अजूनकाही
हे खूप कमी लोकांना माहीत असेल की, राजू श्रीवास्तव कधी काळी समाजवादी पार्टीशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कलाकार प्रलोभनापोठी ज्या तडजोडी करतो, त्या मागे पडतात, कला मात्र आठवणीत राहते. हेही आता कुणाला आठवत नसेल की, जगजितसिंग यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सामान्य कविता गायल्या होत्या. पण आता त्यांची चांगली गाणी तेवढी आठवली जातात. हिंदी कवी श्रीकांत वर्मा काँग्रेसी राजकारणात वावरले, हेही असंच विस्मरणात गेलंय, पण त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘मगध’ हा कवितासंग्रह मात्र सर्वांना आठवतो.
राजू श्रीवास्तव काय करत? ते लोकांना हसवत. हसवण्याची कला ही कलाक्षेत्रात सर्वांत उपेक्षित मानली जाते. विनोद हा साहित्यातला सर्वांत तिरस्कृत प्रकार आहे. इतका की, विनोद सांगणारे लोक त्यात आपलं नावही जोडत नाहीत सहसा.
पण हसवण्याची परंपरा खूप जुनी आहे. प्रकारही खूप आहेत त्यात. हिंदीत ‘हास्य कविता’ हा स्वतंत्र साहित्यप्रकार झालेला आहे. हे हिंदीचं साहित्याला मौलिक योगदान आहे. त्याव्यतिरिक्त व्यंगामध्ये टोचणीबरोबर विनोदही असतो. नाटक हेही विनोदाचं माध्यम राहत आलं आहे. सर्कशीत तर विदूषकाची लोकप्रियता कुठल्याही प्राण्यापेक्षा कमी नसते. या वाक्यातली खोच जाणीवपूर्वकच आहे. कारण आपण आपल्याला हसवणाऱ्या लोकांचा फार सन्मान करत नाही. त्यांच्याशी अनेकदा अ-मानवीय व्यवहार करतो.
राजू श्रीवास्तव लोकांना हसवत. इंग्रजीत किंवा तथाकथित नव्या हिंदीत त्याला ‘स्टँड अप कॉमेडियन’ म्हणतात. पण राजू श्रीवास्तव यांचा युएसपी काय होता? ते इतरांपेक्षा कसे वेगळे होते? याचं उत्तर तसं सोपं आहे. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं देशीपण होतं. त्यात मध्यमवर्गीय जीवनाची आठवण होती, जे आपण काही वर्षांपूर्वी टाकून देऊन उच्च मध्यमवर्गीय जीवनशैली अंगीकारलीय.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दुसरी गोष्ट म्हणजे या देशीपणाला त्यांनी खूप विश्वासार्हतेसह जपलं. चेहऱ्यावरील हावभाव पकडण्यात ते तरबेज होते. नैसर्गिक देहबोली असलेला अभिनेता होते. ते व्यासपीठावर इतर कुठल्याही साधनांशिवाय संपूर्ण प्रसंग उभा करत. त्यांची ही कमाल मौलिक होती असं नाही. तीनेक दशकांपूर्वी छोट्या-छोट्या शहरांत ऑर्केस्ट्रांमधले अनेक हास्यकलाकारही असेच होते. ते खेळ सुरू होण्याच्या आधी प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचं काम कौशल्यपूर्वक करत. हे काम ते स्थानिक बोली आणि चिरपरिचित किश्श्यांना नवनव्या शैलीत सादर करून करत.
राजू श्रीवास्तव याच परंपरेतून पुढे आलेले. ते एकप्रकारे नशिबानच ठरले, कारण जेव्हा ते शिखरावर होते आणि उताराच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात व्हायची होती, त्याआधीच २४ तास वृत्तवाहिन्या सुरू झाल्या. त्यांना आपल्या भस्मासुराचं पोट भरण्यासाठी सर्व प्रकारच्या तमाशाची गरज होती. त्यामुळे राजू श्रीवास्तवसारख्या कितीतरी हास्य-कलाकार रातोरात राष्ट्रीय पातळीवर ओळखले जायला लागले. या काळातल्या माध्यमांवर एक टीका अशीही केली गेली की, ती तीन प्रकारच्या ‘आर’वर अवलंबून होती – राजू श्रीवास्तव, राखी सावंत आणि राहुल द्रविड! त्याआधी काही चित्रपटांमध्येही राजू श्रीवास्तव यांनी काहीबाही भूमिकाही केल्या, पण फक्त इंटरटेनमेंट, इंटरटेनमेंट आणि इंटरटेनमेंट हेच आपलं लक्ष्य मानणाऱ्या सिनेमातून हे स्पष्ट झालं की, कहाणीत विनोद असावा, पण अर्थहीन फसवाफसवी असू नये, नाहीतर सिनेमा पडतो.
पण राजू श्रीवास्तव पडले नाहीत. त्यांना इतकी मागणी होती की, देशातील सर्वांत मोठे दैनिक असलेल्या ‘भास्कर’ने त्यांना एक साप्ताहिक सदर लिहायला सांगितलं. तिथं हे हलक्या-फुलक्या शब्दांत विनोदी लेखन करत असत. अलीकडच्या काही वर्षांत टीव्ही वाहिन्यांवरील त्यांची उपस्थिती काहीशी कमी झाली होती. हास्याचे नवे सम्राट कपिल शर्मा झाले होते. आपण समजून घेण्याच्या स्थितीत असलो असतो, तर समजू शकलो असतो की, भारतातला विनोद खालच्या पातळीवर घसरला आहे आणि त्याची ग्राम्य लैंगिक विनोद व इशारे यांच्या दिशेनं घसरगुंडी झाली आहे. असं नाही की, हे सगळं आपल्या विनोदात पूर्वी वर्ज्य होतं.
राजू श्रीवास्तव आणि इतरही कलाकार जेव्हा कॉमेडी करत, तेव्हा तेही समाजात प्रचलित असलेले लैंगिक विनोद व पूर्वग्रह यांचा भरपूर वापर करत असत. पण तो एका देशी परंपरेचा भाग होता, ज्याची सरंजामी सीमारेषा सर्वांना माहीत होती. आजच्या काळातल्या नव्या कॉमेडीत सरंजामी सडलेपणाबरोबरच आधुनिक लंपटतेचाही समावेश आहे. त्यामुळे ती अजूनच नावड निर्माण उत्पन्न करणारी होते. राजू श्रीवास्तव त्यात अडकले नाहीत, असं म्हणता येणार नाही, पण हे खरं की, ते केवळ यासाठी ओळखले जात नव्हते, त्यांची ओळख त्यावर आधारलेली नव्हती.
अजून एक मुद्दा राजू श्रीवास्तव यांच्या ओळखीला वेगळा अर्थ देतो. टीव्ही वाहिन्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या मृत्युची बातमी चालवताना ‘सर्वांना हसवणारा राजू रडवून गेला’ या शब्दांचाच आधार घेतला. हा हसवण्याचा आणि रडवण्याचा बिंदू त्या नाट्यमयतेतून येतो, ज्याचं नाव आहे मृत्यु. त्याच्या अपरिहार्यतेची कल्पना असूनही त्याचं येणं आपल्याला अस्वस्थ करतं.
दुसरी गोष्ट म्हणजे कुठे ना कुठे सिनेमांशी जोडलेल्या आपल्या आठवणीत ‘मेरा नाम जोकर’सारख्या सिनेमांचे अंश अजून शिल्लक आहेत. हा निव्वळ योगायोग आहे की, ‘मेरा नाम जोकर’मधलं भोळाभाबडं पात्र निरागस होतं आणि आपला विनोदसम्राट राजूही. पण ज्या भोळेपणावर आपण फिदा होऊ इच्छितो, ज्याला एक प्रकारे भारतीयतेची ओळख मानतो, राजू श्रीवास्तव त्यालाच आपलं पात्र बनवून व्यासपीठावर उभं राहत आणि ते काबीज करत. हा कानपुरी ढंगात बोलणारा, अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ असलेला, इंग्रजीत पारंगत असूनही कधी कधी तिचा गमतीशीर वापर करणारा, नायक सहजपणे स्वीकारला गेला, त्यात आश्चर्य ते कोणतं?
विनोद अनेक प्रकारचा असतो, खूप अर्थ सांगणारा असतो. इतरांवर हसणं चांगलं समजलं जात नाही, आणि स्वत:वर हसणं कुणाला आवडत नाही. व्यवस्थेवर केले जाणारे विनोद, तिच्यावर टीका करण्यासारखंच मानलं जातं. नेत्यावर हसणंही धोकादायक मानलं जातं. पण अनेकदा असं वाटतं की, आपण सगळे एका हास्यास्पद व्यवस्थेची शिकार आहोत. आपल्यावर इतर लोक हसत आहेत. राजकीय नेतेही आपल्याला हसत असणार. रघुवीर सहाय यांनी आपल्या एका कवितासंग्रहाचं नावच ‘हंसो-हंसो जल्दी हंसो’ असं ठेवलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, ‘हंसो कि हम पर निगाह रखी जा रही हैं।’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
असं मानलं जातं की, जेव्हा संघर्षाचे सारे पर्याय संपतात, जेव्हा तुम्ही स्वत:ला व्यवस्थेच्या अंधारदरीत सापडलेले पाहता, तेव्हा विनोदाला शेवटचं हत्यार म्हणून वापरू शकता. शक्यता आहे की, त्यामुळे एखादा आशेचा किरण मिळू शकतो. हिटलरच्या काळातल्या जर्मनीच्या ‘व्हिसपरिंग जोक्स’चा इतिहास आता सर्वज्ञात आहेच.
राजू श्रीवास्तव विनोदाला अशा कुठल्याही श्रेणीत पाहत नव्हते. ते मुळात कलावंचित आणि संस्कृतीविहीन काळात घडले. मात्र ही त्यांची निवड नव्हती, नियती होती. आपण सर्वजण हळूहळू कलांना अ-प्रामाणिक आणि संस्कृतीला फिजूल मानू लागलो आहोत. जे काही आहे ती केवळ ‘पॉवर’ आहे, पैसा आहे, राजकीय प्रभाव आहे आणि असत्य बोलून मिळवलेलं समर्थन आहे. एक महिला संसदेत जोरात हसते, तेव्हा या देशाच्या सर्वांत मोठ्या नेत्याला शूर्पणखाची आठवण होते… आणि त्यांच्यासोबत सारी संसद जोरजोरात हसते… सध्याचा काळ हा असा आहे.
विनोद विषारी होत असलेल्या सद्यकाळात राजू श्रीवास्तव हा एक विसावा होता. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी भगव्या मनोवृत्तीचे काही विनोद सादरही केले, पण ते कुणाच्याही आठवणीत राहिले नाहीत. सत्य एवढंच आहे की, त्यांच्या जाण्याने आपल्या निर्दोष, हरवलेल्या विनोदाच्या परतीच्या शक्यताही लोप पावल्या आहेत.
मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा
.................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख ‘एनडीटीव्ही’च्या ब्लॉगवर २१ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://ndtv.in/blogs/priyadarshans-blog-rajus-laughter-in-this-desert-of-culture-3364983
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment