अजूनकाही
सध्या शिक्षण क्षेत्रात केंद्र सरकार तसेच अनेक राज्यांतील सरकारांमार्फत विविध प्रयोग राबवले जात आहेत. त्यामध्ये सत्तेत असलेल्या विचारधारेला प्रेरित असा अभ्यासक्रम, शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आणून त्याचा प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. नुकताच कर्नाटक सरकारने ‘सावरकर बुलबुलवर बसून रोज अंदमानच्या तुरुंगातून मायदेशी जात असत’, अशा आशयाचा एक धडा अभ्यासक्रमात घेतला आहे. विशिष्ट हेतूने सरकारी शाळांची रंगरंगोटी करून आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्याचे ब्रँडिंग काही पुढारी करताना दिसत आहेत. यामागे त्यांचा हेतू खरोखर शाळांचा विकास की, केवळ स्वतःचा प्रचार, हे स्पष्ट व्हायला थोडा वेळ लागणार आहे.
सोबतच शिक्षकाने काय खावे, कुठे राहावे इथपासून त्यांच्यावर थेट विधानसभेत टीका करणारे काही आमदार दिसतात. यावरून एकंदरीतच आज शिक्षणाच्या बाजारीकरणासोबतच त्याच्या राजकीयकरणालासुद्धा गती आलेली दिसून येते.
याच मालिकेतला पुढचा सामना येत्या काळात महाराष्ट्रात रंगणार, अशी चिन्हे आहेत. माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पुण्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल असे शिकवले पाहिजे. जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही,’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गृहपाठ फक्त शिक्षकांसाठी पळवाट असते का?
तो शालेय शिक्षणात का आवश्यक आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे.
‘गृहपाठ’ या शब्दाची बहुतेक विद्यार्थ्यांना भीती वाटते, परंतु हा पारंपरिक शालेय शिक्षणाचा मुख्य भाग आहे. गृहपाठ महत्त्वाचा असतो, कारण तो लहान मुलांमध्ये मुख्य कौशल्ये विकसित करतो, जी त्यांना शाळेत आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. सुधारित ग्रेड, शिस्त, वेळ व्यवस्थापन, संसाधने वापरणे आणि संप्रेषण सुधारणे, ही सर्व जीवन कौशल्ये आहेत. ती गृहपाठामुळे सुधारतात आणि अद्वितीय संधींचे दरवाजे उघडतात… मुलांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत करतात. नियमित गृहपाठ, ही मुलांच्या भविष्यातील गुंतवणूक मानली पाहिजे. त्यामुळे पुढील फायदे होतात -
गृहपाठ सरावाला प्रोत्साहन देतो
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, गृहपाठाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे तो सरावाच्या शिस्तीला प्रोत्साहन देतो. इतर क्रियाकलापांच्या तुलनेत हे वेळखाऊ आणि कंटाळवाणे असले तरी, कौशल्यांमध्ये पारंगत होण्यासाठी ही पुनरावृत्ती आवश्यक असते. गृहपाठ संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात मदत करतो. मुले वेगवेगळ्या गतीने शिकतात आणि वर्गातला वेळ काही विद्यार्थ्यांना विषयाच्या मुख्य संकल्पना पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुरेसा नसतो. घरी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाल्यास मुलांना अधिक सखोल समजून घेण्यास मदत होते. गृहपाठ महत्त्वाचा आहे, कारण तो पालकांना व मुलांना स्वातंत्र्य आणि ते ज्या विषयांशी संघर्ष करत असतील, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ देतो. परीक्षा आणि ग्रेडच्या बाबतीत या अतिरिक्त वेळेमुळे मोठा फरक पडतो.
गृहपाठात पालकांचा समावेश होतो
गृहपाठ पालकांना त्यांच्या मुलांच्या जीवनात गुंतवून ठेवायलाही मदत करतो. पालक त्यांच्या मुलाला गृहपाठात मदत करतात. ते त्यांना त्यांच्या शैक्षणिक यशात भाग घेण्यास प्रवृत्त करतात आणि पालकांना मूल शाळेत जे काही करत आहे, ते चालू ठेवण्यास अनुमती देते. याचा फायदा मूल आणि पालक यांना एकत्र जोडण्यात होतो. थोडक्यात, गृहपाठ एक सेतू म्हणून काम करतो आणि शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांना कसे शिकायला आवडते, याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करतो… त्यांच्या शिक्षण आणि विकासाकडे कसे जायचे, याची माहिती देतो. अनेक पालकांना त्यांच्या मुलांना गृहपाठ मिळावा, अशीदेखील इच्छा असते… जेणेकरून ते शाळेत काय शिकत आहेत, हे त्यांना समजते.
गृहपाठ वेळेचे व्यवस्थापन शिकवतो
गृहपाठ मुलांना त्यांच्या वेळेचे नियोजन करण्यास भाग पाडतो आणि त्यांच्या सर्व असाइनमेंटस वेळेवर पूर्ण करायला लावतो. गृहपाठामुळे विद्यार्थी त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यास शिकून आपल्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा आणि स्वतंत्र विचारांचा सराव करतात. गृहपाठाचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे तो निर्णय घेण्यास आणि तडजोड करण्यास भाग पाडतो.
नियमित गृहपाठ मुलांना महत्त्वाच्या चाचण्या आणि परीक्षांसाठी आवश्यक तो सराव करण्यासाठी मदत करतो. ज्या मुलांना गृहपाठ परिचित असतो, त्यांना तो पूर्ण करण्याच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे सोपे जाते. शिक्षण साहित्यात प्रवेश करणे, वेळ व्यवस्थापन आणि शिस्त यांसारखी कौशल्ये मुले शिकतात. त्यामुळे त्यांच्या ग्रेडस सुधारतात.
गृहपाठ शिकण्यासाठी अधिक वेळ देतो
शाळेच्या तासांमध्ये मुलांना मूळ संकल्पना समजून घेण्यासाठी वेळ पुरेसा ठरतोच, असे नाही. याउलट गृहपाठ मात्र वेळेच्या कमतरतेवर मात करतो. त्याचा मुलांना दीर्घकाळासाठी फायदा होतो. गृहपाठ मुलांना त्यांच्या ‘वर्कलोड’वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांची वेळ-व्यवस्थापन कौशल्ये वाढवण्यासाठी मदत करतो. गृहपाठ मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतो. वेळ व्यवस्थापन हे जीवनातील महत्त्वाचे कौशल्य आहे, जे मुलांना उच्च शिक्षण आणि त्यांच्या करिअरमध्ये मदत करते.
गृहपाठ ‘स्क्रीन वेळ’ कमी करतो
बहुतांश मुले टीव्ही पाहण्यात बरेच तास घालवतात. जर ते शाळेत नसतील तर हे तास आणखी वाढतात. गृहपाठ सहसा अवांछित असला तरी, तो अभ्यासाच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देतो आणि टीव्हीसमोर वेळ घालवण्यापासून परावृत्त करतो. गृहपाठाकडे आणखी एक अतिरिक्त क्रियाकलाप म्हणूनही पाहता येऊ शकते. अनेक पालक त्यांच्या मुलांचा अतिरिक्त वेळ भरण्यासाठी वेगवेगळ्या क्लब आणि धड्यांमध्ये बराच वेळ आणि पैसा गुंतवतात. अभ्यासेतर क्रियाकलापांप्रमाणेच गृहपाठ हाही एक जास्तीचा सराव असतो.
यावरून आपल्या लक्षात येईल की, गृहपाठ औषधासारखा किंवा पूरक आहारासारखा आहे. नाही घेतला तर प्रश्न आणि खूप घेतला तरी प्रश्नच. म्हणून ‘गृहपाठ नकोच’ अशी भूमिका न घेता योग्य तेवढा व योग्य प्रकारचा गृहपाठ उपयुक्तच आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शिक्षण समाज घडवणारे असावे, ते समाजाला हानी पोहचवणारे नसावे. आधीच आठवीपर्यंत सर्व पास, सोपा अभ्यासक्रम, टक्केवारीची खिरापत, त्यात आता गृहपाठ बंद… हे असे निर्णय राबवल्याने उद्याची सशक्त पिढी घडवता येईल का, याचा सरकारमध्ये बसलेले उच्च पदस्थ अधिकारी व मंत्री या सर्वांनी विचार करायला हवा.
शाळांची केवळ रंगरंगोटी करणे किंवा प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोकप्रिय निर्णय घेण्यापेक्षा शिक्षण क्षेत्राला विशिष्ट विचारप्रवाहाचा वाहक बनवण्यापासून रोखले पाहिजे. शिक्षणाला समाज घडवणारे एक महत्त्वाचे साधन करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. नाहीतर असे निर्णय मुलांच्या डोक्यांचे ‘खोके’ करणारे ठरतील, याबाबत शंका नाही..
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. विवेक बी. कोरडे शिक्षणक्रांती संघटना (महाराष्ट्र राज्य)चे राज्य समन्वयक आहेत.
vivekkorde0605@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment