भारत काय शिकला कोरोना महामारीपासून? काही शिकला की नाही?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सलील जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 03 October 2022
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना Corona कोरोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड-१९ Covid-19

कोरोना महामारीत एकच गोष्ट काहीशी दिलासा देणारी होती, ती म्हणजे या महामारीचा भारतातील कमी प्रादुर्भाव. लोकसंख्येत जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाने या रोगावर आश्चर्यकारकरित्या काबू मिळवला असं वाटत होतं. २०२० वर्षाच्या सुरुवातीस अगदी चार तासांच्या अवधीत एवढा मोठा देश बंद करून तेथील व्यवस्थेने त्याचा प्रसार कदाचित कमी केला होता. तसंच करोनाचा एका विशिष्ट वयोगटात होताना दिसत होता. त्याचबरोबर मोठी शहरं व निमशहरी विभागात तो जास्त पसरत होता. सुरुवातीस जगातील इतर देशांप्रमाणे जर भारतातसुद्धा मृत्यसंख्या वाढीस लागली, तर एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर होईल, अशी जी भीती होती, ती त्यामानाने कमी मृत्यूदरामुळे नाहीशी झाली होती.

‘आपण करोनावर कशी मात केली’ याची प्रत्येक भारतीयाकडे तयार कथा होती. कोणी म्हणे की, आपल्याकडे असलेल्या तरुण वर्गामुळे आपण वाचलो, कारण हा रोग तरुणांना होत नाही. कोणी म्हणत की, भारतात प्रत्येकाला बालपणी मिळणाऱ्या रोगप्रतिकारक इंजेकशन्समुळे भारतीयांत कोरोनाशी लढण्याची क्षमता आलेली आहे. काहींच्या मते आपल्याकडे असलेल्या वातावरणामुळे लहान-सहान जंतूंशी आपला सामना अगदी बालपणापासून होत असल्याने कोरोना वाढू शकला नाही. यापैकी कुठल्याही कारणास वैज्ञानिक आधार न मिळत नव्हता, तरी असे अनेक पोकळ सिद्धान्त तरंगत होते.

बरं, एक सहवाद असाही होता की, या महामारीची लस येताच ती बनवण्याची सगळ्यात उत्तम व्यवस्थाही आपल्याच देशांत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमुळे होऊ शकते. तसेच भारतात प्रतिबंधक लसी देण्याची व्यवस्था, त्याच्या जाहिरातीचे तंत्र हे अगदी हल्लीच संपलेल्या पोलिओ अभियानामुळे तयार आहे. त्यामुळे जनमानसात एक निर्धास्त वातावरण तयार होते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२०२०च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून दूरचित्रवाणीवर किंवा आप्तेष्ट-मित्रांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येत होते की, एका कुठल्या तरी सामूहिक आत्मविश्वासावर सगळी मंडळी आपापल्या कामास लागली होती. हा आत्मविश्वास कोणत्या वैद्यकीय कारणांवर आधारित होता, याचे उत्तर कोणीही देत नव्हते. म्हणजे काल-परवापर्यंत अतिशय वेगाने पसरणारा कोरोना असा अचानक काहीही न करता कसा गेला, असा साधा प्रश्नही कोणी विचारताना दिसत नव्हते. त्यामुळे लग्नकार्य, प्रवास या सगळ्यांना ऊत येताना दिसत होता.

अर्थात ज्यांचे पोट रोजच्या घराबाहेर जाण्यामुळेच चालतं, त्यांना घरात बसून राहणं, हा पर्याय नसतो आणि अशांची संख्याही जास्त असणार, हे उघड होतंच. पण सगळ्याच बाहेर पडणाऱ्यांना हा प्रश्न होता, असं म्हणणं धाडसाचंच ठरेल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनासंक्रमित व्यक्तींची संख्या, वाढता मृत्युदर, वैद्यकीय उपकरणांची कमतरता, हे बघता भारतीय व्यवस्था अत्यंत गाफिल राहिली, असंच म्हणावं लागेल.

जगात आजच्या घडीस फाजील आत्मविश्वासानं, स्वतःच्या देशास अत्यंत हातघाईच्या परिस्थितीत ढकलण्याचं जर कुठलं उदाहरण शोधावयाचं असेल तर अमेरिकेकडेच बोट दाखवावं लागेल. अतिशय घिसाडीघाईनं नियोजन केल्यानं लाखोंच्या संख्येनं इथं प्राणहानी झाली. पण एरवी जगण्याच्या प्रत्येक गोष्टीस अमेरिका प्रमाण मानणाऱ्या भारतीय समाजास व सरकारास तेथील चुकांमधून बोध घेण्याची थोडीही इच्छा होऊ नये, याचं आश्चर्य वाटतं. रोजच्या बातम्यांमध्ये अमेरिकेचे वाभाडे काढणाऱ्या कुठल्याही समाजमाध्यमास तेथील लोकांच्या कृतीनं किंवा सरकारच्या धोरणानं, तसंच हल्ली होत असलेल्या काही चांगल्या कृतीनं भारतात सार्वत्रिक समज निर्माण होईल, असं काही करावंसं वाटू नये, ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेच्या अनुभवांवरून एक अदृश्य शत्रू चाल करून येणार आहे आणि पुढील काही दिवस व रात्री वैऱ्याचा आहेत, हे न समजू शकणारी समाज व शासकीय व्यवस्था असणं, हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल.

दुकटी ती गर्दी

भारत व इतर युरोपियन देशांप्रमाणे अमेरिकेत कोरोना लाट अशी कधीच नव्हती. मार्च २०२०पासून अमेरिका हा खऱ्या अर्थानं या विषाणूने वेढला गेला होता. फार फार तर लागण झालेल्यांच्या संख्येत थोडी फार घट मधूनमधून जाणवत असे. जर अगदी वर वर निरीक्षण केल्यास कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ ही सणासुदीच्या दिवसांनंतर प्रकर्षाने जाणवत होती. म्हणजे ‘मेमोरियल डे’ (मे २०२०), ‘थँक्स गिविंग’ (नोव्हे. २०२०), नाताळ व नवीन वर्ष (जाने २०२१), शाळा-कॉलेजेसना लागणारी सुट्टी (फेब्रु २०२१). त्या नंतर बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा व त्यातून त्या भागात पसरलेला कोरोना हे समीकरण पुराव्यासकट सिद्ध झालेलं होतं. तसंच सध्याचे अध्यक्ष बायडन यांनी घरी बसून केलेला यशस्वी प्रचार हा एक मार्गदर्शकच ठरावा, असा दिसत होता.

या पार्श्वभूमीवर उत्तराखंडात हरिद्वारला झालेला कुंभमेळा, प. बंगाल वर इतर राज्यांत झालेल्या निवडणुका, त्यातील नेते मंडळींची मुखपट्टी न वापरता केलेली भाषणं, रोड शोज हे अचंबित करणारं होतं. हे टाळणं सहज शक्य नव्हतं का?

विषाणूचं राजकारण

अमेरिकेतील २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारानं देशाची एक प्रकारे फाळणीच केली होती, असंच म्हणावं लागेल. लोकांची वर्गवारी करताना नकळत मास्कसारख्या ७५ अमेरिकी पैशांत एके काळी मिळणाऱ्या क्षुल्लक गोष्टीचं राजकारण होताना दिसत होतं. त्यावरून तरी बोध घेऊन भारतीय राजकारण्यांनी, ज्यात काहींकडे अमाप प्रसिद्धी व जनमानसाचा कौल आहे, त्यांनी राजकारणापासून फारकत घ्यायला हवी होती. महाराष्ट्रासारखा पुरोगामी राज्यात चालू असलेलं राजकीय टोळीयुद्ध हे अतिशय लाजीरवाणी होतं. त्याला जबाबदार कोण किंवा चूक कोणाची हा विचार नंतर करता येईल, पण जो विखार राजकारण्यांमध्ये दिसून येत होता, त्यात मूळ विषाणू व्यवस्थापनाचा विचार कुठे तरी हरवलेला दिसत होता.

लस उत्पादन व व्यवस्थापन

अमेरिकेतील कोरोनाच्या सुरुवातीचा काळात ‘सेंटर फॉर डीसीस कंट्रोल’ या संस्थेने काही अगम्य कारणामुळे परदेशी यशस्वी असलेल्या कोरोना टेस्ट किटची निर्मिती अमेरिकेत होऊ दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, कोरोनाशी अमेरिकेला लढाईच्या पहिल्याच फेरीत टेस्ट किटअभावी निदान करणं अशक्य  होऊन पराभव पत्करावा लागला. पण अशी चूक अमेरिकेने लस निर्मितीच्या वेळेस केली नाही. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना भरपूर आर्थिक मदत, तसंच कुठल्याही अपयशाला जबाबदार न धरण्याची हमी ही आधीच देण्यात आली. तसंच ‘मर्क’ आणि आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या दोन्ही कट्टर व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वैरभाव विसरून एकाच लसीचं उत्पादन करण्यास सांगण्यात आलं. म्हणजे तीन लसींवर अमेरिकेतील चार मोठे उत्पादक काम करत होते.

भारतात सिरम हे मोछं नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. सिरमचा जगभरात दबदबा या त्याच्यावरील विश्वासाने तयार झाला आहे, यात वादच नाही. आज जगातील दोन तृतीयांश बालकांना इतर रोगांसाठी सिरमनिर्मित लस मिळते. तरीही त्या प्रकारच्या लसींचं उत्पादन करणारा एकच उत्पादक सगळ्या भारतास पुरेल असं वाटणं, हे अनुभवशून्यतेचंच लक्षण मानावं लागेल. सिरमला सरकारकडे ३००० कोटी रुपयांची मदत, तसंच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना कच्च्या मालाची मदत मागावी लागली, हे दुर्दैवी होतं. आणि ही मदत मागताना त्यांना समाजमाध्यमांची मदत घ्यावी लागली, म्हणजे त्यांना दिल्लीहून कुठलीही राजनीतिक मदत मिळत नसणार, हे उघड आहे.

तसंच महाराष्ट्रात असलेली हाफकिनसारखी औषधं बनवणाऱ्या (कदाचित थोड्या जुन्या वळणाची) कंपनीची मदत घेता आली नसती काय? भारत सरकारच्या विदेशी लसींना परवानगी देण्याच्या निर्णय स्तुत्य असला तरी तो सुमारे तीन महिने उशिराने घेण्यात आला होता. तसंच या विदेशी लसींच्या कंपन्यांकडे लसींची भरपूर मागणी होती, म्हणजे त्यात भारताच्या उशिरानं आलेल्या मागणीचा पुरवठाही उशिरानंच होणार होता.

संदेशवहन व जाहिरात

सबंध २०२० या वर्षात अमेरिकेतला महामारीच्या व्यवस्थापनाचा चेहरा राजकीय होता. कोरोनावरील विचार, उपचार व त्यांचे आकडे प्रामुख्यानं राष्ट्राध्यक्ष देताना दिसत. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ हे नुसतेच तोंडी लावण्यापुरते असत. अपवाद काय तो फक्त डॉ. ऍंथोनी फौची यांचा असे. राष्ट्राध्यक्षच सगळी मखलाशी करत, ज्याचा परिणाम गोंधळ किंवा चुकीची माहिती पसरण्यात झाला. भारतातसुद्धा या दरम्यान कुठलंही राजनीतीक नेतृत्व कुठल्याही शास्त्राचा वापर करून माहिती देताना दिसत नव्हतं. राजकीय तसंच शास्त्रीय माहिती ही एकाच व्यक्तीनं देणं आणि तीही देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी हा चुकीचा पायंडा होता. त्या माहितीची विश्वासार्हता ती कशी जोखणार?

खरं म्हणजे भारताचा लसीकरणाचा अनुभव जगातील कित्येक महासत्तांपेक्षा चांगला आहे. पोलिओ, डायरिया, एड्स आदी अभियानं, त्याकरता घेतली गेलेली अनेक मान्यवरांची मदत, हे वाखाणण्याजोगं आहे. यातील कुठलाही उपाय कोरोनाच्या लशींबद्दलची साशंकता कमी करण्यासाठी वा मास्कबद्दल जागरूकता तयार करण्यास उपयोगी पडू नये?

अपयशाचा स्वीकार व पाऊल पुढे

आजमितीस जगातील कुठलाही देश छातीठोकपणे हे सांगू शकणार नाही की, त्याने कोरोना महामारीवर योग्य व्यवस्थापनानं विजय मिळवला आहे. कुणाचे लाट थोपवण्यात चुकले, तर कोणाचे लसीकरणात. पण हे करत असताना फार कमी देश आहेत, जे उघडपणे आपल्या चुका कबुल करतात. अमेरिकेत डॉ. फौचींची मास्कबद्दलची धारणा, काही देशांना प्रवास बंदी घालण्याचा उशीर, तसंच अगदी अलीकडे १५ दशलक्ष लसीचं वाया गेलेलं उत्पादन, या सगळ्या चुका अतिशय उघडपणे चर्चेत असणाऱ्या होत्या. त्यातून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. डॉक्टरांना, शात्रज्ञांना त्यांच्या चुकांचा ऊहापोह न करता खुलेपणाने बोलण्याची मुभा द्यावयास हवी होती. कारण आपण फक्त जगातील इतर देशांच्या चुकांचाच तुलनात्मक अभ्यास करू शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कोरोनाच्या  पलीकडे

या कठीण परिस्थितीत जग या महामारीतून कसं सावरलं, याचा अंदाज बांधणं कठीणच आहे. पण अमेरिकेतील बऱ्याच समित्या याचा नक्कीच विचार असतील. मे २०२१च्या अखेरपर्यंत देशात ३०० दशलक्ष लशींचा अतिरिक्त साठा असेल अशी तजवीज केली गेली. त्यामागे कदाचित माणशी लागू शकणाऱ्या तिसऱ्या डोसचा विचार असावा. कदाचित लशींबद्दलची साशंकता बघता समूह प्रतिकारशक्ती कधीच मिळू शकणार नाही आणि दरवर्षाला एक लस घ्यावीच लागेल, असा विचारसुद्धा असू शकतो. त्यामुळे लसींचं उत्पादन वाढवण्याची गरज वाटत असावी. भारताची आर्थिक परिस्थिती कितीही हातघाईची असली, तरी या एका गोष्टीकरता भांडवल उभारण्यास आकाश पातळ एक करण्याची जरुरी होती. भारताने आर्थिक संकटात सोनं तारण ठेवण्याची आठवण  फार जुनी नव्हे. हे तर अस्मानी संकट होतं.

महामारीच्या व्यवस्थापनाकरता अमेरिकी अपयशाची यादी जगातील कुठल्याही देशास पुरून उरावी, अशीच आहे. या सगळा यशापयशाच्या खेळात कुठेतरी एक आशेचा अंधुक किरण दिसू लागला आहे. ही आशा विज्ञान, आकडेवारी तसंच निर्णय पारदर्शकता या तीन पायांवर उभी आहे. हा आशावाद लशींबद्दल साशंकता, रोज सुमारे ५०००० लोकांना होणारी लागण, दर दिवशी होणारे  १००० मृत्यू (२५ टक्के  जनतेचं पूर्णपणे लसीकरण झालेलं असूनसुद्धा), राजकीय विचारांनी पसरवलेली सामाजिक दुही, कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अन्यायामुळे ढवळून  निघालेलं समाजमन, तसंच महामारीने आर्थिक संकटात असलेला मध्यम व निम्नवर्ग असे सगळे प्रश्न भेडसावत असतानासुद्धा दृढ होत राहिला.

यशाचा अकाली उत्सव साजरा करण्याऐवजी अशा सगळ्याच उदाहरणातून भारतीय प्रशासनानं मोकळ्या मनानं शिकण्यासाठी सज्ज व्हायला हवं होतं. भारत काय शिकला कोरोना महामारीपासून? काही शिकला की नाही?

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......