राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी त्याचा उपयोग तो काय?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं बोधचिन्ह आणि एक पोस्टर
  • Tue , 04 October 2022
  • पडघम देशकारण भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi

भारतीय जनतेत धर्मनिरपेक्षतेची भावना वाढीस लावावी, दैनंदिन जीवनातील प्रश्नांना वाचा फोडावी आणि जनतेचे प्रश्न स्वतः समजून घ्यावेत, या उद्देशानं राहुल गांधी व काँग्रेस पक्षानं ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारीतून ‘भारत जोडो’ यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा सुमारे ३५०० किमी चालत काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. एकंदरीत १५० दिवस ही यात्रा चालणार असून दररोज किमान २५ मैल चालण्याचा, या यात्रेचा दंडक आहे.

काही नागरी समाजाने त्यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे; तर योगेंद्र यादव, गणेश देवी, बी.जी. कोळसे पाटील यांच्यासारखे काही नामवंत पुढारी, व्यक्ती व एनजीओचे कार्यकर्ते या यात्रेत सामील झाले आहेत. काहींनी या यात्रेला पाठिंबा दर्शवत ‘संविधान बचाव यात्रा’ काढल्या आहेत. परंतु ही यात्रा काढताना काँग्रेसने इतर धर्मनिरपेक्ष पक्षांशी कुठल्याही प्रकारचा विचारविनिमय केला नाही. अर्थात कोणी कोणता निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या यात्रेतून काँग्रेस पक्ष बळकट होण्यास मदत होईल, असं राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला वाटत असावं.

राजेशाहीच्या काळात जेव्हा राजे लोक युद्ध वा इतर मोहिमांवर निघत, तेव्हा ते प्रथम आपल्या राज्यातली परिस्थिती ठीकठाक करत. राज्यात काही गडबड आहे का? आपल्या विरोधात काही कटकारस्थानं चालू आहेत का? कोणी बंडाळी करण्याची शक्यता आहे का? याचा अंदाज घेत. तसं असल्यास त्याचा प्रथम बंदोबस्त करत. कुठल्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी सगळा लवाजमा नीटनेटका आहे की नाही, कोणी घातपात करण्याच्या प्रयत्नात नाही ना, याची काळजी घेऊन आणि आपल्या राज्याची जबाबदारी कोणा तरी सक्षम व्यक्तीवर सोपवून ते युद्धमोहिमेवर निघत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काँग्रेसमध्ये ज्या काही घटना घडल्या, त्यावरून राहुल गांधी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं अशी काही काळजी घेतल्याचं दिसत नाही. राहुल अधिकृतपणे पक्षाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी नसले तरी त्यांच्यावरच काँग्रेसची भिस्त आहे. त्यामुळे त्यांनी अशा दीर्घ मुदतीच्या व लांब पल्ल्याच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी पक्ष नीटनेटका करून बाहेर पडणं आवश्यक होतं. कारण त्यांनी यात्रा सुरू केल्याबरोबर त्यांच्या पक्षाच्या गोव्यातील ज्या आठ आमदारांनी पूर्वी मंदिरात जाऊन ‘आम्ही पक्षाशी व जनतेशी गद्दारी करणार नाही’ अशा आणाभाका घेतल्या होत्या, ते भाजपमध्ये गेले आहेत.

त्याचबरोबर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली. खरं तर ही निवडणूक अध्यक्षपदावरून - विशेषत: गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष व्हावा - पक्षांतर्गत धुसफूस चालू होती, त्या वेळी घेतली असती, जास्त बरं झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर सचिन पायलट यांना बसवावं, असं राहुल गांधी यांच्याशी विचारविनिमय करून ठरवण्यात आलं होतं. पण ही बाब त्यांच्या इतकी अंगलट आली की, केवळ राजस्थानच नव्हे तर अन्य राज्यांतील काँग्रेसचे सहानुभूतीदार असलेले विविध कार्यकर्ते, पत्रकार, बुद्धिजीवी आणि विचारवंत या सर्वांची काँग्रेस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे, अशी भावना झाली आहे. परिणामी यात्रेतून एक दिवसाची सवड काढून राहुल गांधींना दिल्लीला जावं लागलं.

काँग्रेसने ही अध्यक्षपदाची निवडणूक निदान ज्या वेळेस ‘जी २३’च्या रूपानं काँग्रेसमधील नेत्यांच्या असंतोषाचा स्फोट झाला, तेव्हा तरी घ्यायला हवी होती… म्हणजे निदान या कारणावरून कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद यासारख्या लोकांना पक्ष सोडून जाण्याचं निमित्त मिळालं नसतं. तेव्हा पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं टायमिंग चुकलं, असंच म्हणावं लागेल.

ज्यांना ‘जी २३’ असं म्हणतात, त्यात मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी कपिल सिब्बल काँग्रेस सोडून नुकतेच समाजवादी पक्षाच्या समर्थनावर राज्यसभेचे खासदार झाले आहेत. काल-परवा गुलाब नबी आजाद यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे. आणि आता शशी थरूर अध्यक्षपदाचे उमेदवार झाले आहेत. त्यांची गांधी घराण्यावरची निष्ठा डळमळीत असल्याने मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. ‘जी २३’मधील बरेचसे नेते त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय जवळ जवळ निश्चित आहे.

राहुल गांधींच्या या पदयात्रेमुळे भारत जोडला की नाही, हा बराच पुढचा मुद्दा आहे, मात्र ही यात्रा काढणाऱ्या काँग्रेसचे सध्या तरी तीन तेरा वाजत आहेत. त्याची फिकीर काँग्रेसने व राहुल गांधींनी आधी करायला हवी होती. या पदयात्रेबाबत काँग्रेसने काय विचार केला असेल, हे आत्ताच निश्चितपणाने सांगता येणार नाही. ही पदयात्रा काँग्रेस व राहुल यांना फलदायी ठरेल की नाही, हेही सांगता येणार नाही. मात्र एवढं नक्की आहे की, सध्या तरी काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे आणि पक्षनेतृत्वाला वास्तवाचं नीटसं आकलन नसावं, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की, राहुल गांधींनी ‘भारत जोडो’आधी ‘काँग्रेस जोडो’चा कार्यक्रम आखला असता, तर जास्त चांगलं झालं असतं. 

बऱ्याचशा परिवर्तनवादी, डाव्या, समाजवादी लोकांना काँग्रेसच भाजपला विरोध करू शकेल असं वाटतं. काँग्रेस सध्या जशी कशी असेल, पण देशव्यापी आहे. १८८५पासून तिचा धर्मनिरपेक्षतेचा नसला तरी सर्वधर्मसमभावाचा इतिहास आहे. त्यामुळे भाजपला विरोधक म्हणून काँग्रेस बऱ्याच जणांना आशादायक वाटते. त्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडीला सीपीआय, सीपीएम व इतर काही डाव्या पक्षांचा पाठिंबा होता.

याच कारणामुळे कन्हैयाकुमारने भारतीय कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या मते सध्या काँग्रेस डुबतं जहाज आहे. त्याला तरंगवणं, ही आपली जबाबदारी आहे. आणि याच उद्देशानं तो या पदयात्रेतसुद्धा सामील झाला आहे. त्यात तो धर्मनिरपेक्षतेच्या घोषणा देत असल्याचे, केरळमधल्या पद्मनाभन मंदिराच्या पायऱ्यावर ब्राह्मणी वेशात उभे असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. परिणामी इतर परिवर्तनवादी कार्यकर्त्यांप्रमाणेच कन्हैयाकुमारचं काँग्रेस वाचवण्याचं जे स्वप्न आहे, त्याची जबाबदारीसुद्धा राहुल गांधी व काँग्रेस पक्षनेतृत्वावर आहे. त्याची त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सोडून राजदशी सलोखा करून सरकार स्थापन केल्यानं भाजपविरोधी आघाडीबाबत अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. लालू यादव यांनी नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली. काँग्रेसशिवाय अशी आघाडी होणार नाही, असं बऱ्याच जणांना वाटतं. मात्र काँग्रेसच्या पडझडीमुळे त्यांच्या आशेवर पाणी फिरू शकतं आणि खुद्द काँग्रेसचीही ‘बार्गेनिंग’ची शक्ती कमी होऊ शकते. परिणामी भाजपला पर्याय निर्माण होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

त्यात भर म्हणजे सध्या भाजपच्या दडपशाही व दहशतीमुळे अनेक पक्ष हतबल झाले आहेत. कारण केंद्रातील भाजप सरकार स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते शरद पवार यांनी मोठ्या मुत्सद्धेगिरीनं स्थापन केलेलं महाविकास आघाडीचं सरकार भाजपने कोसळवून फुटीरांच्या मदतीनं सरकार बनवलं आहे. या महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख गेल्या ११ महिन्यांपासून जामिनाअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यांना अगदी परवापर्यंत साधा जामीनसुद्धा मिळू दिला गेला नाही. दुसरे एक माजी मंत्री नवाब मलिक यांना जुन्या जमीन खरेदी प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या निमित्तानं अटक करून तुरुंगात टाकलं आहे. त्यांनाही जामीन मिळालेला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतही तुरुंगात आहेत.

ही झाली आपल्या महाराष्ट्रातील स्थिती. त्यामुळे यांची निदान नावं तरी आपणाला माहीत आहेत. पण देशातील अनेक राज्यांत अशीच परिस्थिती आहे. तेथीलही अनेक दिग्गज नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम हे त्यापैकी एक नाव. खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी यांनाही ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात गुंतवून, वारंवार चौकशीला बोलवून, त्यांचीही दमछाक केली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परिणामी भाजपशी तुल्यबळ मुकाबला करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा आता नांगी टाकली आहे की काय, अशी शंका येते. नरेंद्र मोदी व भाजपबद्दल त्या आता पूर्वीसारख्या टीकात्मक राहिलेल्या नाहीत. या सर्व घटनांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती असेलच असं नाही. त्यांच्या परोक्षही बऱ्याच गोष्टी चालू असतात.

भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश, पाँडेचरी, महाराष्ट्र इत्यादी अनेक राज्यांतील विरोधकांची सरकारं पाडली आणि आपली सरकारं बनवली. त्यासाठी त्यांनी विरोधी आमदारांना विविध मार्गाने खरेदी करून, त्यांना आमिष दाखवून अथवा स्वायत्त संस्थांमार्फत तुरुंगात डांबण्याचा धाक दाखवून आपल्याकडे वळवून घेतलं.

अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी जनतेनं निवडून दिलेले आमदार-खासदार जर भाजप विविध मार्गानं स्वतःकडे ओढून घेत असेल आणि सरकार बनवत असेल, तर अशा यात्रेचा उपयोग तो काय? कारण आपण कोणालाही निवडून दिलं तरी सरकार मात्र भाजपचंच बनतं, असा प्रश्न मतदारांच्या मनात साहजिकपणे निर्माण होऊ शकतो. तेव्हा केवळ काँग्रेसनेच नव्हे, तर इतरही संसदीय पक्षांनी आपापले आमदार-खासदार सांभाळणं हेच आता प्राधान्यक्रमाचं काम झालं आहे. ते सांभाळूनच जनतेकडे गेलेलं बरं. नाहीतर ‘पुढे पाठ व मागे सपाट’ अशी परिस्थिती निर्माण होईल.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......