अजूनकाही
बापू,
तुम्ही रिटायर होताय का,
सार्वजनिक जीवनातून, लोकांच्या मनातून?
आदर्श जेव्हा जयंती, पुण्यतिथीपुरते उरतात, तेव्हा ते फोटो, पुतळे यात बंदिस्त होतात.
अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र व्यवहारात कुठे आहे?
ते केव्हाच शाळेच्या भिंतीवर बंदिस्त झालंय, खुंटीला टांगलंय.
जे रुचतं आणि रुजतं ते ज्ञान. जे रुचतं पण रुजत नाही ती माहिती.
विचार जेव्हा रुचतात, तेव्हाच ते आचरणात रुजतात.
तुमची माहिती अनेकांना आहे, तुमचं तत्त्वज्ञान त्या प्रमाणात रुजलेलं नाहीये.
अहिंसेपेक्षा हिंसेनं सर्व प्रश्न सोडवले जात आहेत.
आजही क्रिकेटच्या मैदानात वांशिक टिप्पणी होते.
जिवंत बाळं जळतात, चिमुरडीला अत्याचार करून संपवलं जातं…
माणसं दगड झाली आहेत, केवळ मूक साक्षीदार.
तुमच्या फोटोला व समाधीला हार घातले की, लोक इतरांचे ‘हार’ करायला मोकळे.
शिकण्याचे, जगण्याचे संदर्भ बदलले की, तुम्ही तीव्रतेनं आठवता.
तुम्ही जीवनशैली बदलली, त्या वेळेस कुणीच मानलं नाही,
आता विषाणूने बदललेली जीवनशैली प्रत्येक जण अंगिकारत आहे,
त्याशिवाय पर्यायच नाही.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बापू,
तुमचे विचार व लोकांचे आचार एकत्र नांदत नाहीत.
अस्तित्व धोक्यात येत नाही, तोपर्यंत माणसं बदलत नाहीत.
आज माणसं अस्वस्थ आहेत, उद्ध्वस्त आहेत.
तुमची जीवनशैली अंगीकारायला अजून वेळ आहे…
अनेकांना ते कळतं, पण वळत नाही.
तुम्ही चलनात आहात, पण ‘चालण्या’त नाही.
लोकांना गांधी ‘प्रोजेक्ट’ करायला आवडतो, पण ‘प्रोटेक्ट’ करायला आवडत नाही.
फक्त स्वतःच्या अस्तित्वाला ‘गांधी’ नावाची झालर लावण्यात लोक धन्यता मानत आहेत.
तुम्ही ‘सत्याचे प्रयोग’ केले, पण आज ‘असत्याचे प्रयोग’ यशस्वी होत आहेत.
सत्य समोर येऊ द्यायचं नाही, हे नवीन तंत्र लोकांनी शोधून काढलंय.
घटना एकच असली तरी अनेक जण अनेक संहितांचा बाजार मांडताहेत.
चरख्यावर सूत काढण्याऐवजी लोक ऑनलाईन सूत जमवण्यात व्यस्त आहेत.
ज्ञान, कौशल्य, माहिती यांची विक्री चालू आहे.
पाहून शिकणारे ‘एकलव्य’ आता नाहीत. ऑनलाइनमध्ये पैसे दिले की, कर्तव्य संपतं.
कौशल्यापेक्षा ‘कौशल्य प्रमाणपत्र’ देणाऱ्या अनेक संस्था हात धुवून मागे लागल्या आहेत.
द्रोणाचार्य खूप स्वस्त झालेत, ते सतत स्वतःची जाहिरात करत असतात.
विचारात मुलं जरी ‘ऑनलाइन’ असली तरी आचारात ‘ऑफलाईन’ झाली आहेत.
संवादाचेसुद्धा कष्ट न घेणारी पिढी मूकबधिर झाली आहे.
वृद्धापकाळात नांगी टाकणाऱ्या अवयवांनी शैशवातच नांगी टाकणं सुरू केलं आहे.
श्रमप्रतिष्ठा जाऊन खोटी प्रतिष्ठा जपण्यात माणसांचं आयुष्य चाललं आहे.
परिमाण बदललं की, परिणाम बदलतात.
बापू,
तुम्ही जयंती-पुण्यतिथी, पुतळे, चलनी नोटा, लेख, पुस्तकं एवढ्यापुरतेच सिमित झाला आहात.
जीभ कापून, गुडघा दाबून चित्कार थांबवायची अनेक नवीन तंत्रं आली आहेत.
मी नशा केली नाही,
मी काही सांगणार नाही,
हावभाव करणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,
‘माल हैं क्या’ हीच जीवनाची इतिकर्तव्यता झाली आहे.
पैशांच्या मुल्यापुढे नैतिक मूल्यं निष्क्रय झाली आहेत.
‘इन्सान की औलाद’ने ‘इन्सानियत’ कब की छोडी हैं.
‘I cannot breathe’ म्हणणाऱ्याला त्याचा श्वास जाईपर्यंत गुदमरून मारण्यात येतं.
गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं जातं.
अनेक अत्याचार घडतात, पण ज्याची चर्चा होते, तोच अत्याचार समजला जातो.
भयानक, क्रूर घटना मोबाईलच्या टीपकागदानं टिपता येतात व व्हायरल करता येतात.
जे ‘व्हायरल’ होतं, त्याच्यावर बुद्धिवंत चर्चा करतात,
सेमिनार, वेबीनार होतात, संशोधन पेपर सादर केले जातात, अनेकांना डॉक्टरेट मिळते.
विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या कपाटात धूळ खायला अजून एक ग्रंथ कपाटात जाऊन बसतो.
सगळ्यांना हिमनगाचं टोक पाहायचंय, कारण ते पाहायला सुखद असतं.
लोकांना सुखाची ‘टुलिप गार्डन’ पाहायला आवडते.
कुणालाच आपल्या सभोवताली डम्पिंग ग्राउंड नको असतं.
बापू,
मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ‘ब्रेकिंग न्यूज’ पहिल्यांदा आपणच कशी दिली,
याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागलीय.
प्रत्येक न्यूज ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणूनच दिली जाते.
शरीर धडधाकट असताना मृत्यूने उरावर बसून आपला प्राण घेणं क्लेशदायकच.
रंग माणसाच्या जीवनात रंग भरतात माहीत होतं, पण माणसाला उद्ध्वस्त करतात,
हे अनेक वर्षांपासून पाहतोय.
आपल्या आयुष्याचा शेवट कसा आणि कधी होईल हे कुणालाच सांगता येत नाही.
पाशवी अत्याचार होतो, तेव्हा माणसं हतबल होतात.
अडचणीत माणसं मदत करत नाहीत, चित्रीकरण करतात.
सगळीकडे श्वापदंच आहेत.
नवनवीन तंत्रं शोधण्यात माणसांचा हात कोणी धरणार नाही,
विषाणूच्या प्रसारापेक्षाही त्यांचा प्रसार झपाट्यानं होतो.
उपद्रव न करणाऱ्याची हत्या केली की, हळहळ वाटतेच.
लोक मृत्यूला जवळ करतात किंवा मृत्यू माणसाला जवळ करतो.
जगायचं कुणी याचा न्यायनिवाडा माणसं स्वतः करत आहेत.
प्रत्येकाचं आपलं न्यायालय आहे, प्रत्येक जण न्यायाधीश झालाय.
समाधी पूर्वी स्वेच्छेनं घेतली जायची, आज ती जबरदस्तीनं घ्यायला लावली जाते.
जेवढ्या वाटा तेवढ्या पळवाटा.
दृष्टीआड सृष्टी प्रत्येकालाच आवडते.
संघर्ष जेव्हा दुबळा पडतो, तेव्हा अमानवीय शक्तीचा विजय होतो.
ज्याचं त्याचं जीवन म्हणजे ज्याचा त्याचा संघर्ष.
कुणी संघर्षावर स्वार होतो, तर कुणाला संघर्षांपुढे हार मानावी लागते.
Survival of the fittest हेच जगण्याचं सूत्र आहे.
निसर्गात वर्णद्वेष नाही, पण मनात वर्णद्वेष आहे.
बापू,
तुमची शिडी वापरून लोक आपले मनसुबे पूर्ण करत आहेत.
तुमच्या फोटोला हार व समाधीवर ओंझळभर फुलं वाहिली की, हवं ते करता येतं.
तुम्ही नोटावरील चित्रांत आहांत, पण निवडणुकीतील ‘नोटा’च्या बाबतीत तुम्ही असाह्य आहात.
नोटामध्ये ‘यापैकी कोणीच नको’ म्हटलं तरी नको ते निवडून येतंच आहेत.
नोटा म्हणजे एक वैधानिक इशारा झालाय.
धूम्रपान असो, दारू पिणे असो, चुंबन असो, आलिंगन असो,
अश्लीलता, बलात्काराची दृश्य दाखवणं असो,
कोपऱ्यात फक्त गोमुत्रासारखा वैधानिक इशारा शिंपडला की, झालं!
ऑफिसमध्ये तुमच्या फोटोसमोर भ्रष्टाचार होतो, पैMexची देवाण-घेवाण होते.
नव्या नोटांवरही तुम्हीच विराजमान आहात, पण नोटबंदी, महागाई, भ्रष्टाचार थांबलेला नाहीये.
‘गांधी हैं तो मुमकिन हैं’ म्हणत,
भाषणात तुमचे गोडवे गायले जातात,
खोट्या शपथा घेतल्या जातात,
इतकं केलं की, सात पिढ्यांची कमाई करण्याचं नवीन तंत्र माणसानं शोधून काढलंय.
भांडणारे गळ्यात पडत आहेत आणि गळ्यात पडलेले भांडत आहेत.
पूर्वी तत्त्वांसाठी काही पण होतं, आता तत्त्वांसाठी काहीही आहे.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, मानवी व्यवहार, भावभावना,
सगळंच गढूळ झालं आहे.
चांगल्या विचारांची तुरटी दुर्मीळ झालीय.
बापू,
राजकारणात अनेकांसाठी ‘गांधी’ यशाची पहिली पायरी आहे.
यशोशिखराकडे जाताना पहिली पायरी विस्मरणात जाते.
शाळेतल्या प्रतिज्ञेच्या चिंधड्या उडत आहेत.
वादामुळे ‘सारे भारतीय माझे बांधव’ आहेत का? हा प्रश्न पडू लागलाय.
शाळेतील मुलं निरागसपणे प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणायचे, आता त्यांचीच समाधी झालीय.
तरुण ‘फ्री काश्मीर’ची मागणी करतात, पोलिसांवर दगडफेक करतात, हिंसेमध्ये भाग घेतात.
तुमचा अहिंसेचा डोस अनेकांना नकोय.
मतासाठी तुमच्या नावाचा वापर करून जोगवा मागणं आजही सुरूचंय.
‘नई तालीम’ ही तुम्ही दिलेली अमूल्य भेट,
पण ती गुंडाळून ठेवली गेलीय, कारण कुणालाच नको आहे मूल्य आणि श्रमप्रतिष्ठा.
मस्तकापेक्षा पुस्तकाला महत्त्व आलंय. पुस्तकात आहे तेवढंच वाचायचं, लक्षात ठेवायचं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बापू,
तुमचा मृत्यू घडवून आणला, पण तुमच्या मृत्यूने इतिहास घडवला.
तुमच्या विचारानं पिढ्या घडवल्या.
तुमचा वैचारिक वारसा अजून जिवंत आहे.
या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्यात.
तुमची साधी राहणी, उच्च विचारसरणी अजून रुचत नाही, म्हणून रुजत नाही.
जगावर तुमची छाप पडली आहे. जगभर तुमचे पुतळे आहेत.
गांधींना कोण ओळखत नाही?
आम्ही कुणी आवडलं की, फोटोत बंदिस्त करतो व भिंतीवर टांगतो.
असं केलं की, प्रेमही दिसतं… जबाबदारीही झटकता येते.
तुम्ही पुस्तकात व अभ्यासक्रमात रुतून बसला आहात,
पण तुमचं नाव वापरून अनेकांना राजकारणात जायचं आहे,
स्वतःचा जम बसवण्यासाठी दुसऱ्यांना फसवायचं आहे.
‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे’
हे तुमच्याबरोबरच इतिहासजमा झालंय.
नव्या पिढीसमोर गांधी नाही, वेगळी आँधी आहे.
तुमचं तत्त्वज्ञान लोणचं म्हणून चवीपुरतं वापरलं जात आहे.
तुम्ही विस्मृतीत चाललात बापू...
.................................................................................................................................................................
अनिल कुलकर्णी
anilkulkarni666@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment