प्रश्न निर्माण होतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद द्यायचं कबूल केलं होतं, हे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं जसं मिथक ठरतं, तसंच आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीची चौकशी उद्धव ठाकरे यांनी केली, हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं मिथकचं ठरतं. ‘शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा’ असं एकनाथ शिंदे यांनी सोडलेलं टीकास्त्र खरं आहे, असं मानायचं असेल, तर शिंदे सरकारच्या काळात ‘शिवसेनेचा झेंडा आणि भाजपचा अजेंडा’ असा कारभार सुरू आहे; हे म्हणजे ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ असाच मामला झाला की! एकनाथ शिंदे यांच्या एकूणच भाषणात अशा बऱ्याच गफलती आहेत. अनेकदा तर ‘या बाबत मी योग्य वेळी बोलेन’ असा सूचक (?) इशारा ते देतात आणि मुद्द्याला बगल देतात  .

उद्धव ठाकरेंचं भाषण एका अनुभवी नेत्याचं होतं तरी, जे काही टोमणे त्यांनी लगावले आणि व्यक्तिगत उणी-दुणी त्यांनीही काढली, ती त्यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला शोभणारी मुळीच नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या, लोकसभा सदस्य असलेला ‘कार्टा’ हा आणि नातवाचा उद्धव ठाकरे यांनी केलेला उपहासपूर्ण उल्लेख तर पूर्णपणे अनाठायी होता. उद्या जर आदित्य किंवा तेजस ठाकरे यांचा ‘कार्टा’ असा हेटाळणीयुक्त उल्लेख कुणी केला, तर ते उद्धव ठाकरे सहन करू शकणार नाहीत, हे स्पष्टच आहे.

राजकारण नेहमीच एका (किंवा काही मोजक्याच) नेत्यांभोवती केंद्रित झालेलं असतं. त्याला शिवसेना तर मुळीच अपवाद नाही. तरी पक्ष म्हणजे मी आणि मी म्हणजेच पक्ष अशी भूमिका घेता येत नसते, कारण कोणत्याही राजकीय पक्षांचं अस्तित्व कार्यकर्त्यांवर बळकट आणि निर्भर असतं. पक्ष आणि सत्तेत लाभाची पदं मिळाली की, कार्यकर्त्यांना आणि त्यातून पक्षाला बळ मिळतं, असा हा परस्परपूरक मामला असतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उद्धव ठाकरे मात्र ‘मी त्यांना अमुक केलं’, ‘मी त्यांना तमुक दिलं’, ‘तो माझ्यामुळे घडला’, अशा संमोहात वावरत आहेत, असंच दिसतं. महाविकास आघाडीत उद्धव आणि सेना एकटे पडले असल्याचं चित्र आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप साम-दाम-दंडासह ठामपणे उभा आहे; म्हणजे आता लढाई फारच विषम व आव्हानात्मक आहे. यापुढील प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागणार आहे. सेनेत पडलेल्या फुटीच्या संदर्भात मुळीच भावनोत्कट न होता आत्मपरीक्षणाची नेमकी परखड भूमिका न घेता उद्धव ठाकरे केवळ तळतळाट व्यक्त करत आहेत, असाच संदेश त्यांच्या भाषणातून गेला आहे. या संमोहातून उद्धव ठाकरे जितक्या लावकर बाहेर येतील, तितकं सेनेसाठी चांगलं ठरेल.

शेवटी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. सेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे यांचं वागणं शिवसेनेसाठी फारच आशादायक आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं ग्रामीण भागात पदोपदी जाणवते, पण उद्धव ठाकरे अजूनही त्यांच्यापर्यंत गेलेले नाहीत आणि आदित्य मात्र फुटीची जखम भळाभळा स्त्रवत असतानाही जोशात सर्वत्र फिरत आहेत, फार क्वचित अपवाद वगळता नेमकं बोलत आहेत. राजकारणात हे असं चालणारच, असा जो भाव त्यांच्या वर्तनात दिसतो तो उमदा आहे. प्रकृती साथ देत नसेल, तसंच भावनोत्कटता बाजूला ठेवून आणि नेतृत्वाच्या संमोहनातून बाजूला होणं शक्य नसेल तर, आदित्य ठाकरे व सेनेच्या काही जुन्या-जाणत्यांचे एक अष्टप्रधान मंडळ स्थापन करून त्यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी सेनेचा कारभार सोपवायला हवा, हाच आदित्य यांच्या या आशादायक वावराचा संकेत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......