कोविड-१९ महामारीमध्ये जगभरात जवळपास दीड कोटी बालके आई-वडिलांचा किंवा काळजीवाहू व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनाथ
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
ज्यूड कोलमन
  • Credit: Jaipal Singh/EPA-EFE/Shutterstock
  • Mon , 03 October 2022
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना Corona कोरोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड-१९ Covid-19

भारताच्या संदर्भाने इव्हेंटच्या महापुरात कोविड महामारी आता कोणती तरी दूरस्थ घटना भासत असली तरीही, जगात अजूनही कोविड-काळात झालेल्या सामाजिक-आर्थिक उलथापालथींची मोजदाद केली जात आहे. घडलेल्या घटनांचे अर्थ लावून भविष्यातल्या आव्हानांचा अदमास घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच कोविड-काळात आई-वडील किंवा यापैकी एक आधार गमावलेल्या बालकांच्या निराधार अवस्थेवर आणि त्यावरच्या उपायांवर प्रसिद्ध ‘नेचर’ या जागतिक ख्यातीच्या मासिकाने आकडेवारी-अहवालाद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. सून्न करणाऱ्या त्या टिपणाचा हा साभार अनुवाद...

.................................................................................................................................................................

आताच्या घडीला सबंध जगभरातच कोरोनाची साथ जवळपास आटोक्यात आल्याची स्थिती आहे. तरीही कोरोनापश्चात शारीरिक-मानसिक-भावनिक गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी जगाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, असा इशारा देशोदेशीचे तज्ज्ञ देत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर २०२२ रोजी ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’च्या ‘जेएएमए पेडिआट्रिक्स’तर्फे प्रकाशित होणाऱ्या मासिकात कोविड-काळात निराधार झालेल्या जगभरातल्या बालकांच्या स्थितिगतीवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल छापण्यात आला आहे. त्यानुसार कोविड-१९ महासाथीमध्ये जगभरात जवळपास दीड कोटी बालके आई-वडिलांचा किंवा काळजीवाहू व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनाथ झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

याआधी केलेला अंदाज चुकवत वाढलेला हा आकडा शासनकर्त्यांची सर्वार्थाने काळजी वाढवणारा आहे. ज्या देशांतल्या बालकांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला आहे, त्यात भारत, इंडोनिशिया आणि इजिप्त या तीन देशांचा समावेश आहे. याचसोबत संबंध आफ्रिका खंड आणि दक्षिण आशियाई देशांनी कोविडचा कहर अनुभवला आहे. ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ने जाहीर केलेली ही तिसरी सुधारित आकडेवारी आहे आणि ती वास्तवाचे अधिक निकटचे दर्शन घडवणारी आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पोरके जग

याआधी संस्थेने महासाथीच्या १४ महिन्यांनंतर पहिले सर्वेक्षण केले होते, त्यात १८ वर्षांखालील जवळपास १५ लाख मुले-मुली निराधार झाल्याचे पुढे आले होते. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा एकदा सर्वेक्षण केले गेले, तेव्हा कोविडची भयावहता खऱ्या अर्थाने पुढे आली. तेव्हा जगात कोविड साथीच्या आधीपासून जवळपास १४ कोटी बालके या ना त्या आपत्तींमुळे निराधार झालेली होतीच, पण आता त्यात कोविडमुळे निराधार मुलांची भर पडली.

या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी संस्थेला १ जानेवारी २०२० ते १ मे २०२२ या कालावधीतल्या जागतिक आरोग्य संघटनेकडील प्रमाणापेक्षा अधिक मृत्यूची झालेली नोंद उपयोगी आली. ‘सिएटल’ आणि वॉशिंग्टनमधल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’ने केलेले कोटेकोर सर्वेक्षण तसेच ‘दी इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने केलेल्या संशोधनपर अभ्यासाची प्रत्येक देशातल्या एका मृत्यूमागे किती बालके एकटी पडली, याचा शोध घेण्यास मोलाची मदत झाली.

ज्या प्रारूपाच्या आधारे ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ने हा अहवाल मांडला आहे, त्यानुसार जगभरात तब्बल ७५ लाख मुलांनी आई-वडील किंवा दोघांपैकी एकाला या महासाथीच्या काळात गमावले आहे. तर १ कोटी ५ लाख मुला-मुलींनी आई-वडिलांसह आपले इतर पालक किंवा सांभाळकर्ते गमावले आहेत. इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात साथरोगविज्ञानतज्ज्ञ असलेल्या सुझान हिलिस यांच्या मते, जगभरात जशा चाचण्या वाढल्या आणि विकसनशील देशांना महासाथीच्या काळात जसजशी आपल्याकडची आकडेवारी जागतिक स्तरांवरील संस्था- संघटनांपर्यंत पोहोचवली, तसे निराधार होत गेलेल्या बालकांची सरासरी वाढत गेली आहे. आपल्या आई-वडिलांचा किंवा सांभाळकर्त्यांचा कशाने बळी गेला आहे, हे या मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीये. तर आपले पालक-सांभाळकर्ते मरण पावले आहेत, आणि आपण जगात एकटे आहोत, ही त्यांच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक बाब ठरली आहे, अशीही टिप्पणी हिलिस यांनी यानिमित्ताने केली आहे. ती अंगावर काटे आणणारी आहे.

आयुष्यभरासाठीची आव्हाने

आई-वडील किंवा इतर सांभाळकर्त्यांचे छत्र हरपणे, ही कोणाही देशातल्या बालकासाठी आयुष्यभराचे दैन्य देणारी बाब ठरू शकते. ज्या धक्क्यातून ही मुले जातात, किंवा आपल्या डोळ्यांदेखत आई-वडिलांचा वा सांभाळकर्त्यांचा मृत्यू पाहण्याची वेळ त्यांच्यावर येते, त्यातून पुढील आयुष्यात मानसिक आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीचे, सामाजिक छळाचे किंवा सततच्या आजारपणाचे बळी ठरण्याची खूप अधिक शक्यता त्यांच्यासंबंधाने निर्माण होत असते. अर्थात, शासनकर्ते आणि समाज संवेदनशील असेल, तर सुझान हिलिस यांच्या मते, काही प्रमाणात यातून उद्भवणाऱ्या समस्या सोडवता येऊ शकतात, पण त्यासाठी पहिली अट हे दोन्ही घटक सजग नि संवेदनशील असणे अत्यंत आवश्यक असते, हे ओघाने आलेच. अशा वेळी सुस्थित नागरिकांनी आपल्या आसपास कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांची वेळीच दखल घेऊन त्यांचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा हात पुढे करत राहणे अत्यंत आवश्यक बनते.

सुझान हिलिस असेही सुचवतात की, याआधीच्या काही दशकांत एचआयव्ही-एड्समुळे मरण पावलेल्या पालकांच्या पश्चात मागे राहिलेल्या बालकांच्या अवस्थांचा देशोदेशीच्या तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे. त्यातून या निराधार मुला-मुलींच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या पायाभूत उपाययोजना विविध संस्था-संघटनांमार्फत आजवर सर्वदूर राबवल्या गेल्या आहेत. तोच अनुभव आता कोविडपश्चात जगाला उपयोगात आणायचा आहे. म्हणजे असे की, कोविडच्या लाटेत एकटे पडलेल्या बालकांसाठी सर्वप्रथम शैक्षणिक आधार देणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. दुसरे म्हणजे दैनंदिन गरजा भागण्यासाठी या बालकांना आणि त्यांच्या मागे राहिलेल्या सांभाळकर्त्यांना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता आर्थिक मदत पुरवणे महत्त्वाचे राहणार आहे. एवढे जर साधले तर, ही मुले धक्क्यातून सावरतील आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पावले टाकण्याचा प्रयत्न करून पाहतील.

अर्थात, हे झाले आदर्शवचन. वस्तुस्थिती ही आहे की, जगात अमेरिका आणि पेरू या दोनच देशांनी कोविड-१९च्या महासाथीत पोरके झालेल्या मुला-मुलांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन, त्या दृष्टीने उपाययोजनांना वेग दिला आहे. अशाच प्रकारे आपली जबाबदारी ओळखून उर्वरित जगालाही पुढाकार घ्यावा लागणार आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या आव्हानात्मक काळात एकट्या अमेरिकेत पाचामधल्या एका नागरिकाला अजूनही कोविडचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याचा अर्थ अजूनही काही टक्के नागरिक कोविडने लादलेल्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. याचा एक अर्थ असा आहे, अमेरिकेतले जवळपास ४० लाख प्रौढ नागरिक या घडीला बेरोजगारीचा सामना करत आहेत. त्यांच्या हातांना काम नाही, खायला अन्न नाही. ही सधन-संपन्न अमेरिकेची सध्याची अवस्था आहे. अशा प्रसंगी अधिकचे संशोधन आणि अधिकची आकडेवारी आवश्यक आहे. जेणेकरून निराधार मुलांच्या समस्यांबरोबर मागे राहिलेल्या मुलांचा सांभाळ करू पाहणाऱ्यांच्या आर्थिक क्षमतांचाही अचूक वेध घेऊन एकल पालकांसाठी वा सांभाळकर्त्यांसाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवता येतील.

हा काळ आढेवेढे न घेता मदतीचा हात पुढे करण्याचा आहे. अशा प्रसंगी, जी बालके, जी षोडशवर्षीय मुले-मुली आघात पचवून स्वतःला सावरू पाहताहेत, जी बहिष्कृत होणार नाहीत, त्यांना समाजावरचा कलंक मानला जाणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे. ते ज्या परिस्थितीतून गेलेत वा जाताहेत याच्याशी त्यांची ओळख जोडणे योग्य ठरणार नाही. कारण, कोणतीही आपत्ती इतर दैनंदिन आव्हानांसोबतच भेदाभेदाचेही दुष्टचक्र सोबत घेऊन येत असते. त्याचा फटका बळींना बसत असतो.

सरतेशेवटी एक गोष्ट ठामपणे म्हणता येते ती म्हणजे, लहान मुले-मुली बळीक्षम-अत्याचारक्षम असली तरीही, त्यांच्यात परिस्थितीवर मात करण्याचा विलक्षण असा तितिक्षाभावही बसत असतो. हीच पीडित जगाला तारून नेणारी जादुई मात्रा ठरते.

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑक्टोबर २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘नेचर’ या मासिकाच्या पोर्टलवर १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.nature.com/articles/d41586-022-02941-z

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......