अजूनकाही
काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली परिसरातील एक व्हिडिओ महाजालावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला इमारत परिसरावर पहारा देणाऱ्या चौकीदारावर चांगलीच संतापलेली होती. बहुदा बेधुंदीमुळे तिच्याकडून शिव्यांची संततधार सुरू होती, म्हणा ना. तो बिच्चारा चौकीदार कसाबसा स्वतःला वाचवू पाहत होता. पण ती उच्चभू महिला त्याच्यावर कायेने आणि वाचेने स्वार होऊ पाहत होती. या घटनेनंतर काही दिवसांनी कानपूर येथील एक व्हिडिओ प्रसारित झाला. या व्हिडिओत तीन मुली एकमेकींशी झोंबाझोंबी करत, एकमेकींना जमिनीवर आदळत आणि लुचत होत्या. यामधील एक मुलगी आईवरून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करताना दिसत होती.
या दोन्ही घटनांमधील मुख्य प्रश्न आहे, हे व्हिडिओ व्हायरल होण्याची कारणे काय आहेत? भारतीय संस्कृतीत पहिल्यांदा शिव्यांचा वापर होत होता? समाज पहिल्यांदा शिव्या ऐकत होता? महिला पहिल्यांदा शिव्या देत होत्या? पहिल्यांदाच आपण मुलींची ‘दबंगगिरी’ पाहत होतो?
भारतीय संस्कृती आणि शिव्या
भारतीय पितृसत्ताक समाजात शिव्यांचे एक विशिष्ट स्थान आहे. लोक आनंदी असतील, तरी आनंदाच्या भरात शिव्या देतात. राग-संताप उफाळून आला असेल, तरीही शिव्या देतात. एकेकट्याने आणि चारचौघांत पण शिव्या देतात. मनातल्या मनातसुद्धा शिव्या देतात. येथे शिव्यांची संस्कृती आणि सभ्यताच आहे म्हणा की! या शिव्या शिकण्यासाठी विशिष्ट शाळेत जावे लागत नाही. इथल्या वातावरणातच शिव्यांची संस्कृती मुरली आहे. या वातावरणाचा दुष्परिणाम होऊन नवी पिढी या संस्कृतीचा यथेच्छ अवलंब करत आहे. अशा या शिवीगाळयुक्त वातावरणात वावरताना असे वाटते की, शिव्यांची संस्कृती आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा भाग राहिलेली आहे. मौखिक आणि वाचन परंपरेचा भाग राहिलेली आहे. येथे बाप आपल्या अपत्यांना शिव्या देतो. पती आपल्या पत्नीला शिव्या देतो. शत्रू आपल्या शत्रूला शिव्या देऊन अपमानित करतो.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
लक्ष्य महिलांचे जननेंद्रिय
दुनियेचे माहीत नाही, पण भारतीय आणि विशेषतः हिंदी पट्टा म्हणून गणल्या गेलेल्या उत्तर भारतात शिव्यांचे एक वैशिष्ट्य आहे. येथील ९० टक्के शिव्या या महिलाकेंद्रित असतात. महिलांमध्ये त्या महिला नातेवाईकांशी संबंधित असतात. ज्यांच्यासोबत आपला कुठला ना कुठल्या प्रकारचा जैविक संबंध असतोच. बरे, ही गोष्ट मान्यही झाली असती, जर आपण सरळपणे नातेवाईकांना काही म्हटले-ऐकवले असते. पण इथे नातेवाईक लक्ष्य नसतात, तर लक्ष्य असते नातेवाईक स्त्रीचे जननेंद्रिय. त्यावर शब्दांच्या माध्यमातून हल्ला केला जातो.
शाब्दिक बलात्कार
बळजबरीने स्त्रियांच्या देहावर कब्जा करणे म्हणजे बलात्कार होय. पुरुष हा नेहमीच स्त्रियांवर बळजबरीने आपली ताकद लादण्याचा प्रयत्न करत असतो. शिव्यांच्या मदतीने तो एक प्रकारे शाब्दिक बलात्कार करत असतो. पण खरे तर हे म्हणणे योग्य होईल की, तो या शाब्दिक बलात्काराचा आनंद घेत असतो.
भारतीय संस्कृतीत नेहमीच महिलांना घर-कुटुंब, जात, समाज आणि धर्माने पावित्र्याच्या कोंदणात ढकलले. त्यामुळे जेव्हा कोणी शिव्या देतो, तेव्हा त्या कुटुंबाची, समाजाची आणि धर्माची ‘पवित्रता’ भंग करणे, हा त्याच्या पाठीमागचा भाव असतो. उदाहरणार्थ, आपण समाजात सर्रास पाहतो की, बलात्कार करून समाजाची, धर्माची आणि कुटुंबाची पावित्र्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याच प्रकारे महिलांच्या जनेंद्रियावर शिव्यांच्या रूपाने हल्ला म्हणजे, त्या विशिष्ट स्त्रीची वा समुदायाची बदनामी करणे, हा उद्देश असतो.
शिव्या देण्याचे उद्देश
जेवढी कारणे बलात्कार करण्यामागे असतात, तेवढीच कारणे शिव्या देण्यामागे असतात. म्हणजेच शिव्यांचा वापर हा असुरी आनंदासाठी असतो. कुणाला कस्पटासमान दाखवायचे आहे, कुणाची बदनामी करायची आहे, तर करा शिव्यांचा वापर. कुणावर सूड उगवायचा आहे, कुणावर नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे, कुणाला धाक दाखवायचा आहे, कुणाची सर्वांसमोर बदनामी, निंदानालस्ती करायची आहे, यासाठी आपल्याकडे सर्रास शिव्यांचा वापर होतो.
शिव्यांचा वर्ग असतो. जात असते. धर्म असतो, परंतु ज्याप्रमाणे बलात्कार हा सर्वांवर केला जात नाही, त्याप्रमाणे शिव्या या सर्वांनाच दिल्या जात नाहीत. शिव्या देणारा स्वतःला श्रेष्ठ, ताकदवान समजत असतो. समोरच्याला तो कनिष्ठ आणि दुर्बल समजत असतो. फक्त हेच नाही, तर तो हेसुद्धा समजत असतो की, शिव्या ऐकून घेणे हेच समोरच्याचे प्राक्तन आहे.
मर्दपणा आणि शिव्या
शिव्या देणाऱ्यांची भावमुद्रा नेहमीच उन्मत्त मर्दपणाचे दर्शन घडवणारी असते. नव्हे, ही भावमुद्रा समाजात मर्दपणाची द्योतक मानली जाते. नित्याच्या बोलाचालीत या शब्दांना हिंसक ‘मर्दपणा’ किंवा ‘विखारी मर्दपणा’ म्हणून संबोधले जाते. मर्दपणा या संकल्पनेला पूजणाऱ्या समाजात किंवा पितृसत्ताक समाजात या ‘मर्दपणा’ला एक मूल्य आहे, म्हणूनच विशिष्ट स्थानही आहे. हे मूल्य कुठे ना कुठे स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेला खतपाणी घालत असते. समजा, आपल्या घरातल्या सदस्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताबा मिळवायचा असल्यास, ज्या पद्धतीने तो हिंसेचा प्रयोग करतो, यात शिव्यांचासुद्धा समावेश असतो.
पुरुषवर्गासोबत कार्य करणारे कार्यकर्ते सतीश सिंह आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन करताना म्हणतात की, एका गावामध्ये दहा ते अकरा वर्षे काम केल्यानंतर मला अनुभव आला की, ९९ टक्के शिव्या या महिलाकेंद्रित असतात. या शिव्या महिलांची प्रतिष्ठा पुरती भंग करतात. पुरुषवर्ग शिव्या घालून समोरच्या व्यक्तीच्या सन्मानावरच आघात करत असतो.
महिलाही शिव्या का देतात?
मजेशीर गोष्ट आहे की, जेव्हा महिलाहीसुद्धा स्वतःमधली ‘दबंगगिरी’ दाखवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यादेखील महिलाकेंद्रित शिव्यांचाच वापर करतात. महिलाही इतरांपेक्षा स्वतःला उच्च समजायला लागतात. एकमेकींवर ओरडतात आणि शिव्यासुद्धा देतात. संधी मिळाली तर धक्काबुक्कीही करतात.
आपल्या ताकदीचे प्रदर्शन करायचे आहे, तर आपल्यालासुद्धा त्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल, ज्या मार्गाचा अवलंब मर्द पुरुष करतात, असे महिलावर्गाला वाटते. थोडक्यात, काही प्रसंगांत महिलासुद्धा पुरुषवर्गाप्रमाणे मर्द बनू इच्छितात. त्यांनासुद्धा असे वाटते की, ही ‘दबंगगिरी’ आत्मसात करण्यासाठी त्यांना पुरुषासारखे बनावे लागेल. अप्रत्यक्षपणे महिला कुठे ना कुठे मर्दपणाच्या धारणा घट्ट करत असतात. याच मर्दापणातून स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत, त्यांना अपमानित केले गेले आहे, याचा त्यांना विसर पडतो.
मुळात, मुद्दा असा आहे की, पितृसत्ताक व्यवस्थेने सर्वांनाच आपल्या नियंत्रणात आणले आहे. यामुळे आश्चर्य नाही की, मुलींमध्येसुद्धा पुरुषांप्रमाणेच शिवीगाळ करण्याची पद्धत रुळली आहे. त्या कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आई-बहिणीवरून शिव्या देतात. इंग्रजीमधील शिव्यासुद्धा त्यांच्या तोंडातून सरळपणे बाहेर पडतात.
शिव्यांबद्दल महिलांची मते
पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारी पूजा हिचे असे मत आहे की, मित्रांमध्ये बोलता बोलता शिव्या तोंडातून सहज बाहेर कशा पडतात, हेच कळत नाही. तिला या गोष्टी अगदीच सहज वाटतात.
पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अरुंधतीचे असे म्हणणे आहे की, मुलीसुद्धा त्याच शिव्या देतात, ज्या मुले देतात. शहरी वातावरणात वाढलेल्या या मुलींचे असे मत आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपट आणि वेबसिरीजमुळे शिव्यांना अगदी सहज (‘कूल’) मानले जाते. म्हणजे शिव्या या सध्या सहजसंवादाचा भाग बनल्या आहेत. जर तुम्ही शिव्यांचा वापर करत नसाल, तर तुम्हाला या दुनियेचे मानायला कुणीच तयार होणार नाही.
स्त्रियांनी शिव्या देणे बरे की वाईट?
एक प्रयोग करूयात. गुगल आणि यू-ट्यूबवर जरा शोधूया. यामध्ये आपल्याला अनेक व्हिडिओ मिळतील, ज्या व्हिडिओचे शीर्षक असेल – ‘औरत गालियां देती हुई, शॉकिंग!’ बघा! कशा प्रकारे महिला दांडक्याने मारत आहेत. बघा! कशा प्रकारे महिला शिव्या देत आहेत. नोएडाची गालीबाज महिला, वगैरे...वगैरे
यामध्ये प्रश्न असा आहे, आपल्याला पुरुषवर्गाने शिविगाळ केल्यास ती सहजप्रवृत्ती वाटते. पुरुषाचे शिव्या देतानाचे व्हिडिओ सहसा व्हायरल होत नाहीत. कारण? पुरुषांनी शिव्या देणे ही गोष्ट आपल्या समाजात पुरुषांची मक्तेदारी आणि स्वभावप्रवृत्ती मानली जाते. असेही म्हणा की, शिव्या देणे हा पुरुषांचा गुण आणि कर्तृत्व मानले जाते. जसे मर्दपणा हा गुण मानला जातो. यामुळे ना पुरुषांचे शिव्या देणारे व्हिडिओ मिळतात, ना त्यांचे शिव्या देणारे व्हिडिओ व्हायरल होतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पण, माझा मुद्दा असा आहे, शिव्या चांगला माणूस घडवतात? त्या आपणाला अहिंसक बनवतात? आपल्यामध्ये प्रेम आणि सद्भाव निर्माण करतात? आपल्या नात्यात दृढता आणतात?... आणि जर शिव्या देणे हा स्त्रियांच्या व्यक्तिमत्वावर आघात आहे, तर त्यामध्ये आपण समानता शोधायची कशाला? स्त्री असो वा पुरुष, जर ते स्त्री विरोधी शिव्यांचा वापर करत असतील, तर ते स्त्रीविरोधीच असणार.
आणखी एक गोष्ट, मुलींचे ‘रोल मॉडेल’ पितृसत्ताक मूल्यांची वाखाणणी करणारे मर्दानी पुरुष असतील? ही गोष्ट महिलांना कब्जात ठेवणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेला सबल बनवणारी नाही? समानता, मानवता आणि अहिंसा ही जर उदात्त मानवीय मूल्ये असतील, तर या मूल्यांचा स्त्री आणि पुरुष या दोघांनीही का स्वीकार करू नये? मुळात, म्हणजे वाईट गोष्टीत तुलना कुणाच्याही सन्मानावर आघात असतो. यामध्ये असमानता असते, यामध्ये हिंसेंची दुर्गंधी येते.
तर आता प्रश्न हा आहे की, जर मुले शिव्या देऊ शकतात, तर मुली का नाही देऊ शकत? माझ्या मते, हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. जर शिव्या देणे ही हिंसा आहे, तर ती मुलगी असो वा मुलगा, ते तर चुकीचंच आहे. शिव्या या माणसाला सर्वोत्तम बनवत नाहीत, तर त्या माणसाला क्रूर आणि हिंसक बनवतात. त्या एकमेकांविषयी द्वेष निर्माण करतात. अशा वेळी वाईट गोष्टींत समानता शोधायची तरी कशाला?
शिव्या देणे हे चुकीचेच
यामुळे महिलांना पितृसत्ताक समाज व्यवस्थेला सुरुंग लावयाचा असल्यास वा उत्मत्त मर्दानगीपासून स्वतः सुटका करायची असल्यास, फक्त अधिकारांची भाषा बोलून चालणार नाही, तर एक नवीन संस्कृती विकसित करावी लागेल. नवीन जीवन संस्कृतीसाठी काम करावे लागेल. संवादाची नवीन भाषा स्थापित करावी लागेल.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑक्टोबर २०२२च्या अंकातून साभार
अनुवाद : राज बोराडे
.................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख ‘बीबीसी-हिंदी’च्या पोर्टलवर १७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://www.bbc.com/hindi/india-62938489
................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment