अजूनकाही
सध्या दोन प्रकारच्या मुसलमानांची मज्जा आहे बुवा! सरकारी पदे भूषवून निवृत्त झालेल्या अन् दाढीटोपीवाल्या मुसलमानांना एकदम देशभर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळू लागली आहे. साक्षात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांना दर्शन देत आहेत. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ अशी म्हण मराठीत आहे. दिल्लीच तीच म्हण जरा बदलते. आधी गाडा येतो, मग नळ्याला भेटतो, पण एकत्र मात्र चालत नाहीत. तरीही गाड्याची महती फार असल्याने समस्त नळे धन्य धन्य पावतात. आपण सामान्य माणसे बुचकळ्यात पडतो अन विचारू लागतो – असे कसे झाले? द्वेष, तिरस्कार, चीड अशी अचानक कशी पालटली? हा खास संघीय नमुन्याचा ‘लव्ह-जिहाद’ तर नाही ना? असणार नक्कीच. ‘राष्ट्रीय लव्हंसेवक संघ’ असे तर नामांतर होणार नाही ना?
छे! छे! काहीतरी काय… अहो, साधी गोष्ट समजावून घ्या. तिकडे राहुल गांधी रोज संघाच्या नावाने खडे फोडत असताना यांनी शाखेत फक्त खडेच राहायचे की काय? नाही. सावध झाल्याचे लक्षण आहे हे. राहुलच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा सारा रोख हिंदुत्ववाद्यांनी तुकडे केलेला भारत जोडण्यावर असताना लोकही खूप दाद देऊ लागले. असतील कोणी राहुलला बघायला कडमडणारे, असतील कोणी पचका होतो का ते बघायला आलेले. पण छे! राहुलच्या पदयात्रेची दखल ‘गोदी मीडिया’ घेत नाही म्हणून काय झाले? गावोगावचे लोक येऊन बोलू लागले, बघू लागले, नोंद घेऊ लागले. ‘पप्पूपदयात्रा’ म्हणून खिल्ली उडवा की, आणखी काही करा... राहुलची त्याच्या बुटासकट दखल घ्यावी लागते आहे देशाला.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बहुधा त्यानेच हैराण झालेला संघपरिवार आम्हीही ‘भारत जोडो’वालेच आहोत, असे ठसवायला निघाला आहे. निघाला तो निघाला, पण ‘होयबां’च्या घरीच निघाला की तो! दाढीटोपीवाले ‘धर्मजीवी’ मुसलमान आणि चार-पाच ‘पेन्शनजीवी’ मुसलमान निवडून भेटीगाठी सुरू केल्या की त्याने. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात अन प्रचारकांच्या पुढाकारात सरसंघचालक निवडक मदरसे व मशिदी पाहून आले. दिल्लीतल्या ‘ऑल इंडिया इमाम’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. उमर अहमद इलियासी यांनी सरसंघचालकांची तुलना व तारीफ ‘राष्ट्रपिता, राष्ट्रसंत’ अशी केली. इतकी अचूक कशी काय केली असेल बुवा? सरसंघचालक ‘हिंदू राष्ट्रपिता’ आहेत, पण भारत अजून ‘हिंदूराष्ट्र’ व्हायचा असल्याने त्यांनी भावी बिरुदाची जाहीर वाच्यता केली आणि आपला बचाव करून घेतला.
राहुल गांधींचा धसका जसा बसला आहे, तसा यशवंत शिंदे यांचाही बसलेला दिसतो. एकेकाळच्या या पूर्णवेळ संघप्रचारकाने आपला नांदेडच्या बॉम्बस्फोटात सहभाग कसा व का होता, ते सांगण्यासाठी २९ ऑगस्ट २०२२ रोजी विशेष न्यायालयात साक्षीदार म्हणून येण्याबाबत अर्ज केला आहे. त्यांनी स्वत: यु-ट्युबवर आपली ही तयारी प्रक्षेपित केली असून ती आणि त्याच्या बातम्या गुगलवर बघता येतात. मालेगाव वगैरे बॉम्बस्फोटांतला हिंदुत्ववाद्यांचा सहभागही तसा सर्वांना समजून आला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी तर ‘ब्राह्मणीनिस्टस बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड्’ असे पुस्तकच लिहिले आहे.
नाही तर डॉ. भागवत आताच एकाएकी ‘होयबा’ मुसलमानांना का भेटावेत? लोकसभेत आज भाजपचा एकही मुस्लीम खासदार नाही. एकाही राज्याच्या विधानसभेत आमदार नाही. राज्यसभेतल्या भाजपायी मुसलमानांची मुदत संपत आलेली आहे किंवा संपलेली आहे. म्हणजे मुस्लिमांना उमेदवारी द्यायचीच नाही, असे भाजपचे धोरण अमलात येत असताना संघ काय करत होता? टाळ्याच वाजवत होता ना, ब्याद नाहीशी झाली म्हणून?
योगी आदित्यनाथांचे बुलडोझर आरोपींची घरे उदध्वस्त करत असताना डॉ. मोहन भागवत ऐकून न ऐकल्यासारखे करत होते का? बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांना ‘आता शिक्षा पुरे झाली’ म्हणून तुरुंगाबाहेर काढणारे गुजरात सरकार आणि त्या कैद्यांच्या सत्कारात बुडालेले हिंदुत्ववादी डॉ. भागवत यांनी बातम्यांत बघितले नसतील का? मुस्लीम पत्रकार, कार्यकर्ते, विद्यार्थी आदींना फुसक्या कारणांसाठी तुरुंगात सडवत ठेवले असताना डॉ. भागवत त्यापासून अनभिज्ञ असतील का?
अशा कैक मुस्लीम मामल्यांत उघडपणे द्वेष, तिरस्कार, छळ, सूड, अपमान, दहशत कोण आणत होते, याची जाणीव भागवतसाहेबांना नव्हती, याची शक्यता वाटत नाही. डीएनए फक्त सांगोवांगी नसावा. तो सहानुभूती, सहजीवन आणि समभाव यांतही असावा. एकाएकी मुसलमानांचा पुळका येणे, ही त्यांना पुढे येऊ घातलेल्या धोक्याची चाहूल वाटू लागली आहे.
सलोखा, मैत्री, सामंजस्य या गोष्टी २०१४मध्येच खतम झाल्याचे सामान्य मुसलमानांना समजून चुकले आहे. हिजाबची समस्या मुद्दाम उकरून काढायची (इराणच्या महिलांनी धर्माज्ञा आणि प्रथा स्वातंत्र्यासाठी धुडकावून लावणे सुरू केले, त्या धर्तीवर मुळीच नाही) आणि सदोदित ‘लव्ह-जिहाद’ची फसवी अन विखारी अफवा पसरवत राहायची. कोण असते हो यामागे? अमरावतीत दांडगाई करून ‘लव्ह-जिहाद’ माथी मारणारे तोंडघशी पडले तरी सुधारणार नाही, ही मंडळी…
१३ जुलै १९३१ रोजी काश्मीरचे राजे हरिसिंह यांची राजेशाही आणि ब्रिटिशांची साम्राज्यशाही यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सच्या २१ कार्यकर्त्यांना राजेसाहेबांच्या पोलिसांनी गोळ्या घालून मारून टाकले होते. त्यांचा ‘हुतात्मा दिन’ पाळणे दोन वर्षांपासून बंद झाले असून, २३ सप्टेंबर हा हरिसिंह यांचा जन्मदिन साजरा करणे सुरू झाले आहे. हा प्रकार कशात मोडतो, ते उच्चवर्णीय व उच्चवर्गीय मुस्लीम अधिकारी आणि दाढीटोपीधारी मुस्लीम भागवतांकडून समजावून घेतील का? संघाचे इंद्रेशकुमार काही दिवसांपूर्वी हैदराबादेत निजामाचे गुणगान करून गेले. मग या वर्षापासून हैदराबाद मुक्तिलढ्याची पंचाहत्तरी भाजप कोणत्या तोंडाने करतो, हेही सांगा म्हणावे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सरसंघचालक प्रथमच मशिदीत जातात, अशी बातमी भारतासारख्या देशात आश्चर्याची किंवा आत्मगौरवाची मानणे, ही खरे तर लज्जास्पद बाब आहे. मुसलमानांना गाजावाजा करत भेटल्याच्या बातम्या झळकवणे, ही कृती लज्जेची म्हणायची की लबाडीची याविषयी संभ्रम पडतो. नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी लाखो मुसलमानांना भयात लोटणे काय, प्रत्येकाला राष्ट्रभक्तीची पावती फाडायला लावणे काय, अन झुंडबळीच्या छायेत सतत वावरायला लावणे काय, हे फार क्रूर वर्तन चालले आहे.
सच्चर आयोग झाला, रहमान रिपोर्ट सादर झाला. आता मुसलमानांची स्थिती कशी असते, त्याचा अभ्यास करायला महाराष्ट्राच्या ‘असली’ हिंदुत्ववादी सरकारची तयारी सुरू झाली आहे. सर्वांचा हा कैवारी अवतार संशयास्पद वाटतो आहे. ही बतावणी चालली आहे, असे वाटते आहे…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment