अ‍ॅनी अखनोव्ह : माणसाला अवगत नसलेल्या भाषेत स्वतःला व्यक्त करण्याची इच्छा असलेली लेखिका
पडघम - साहित्यिक
पाशा
  • अ‍ॅनी अखनोव्ह या फ्रेंच लेखिकेला काल साहित्याचं नोबेल पारितोषिक जाहीर झालंय
  • Fri , 07 October 2022
  • पडघम साहित्यिक अ‍ॅनी अखनोव्ह Annie Ernaux नोबेल प्राईझ Nobel Prize

अ‍ॅनीचं साहित्य खरं तर तिच्या जन्मप्रवाहाचाच दाखला आहे जणू..

आपण त्याला ‘बायोडाटा’ म्हणतो ना...

नोबेल समितीचं मला हे आवडतं की, ते दरवर्षी पटवून देतात- आपल्या भाषेचा माज विसरा… आजूबाजूला अशा अनेक भाषा आहेत, त्यांच्या लेखकांची नावं आणि मूळ पुस्तकांची शीर्षकं उच्चारताना तुम्हाला तुमची भाषा किती तोकडी आहे, हे पटेल...

मराठीत, माझ्या मराठीत Annie Ernaux कसं लिहू, कसं उच्चारू?

तिच्या पुस्तकांचा उल्लेख मूळ फ्रेंचमध्ये लिहिणं कठीण..

अनुवादित इंग्रजी योग्य आहे का, हे कळणं कठीण...

‘स्व’ला शोधताना परिस्थितीचा, परिसराचा, दगड-भिंती भेदून अगदी आईच्या गर्भगृहाचा कानोसा घेत आपल्या नातेसंबंधांचा तपशील ही लेखिका घेते, ते आपल्या स्मरणशक्तीला अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखं घासत घासत...

त्यामुळे तिचं लेखन तुम्ही वाचलंत तर ते आत्मकथन आहे की, आत्मचरित्र आहे, की दीर्घ चरित्रातून घरंगळून पडलेली, आपल्या बापावर लिहिलेली कादंबरी आहे, हे समजत नाही...

तिच्या काही कादंबर्‍या आहेत म्हणे! पण स्वतः पाहून, अनुभवून तिने जे लिहिलंय, तो दस्तावेज आहे तिच्या रोजच्या जगण्याचा… फ्रान्समध्ये जन्मापासून आत्तापर्यंत… ऐंशी वर्षं तो समाज अंगावर गोंदून घेतल्यानं त्याचाही तो इतिहास आहेच…

तिच्या डायरीज पण आहेत… म्हणाव्या तर खाजगी… त्यात पॅरिस मेट्रोमध्ये दिसणारे चेहरे अन् त्या चेहऱ्यांत प्रतिबिंब शोधणारी ही आहेच… ही सुपर मार्केटमध्येही  हिंडते...

एक वैशिष्ट्य हेही आहे की, ही जिथं जाते तिथं तिला स्वतःची पाळंमुळं घट्ट रुजलेली दिसतात...

समोरच्याच्या चेहर्‍यात ही त्यांची कहाणी कल्पित असताना शोधते मात्र स्वतःचं अंतरंग...

Susan Sontagचा ‘On photography’ हा निबंध मी मागे खुपदा वाचायचो. ती म्हणते- ‘छायाचित्र हा बघणार्‍याचा स्वानुभव नसतो… उसनवारीचा अनुभव असतो...’

आज अ‍ॅनीसंदर्भात विचार करताना मला उगीच वाटून गेलं की, आयुष्याचा दस्तावेज मांडताना लहानपणीच्या आठवणी, आपलं पैतृक गावघर सोडताना, आपल्या गर्भपातप्रसंगी आजूबाजूला असलेल्या शुष्कभिंती, लग्नाबाहेरचे प्रेमसंबंध, ही आठवणींची छायाचित्रंच की!

ते तुमच्या पुढ्यात ठेवताना ही लेखिका तुम्हाला उसनवारीचा अनुभव देत नाही, स्वानुभवाचा देते...

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी अ‍ॅनीची पुस्तकं आपल्या देशात कधी पाहिली नाहीत, किंवा असली तरी दिसली नाहीत.

हे नाव सहजासहजी मला आठवलंही नसतं, तिचं छायाचित्र तर मी कधीच ओळखलं नसतं...

एका पावसाळ्या दुपारी कॅलिफोर्नियामधील कपरटिनोच्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये एक छोटेखानी पुस्तक होतं – ‘SHAME’.

त्यात पहिलंच वाक्य होतं – ‘MY FATHER TRIED TO KILL MY MOTHER ONE SUNDAY IN JUNE...’

एका वयात भुरळ पाडणारे ते वाक्य मी साठीत वाचत होतो...

एक १२ वर्षांची मुलगी सांगते आपली कथा...

अन् मी वाचत/ऐकत राहिलो...

ज्या ‘SHAME’भोवती अ‍ॅनीचं आयुष्य घुटमळत राहतं आणि जो अनुभव जखमेच्या व्रणासारखा तिला चिटकून राहतो, तो म्हणजे वडिलांनी एका दुपारी आईला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न...

कष्टकरी समाजात उदरनिर्वाह करणारे ते आई-वडील ही घटना सामान्य म्हणून स्वीकारतात… त्याचं मूकरुदनही त्यांच्या आयुष्यात कुंथत नाही... उभ्या आयुष्यात त्याचा विसर पडावा असं वागतात...

पण अ‍ॅनी एखाद्या शवचिकित्सकासारखी आई-वडिलांच्या नात्याची, स्वतः च्या नातेसंबंधांची चिरफाड करत राहते… शाळेतल्या धार्मिक वातावरणात, आजूबाजूच्या रहिवाश्यांत, समाजकारणात आणि एकूणच फ्रेंच संस्कृतीत तिला ‘SHAME’ वाटावेत, असे अनुभव यायला लागतात… आणि त्यांची दाहकता सुन्न करते. तुमचं बोलणं, वागणं, तुमचा धर्म, समाज, तुमचं राष्ट्र, तुमच्यातील तो ‘SHAME’क्षण धगधगत ठेवतात…

असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात अन् परत परत त्या क्षणाची आठवण जागवून देणार्‍या वार्‍याच्या झुळूकी दाहक ठरतात…

अ‍ॅनी ‘SHAME’ हा शब्द वापरते. त्याला पर्यायी शब्द नव्हे, तर भावना शोधावी, असं मला वाटतं. ‘SHAME’ हा शब्द लाज, शरम, लज्जास्पद इतक्या संकुचित अर्थानं वापरला आहे, असं मला वाटत नाही…

पण फार अपरिचितही नाही हा शब्द... भावना..

 

ही ‘SHAME’ मला लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रे’मध्ये दिसते...

संततीनियमनाची साधनं आणि ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकाची जुळवाजुळव करणार्‍या रघुनाथ कर्वे या आपल्या मनस्वी नवर्‍याबरोबरच्या संसारात टिकून राहणार्‍या मालतीबाईमध्ये जाणवते...

आणि वयस्क नवरा व देशोधडीला लावणारा गुलछबू प्रियकर या दोघांची नावं सारखी आणि नावडती… काय तर ‘गणपती’... म्हणजे नवरा ‘गणपती विजापूरे’ आणि प्रियकर ‘गणपती बेहरे’ असं सांगणार्‍या आनंदीबाई विजापुरे यांच्या आत्मकथनातही दिसते…

ही हीच भावना आत्मकथन करवते बहुतेक...

 

कपरटिनोच्या ग्रंथालयामध्ये अ‍ॅनीची अजूनही पुस्तकं होती...

फारशी कोणी चाळली असतील अशी वाटत नव्हती...

फ्रान्समध्ये असताना मी ग्रंथालयाकडे फिरकलो असं झालं नाही..

फ्रान्समध्ये नाट्यगृहात… कॅफेत… बागेत… रस्त्यांवर… भटकणारा असतो मी...

पण अमेरिकेत छोट्या गावातलं ग्रंथालय म्हणजे अखंड डुंबणं...

अगदी रांगणारी मुलंदेखील ग्रंथालयामध्ये दिसतात…

अ‍ॅनीची पुस्तकं तिथं दिसली त्यात नवल काय!

 

ओळीनं तिची पुस्तकं होती...

तिची अनुवादक बहुतेक पुस्तकांची Tanya Leslieहीच...

आज  कळतंय की, जवळपास समग्र अ‍ॅनी तिने इंग्रजीत आणलीय...

मात्र अ‍ॅनीचे कमी शाब्दिक आणि छायाचित्रसदृश लेखन इंग्रजीत शब्दबंबाळ झालं आहे, असं काही समीक्षक म्हणतात...

आपल्या आईच्या विस्मृतीरोगावर लिहिलेलं अ‍ॅनीचं ‘I remain in darkness’ हे पुस्तक खूप दिवस माझ्या हातात पडून होतं...

विस्मृती हा माझा स्मृतीचाळा आहे… मला काय आठवतं आणि आठवत नाही, याचा खेळ मी खेळत असतो…

त्यामुळे अ‍ॅनीचं पुस्तक ‘मला वाच’ असं खुणावत होतंच...

ते चाळत असताना गळाला मासा लागावा, असं एक वाक्य माझ्या नजरेला अडकलं…

अ‍ॅनी लिहिते –

‘‘आईने तिची ओली चड्डी उशीखाली कोंबली होती…

मी सात वर्षांची असतानाची एक आठवण मला काल आली होती… मासिकधर्मामुळे रक्ताळलेली तिची अंतर्वस्त्रं धुण्यासाठी बास्केटमध्ये नजरेला पडू नयेत म्हणून अगदी तळाशी ती लपवून ठेवत असे… त्या वयात मी ते कुतूहल लपवू शकत नव्हते…

आणि आज ती उशीखालील अंतर्वस्त्रं विष्ठा लपवत होती...”

कपरटिनोच्या ग्रंथालयामध्ये ते न वाचलेलं पुस्तक मी एन्सायक्लोपिडियाच्या मागे लपवून ठेवलं आहे.... माझ्यासाठी, वाचायचं आहे म्हणून…

ते हरवेल अशी उगीचच धास्ती वाटत राहिली...

कादंबरी असती तर मी घुटमळत राहिलो नसतो...

 

अ‍ॅनीची पुस्तकं आता मिळतीलच… कुठेही...

काल नोबेल जाहीर झालं अन् ‘Hollywood Reporter’मध्ये वाचलं की, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०२१ साली ‘Golden Lion’ हा बहुमान मिळवणारा ‘HAPPENING’ हा चित्रपट अ‍ॅनीच्या आत्मकथनपर कादंबरीवर आहे...

तो आता शोधून बघेन… कुठे मिळेल?

मूळ कादंबरी ‘L'evenement’. प्रकाशन वर्ष २०००...

१९६३ साली हुशार अ‍ॅनी गर्भपात निवडीचा निर्णय घेते, कारण तिला भविष्य हवं होतं… आणि या गुन्ह्याची शिक्षा फ्रान्समध्ये तुरुंग आहे...

हेही आत्मकथनच...

समग्र लेखक वाचण्याचा माझा पिंड नाही... त्यातही  अ‍ॅनी आणि तिचे स्मृतीग्रंथ मी एकामागोमाग वाचेन असंही वाटत नाही... कारण आज तिचा गूगलशोध घेताना… तिची पुस्तकं किंडलवर चाळताना ओळखीचं माणूस सारखंसारखं समोर यावं असं झालं...

मुळात ‘SHAME’च्या फक्त शंभर पानांत माझी तिच्याशी झालेली ओळख... पण आज गूगलने तिची कितीतरी पानं माझ्यापुढे ठेवली...

A Woman's story,

A man's place,

A Frozen Woman,

Simple Passion,

The Years...

गर्भपात… स्तनांचा कर्करोग… लैंगिकसंबंध… विस्मृती… लग्न… तारुण्य या आपल्या आयुष्यातील घटना अ‍ॅनीने सार्वजनिक केल्या…

पण हे स्वप्रेम नव्हे, तर स्वसंशोधन आहे...

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आज तिचे व्हिडिओ बघतोय… किती आनंदी… किती पारदर्शक…

चेहर्‍यावर सुरकुत्या आहेत, पण जणू सारखं हसल्यामुळे पडल्या आहेत...

जणू अ‍ॅनीने बिनओझ्याचाच प्रवास केला आहे…

किंवा आयुष्य शब्दमय जगल्यानं… कागदोपत्री मुद्रित केल्यानं लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही तिच्या जवळ...

माझ्याजवळ मात्र आहे- लपवलेलं तिचं एक पुस्तक… ते मला वाचायचं आहे...

अमेरिकेला जावं लागलं तरी...

...............................................................................................................................................................

पाशा

yashpalpasha@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......