पाब्लो पिकासो यांचे ‘गेर्नीका’ आणि साल्वादोर दाली यांचे ‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ : जुलमी व पाशवी शक्तीचे प्रभावी प्रतीक आणि काळ व अवकाश या संकल्पनांचा नवा व अनोखा अर्थ
ग्रंथनामा - झलक
रमेशचंद्र पाटकर
  • ‘कलादर्पण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 24 September 2022
  • ग्रंथनामा झलक कलादर्पण Kaladarpan रमेशचंद्र पाटकर Rameshchandra Patkar पाब्लो पिकासो Pablo Picasso गेर्नीका Guernica साल्वादोर दाली Salvador Dalí पर्सिस्टन्स ऑफ मेमरी The Persistence of Memory

ज्येष्ठ कलासमीक्षक रमेशचंद्र पाटकर यांचं ‘कलादर्पण : कलाविषयक लेखसंग्रह’ हे पुस्तकंच काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं आहे. लोकवाङ्‌मय गृहाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात प्रामुख्याने कलेविषयीचे लेख आहेत. मात्र केवळ कलाविचार असे त्यांचे स्वरूप नाही, तर ज्या राजकीय-सामाजिक पर्यावरणात कला आकार घेते, साकार होते, तो काळही पाटकरांनी उभा केलेला आहे. कलेला राजकीय-सामजिक संदर्भ असतातच. त्यांचा अन्वयर्थक उलगडा करत पाटकर विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान यांचेही दाखले उचित ठिकाणी देतात. त्यामुळे या पुस्तकातून कला-समाज यांचे परस्परसंबंध, कला, कारागिरी आणि अभिजात कला यांतील सीमारेषा, कलाविकास आणि तत्कालीन राजकीय-सामाजिक अवकाश यांचंही भान या पुस्तकातून येतं. ‘कलेचा सामाजिक भाष्यकार’ या भूमिकेतून पाटकरांनी हे लेखन केलं आहे. या पुस्तकातील हा एक लेख…

.................................................................................................................................................................

विसाव्या शतकात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आविष्काराने जागतिक कलेच्या कॅनव्हासवर स्वत:ची नाममुद्रा चिरस्थायी करणाऱ्या चित्रकारांत पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) आणि साल्वादोर दाली (१९०४-१९८९) यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. कलेची संपन्न परंपरा लाभलेल्या स्पेनमधील मालागा (Malaga) व फिगेरास (Figueras) या छोट्या शहरांत अनुक्रमे पिकासो व दाली यांचा जन्म झाला.

पिकासोचे वडील रुइझ (Ruiz) हे चित्रकार व चित्रकला शिक्षक होते, तर दालीचे वडील साल्वादोर राफाएल (Salvador Rafael) हे नोटरी (कायद्यांच्या व्यवहारातील अधिकारी व्यक्ती) होते. या दोघांनाही बालपणापासून चित्रकलेची आवड होती. पक्ष्यांची चित्रे काढणे हा पिकासोचा छंद होता. पांढरे कबुतर हा तर त्याचा आवडता पक्षी. त्याची बरीच चित्रे त्याने काढली आहेत. (मोठेपणी काढलेले आणि ‘शांततेचे प्रतीक’ म्हणून लोकप्रिय झालेले कबुतराचे चित्र प्रसिद्ध आहे.) दालीने वयाच्या चौदाव्या वर्षी (१९१८) शहरातील नगरपालिकेच्या नाट्यगृहात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पिकासो हा निव्वळ चित्रकार नव्हता, तर शिल्पकारही होता. धातूच्या पत्र्यावरील कोरीव काम (engraving), चित्रमुद्रण (prints) यातही त्याला गती होती. दालीनेही काही शिल्पे घडवली होती. पुस्तकांची मुखपृष्ठे, दागदागिन्यांचे नक्षीकाम यांसारखे कलाप्रकारही त्याने हाताळले होते. एक प्रायोगिक चित्रपटही त्याच्या नावावर आहे.

त्या वेळी पॅरिस हे कलेचे माहेरघर होते. नाव, पैसा मिळवण्यासाठी आणि कलावंत म्हणून आपली कारकीर्द नावीन्यपूर्ण व विविधांगी विकास करणाऱ्या दृक्प्रत्ययवाद (impressionism), घनावाद (cubism) यांसारख्या चळवळीचे उगमस्थान पॅरिस होते. या चळवळींचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रभाव या दोन चित्रकारांवर पडला होता. दोघेही प्रयोगशील चित्रकार होते. पिकासोची कलानिमिर्तीची ऊर्जा व कल्पनाशक्तीचा आवाका व्यापक होता. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलेविषयी पिकासोने म्हटले आहे : “अभिव्यक्ती करण्याजोगे काही गवसले तर भूत-भविष्याचा विचार न करता त्याला चित्ररूप देतो. मी ज्या कलाशैलीचा उपयोग केला, त्या परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. जे विषय मला अभिव्यक्त करायचे होते, त्या विषयांनी मला अभिव्यक्तीचे वेगवेगळे मार्ग सुचवले आणि ते स्वीकारायला मी मागेपुढे पाहिले नाही.”

दालीनेही चित्रनिर्मितीच्या वाटचालीत वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याचे पर्यवसान शेवटी अतिवास्तववादी शैलीत झाले. त्याला विज्ञानात विशेष रुची होती. आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धान्ताने त्याच्या मनात कुतूहल निर्माण केले होते. त्यातील ‘अवकाश’ व ‘काळ’ या संकल्पनांचा दालीवर विशेष प्रभाव पडला. ‘चिरस्थायी स्मरण’ (‘The Persistence of Memory’) हे चित्र त्याचे उत्तम उदाहरण आहे. जपानने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बने केलेला प्रचंड विध्वंस हा त्याच्या चिंतनाचा विषय बनला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या चित्रनिर्मितीत त्याचे पडसाद उमटले. स्पेनमधील यादवी युद्धाचे अतिवास्तववादी शैलीत दालीने ‘स्पेन’ या चित्रात १९३८ साली चित्रण केले आहे.

पिकासोच्या कलानिर्मितीत ‘गेर्नीका’ हे चित्र जसे महत्त्वाचे आहे, तसे दालीचे 'चिरस्थायी स्मरण' हेदेखील महत्त्वाचे मानले जाते. या दोन्ही चित्रांचा आपण थोडा विस्ताराने विचार करूया.

गेर्नीका

स्पेनमधील प्रजासत्ताक सरकारने जुलै १९३७मध्ये पॅरिसला भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी पिकासोला एक चित्र तयार करायला सांगितले होते; ते चित्र म्हणजे ‘गेर्नीका’. प्रदर्शनातील स्पेनच्या दालनात ते प्रथमच प्रदर्शित केले गेले.

‘गेर्नीका’ला फार मोठा संदर्भ आहे. तो लक्षात घेतल्याशिवाय त्या चित्राचे नीट आकलन होणार नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर तीन वर्षे म्हणजे १९३६ साली स्पेनमध्ये यादवी युद्ध पेटले. उजव्या विचारसरणीच्या बंडखोरांनी स्पेनमधील प्रजासत्ताक उलथून टाकले. जनरल फ्रॅन्सिस्को फ्रांको याच्या नेतृत्वाखाली हे युद्ध लढवले जात होते. हिटलरच्या फॅसिझमच्या पूर्वकालीन खुणा फ्रांकोच्या राजवटीत दिसू लागल्या होत्या. स्पेनमधील रिपब्लिकनवाल्यांचे त्याने हत्याकांड केले. फ्रांकोच्या फॅसिझमच्या विरोधात जगातील काही विचारवंतांनी, कलावंतांनी प्रत्यक्ष भाग घेतला. १९३९च्या सुमारास युरोपमधील अमानुष व पाशवी शक्ती एकत्र आल्या. स्पेनमध्ये फ्रांको होताच; पण त्याच्या जोडीला जर्मनीत हिटलर व इटलीत मुसलोनी यांच्या रूपाने फॅसिझम अधिक आक्रमक बनला.

दहशत, हिंसा, भीती व मृत्यू यांचे फॅसिझमच्या रूपात जे ‘दर्शन’ घडत होते. त्याचे पडसाद पिकासोच्या चित्रात ‘गेर्नीका’पूर्वी उमटू लागले होते. आशय व रूप या दोन्ही दृष्टींनी पिकासोच्या चित्रात बदल होऊ लागले होते. ‘Weeping women’ हे १९३७मधील त्याचे चित्र एक उदाहरण म्हणून सांगता येईल. त्याच्या चित्रांत बैल व मेणबत्ती अशी काही नवी प्रतीके दिसू लागली होती. बैलाचे मस्तक व माणसाचे शरीर (minotaur) अशा रूपात असलेल्या आकृत्या दिसत होत्या. Minotaur हा ग्रीक पुराणातील एक प्राणी आहे. पाशवी शक्तीचे प्रतीक म्हणून पिकासोने त्याचे चित्रण केले आहे. उजव्या हातात फुलांचा गुच्छ आणि डाव्या हातात पेटलेली मेणबत्ती हे पाशवी शक्तीला विरोध करणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्याच्या चित्रांमध्ये येते. ‘गेर्नीका’मध्ये अशा रूपात प्रतीकांचे चित्रण झाले आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘गेर्नीका’त एका वास्तव घटनेचे प्रतीकरूपाने चित्रण केले गेले आहे.

जनरल फ्रांकोला मदत करणाऱ्या जर्मन बॉम्बफेक्या विमानांनी २५ एप्रिल १९३७ रोजी उत्तर स्पेनमधील गेर्नीका शहरावर बॉम्बवर्षाव करून ते शहर उद्ध्वस्त केले. त्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. या अमानुष कत्तलीचा व रक्तपाताचा पिकासोच्या मनावर झालेला तीव्र आघात ‘गेर्नीका’ या भव्य चित्राच्या (आकार : ३४९.३ x ७७६.६ से.मी.) निर्मितीमागील एक महत्त्वाचे कारण आहे.

हे चित्र तैलरंगात आहे आणि त्यातील मानवी प्राणी व वस्तूंच्या आकृत्या ओळखता येतात. या आकृत्या त्यांच्या मूळ वास्तव रूपात नाहीत. पिकासोने त्यांना वेगळे व विलक्षण रूप दिले आहे. मनुष्यप्राणी व वस्तू यांच्या मूळ वास्तवातील रूपांचे त्याने ‘विरूपीकरण’ करून त्यांना प्रतिमा व प्रतीकांचे रूप प्राप्त करून दिले आहे.

ते चित्र पाहिल्यावर काही गोष्टी डोळ्यांना चटकन जाणवतात. उदाहरणार्थ, हे चित्र काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगांत आणि त्यांच्या छटांत रंगवले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना दिवसा घडते की रात्री, घरात की घराबाहेर घडते हे चित्रातून स्पष्ट होत नाही. याचा अर्थ मूळ घटनेला असलेला स्थलकालाचा संदर्भ पिकासोने चित्रात पुसून टाकला आहे आणि ते विश्वव्यापकतेच्या पातळीवर आणले आहे.

चित्रात ज्या प्रतिमा आहेत, त्यांपैकी एक प्रतिमा घोड्याची असून चित्रात ती साधारणपणे मध्यभागी दिसते. वेदनाग्रस्त झालेला व किंकाळी फोडणारा हा घोडा आहे. पाशवी शक्तींशी संघर्ष करणाऱ्या शक्तीचे घोडा हे प्रतीक आहे. घोड्याच्या वर डोळ्याच्या आकाराची प्रतिमा आहे. बुबुळाच्या जागी विजेचा दिवा किंवा बल्ब रेखाटला आहे. ते बॉम्बचे प्रतीक असावे, असे मानले जाते. घोड्याच्या खुरांखाली युद्धात मारला गेलेला एक योद्धा आहे. त्याच्या एका हातात तुटलेली तलवार आहे आणि त्यातून एक फूल उमलले आहे. निराशेतून आशेला फुटणारा अंकुर हा अर्थ त्यातून सुचवला जातो. खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या स्त्रीचे मस्तक आहे. आणि तिचा हात घोड्याच्या मस्तकापर्यंत ताणलेला असून तिच्या हाती दिवा पेटलेली चिमणी आहे. अंधारातून वाट दाखवणारा तो हात आहे. बैलाच्या मस्तकाखाली हातात मेलेले मूल घेऊन शोक करणाऱ्या मातेचे चित्र आहे. बैल निर्विकार आहे. तो पाशवी शक्तीचे प्रतीक आहे. मरणोन्मुख घोडा आणि विकारशून्य बैल ही परस्परविरोधी प्रवृत्तींची मुख्य प्रतीके आहेत. ती एकमेकांजवळ रेखाटून गेर्नीकाच्या शोकनाट्यातील तीव्रता सूचित केली आहे. आक्रंदन करणाऱ्या स्त्रियांचे चित्रण करताना त्यांच्या डोळ्यांना अश्रूचा दिलेला आकारदेखील सूचक आहे. संहारात सुंदर मानवी देह छिन्नविछिन्न करून एक ‘अघोर विरूपण’ फॅसिझमने केले होते. त्याच वास्तवाचे एक विरूपण ‘अतिवास्तव’पणे चित्रित करून पिकासोने गेर्नीकातून भयाचा व शोकाकुलतेचा विचार करायला लावणारा एक विलक्षण दृश्यानुभव साकार केला आहे. गेर्नीकात घडलेल्या संहाराचे व अमानष कृत्याचे चित्रण करणे एवढाच पिकासोचा हेतू नाही, तर यापुढे जगात जिथे जिथे गेर्नीकासारखी संहारक व अमानुष कृत्ये घडतील, त्याचे प्रतीकात्मक चित्रण त्याला करायचे होते. वास्तवातील एका विशिष्ट घटनेला त्याने ‘गेर्नीका’मध्ये एक विश्वव्यापक अर्थ प्राप्त करून दिला. त्यामुळे मानवी जीवन व संस्कृती यांना धोकादायक ठरणाऱ्या जुलमी व पाशवी शक्तीचे प्रभावी प्रतीक म्हणजे ‘गेर्नीका’ असा अर्थ त्या चित्रातून आपल्याला जाणवत राहतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’

दालीच्या चित्राचा विचार करण्यापूर्वी अतिवास्तववादी शैलीचा थोडक्यात परिचय करून घेऊ.

अतिवास्तववादी शैलीच्या मागे फ्रॉईडच्या मनोविश्लेषणाच्या सिद्धान्ताची प्रेरणा आहे. अबोध मनाच्या खोल तळाशी दडपलेल्या सुप्त वासनाविकारांचे, स्वप्न-दःस्वप्नांचे प्रकटीकरण प्रतिमा-प्रतीकांद्वारा करणे, हे अतिवास्तववादी चित्रशैलीचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. अबोध मनातील अनियंत्रित कल्पनासाहचर्य, स्वप्नांचे सार्वभौमत्व, स्वैर विचारतरंग, कल्पनाप्रचुर व अतींद्रिय प्रतिमा संघटना यांवर अतिवास्तववादी कलाप्रणालीची उभारणी झाली आहे. वास्तवाचे ‘जसेच्या तसे’ चित्रण करणे या प्रणालीत अपेक्षित नाही. अबोध मनाच्या सृजनशील शक्तींना वाट मोकळी करून देणे, हे तिचे मुख्य सूत्र आहे. स्वप्न व वास्तव यांच्यातील ‘विरोध’ दूर करून एक अनिबंध ‘वास्तव’, एक ‘अतिवास्तव’ निर्माण करणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. अतिवास्तववादी विश्व निर्माण करण्यासाठी वास्तवातील वस्तूंच्या रूपांचे ‘विरूपीकरण’ होणे हे अपरिहार्य होते. त्यामुळे (पिकासोनेही ‘गेर्नीका’त मनुष्यप्राण्यांचे व वस्तूंचे एका वेगळ्या शैलीत विरूपणच केले होते.) वास्तवातील तर्कसंगतीच्या फूटपट्ट्यांनी अतिवास्तववादी चित्राचे मूल्यमापन करता येणार नाही..

वर म्हटल्याप्रमाणे वरवर पाहता अत्यंत असंबद्ध व विस्कळीत वस्तुप्रतिमांची सांगड घालून मांडणी करणे, हे अतिवास्तववादी कलाशैलीचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. तसेच वस्तूंच्या किंवा मानवी देहाच्या परिचित रूपांची विरूपणे करणे, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

दालीच्या चित्रांतील जग हे त्याच्या अबोध मनातून निर्माण झालेले आहे. अतिशय विक्षिप्त, चमत्कृतिजन्य व धक्कादायक प्रतिमांचे ते जग आहे. छायाचित्रात ‘प्रकाश’ व ‘सावली’ असे दोन घटक असतात. या घटकांमुळे वास्तववादी पद्धतीचे चित्रण हे दालीच्या चित्रभाषेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. आपली चित्रे म्हणजे ‘हाताने रंगवलेल्या स्वप्नांची छायाचित्रे आहेत’ असे त्याने एका ठिकाणी म्हटले आहे.

‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ ही दालीची अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. मानवी स्मृतीचे चिरंतनत्व असा त्याचा अर्थ आहे. मानवी स्मृतीच्या चिरंतनत्वाचे अतिशय कल्पकतेने त्याने चित्रण केले आहे. कसे ते आता आपण पाहूया.

घड्याळाची प्रतिमा ही या चित्राच्या केंद्रस्थानी आहे. घड्याळाच्या प्रतिमेला यंत्रयुगाचा संदर्भ आहे. काळाची सतत जाणीव करून देणारे एक यंत्र घड्याळाच्या रूपात माणसाने निर्माण केले. काळाचे प्रतीक या अर्थाने घड्याळाचे चित्रण त्याने केलेले नाही. वेळ दाखवण्याचे कार्य जरी घड्याळ करत असले तरी ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही. काळ प्रवाही असतो, याची जाणीव दाली आपल्याला घड्याळाच्या प्रतिमेतून करून देतो. यांत्रिकपणे काळाची खरे तर वेळेची जाणीव करून देणारे वास्तवातील घड्याळ धातूचे बनलेले असते, ते कठीण व घनरूप असते. पण दाली आपल्याला अभिप्रेत असलेला आशय व्यक्त करण्यासाठी त्यांचे विरूपीकरण करतो म्हणजे त्यांना मृदू, ठिसूळ व लवचीक रूप देतो आणि त्यातून काळाचा प्रवाहीपणा सूचित करतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

चित्रात आणखीही काही प्रतिमा दिसतात. उदाहरणार्थ, सागरकिनाऱ्यावर सिमेंटसारख्या दिसणाऱ्या एका चौथऱ्यावर झाडाचा एक निष्पर्ण सांगाडा आहे. वस्त्र वाळत घालावे, तसे एक घड्याळ त्याच्या फांदीवर वाळत घातले आहे. दुसरे म्हणजे ते त्या चौथऱ्यावर आडवे-तिडवे पसरले आहे. त्याच्या बाजूला घड्याळाची गोल तबकडी आहे आणि एखाद्या मेलेल्या प्राण्याला कुरतडून खावे, तशा मुंग्या त्याच्यावर हल्ला करत आहेत. (दालीच्या इतर काही चित्रांत मुंग्यांची प्रतिमा आली आहे.) ऱ्हासाचे प्रतीक म्हणून ती प्रतिमा येते. घड्याळाची आणखी एक प्रतिमा आहे. एका मृत राक्षसी प्राण्याच्या शरीरावर कफनासारखे ते पसरले आहे.

वेगवेगळ्या लवचीक आकारांत, वेगवेगळ्या पातळ्यांवर दालीने घड्याळाच्या प्रतिमा चित्रित केल्या आहेत. त्यातून काळाचे प्रवाही व अनिवाशी रूप सूचित केले आहे. पण त्याचबरोबर निष्पर्ण झाडाचा सांगाडा, मेलेला राक्षसी प्राणी, हल्ला करणाऱ्या मुंग्या यांची घड्याळांशी सांगड घालून काळाचे विनाशी व संहारी रूपही सूचित केले आहे.

‘काळ’ या संकल्पनेप्रमाणे ‘अवकाश’ या संकल्पनेचे दालीने स्वत:ला जाणवलेले व अभिप्रेत असलेले रूप कसे साकार केले आहे ते पाहूया.

निळेभोर आकाश, पिवळसर-हिरवट पसरलेला प्रकाश, समुद्राचे संथ पाणी, त्यातून वर आलेले करड्या-किरमिजी रंगाचे सुळके अशा निसर्गदृश्याची पृष्ठभूमी घड्याळांना लाभली आहे. अवकाशाच्या भव्यतेचे व अनंतत्वाचे सूचन करणारे हे निसर्गदृश्य आहे. हे दृश्य आणि घड्याळांचे दृश्य यांतून अवकाश व काल यांतील ताण अतिशय सूक्ष्मपणे दालीने जाणवून दिला आहे. स्थिर अवकाश आणि प्रवाही काल यांचे परस्परांना छेदणारे चित्रण करून दालीने अवकाशाचा अनंतपणा आणि काळाचे संदिग्ध, गूढ व अमूर्त रूप ‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’मधून व्यक्त केले आहे. मानवी स्मृतीच्या चिरंतनत्वाचे संभ्रमित रूप आणि काळ व अवकाश या संकल्पनांना नवा व अनोखा अर्थ दालीने या चित्रातून प्राप्त करून दिला आहे.

‘कलादर्पण : कलाविषयक लेखसंग्रह’ - रमेशचंद्र पाटकर

लोकवाङ्‌मय गृह, मुंबई

पृष्ठे - २५८

मूल्य - ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......