संगीताचे सूर, बंदुकीच्या गोळ्या आणि बॉलिवूडच्या इतिहासातला काळा अध्याय
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • गुलशन कुमार
  • Sat , 18 March 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar गुलशन कुमार Gulshan Kumar टी सिरीज T Series अक्षय कुमार Akshay Kumar व्हिनस Venus टिप्स Tips मॅग्नासाउंड Magnasound

काही दिवसांपूर्वीच टी सिरीजने एका चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन 'जॉली एल एल बी'फेम सुभाष कपूर करणार आहे आणि मुख्य भूमिकेत असणार आहे अक्षय कुमार! ही मुख्य भूमिका असणार आहे, टी सिरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार यांची. त्याचे रक्ताचे नातेवाईकच निर्माते असल्यामुळे हा बायोपिक ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा तयार करणाऱ्या बॉलिवुडच्या इतर बायोपिकसारखाच असणार, हे सांगण्याची गरज नाहीच. असो. गुलशनकुमार म्हटलं की, दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. पहिली म्हणजे, 'आशिकी'सारख्या चित्रपटातून त्यांनी आणलेलं नव्वदच्या दशकातलं संगीताचं सुवर्णयुग. दुसरी म्हणजे, ते जिथे नेहमी पूजेला जात त्या मंदिरासमोर अंडरवर्ल्डने केलेली त्यांची निर्घृण हत्या. हुसैन झैदीच्या 'डोंगरी ते दुबई' या पुस्तकातल्या एका प्रकरणात या हत्येचं थरकाप उडवणारं वर्णन आहे. गुलशन कुमार यांच्या अतरंगी गोष्टीतले संगीताचे सूर आणि बंदुकीच्या गोळ्या, यांचं जालीम मिश्रण त्यांना एक आदर्श बायोपिक व्यक्तिमत्त्व बनवतं, हे बाकी खरं! मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचा वेळोवेळी आढावा घेणाऱ्या चित्रपट-रसिकांना या चित्रपटाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा कालखंड आठवेल, हे नक्की.

नव्वदचं दशक अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होतं. व्हिनस, टिप्स, टी सिरीज, मॅग्नासाउंड अशा अनेक कॅसेट उत्पादन करणाऱ्या म्युझिक कंपनीज मार्केटमध्ये होत्या. त्या काळात चित्रपट संगीताला अनन्यसाधारण महत्त्व होतं. चित्रपटांच्या उत्पन्नाचा जवळपास अर्धा हिस्सा संगीताच्या विक्रीतून मिळायचा. चित्रपटाच्या कॅसेट्सवर त्या वेळेच्या रसिकांच्या उड्या पडायच्या. चित्रपटाचा हिरो नक्की होण्याअगोदर संगीत दिग्दर्शक बोर्डवर यायचा, यावरून त्या काळात संगीत दिग्दर्शकांचं महत्त्व किती वाढलं होतं, ते समजून येतं. या म्युझिक कंपन्या अतिशय आक्रमकपणे स्वतःच्या संगीताचं प्रमोशन करायच्या. नुकतीच तेजीत येऊ लागलेली खासगी चॅनेल्स आणि रेडिओ यावरून हे आक्रमक प्रमोशन व्हायचं. नव्वदच्या दशकात वाढलेल्या मुलांना हे आक्रमक प्रमोशन आठवत असेल. पहिले त्या कंपनीचा लोगो यायचा, मग त्याची विशिष्ट सिग्नेचर ट्यून वाजायची आणि नंतर गाण्यांचे ट्रेलर दाखवले जायचे.

आनंद-मिलिंद, नदीम श्रवण, अनु मलिक हे त्या वेळचे आघाडीचे संगीतकार होते. या म्युझिक कंपन्या अनेकदा चित्रपटांची निर्मितीही करायच्या. त्या वेळी चित्रपट संगीताची उलाढाल हजारो कोटींमध्ये होती, असं मानलं जातं. साहजिकच या मार्केटचा मोठा हिस्सा ताब्यात घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये अतितीव्र स्पर्धा होती. त्यातून इंडस्ट्रीमध्ये अनेक अनैतिक प्रवृत्तीही आल्या होत्या. तसंच आघाडीच्या प्रमुख तीन कंपन्यांच्या प्रमुखांमध्ये बरीच कटुताही निर्माण झाली होती. व्हिनस कंपनीचे रतन जैन आणि बंधू, टिप्सचे तौराणी बंधू आणि टी सीरिजचे गुलशन कुमार हे एकमेकांचे पाय खेचायची एकही संधी सोडत नसत. एक मजेशीर उदाहरण आहे. व्हिनस कंपनीने मन्सूर खानला दिग्दर्शक म्हणून घेऊन आणि आमीर खान आणि मनीषा कोईरालाला मध्यवर्ती भूमिका देऊन 'अकेले हम अकेले तुम' नावाचा चित्रपट काढला होता. हा चित्रपट म्हणजे 'क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर' या हॉलिवुड क्लासिकची अतिशय भ्रष्ट आणि वाईट हिंदी आवृत्ती होती. चित्रपटाच्या कथानकात हिंदी चित्रपट संगीतसृष्टीचे संदर्भ येतात. त्यात गुलशन कुमारचं कॅरिकेचर असणारं गुलबदन कुमार नावाचं एक पात्र सतीश शाहने साकारलं आहे. ते पात्र चित्रपटात अतिशय कारस्थानी आणि पाताळयंत्री दाखवलं आहे. बाकी कॅसेट कंपन्यांचा गुलशन कुमार यांच्यावर अतिशय रास्त असा राग होता.

गुलशन कुमार हा दिल्लीमधल्या फळविक्रेत्याचा मुलगा. तो अतिशय महत्त्वाकांक्षी माणूस होता. 'आपला जन्म फळं विकण्यासाठी झालेला नाही', यावर त्याचा पुरेपूर विश्वास होता. त्याने दिल्लीत स्वस्तात कॅसेट विकण्याचं दुकान सुरू केलं. हे छोटं दुकान म्हणजे टी सिरीजच्या भावी साम्राज्याचा पाया होता. गुलशन कुमारने चांगल्या आणि वाईट अर्थाने कॅसेट विक्रीच्या धंद्यात क्रांती आणली. गुलशन कुमारचा धंदा खरा बहरला तो भजन आणि तत्सम धार्मिक संगीताची निर्मिती करून. बऱ्याचदा या भजनांच्या व्हिडिओमध्ये गुलशन कुमारच हातात पूजेची आरती घेऊन भजनाला स्वतःचा चेहरा देताना दिसायचे. या व्हिडिओजमुळे गुलशन कुमारचा चेहरा घराघरात माहीत झाला. ही भजनं जुन्या हिट गाण्यांच्या चालीवर बेतलेली असत. कॉपीराईट कायद्यात त्या वेळी असणाऱ्या पळवाटांचा गुलशन कुमारने पुरेपूर वापर केला. त्याचबरोबर त्याने ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘आशिकी’ असं ओरिजिनल हिट संगीत असणाऱ्या चित्रपटांची निर्मितीही केली. भारतातल्या घराघरात कॅसेट संस्कृती पोचवण्याचं श्रेयही गुलशन कुमारलाच जातं.

गुलशन कुमार टिप्स आणि व्हिनस या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त किमतीत कॅसेट विकत असे. कितीही ठरवलं, तरी बाकी कॅसेट कंपन्या या बाबतीत टी सिरीजची बरोबरी करू शकत नव्हत्या. टिप्सचे तौराणी आणि व्हिनसचे जैन खानदानी उच्चभ्रू होते. दिल्लीहून आलेला एक फळविक्रेत्याचा पोरगा त्यांना आव्हान देत असल्याचं त्यांना खुपत होतं. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी चेन्नईच्या एका पॉश पंचतारांकित हॉटेलमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमधले सगळे दिग्गज जमले होते. तिथे त्यांनी गुलशन कुमार यांना हे किमतीचं युद्ध थांबवण्याची विनंती केली. नाहीतर इतरांना धंदा करणं अशक्य झालं असतं, असं सांगून अजिजीही केली. गुलशन कुमार यांनीही त्यांच्या विनंतीचा विचार करण्याचं आश्वासन दिलं, पण नंतर काहीच दिवसांनी गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या झाली. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई नदीम-श्रवणमधल्या नदीमवर आणि टिप्सच्या तौराणीवर झुकली. अंडरवर्ल्डशी संधान साधून त्यांनी ही हत्या घडवल्याचा आरोप झाला. हुसेन झैदीच्या पुस्तकानुसार अबू सालेम या गँगस्टरने ही हत्या घडवून आणली होती. गुलशन कुमारकडून अबू सालेमच्या ज्या आर्थिक अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यास गुलशन कुमार यांनी सरळ सरळ नकार दिल्यामुळे त्याने ही हत्या केली, असं त्याचं विश्लेषण समोर येतं. कारणं काहीही असोत, पण गुलशन कुमार यांच्या खळबळजनक हत्येने फिल्म म्युझिक इंडस्ट्रीचा सगळा लँडस्केप कायमचाच बदलून गेला.

बॉलिवुडभोवती असणारा अंडरवर्ल्डचा पोलादी पाश या निमित्तानं पुन्हा उघड झाला. 'आमच्या  वर्चस्वाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा आम्ही निर्घृणपणे काटा काढू', असा संदेश अंडरवर्ल्डने बॉलिवुडमध्ये पोचवला. व्हिनसचे रविंद्र जैन यांनाही अंडरवर्ल्डचा फटका बसला. त्यांनाही धमक्या यायला सुरुवात झाली. सगळी अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर काही काळापुरती का होईना, टी सिरीज चित्रपट संगीतापासून दूर झाली. काही काळानंतर सीडीजनी कॅसेट्सची जागा घेतली. चित्रपटाच्या गाण्यांच्या पायरेटेड सीडीज मार्केटमध्ये सहज उपलब्ध व्हायला लागल्या आणि सगळ्याच कॅसेट कंपन्यांचा धंदा बसायला लागायला. नंतर इंटरनेट युगात गाणी इंटरनेटवरून सहज  डाउनलोड करता यायला लागली. या सगळ्या घडामोडींमुळे म्युझिक इंडस्ट्रीचं सगळं अर्थकारण आमूलाग्र बदलून गेलं. एके काळी ऐन भरात असणाऱ्या म्युझिक कंपन्या आता तितक्याशा मजबूत राहिल्या नव्हत्या. बहुतेक म्युझिक कंपन्यांनी संगीत क्षेत्रातून अंग काढून घेतलं होतं आणि चित्रपटाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं होतं. इनमीन दहा वर्षांमध्ये तत्कालीन म्युझिक इंडस्ट्रीची अशी धूळधाण उडाली!

स्टुडिओच्या आगमनानंतर गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवुड कार्पोरेट बरंच संघटित झालं आहे. सध्या मार्केटमध्ये झी म्युझिक, युनिव्हर्सल, सोनी म्युझिक अशा कंपन्या आहेत. टी सिरीजनेही दणदणीत पुनरागमन केलं आहे; पण भारतीय चित्रपट म्युझिक इंडस्ट्रीचा सर्वोच्च वैभवाचा काळ मागे पडला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. या इंडस्ट्रीने अंडरवर्ल्डचा घाव सोसला, पण इंटरनेटच्या आघातातून ही इंडस्ट्री अजूनही सावरली नाहीये. 'इंटरनेट' नावाच्या बाटलीतून बाहेर पडलेल्या राक्षसाचं काय करायचं, हे त्यांना अजून नीट उमगलेलं नाही. बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा तंत्रज्ञान कधीही किती बलवत्तर असतं, हे या उदाहरणावरून कळतं. गुलशन कुमारवरच्या चरित्रपटात हा सगळा इतिहास सुभाष कपूर कसा दाखवतो, हे बघणं त्यामुळेच औत्सुक्याचं ठरणार आहे .

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

anirudh jadhav

Sat , 18 March 2017

बॉलीवुड आणि गुन्हेगारी जगाचे संबंध हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या स्थापनेपासून आहेत. त्यातल्या एका महत्वाच्या घटनेवर ह्या लेखातून खूप चांगला प्रकाश टाकला गेला आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......