काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... 
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची काही छायाचित्रं आणि बोधचिन्ह
  • Sat , 24 September 2022
  • पडघम देशकारण भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi

काँग्रेस पक्षाच्या नवीन (आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या) अध्यक्षाच्या निवडणुकीच्या हालचालींनी वेध घेतलेला असताना हा मजकूर प्रकाशित होईल, तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला पंधरवडा उलटलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या पंधरा दिवसांत तरी कष्टकरी-कामकरी, सर्वसामान्य आणि विशेषत: युवकांमध्ये या यात्रेविषयी मोठं आकर्षण निर्माण झालेलं दिसत आहे. या यात्रेमुळे राहुल गांधी यांचं नेतृत्व जसं एक वेगळा आयाम धारण करेल का, तसंच शैथिल्य पांघरूण निष्क्रिय झालेल्या काँग्रेस पक्षातही धुगधुगी निर्माण होईल किंवा नाही, हे समजण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागेल. थोडक्यात, काय तर ही पदयात्रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं भवितव्य ठरवणारी आहे. 

पत्रकारितेच्या गेल्या साडेचार दशकांच्या काळातल्या अशा अनेक यात्रा या यात्रेच्या निमित्तानं आठवल्या. १९७७ साली पत्रकारितेत आल्यावर लगेच जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांची गाजलेली भारत यात्रा आठवते. तेव्हा मी चिपळूणच्या ‘सागर’ या दैनिकात उमेदवारी करत होतो. तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि आम्हा पिढीचे आदर्श असलेले मधु दंडवते यांच्यामुळे या पदयात्रेत एक दिवस सहभागी होता आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात गाजलेली शेतकरी दिंडी होती आणि ती शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघाली होती. त्याबद्दल कविवर्य ना. धों. महानोर दररोजच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पहिल्या पानावर एक टिपण लिहीत असत. नंतर दि. बा. पाटील यांची जळगाव ते नागपूर पदयात्रा आठवते आणि या यात्रेत विचारवंत भा. ल. भोळे यांच्या समवेत पाच-सहा किलोमीटर झपाझपा चालल्यावर कशी दमछाक झाली होती, हेही स्मरतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांची राममंदिरासाठीची आणि समाजात टोकाची नफरत पसरवणारी रथयात्राही चांगली आठवते. सत्तेत आल्यावरही लालकृष्ण अडवाणी यांनी एक रथयात्रा काढली होती.  त्या यात्रेच्या काळात औरंगाबादला असताना रात्री उशिरा अडवाणी यांची प्रकृती किंचित बिघडली, तेव्हा हृदयरोगतज्ज्ञ  डॉ. सतीश रोपळेकर यांना झोपेतून उठवून आणून ईसीजी काढला, उपचार केले गेले होते. यासंबंधीची दिलेली एक्सक्युझिव्ह बातमी आठवते आणि त्यामुळे पत्रकारांना वाटलेली असूया व तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना वाटलेला विस्मयही पक्का आठवतो. (त्या रात्री लालकृष्ण अडवाणी यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहात होता आणि ‘लोकसत्ता’चा विशेष प्रतिनिधी म्हणून नुकतीच औरंगाबादला बदली झालेल्या माझाही डेरा त्याच परिसरात होता. त्यामुळे ही बातमी मला अगदी सहजच मिळालेली होती. )

अलीकडच्या दोन-अडीच दशकांत शिवसेनेचे दिवाकरराव रावते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जितक्या पदयात्रा काढल्या, तितक्या महाराष्ट्रात कोणत्याच राजकीय नेत्यांनी काढलेल्या नाहीत. दिवसभरात राहुल गांधी २२ ते २३ किलोमीटर चालतात. दिवाकरराव मात्र ३० किलोमीटर चालत. १८-२०पेक्षा जास्त किलोमीटर दिवसभरात चालणं मुळीच सोपं नाही. शरीरातल्या प्रत्येक अंगाचा आणि कसा कस लागतो, हे एक दिवस-दोन तास चालल्यावर दिवाकरराव रावते यांच्यासोबत चालताना अनुभवलं आहे.

अशा पदयात्रा करणाऱ्यांच्या वेशभूषा किंवा पादत्राणांवरून चर्चा करणं किंवा ट्रोल करणं फार सोप्पं आहे, प्रत्यक्षात हे आव्हान किती खडतर असतं, ते केवळ ट्रोल करणाऱ्यांना कधीच समजू शकणार नाही.

मुख्य विषय राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व यात्रा किंवा पदयात्रा पक्ष किमान सुस्थितीत असताना काढण्यात आलेल्या होत्या. राहुल गांधी मात्र काँग्रेस पक्ष निपचित पडल्यागत झालेला असताना ही यात्रा काढत आहेत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष, देशाच्या लोकशाही समोर एकपक्षीयत्वाचं आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात असताना व त्यामुळे आपली लोकशाही बहुमताकडून बहुसंख्याकवादाकडे ढकलली जात असताना, राहुल गांधी यांची पदयात्रा निघाली आहे. एकप्रकारे भारतीय लोकशाहीसमोर असलेलं एकपक्षीयत्वाचं संभाव्य संकट दूर करण्याचा राहुल गांधी यांचा हा प्रयत्न म्हणूनही या यात्रेकडे पाहायला हवं.

वर उल्लेख केलेल्या ज्या यात्रा किंवा पदयात्रा निघाल्या, तेव्हा त्या काढणाऱ्या त्या नेत्यांच्या नेतृत्वाला  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान देणारं त्यांच्या पक्षात कुणी नव्हतं. काँग्रेस पक्षात मात्र सर्व काही ‘ऑल वेल’ मुळीच नाही. ‘जी २३’ (खरं तर, त्यातले दोघे आता गळाले आहेत!) गटानं राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. याचं कारण, गेल्या दोन लोकसभा निवडणुकात काँग्रेसला सभागृहातलं विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही किमान जागा मिळवता आलेल्या नव्हत्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ४५च्या उंबरठ्यावर अडकून पडला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल शंका उपस्थित करत आधी ज्योतिरादित्य शिंदे, कपिल सिब्बल मग गुलाम नबी आझाद, योगानंद शास्त्री हे नेते बाहेर पडले आहेत. गोवा विधानसभेतले काँग्रेस पक्षाचे ११ सदस्य तर ही यात्रा सुरू झाल्यावर काँग्रेसच्या वस्त्राचा त्याग करून ‘दिगंबर’ झालेले  आहेत. ‘जी २३’ गटाचे बहुसंख्य नेते या पदयात्रेपासून लांबच आहेत.

आणखी एक मुद्दा म्हणजे भाजप आणि काँग्रेसेतर अन्य विरोधी पक्षही या यात्रेपासून केवळ फटकूनच आहेत असं नव्हे, तर नितीशकुमार, शरद पवार यांच्यासारखे नेते (न मिळणाऱ्या देशाच्या पंतप्रधानपदासाठी) वेगळी मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. शिवाय हिंदुत्ववाद्याच्या घनघोर आणि अनेकदा अश्लाघ्यकडे झुकणाऱ्या टीकास्त्राचे राहुल गांधी लक्ष्य ठरलेले आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही यात्रा निघालेली आहे. या यात्रेतून काय साध्य होईल आणि काय नाही, याचा लेखाजोखा २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेलच.

१२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातून पाच महिने चालणाऱ्या या ३५७० किलोमीटरच्या यात्रेमुळे जर खरंच निपचित पडलेल्या काँग्रेस पक्षात काही चैतन्य सळाळलं आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १००च्या आसपास जागा मिळाल्या तरी ही यात्रा यशस्वी झाली असं मानता येईल. शिवाय मुद्दा राहुल गांधी यांच्यातील नेतृत्वाच्या क्षमतेचा आहे. त्याबद्दल विरोधी पक्षांकडूनच नव्हे, तर स्वपक्षीयांकडूनही टीकेचे वार त्यांना अजूनही सहन करावे लागत आहे. त्यातील एक वार त्यांना देशाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याची स्थिती (ground reality) न समजण्याचा आहे.  या यात्रेमुळे राहुल गांधी यांना जमिनीवरचा जिता-जागता भारत आणि त्याची संवेदना कळण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यातून त्यांचं असलेलं नेतृत्व अधिकाधिक उजळत जाणार आहे… आणि जर नेतृत्व गुण त्यांच्या आता नसतील तर त्यांना पैलू पडणार आहेत, हे नक्की.

राहुल गांधी यांनी आजवर केलेल्या काही राजकीय चुकांचं परिमार्जन ही यात्रा करेल का, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे, काँग्रेसला जर येत्या लोकसभा निवडणुकीत शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागी विजय संपादन करता आला, तर राहुल गांधी यांना असणारा पक्षांतर्गंत विरोध पूर्णपणे संपुष्टात येईल आणि पक्षाच्या अध्यक्षपदी कुणीही विराजमान असलं तरी राहुल गांधी हेच पक्षाचे एकमेव निर्णायक नेते ठरतील. मात्र, असं घडलं नाही तर २०२४ची लोकसभा निवडणूक हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या अस्ताचा प्रारंभ असेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या सात-आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध बेडरपणे आवाज उठवणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत. त्यांच्या पक्षातल्यासकट भाजपेतर बहुसंख्य नेत्यांनी (सोयीस्कर) मौन बाळगलेलं असताना राहुल गांधी मात्र देशभर फिरले. आता तर त्यांच्या पदयात्रेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. शिवाय ज्या पद्धतीनं लोकांशी राहुल गांधी संवाद साधत आहेत, तेही फारच सकारात्मक आहे. त्यांची लोकांशी संवाद साधण्याची शैली मृदु आहे आणि म्हणूनच आश्चर्यस्तंभित करणारी आहे. भेटायला आलेल्या मुलीच्या पायातल्या सँडल्सचे सुटलेले बकल लावून देणारे आणि कळकटलेल्या वेषातल्या साध्या माणसाशी संवाद साधणारे असे राजकारणी दुर्मीळ आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्यंत अश्लाघ्यपणे ट्रोल होऊनही राहुल गांधी यांनी त्यांच्या या संवादाच्या दिनचर्येत बदल केलेला नाही, हेही महत्त्वाचं आहे. देशाच्या सत्ताधारी पक्षाचा सर्वोच्च नेता जनतेत जात नाही, सर्वसामान्य लोकांशी तर सोडाच पत्रकारांशीही संवाद साधण्यास कचरत असल्याचं चित्र असताना राहुल गांधी मात्र जनतेत जातात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्यासोबत पायी चालतात, त्यांची सुखदु:ख जाणून घेतात, त्यांच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करतात, या सर्वांतून उद्याचा एक सक्षम नेता या पदयात्रेतून तयार होण्याची लक्षणं  आहेत.  तसं जर खरंच घडलं तर, तेही या यात्रेचं एक मोठं यश असेल.

राहुल गांधी व्यक्ती व राजकारणी म्हणून आवडो अथवा न आवडो, त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे किंवा नाही, याबद्दल दुमत असो वा नसो, भारताच्या एकपक्षीय राजवटीकडे सुरू असलेल्या वाटचालीकडे  आणि बहुमताकडून बहुसंख्याकवादाकडे झुकू पाहणाऱ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत, हे महत्त्वाचं आणि सकारात्मक आहे. त्यातून त्यांचं नेतृत्व उजळून निघणं किंवा न निघणं आणि काँग्रेस पक्षाला चैतन्य प्राप्त होतं किंवा नाही, हे सिद्ध होण्यासाठी काळ जाऊ द्यावा लागेल.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......