अजूनकाही
‘तातडीने निघा, महत्त्वाची बैठक आहे, जसे असाल तसे या’, अशा फैरींमागून फैरी आमच्या फोनमध्ये धडकल्या अन आम्ही खरेच दात घासत निघालो. पण शाखेत चुळा भरायला पाणी नसणार म्हणून पटापट तोंड धुतले आणि धावत सुटलो. आमच्या अंगावर कोणते कपडे आहेत, आम्ही केसांवर कंगवा तरी फिरवलाय का, असे काहीही मनात न आणता आमची धाव प्रभात शाखेकडे सुरू झाली. दहा मिनिटे आम्ही नुसते पळत होतो. वयोमानाप्रमाणे जो वेग होता, तो पाहून वाटेत कोणीही आमच्याकडे आश्चर्याने पाहिले नाही. साहेब जॉगिंगऐवजी रनिंग करत आहेत, असा समज सर्वांचा झाला. परंतु आमचे मन केवढे व्याकुळ झाले होते शाखेत पोचायला, हे कसे ते जाणणार? नक्कीच काही तरी विपरीत घडले असणार, देशापुढे महान संकट उभे ठाकले असणार, असा घोर मनाला लागून राहिला अन् हा राष्ट्रीय स्वयंसेवक सारे काही मागे टाकून शाखेकडे निघाला…
गरम गरम चहा तयार होता. पेपरांचा गठ्ठा दारात येऊन पडला होता. रेडिओवर प्रादेशिक बातम्या लागणार होत्या. ताज्या ताज्या कूकीज वाफाळलेल्या चहाची सोबत करणार होत्या. शेजाऱ्यांनी पूजेवेळचा शंख फुंकला होता. त्यांच्या उदबत्तीचा सुगंध दरवळत आमच्या दारातून आम्हाला पावन करत होता. अशा प्रसन्न अन उत्साही वातावरणाचा त्याग करून प्रभात शाखेकडे जावे, असे काही कारण नव्हते. पण आजकाल इडीवाले पहाटेस कोणाकोणाच्या घरी जाऊन दार ठोठावतात, तसा मोबाईल आमचे कान ठोठावत राहिला. चार्जिंगची पिन काढून आम्ही मोठ्या अनिच्छेने पडदा उघडला तर काय! ‘हिंदूराष्ट्रा’ची हाक हा आमच्या ग्रुपचा अॅडमिन आम्हाला ‘उठा राष्ट्रवीर हो’ अशी आज्ञा देत होता.
…तर दहाव्या मिनिटाला आम्ही धापा टाकत प्रभात शाखेत पोचलो. आमच्या आधीच अनेक स्वयंसेवक जमा होऊन गटागटाने हळू आवाजात बोलत होते. तशी एकमेकांशी शाखेत कुजबुजायची काही गरज नसते, लोकांत कुजबुज करतात, हे त्यांना बजावायला हवे असे वाटून गेले. बहुतेकांच्या अंगावर गणवेश नव्हता. साऱ्यांना झोपेतून उठून बोलावले असावे. दोघांच्या हातात दोन वृत्तपत्रे होती. त्यांचे चेहरे कमालीचे गंभीर, लालबुंद आणि क्रुद्ध झाल्याचे स्पष्ट दिसत होते. शाखाप्रमुखाने गडबडीत ध्वज रोवला होता. मात्र तोही गपगार उभा राहून वातावरणातली धग प्रकटत होता.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तेवढ्यात घशातून विचित्र आवाज निघू लागले. शाखाप्रमुख खाकरून प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधत होते. आज त्यांनी रोजच्या शिस्तीलाही शाखेबाहेर ठेवले असावे. दोनापैकी एका पेपराची हेडलाईन ते वाचू लागले- ‘‘नवी दिल्ली, दोन ऑक्टोबर, देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता ही चिंतेची बाब असून तरुणांना उद्योगांकडे वळवून रोजगार मागणारे रोजगारदाते व्हावेत, यासाठी प्रयत्नरत राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी केले. ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत होसबळे हे बोलत होते. आपल्यासमोर उभ्या असलेल्या गरिबीच्या राक्षसाचा नायनाट करणे आवश्यक आहे. दोन कोटी लोक अद्याप दारिद्रयरेषेखाली जगत आहेत. २३ कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न ३७५ रुपयांपेक्षा कमी आहे. देशात चार कोटी बेरोजगार आहेत. देशाचा बेरोजगारी दर ७.६ टक्के असल्याची कामगार सर्वेक्षणाची आकडेवारी आहे, याकडे होसबळे यांनी लक्ष वेधले. देशातील मोठा समूह अद्याप स्वच्छ पाणी आणि सकस आहारापासून वंचित आहे. समाजामधील वाद आणि शिक्षणाचा दर्जाही गरिबीला कारणीभूत आहे. त्यामुळेच नवे शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे. वातावरण बदल हेदेखील गरिबीचे कारण आहे आणि काही प्रमाणात सरकारची अकार्यक्षमताही याला जबाबदार आहे.”
शाखाप्रमुखांनी मराठी बातमी वाचली. मग थरथरत्या हातांनी आणि कंठ दाटलेल्या स्वरात त्यांनी इंग्रजी दैनिकाची बातमी वाचून काढली. तीही संपली आणि एकदम त्यांच्या तोंडून हंबरडा फुटला. हमसून हमसून ते रडू लागले. प्रभात शाखेत जमलेल्या तेरा जणांचेही डोळे पाणावले. देशाचे हे अत्यंत करुण, दु:खी करणारे चित्र साक्षात सरकार्यवाह यांच्या तोंडून प्रकट झाल्याचे त्यांना वाईट वाटते होते की, देश गरीब बनला याचे, हे आम्हाला समजेना. कारण आमची उभी हयात गेली शाखांमध्ये स्वयंसेवक म्हणून, पण आम्ही असे कधी दारिद्रयाचे किंवा बेरोजगारीचे चिंतन ऐकले नव्हते. त्यावर बौद्धिक तर दूरची गोष्ट.
खरे तर शाखेत येताना तुमचे सारे आयुष्य बाहेर ठेवून यायचे असते. आम्ही ना कधी कोणाला जात विचारली, ना कधी कोण किती शिकतो, याची चौकशी केली. शाखेत आलो की, सारे भेद गळून पडतात. म्हणून अवघा देश शाखामय करायचा, असा पण केलेले आम्ही स्वयंसेवक! तरी एक बरे झाले की, होसबळेजी शाखेत काही बोलले नव्हते. तसे शाखेतले काहीही बाहेर न सांगायची आम्हाला ताकीद दिलेली असते. त्यामुळे शाखेबाहेरच्या देशात एकूण देशाची परिस्थिती कशी आहे, ते त्यांनी सांगितले, याने ते किती कट्टर स्वयंसेवक आहेत, हे सिद्ध झाले. खरे तर होसबळेजींच्या या शाखानिष्ठेने आमचे डोळे भरून आले.
शाखेत मुसमुसणे बराच काळ चालले. ही प्रभात शाखा की शोकशाखा याचा उलगडा आम्हाला होईना. शाखाप्रमुखांनी रुमालात नाक शिंकरून, घसा खाकरून डोळे पुसले आणि चेहराही पुसून काढला. दक्ष होऊन ते बोलू लागले, “स्वयंसेवक राष्ट्रभक्त हो, आपली प्रिय मां भारती अशी विपन्न, विनाकाम आणि विषम जगणे जगते, हे केवढे धक्कादायक. पूज्य सरकार्यवाह यांनी तिची दखल घेतली नसती, तर तिचे आणखी काय धिंडवडे निघाले असते, याची कल्पनाही करवत नाही!” पुन्हा त्यांचा स्वर भरून आला. ओथंबलेल्या आवाजाने कातर, हळवे होत ते पुढे म्हणाले, “काय तो सरकार्यवाह यांचा दांडगा अभ्यास! काय ती बुद्धी. केवढा व्यांसग. किती ही कळकळ. त्यांच्या हृदयाला पाझर फुटणे ही साधी गोष्ट आहे काय?
“आज तमाम गरीब भारतीयांनी होसबळेजींचे आभार मानले पाहिजेत की, त्यांची काळजी संघाला आहे. बेरोजगार तरुणांनाही धन्य झाले पाहिजे. खरे तर त्या सर्वांनी शाखेत यावे आणि संस्कारित होऊन रोजगार प्राप्त करावा. विषमतेची वाहवा करावी तेवढी थोडीच! साक्षात सरकार्यवाह यांच्या तोंडी ती थोडा वेळ यावी, याने तिचे भाग्य उजळले असे आम्ही मानतो. भारतमातेच्या पोटी असे पराक्रमी पुत्र जन्माला आले, याने मातेलासुद्धा कृतकृत्य झाले, असे वाटले असेल.
“होसबळेजी दिवाळीनंतर आपल्या गावात येत आहेत. त्या वेळी त्यांचे भव्य स्वागत आपण तर करूच, पण माझे गरीब व बेरोजगार यांना आवाहन आहे की, त्यांनीही या समारंभात सामील होऊन कार्यक्रमाची शोभा आणि संघाची शक्ती वाढवावी.”
शाखाप्रमुख थांबले. तेवढ्यात शाखेतले सर्वांत ज्येष्ठ स्वयंसेवक दादासाहेब खाकरून जरा सावध होऊन बोलू लागले. म्हणाले, “अशा प्रकारे आपल्या भारतमातेचे दैन्य, दुर्दैव आणि दुर्भाग्य सर्वांसमक्ष काढावयास नको होते. सरकार्यवाह नवखे असल्याने त्यांना संघाची परंपरा ज्ञात नाही. गरिबी, विषमता आदी समस्या या ज्याच्या त्याच्या कर्माची फळे असतात. त्यांचा व जनतेचा आणि मां भारतीचा काय संबंध? भारताची संस्कृती, इतिहास व परंपरा किती गौरवपूर्ण आहे, याचा कधी विसर पडू नये. गरिबी येते-जाते, राष्ट्र टिकून राहते! बलवानांना जगायचा नैसर्गिक अधिकार असतो. बलियसी सर्वत्र पूज्यते! होसबळेजींना याची कल्पना नसावी, अशी शक्यताच नाही. त्यांनी जाणीवपूर्वक पूज्य मोदीजींच्या सरकारची अडचण व्हावी, यासाठी ही खुसपटे काढली असावीत. मोदीजींच्या विकासाच्या झपाट्यात न आलेले हे गरीब व बेरोजगार काँग्रेसचे मतदार असावेत. गेल्या ७० वर्षांत त्यांनी काय दिले देशाला? ही अशी घाणेरडी अवलाद दिली. तेव्हा आज आपणापैकी कोणीही कळवळा दाखवायची मुळीच गरज नाही. शाखाप्रमुखांच्या अश्रुंचा मी आदर करतो, मात्र हा अश्रुपात अनाठायी आहे, हे त्यांच्या नजरेस आणून देतो.”
शाखेत पुन्हा कुजबुज सुरू झाली. किती वेळा सांगावे यांना की, ती शाखेत नसते करायची…! बावळट कुठचे!!
शाखेमध्ये फूट पडते की काय असे माझ्या संशयी मनाला वाटून गेले. शाखाप्रमुख आणि दादासाहेब दोघेही बरोबर होते. संघ कधीही डावे-उजवे करत नसतो. त्याला फक्त हिंदूहित तेवढे कळवते. ही गरिबी, बेकारी, विषमता यांची भाषा कोण्या कॉम्रेडच्या तोंडी शोभली असती. होबसळेजींनी का बरे ती वापरावी? ‘हिंदू हिंदू सारा एक’ असा आपला उदात्त, उच्च हेतू असताना का बरे त्यांनी अशा वर्गवाऱ्या कराव्यात? परंतु दुसरे मन म्हणू लागले की, डिसेंबरात गुजरातेत विधानसभेच्या निवडणुका आहेत. तिथे संघाचे अनेक ज्येष्ठश्रेष्ठ असंतुष्ट असल्याची कुजबुज आमच्या कानी पडली होती. म्हाताऱ्यांना थोडे गोंजारले की, ते हुरळतात. मोदीजींना ते पक्के माहीत आहे. निदान गरीब, बेकार यांच्या निमित्ताने मोदीजींनी सर्वांची योग्य काळजी घेतली की, सत्ता परत आपल्याकडेच! मतदारांना सतत वाटत राहावे की, कोणी तरी आपली काळजी वाहतो आहे, अशी भाषा करणे यशस्वी राजकारण्याचे चिन्ह. मोदीजी सतत गरिबी, निरक्षरता यांचा उल्लेख करत असतात ते यासाठीच. कदाचित होसबळेजींनी मोदींसाठी सुतोवाच करून ठेवले. सूज्ञास अधिक न सांगणे.
हे मनातले विचार आम्ही बोलून दाखवले. मुसमुसणे कधीचेच थांबले होते. आता सुस्कारे, ‘हं’चे उदगार आणि हवेतला ताण मोकळा झाल्याच्या हालचाली ऐकू येऊ लागल्या. धावत शाखेत पोचल्याचा संतोष झाला. शाखाप्रमुखांचा चेहरा अर्धा खुललेला आणि अर्धा हिरमुसलेला जाणवू लागला. वाटले हीच वेळ आहे आणखी काही सुनावण्याची. म्हटले, “ही बातमी फेक न्यूज असू शकते! ती प्लांटेड आहे हे तर दिसतेच आहे. ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या वेबिनारमध्ये होसबळेजी भाग घेणार असल्याचे पत्रकारांना कसे ठाऊक असणार? आपण कधीही आपल्या चर्चांची वाच्यता करत नसतो, हे कसे विसरता तुम्ही? आपल्यात कधीही कुण्या पत्रकाराला आपण बोलवत नसतो, हे काय सारखे सांगत राहायला पाहिजे का? दोन बड्या पेपरांनी होसबळेजींच्या हेडलायनी करायला काय त्यांना गरिबी नवी वाटली की विषमता? त्या पेपरवाल्यांना आपण काहीतरी खोदून मिळवल्याचे समाधान मिळावे आणि वाचकांना संघाला कशी आताच दारिद्रयाची दखल घ्यावीशी वाटली, या टीकेची संधी मिळावी, यासाठी एवढी उचापत केलेली नाही. संघाचे डोके दहा दिशांनी चालते. सांगायचे एक नि करायचे भलतेच, ही चाणक्यनीती तर आपण बालशाखेपासून बाणवलेली आहे. आपल्याला विरोधक डावे काय म्हणतात? यांना ना अर्थशास्त्र समजते, ना परराष्ट्र धोरण! यांनीच देश खड्ड्यात ढकलला. तेव्हा हा आरोप खोटा ठरावा, यासाठी होसबळेजी स्वत:हून मान्य करत आहेत की, आहे बुवा गरिबी. असते कुठे विषमता! पण आमचे लक्ष आहे त्याकडे…”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आमचे रंगात आलेले हे मनोगत दादासाहेबांनी ‘आता पुरे’ असा गगनभेदी आदेश देत थांबवले. आमची त्यांची नजरानजर झाली, तेव्हा ते डोळ्यांनी काही इशारे करत असावेत, असा आम्हाला भास झाला. केवळ मोठेपणाचा आदर म्हणून आम्ही थांबलो. शाखाप्रमुखांना त्यांनी ‘विकीर’ची आज्ञा द्यायला भाग पाडले आणि ही तातडीची शाखा आटोपली. पण त्या मैदानाबाहेर पडायची तयारी कुणाची दिसेना. प्रत्येकाला प्रश्न पडला की, या एवढ्याशा विषयासाठी धावतपळत शाखेत येण्याचे संदेश का म्हणून पाठवले? संघाचे तसे दैनंदिन समस्या आणि संकटे यांच्याशी कसलेही देणेघेणे नसते. नेहमी उत्तुंग असे ‘हिंदूराष्ट्र’ उभारणीचे ध्येय समोर ठेवून चालणारे आम्ही स्वयंसेवक. हे गरीब, बेरोजगार, विषमता यांची तडमड कधी मध्ये येत नसते.
विचारात गुंग असे आम्ही घरी परतलो. पुन्हा सारा सरंजाम मांडला. चहा, पेपर, आकाशवाणी, कुकीज यांची आमची बहारदार मैफल जमली. तेवढ्यात फोन टुणटुणला. पाहतो तर दादासाहेब. मोठ्या अनिच्छेनेच ‘वंदे मातरम्’ करत संभाषणाची सुरुवात केली. तिकडून ते ओरडलेच, “मूर्खा, स्वत:ला शहाणा समजू लागलास का? तो शाखाप्रमुख एक गाढव. त्याला तुझी कशाला रे साथ? रात्रीच मला पीएमओमधून फोन आला होता. भाषण उत्तम झाले. मात्र ते मनावर घेऊ नका. होसबळेजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवाल्याने भाषणातले मुद्दे मांडलेत. परदेशी अपप्रचार आहे तो… मोदीजींना बदनाम करायचा. स्वदेशी मंचावर परकियांची आकडेवारी!”
देवा रे, नशीब फुटके आमचे!!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
...............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment