अजूनकाही
१. भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आखणीदेखील केली आहे.
दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आखणीशिवायही बरंच काही करायचं असतं सत्ताधाऱ्यांनी, याची त्यांना कल्पना असेलच, नाही का? निवडणुकांत यश मिळालं की, आखणीचा छंद जडतो, नशा चढते; सगळं काही त्याच एका दिशेनं, हेतूनं आखलं जायला लागतं. साधी भाषणंही प्रचाराची भाषणं बनून बसतात. पण, २०१९ साली संसदीय पद्धतीने निवडणूक होणार आहे, असं सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरलंय, हीच एक दिलासादायक बातमी आहे म्हणायची.
.......................................................................................
२. पक्षनेतृत्व गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची टीका करत काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी आमदारकी आणि पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसकडून आता कोणतीही आशा नसून त्यांनी जनतेचा विश्वासघात केला अशी घणाघाती टीका त्यांनी केली. गुरुवारी गोवा विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव भाजपने जिंकला. ४० जागा असलेल्या विधानसभेत १३ जागांवर विजय मिळवूनही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले. या घडामोडींमुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे.
सगळं काही सत्तेसाठीच करायचं असतं, अशा गैरसमजुतीतून उभ्या राहात चाललेल्या सत्तापिपासू लोकशाहीची फळं आहेत ही. विश्वजीत भाऊ, गोव्यातली त्रिशंकू सरकारं कशी चालतात, कशी फुटतात, कशी बदलतात, याची तुम्हाला अधिक माहिती असायला हवी. अल्पमतातल्या सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याची क्षमता दाखवून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी दवडलीत, तर लोक काय तुम्हाला आपोआप सत्तेवर बसवणार आहेत का? विसरा जुने दिवस आणि जुनं राजकारण आता.
.......................................................................................
३. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णविराम दिला. फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.
बातमीत उल्लेख नाही, पण जिथे ही घोषणा झाली त्या परिसरातून ‘हुश्शSSS’ असा आवाज आल्याचं सांगतात बुवा प्रत्यक्षदर्शी. त्याच वेळी महाराष्ट्राच्या काही भागांमधून दु:खाचा सुस्काराही ऐकू आल्याचं सांगितलं जातं. खरं खोटं राम जाणे! बोला, मंदिर फिलहाल यही बनायेंगे!!!
.......................................................................................
४. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर गुरूवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना नम्रतेचे धडे गिरवण्याचा सल्ला दिला. ‘मुंह के लालों का भी शुक्रिया, जो चुप रहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या बोलघेवड्या मंत्र्यांना टोलाही लगावला. पक्षाच्या विजयामुळे अतिउत्साही होऊ नका, विनम्र राहा, असा सल्ला देत मी स्वत: बसणार नाही आणि कोणाला बसूही देणार नसल्याचा इशाराही त्यांनी खासदारांना दिला.
बॉस असल्याचा फायदा असा असतो की, कोणालाही काहीही सांगता येतं आणि ते आपल्या आचरणातून दाखवून देण्याचं बंधन नसतं. उलट, मी असाच वागणार; तुम्ही असे वागायला स्वत:ला बॉस समजता का, असं दरडावताही येतं. नोटाबंदीसारखे वादग्रस्त निर्णय आणि आधीच्याच सरकारच्या योजनांचं स्मार्ट पॅकेजिंग करून निर्माण केलेल्या काही दिखाऊ, जेमतेम योजना यांच्यापलीकडे या सरकारच्या खात्यात काय आहे दाखवण्याजोगं?
.......................................................................................
५. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षांची मोट बांधायला घेतली पाहिजे. प्रसंगी विरोधकांच्या या आघाडीचे नेतृत्त्व इतर कोणाकडे देण्याची तयारीही काँग्रेसने दाखवली पाहिजे. देशातील ठराविक लोकांशी संधान बांधून चालणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले.
मणिशंकरांना ही ज्ञानप्राप्ती आताच झाली की, ते मांडण्याची धैर्यप्राप्ती आताच झाली? शिवाय या सगळ्या निखळ राजकीय मांडण्या झाल्या. भारतीय जनता पक्षाने भारतीय जनतेच्या विचारशक्तीचा ताबा घेण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यासाठी या जनमानसाच्या आशाआकांक्षांचा अभ्यास चालवला आहे, काही अस्मितांवर जाणीवपूर्वक फुंकर घालणं सुरू झालेलं आहे. अशा वेळी या मनोवैज्ञानिक युद्धासाठी काँग्रेससकट एक तरी विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने सक्षम आहे का? ती तयारी नसेल, तर भाजप कितीही मोठ्या आघाडीला एका तडाख्यात भुईसपाट करेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
.......................................................................................
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment