पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम आवश्यक आहेच, पण त्याबाहेर मुलं खूप काही शिकतात. ते गृहपाठातच गृहीत धरायला हवं
पडघम - राज्यकारण
अनिल कुलकर्णी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 04 October 2022
  • पडघम राज्यकारण होमवर्क Homework अभ्यास Study शाळा School मुलं Kids पालक Parents

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी गृहपाठ बंद करण्याची टुम काढली, पण त्याचे तरंग ज्याप्रमाणे उठायला पाहिजे होते, तसे काही उठले नाहीत. काही मोजक्या शिक्षणतज्ज्ञांनी व वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली. शिक्षणतज्ज्ञांचा एकंदर सूर असा आहे की, गृहपाठ बंद न करता त्याची पुनर्रचना करण्यात यावी… जेणेकरून तो आनंददायी होईल. मूल प्रत्येक क्षणाला स्वतःहून बऱ्याच गोष्टी निरीक्षणातून आणि अनुकरणातून शिकतं. त्यामुळे गृहपाठाची संकल्पनाच बदलायला हवी. पारंपरिक गृहपाठात वर्गपाठातलंच कार्य पुन्हा घरी करायला सांगण्यात येतं. ते पक्क व्हावं, विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं, हा त्यामागचा उद्देश असतो, पण त्यात नावीन्य नसल्यामुळे मुलांसाठी कंटाळवाणा होतो आणि त्यांच्यातील वर्तन-बदल केवळ लिखित स्वरूपात तपासणं शिक्षकालाही अवघड होऊन बसतं.

सध्याच्या गृहपाठाची स्थिती हा एक प्रकारे पाट्या टाकू प्रकार झाला आहे. शिक्षक तो देतात, कारण आदेश व परिपत्रक या चौकटीत त्यांना काम करावं लागतं आणि विद्यार्थी तो निमुटपणानं करतात किंवा पालकाकडून करवून घेतात.

करोनाच्या दोन वर्षांच्या काळात मुलांनी खरं तर गृहपाठच केला. त्या माध्यमातून त्यांनी जे काही शिक्षण मिळवलं, त्याचं आकलन केलं आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर केला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. काही संस्थांनी मुलांमध्ये कौशल्यं रुजावीत म्हणून एक महिनाभर वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करायला लावल्या आणि त्यांना त्या कितपत आत्मसात झाल्या, याची चाचपणी केली. मुलांनी हळूहळू एखादी गोष्ट सातत्यानं केली, तर त्या कौशल्यावर ती मात करू शकतात, पण त्याचा सराव होण्यासाठी त्यांना वेळ हवा. उन्हाळ्याच्या शिबिरात मुलं एखादं कौशल्य शिकण्यासाठी प्रचंड पैसे देऊन विविध गोष्टी शिकतात, पण त्यात सातत्यं नसल्यानं नंतर ती विस्मरणात जातात.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गृहपाठाच्या संदर्भात वर्गातल्या गोष्टी वर्गपाठ व घरात मुलं ज्या गोष्टी करतात, त्याला गृहपाठ समजून त्याची नोंद घेतली जायला हवी. तशी यंत्रणा आपल्याला तयार करावी लागेल. मुलांना वर्गातल्या पाठावरचे प्रश्न देण्याऐवजी माझा कालचा दिवस कसा गेला, यावर आठवड्यातून एकदा लिहायला सांगावं. मग कोणी कोणत्या विषयाचा अभ्यास केला, कशाच्या माध्यमातून केला, आई-वडिलांनी सांगितलेली कोणती कामं केली, या सगळ्याचा वर्गातल्या अध्यापनाशी संबंध जोडायला हवा. काही मुलं बराच काळ काहीच करणार नाहीत. त्याची नोंद करायला हवी आणि या वर्गपाठामध्ये त्याचं एकदा सामूहिक वाचन घ्यावं, म्हणजे विद्यार्थी आपापसात ठरवतील की, आपण कुठे आहोत, आपल्यापेक्षा कोण काय वेगळं करतं. याचा परिणाम नेमका काय होतो, हे शिक्षकांनी वर्गात इतिवृत्त म्हणून सादर करावं.

एके दिवशी मुलं गणित शिकतील, एके दिवशी मराठी शिकतील. व्यवहारात ज्याच्याशी संबंध येईल, त्याचा सहसंबंध त्यांना जोडता यायला हवा. आज आईने स्वयंपाकघरात मदतीला बोलावलं, तर कोणती मदत केली, कशा प्रकारे केली, हे त्यांनी लिहून काढावं, म्हणजे साधारण कोणत्या गोष्टींतून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला, कोणत्या गोष्टींतून इतर मूल्यं रुजली, याची चाचपणी शिक्षकाला करता येईल.

शाळेतून आल्यानंतर, जेवायला बसण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर, हात स्वच्छ धुणं, जेवल्यानंतर ब्रश करणं, या सर्व बाबी ते यथायोग्य करतात का, हे पाहायला हवं. त्यातून त्यांच्या आरोग्याच्या सवयी कळतील. करोना संपल्यानंतर आरोग्याच्या सवयी पूर्ववत झाल्या का? जर झाल्या असतील तर ती कौशल्य त्यांच्यात रुजली नाहीत, असंच म्हणावं लागेल. म्हणून पाठ्यपुस्तकातील गृहपाठाचा फक्त परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी फायदा होईल, पण दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी करत असताना मुलांना जीवन कौशल्यं शिकायला मिळतील… जी पुढच्या आयुष्यात कामाला येतील.

खेळण्यातून त्यांची शरीरयष्टी चांगली राखली जाईल, मनोरंजनातून त्यांचं मन सुदृढ होईल, फिरण्यातून त्यांना निसर्गाचं निरीक्षण करण्याची संधी मिळेल. बागेत फेरफटका मारताना पानांचे विविध आकार, फुलांचे विविध प्रकार, स्त्रीकेशर-पुंकेसर यांचं निरीक्षण करून मुलांनी नोंदी केल्या, तर ती एक घटक शिकली, असं म्हणायला हरकत नाही. आपण मुलांना निरीक्षणाची, विचार करण्याची संधीच देत नाही.

घरी आल्यानंतर मुलं एखादं गोष्टीचं पुस्तक वाचत असतील, तर त्यातून त्यांना नैतिक गोष्टींचं, सामान्यज्ञानाचं आकलन होईल. शाळेतला गृहपाठ केला नसेल, पण ‘कोन बनेगा करोडपती?’ पाहिलं तर त्यातील सामान्यज्ञानातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा उंचावेल. सगळ्या गोष्टींचा केवळ परीक्षाकेंद्रीच विचार न करता मुलांमध्ये जीवनातल्या यशापयशाचा विचार रुजायला हवा.

काही मुलं लहान वयातच ऑटोमोबाईल व इतर व्यवसायातील तंत्रं अवगत करतात. हा तर भावी आयुष्याचा गृहपाठच आहे. प्रत्येक मुलानं जर त्याच्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये थोडा हातभार लावला, तर तोही गृहपाठच आहे, हे आम्ही कधी गृहीत धरणार? आणि गृहीत धरलं तरी त्याची नोंद कधी करणार? आम्ही नोंदीच करत नाही, आमची मुलं अभ्यासक्रमाबाहेरच्या खूप गोष्टी शिकत असतात, पण त्यांचीही नोंद होत नाही.

सचिन तेंडुलकरने शाळा शिकत असतानाच क्रिकेटचं कौशल्य जोपासलं, त्याच्यावर प्रेम केलं, ते वाढवलं, म्हणून तो ‘भारतरत्न’पर्यंत जाऊन पोहोचला. वर्गातला गृहपाठ त्याने एखाद्या वेळेस केलाही नसेल, पण आपल्याला जे आवडतं ते मन लावून केलं. पण आजच्या पालकांना वर्गपाठ, गृहपाठ, शिकवणी यांच्या माध्यमातून मुलांना परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील आणि आपल्या मुलाचा नंबर मेडिकल वा इंजिनिअरिंगला कसा लागेल, यातच जीवनाची कृतार्थता वाटते.

गृहपाठ बंद झाला तरी पालकांचं नियोजन ठरलेलं आहे. घोकमपट्टी करून घेणं, भरमसाठ फी देऊन चांगल्या शिकवणीला घालणं आणि परीक्षेत गुणवत्ता यादीपर्यंत जाऊन पोहोचणं… आणि मग मुलांना परदेशात पाठवणं... बाजारात कोचिंग, गाईड, मार्गदर्शिका असं सर्व काही पुरवणाऱ्या अनेक संस्था, प्रोजेक्ट पूर्ण करून देणाऱ्या संस्था हात जोडून उभ्या आहेत. त्यामुळे गृहपाठाला विचारतं कोण?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘एकदा काय झालं?’ या मराठी चित्रपटात लहान मुलांना रोल प्ले मेथडच्या माध्यमातून शिक्षण कसं परिणामकारक होतं, हे दाखवलं आहे. गोष्टीच्या माध्यमातून केलेलं अध्यापन मुलांच्या कसं लक्षात राहतं, हे दाखवलं आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी गृहपाठाचा सहसंबंध जोडता आला पाहिजे. गृहपाठ वेगळा नाही, तो अभ्यासाचाच भाग आहे. शिकवलेला अभ्यास समजावा, त्याचं चिंतन, मनन व्हावं म्हणून तो दिलेला असतो. पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम आवश्यक आहेच, पण त्याबाहेर मुलं खूप काही शिकतात. ते गृहपाठातच गृहीत धरायला हवं.

मुळात गृहपाठाची संकल्पना व व्याप्तीला नव्यानं सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. कल्पनेला वाव देणारा गृहपाठ हवा. गृहपाठ यांत्रिक क्रिया नको. लादलेला गृहपाठ नको, तर आनंदानं ओथंबलेला गृहपाठ हवा. गृहपाठ पाठ्यपुस्तकातून न देता अवतीभवती असलेल्या सुंदर गोष्टींच्या आकलनासाठी देण्यात यावा. पण कशाला गृहपाठ म्हणावा, याचं स्वातंत्र्य शिक्षकांना, पालकांना कुठे आहे?

करोना-काळामध्ये शाळा बंद होत्या. त्याचे परिणाम आपण अजून भोगत आहोत. गृहपाठ बंद करायला नको, हाच बहुतांश पालकांचा, शिक्षकांचा कल आहे. बंद म्हटलं की, आपण त्याच्याकडे एकदम पाठ फिरवतो. आठवीपर्यंत नापास करायचं नाही, हा विचार वेगळ्या पद्धतीनं घेतला गेला आणि मुलांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली. तसं गृहपाठाचं होऊ नये. स्वयंअध्ययनाची जाणीव आली की, मुलं आपोआपच गृहपाठ करतात. ती निर्माण करण्याचं काम शिक्षण व्यवस्थेनं करायला हवं.

.................................................................................................................................................................

अनिल कुलकर्णी

anilkulkarni666@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......