केशवराव धोंडगे : ‘मन्याड’चा थकलेला वाघ!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर   
  • महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे, सोबत त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती
  • Sat , 01 October 2022
  • पडघम कोमविप केशवराव धाेंडगे Kesharao Dhondge शेकाप Shekap शरद पवार Sharad Pawar

जाणीव-नेणीव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या केशवरावांचं वय १०५ आहे; दस्तुरुखुद्द ते आणि त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे. मात्र, विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेत त्यांची जन्मतारीख २५ जुलै १९२२ असल्याची नोंद आहे. वयाचा वाद सोडून देऊ, पण आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवरावांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं, यात शंका नाही.

केशवरावांचं व्यक्तिमत्त्व अस्सल मराठवाडी ग्रामीण ढंगातलं. ते राजकारणात आले, तेव्हा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता. याच पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून एक वेळा विजयी झालेले आहेत. (आजच्या माध्यमांच्या भाषेत सांगायचं तर ते ‘विधानसभेचे आमदार’ होते. विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार आणि संसदेचा सदस्य म्हणजे खासदार असतो, हे आपल्या माध्यमांना जणू ठाऊक नाही. जर प्रकृतीनं ठणठणीत असते, तर माध्यमांच्या या भाषक दारिद्रयाबद्दल केशवरावांनी चांगलंच बोचकारून काढलं असतं!) शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांची होती, तशीच केशवरावांचीही साम्यवाद, मार्क्सवाद एकाच वेळी श्रद्धा आहे. एकाच वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव हे माझ्या पत्रकारितेतले एकमेव राजकारणी आहेत!

मध्यम चण, किचिंत गव्हाळ वर्ण आणि डोक्यावरच्या केसांनी बंड केलेलं म्हणजे ते विस्कटलेले, धोतर आणि साधारण किचिंत ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता, कपाळावर टिळा, असं केशवरावांचं व्यक्तिमत्त्व तब्बल तीन दशकं विधानसभेत गाजलं. खणखणीत आवाज, बोलण्याची बोचरी शैली, त्या शैलीला मराठवाडी बोलीची ‘भरजरी’ किनार आणि जे काही बोलायचं ते रोखठोक, असं केशवरावांचं वागणं असायचं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिवाय कुणी अंगावर आलं की, शिंगावर घेतल्याशिवाय त्यांनी सोडलं नाही. किती बोचरं आणि किती रोखठोक असावं, तर त्याची एक आठवण सांगतो- केशवरावांचा वयाची शंभरी पार केल्याचा सत्कार (बहुधा नांदेडला) देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला. तेव्हा ‘शरदरावांची बारामती म्हणजे भानामती’, ‘माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल’, ‘नारदमुनीही पवारांची बरोबरी करू शकणार नाही’, ‘पवार म्हणजे बिनचिपळ्यांचे नारद’, अशा इरसाल शब्दांत केशवरावांनी ‘पवार-स्तुती’ केली होती आणि पवारांनीही केशवरावांच्या म्हणण्याला भरभरून दाद दिली होती!

आलेल्या माणसाचं स्वागत उजव्या हाताच्या पालथ्या मुठीवर अत्तर लावून आणि समोरचा जास्तच जवळचा असेल तर त्याच्या भालप्रदेशाचा मुका घेऊन करायचं, हेही केशवरावांचं एक वैशिष्ट्य अनेकांना ठाऊक असेल, अनेकांना नाही. अत्तर लावून आणि प्रेमभरे मुका घेऊन स्वागत झालेले पवार केशवरावांच्या या इरसालपणावर तसंही काय बोलणार होते म्हणा!

छगन भुजबळांची मफलर सध्या राजकारणात एक सिम्बॉल झाली आहे, पण आमदार असताना केशवरावही अनेकदा गळ्यात मफलर घालत आणि ती बहुधा प्लेन किंवा प्रिंटेड लाल रंगाची असे. हा रंग त्यांची क्रांतीवर असणारी श्रद्धा दर्शवत असे. थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकारणातील मफलर-संस्कृतीचे खरे जनक केशवराव धोंडगे आहेत.

पत्रकारितेतली माझी पिढी खरंच भाग्यवान होती. बहुसंख्य लोकप्रतिनिधी वर्तन आणि व्यवहारात साधे होते, धनसंचय करण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल त्यांना डोहखोल तळमळ होती. या तळमळीपोटी विधिमंडळात हे बहुसंख्य लोकप्रतिनिधी केवळ एक रुपयाची कपात सूचना मांडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत, जनतेचे प्रश्न मांडत असत. शिवाय स्थगन प्रस्ताव आणि शून्य प्रहरातही सरकारची सालटी सोलण्याची एकही संधी तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी कधीच सोडत नसत. विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण मुदतभर आणि अनेकदा तर रात्री  उशिरापर्यंत चालत असे.

अधिवेशन सुरू होण्याआधीच ‘कामकाज चालू देणार नाही’, अशी सरकाराच्या सोयीची भूमिका घेणारे विरोधी पक्ष तेव्हा जन्मालाच यायचे होते. त्यामुळे सभागृहाचं कामकाज ‘उरकून’ टाकण्याची हिंमत सत्ताधारी पक्षाला मुळीच होत नसे, कारण विरोधी पक्षातील या बहुसंख्य सदस्यांचा नैतिक आणि सात्त्विक धाक सरकारला वाटत असे. ही मंडळी साधी होती म्हणजे किती साधी होती, तर ते चक्क एसटी महामंडळाच्या साध्या बसनं सर्वसामान्य माणसांसोबत प्रवास करत. (तशाही तेव्हा वातानुकूलित बसेस आणि कार नव्हत्याच म्हणा!) केशवराव ‘त्या’ जातकुळीचे लोकप्रतिनिधी म्हणून कायमच वावरले.

या पार्श्वभूमीवर विद्यमान बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकतर भोंगे वाजवतात, नाही तर ‘हनुमानचालीसा’ म्हणतात, नाही तर सत्तालोभासाठी मुंबई ते सुरत-गुहाहाटी-गोवा-मुंबई असा प्रवास करताना दिसतात. अशा वेळी केशवराव आणि त्यांच्या पिढीच्या लोकप्रतिनिधींमधल्या तळमळ आणि साधेपणाला  सलाम केल्याशिवाय पर्यायच उतरत नाही...

या व्यतिरिक्त केशवरावांचा वाचन-व्यासंगही भरपूर होता. ते एका साप्ताहिकाचं प्रकाशनही करत. ‘गुराखी साहित्य संमेलना’सारखी एक वेगळी वाट त्यांची चोखाळली. वृत्तपत्र आणि ग्रंथवाचनामुळे केशवरावांचं भाषण म्हणजे संदर्भाचा मसाला असे. खणखणीत आवाजात, चुरुचुरुपणे ते बोलत आणि प्रतिस्पर्ध्यांचे वाभाडे काढत. चौफेर वाचन, जीभेला धार आणि कष्टकरी तसंच तळागाळातल्या जनतेशी जोडलेली नाळ, या मिलाफातून प्रसिद्धी मिळवण्याची विलक्षण हातोटीही केशवरावांनी प्राप्त केलेली होती. बोलण्याच्या या असोशीतून वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून केशवराव स्वत:ला अनेकदा आवरू शकले नाहीत.

महात्मा गांधी मिशन रुग्णालयात त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांना भेटायला गेलो. रुग्णशय्येवर पडलेल्या केशवरावांचा आवाज याही वयात तेवढाच खणखणीत आहे. या वयात ही शस्त्रक्रिया जोखमीची होती, पण ते आव्हान महात्मा गांधी मिशनमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेललं. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारली आणि केशवरावांनी त्यांच्या सवयीला साजेसं बंड, गावी जाण्यासाठी पुकारलं. बारा तास ते चक्क मौनात गेले. आरोग्यविषयक सर्व निकष योग्य, पण केशवराव मात्र मौनात. अखेर रात्री उशिरा मौनभंग करून गावी जाण्याची आस त्यांनी व्यक्त केली. भाषेबद्दल केशवराव याही वयात किती आग्रही आहेत, तर डिस्चार्जपूर्वी उपचारांबद्दल महात्मा गांधी मिशनच्या कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याप्रती त्यांनी ऋण व्यक्त करताना ‘आभार’ हा शब्द त्यासाठी कसा योग्य नाही, हे आवर्जून सांगितलं .

दोन-एक महिन्यापूर्वी आजारी होईपर्यंत ‘म्हातारा न तुका’ या बाण्याला स्मरून केशवराव जगत होते. दूध आणि रस यावर ते ठणठणीत असत. श्रवणवशक्ती क्षीण झालेली आणि स्मरणशक्ती विस्मरणाशी खेळत असलेली, तरी सकाळी वृत्तपत्रांचं नियमित वाचन, मग त्यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या गावातील संस्थांचा फेरफटका, लोकांच्या गाठीभेटी असा त्यांचा दिनक्रम राहिला. या वयात स्मरण-विस्मरणाचा ऊन-सावलीचा खेळ अपरिहार्यच असतो, पण काही नावं मेंदूत किती पक्की रोवलेली असतात, याचा अनुभवही आमच्या या भेटीत आला. माझ्यासोबत प्राचार्या  डॉ. रेखा शेळके आणि प्रा. जयदेव डोळे होते. जयदेवचं ‘डोळे’ हे आडनाव ऐकताच केशवरावांच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ते ना.य. डोळे समजून जयदेवशी बोलू लागले. ना.य. डोळे म्हणजे तळमळीचा शिक्षक, मोठा माणूस, क्रांतिकारक, महापुरुष असं  बरंच काही केशवराव म्हणाले. बाय द वे, प्रा. जयदेव डोळे हा ना.य. डोळे यांचा पुत्र आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘सुपरकॉप’ म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात केशवराव धोंगडे यांचा उल्लेख असल्याचं आठवतं. रिबेरो हे १९६९ साली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते, तेव्हाची ती आठवण आहे. त्या वेळी मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी केशवराव यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. ते आंदोलन कसं आटोक्यात आणावं, असा प्रश्न सरकारला पडल्याचं रिबेरो यांनी नमूद केलं आहे. ते आंदोलन अखेर यशस्वी ठरलं. तेव्हापासून केशवरावांना ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ म्हणूनही ओळखलं जात असे. तेव्हा केशवराव आमदार होते. एखादा आमदार आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जगण्याबद्दल किती संवेदनशील असतो, याचं नेमकं उदाहरण म्हणजे ते आंदोलन होतं.

त्यांचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं, हा माझा प्रश्न मोठ्ठ्या आवाजात विचारला आणि केशवरावांनी तत्परतेनं साभिनय उत्तर दिलं. ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही. बोलणं बंदच करायला पाहिजे. उत्तर एकच- तोंडावर हात आणि कानावरही हात, हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे’, असं केशवराव म्हणाले. अन्यही काही विषयावर ते बोलले, पण त्यात संगती नव्हती शिवाय काही वेळ बोलल्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागला असल्याचं जाणवलं आणि आम्ही रुग्णालयाच्या त्या  खोलीतून बाहेर पडलो.

एकूण काय तर, मन्याड खोऱ्यातील एकेकाळचा वाघ आता वृद्धत्वामुळे थकला आहे.

विद्यमान राजकारणात असे वाघ आहेत कुठे?

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......