अजूनकाही
चिनुआ अचेबे (१९३० - २०१३) यांना ‘आधुनिक आफ्रिकन साहित्याचे पितामह’ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपल्या लेखनातून वसाहतवादविरोधी भूमिका घेतली. त्यांनी नायजेरियातील प्रस्थापित सरकारांच्या चुकीच्या धोरणांविरोधात, भ्रष्ट कारभाराविरोधात कायम टीकात्मक लेखन केलं. १९८१ साली नायजेरिया विद्यापीठात भरलेल्या एका लेखकांच्या परिषदेत त्यांनी केलेल्या भाषणाचा हा अनुवाद. त्यांनी या भाषणात वर्णन केलेली त्यांच्या देशातील परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ लागली आहे की काय, अशी शंका वाटावी, असं वातावरण आसपास पाहायला मिळतं आहे. त्यांनी अशा काळात लेखकाची भूमिका काय असायला हवी, याविषयीदेखील मांडणी केली आहे.
.................................................................................................................................................................
लेखक हे त्यांच्या सहज प्रवृत्तीनुसार – आणि एखादा यात जोडू शकतो की, अनुभवानेही – सरकारबाबत काहीसे चिकित्सक असतात. त्यांना जेव्हा पुरस्कार जाहीर होतात, तेव्हाही आपण त्यांना घाबरतो... त्यांचं हे चिकित्सक असणं निरोगीपणाचं लक्षण आहे आणि उचितही आहे... या उबदार आशावादी वातावरणात राहणाऱ्या, वावरणाऱ्या आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या आपल्यासारख्या बहुतांशी उच्चवर्गीय नायजेरियन लोकांना धोक्याची जाणीव अकल्पित वाटू शकते. पण वर्तमानकाळात दानधर्माच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कट्टरता अंगी बाणवलेलं आडदांड श्वापद मान खाली घालून भटकतंय – धार्मिक कट्टरता, विशिष्ट वंश, जात यांप्रतीची कट्टरता आणि राजकीय कट्टरता.
मी गेल्या दोन आठवड्यांत जे वाचलं आणि पाहिलं तेवढ्याच आधारावर मला उदाहरणं देऊन माझा मुद्दा थोडक्यात स्पष्ट करू दे. आपल्या एका आघाडीच्या राष्ट्रीय वर्तमानपत्रात सदर लिहिणाऱ्या लेखकाने इराणविषयी चांगलं मत व्यक्त करण्याच्या आविर्भावात लिहिलं की, धर्माच्या प्रभावी अस्त्राने पूर्वेकडील राष्ट्रांकडून तसंच पाश्चात्त्य राष्ट्रांकडूनही होणारा भीषण हल्ला रोखण्यात यश मिळवलेला इराण हा तिसऱ्या जगातील एक देश आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हे मी दोन आठवड्यांपूर्वीचं सांगतोय. या आठवड्यात आपण सगळ्यांनी वाचलेलं आणि ऐकलेलं आहे की, इराणमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांच्या मालिकेत सईद सोलतानपूर (इराणमधील कवी, नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ता. त्याला २६ जून १९८१ रोजी ही शिक्षा सुनावण्यात आली.) या कवीला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचा गुन्हा काय होता तर ‘भ्रष्टाचार’ आणि ‘ईश्वराच्या विरोधातील लिखाण’.
आता याविषयी अधिक काही बोलण्याची गरज नाही. लेखक नैसर्गिकपणेच चिकित्सक असतात आणि धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात ते सुरक्षित राहू शकतील, असा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो.
मला आश्चर्य वाटायचं- बर्ट्रांड रसेल का असं मानायचा की, धर्माने या जगाला सगळ्यात मोठ्या अशा कोणत्या कुकर्माची ओळख करून दिलेली असेल, तर ती म्हणजे नैतिकदृष्ट्या कायम योग्य किंवा समर्थनीय असण्याचा गुण. प्रसंगोपात ज्यूंनी हा गुण शोधून काढल्याचं श्रेय घ्यायला हवं. पण समकालीन जगाकडे आणि ईश्वराच्या नावावर कोणताही गुन्हा करण्यासाठी स्वतःच दिलेल्या ‘प्रामाणिक’ समर्थनांवर विश्वास असलेल्या धोकादायक वेड्यांनी व्यापलेल्या समकालीन नायजेरियाकडे पाहता बर्ट्रांड रसेल काय म्हणत होता, ते आपण समजून घेतलं पाहिजे.
आणि आता थोडं राजकीय कट्टरतेबाबत. आपल्याकडे भयावह अशी दुश्चिन्हं पाहण्यासाठी प्रेषितांसारखी अंतर्दृष्टी असण्याची आवश्यकता आहे का? आणि पुन्हा या कट्टरतावाद्यांचं आसपास असणं, ही खरी चिंतेची बाब नाहीय, तर त्यांचं प्रकटीकरण थांबवण्यासाठी आणि नुकत्याच सुरुवात झालेल्या फॅसिझमच्या दृढीकरणाला अटकाव करण्यासाठी प्रामाणिक जनमताच्या रेट्याची अनुपस्थिती ही खरी काळजी वाढवणारी गोष्ट आहे.
एके दिवशी राज्याच्या राज्यपालाने एअरपोर्टवरील वार्ता परिषदेत म्हटलं की, ‘काहीही असो, मीच सरकार आहे.’ आणि हे ऐकून श्रोत्यांना धक्का बसून शांतता पसरण्याऐवजी या वक्तव्याचं स्वागत केलं गेलं होतं आणि तिथं आनंदी हास्य पसरलं होतं.
फ्रान्समधील चौदाव्या लुईसने नेमकं हेच वाक्य ३०० वर्षांपूर्वी म्हटलं होतं. त्याने फ्रान्सला केवळ उद्ध्वस्तच केलं होतं असं नाही, तर दोन राजवटींनंतर त्याच्या वंशजाने त्याची किंमतदेखील मोजली होती. क्रांतीच्या काळात त्याचं मुंडकं छाटलं गेलं होतं. त्यानंतर भयानक रक्तपात झाला होता. कदाचित एअरपोर्टवर होणारी वार्ता परिषद ही ज्ञानप्रसार आणि देशातल्या राजकीय गुंतागुंतीविषयी वाद घालण्यासाठी काही आदर्श जागा नाही. शांतचित्त, बुद्धिवादी अकॅडमिक वातावरणात या गोष्टींवर व्यवस्थित चर्चा करता येईल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ही वार्ता परिषद झाली, त्याच काळात आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने श्रोत्यांना याच विद्यापीठात सांगितलं होतं- “राजकारण हा सत्तेचा खेळ आहे आणि कुणीही शांततापूर्ण मार्गाने सत्ता सोडत नाही.” त्याच्या या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या होत्या. अकॅडमिक वर्तुळातील लोकांकडून! ज्ञानप्रसार करणाऱ्या वास्तुतून!
राजकारणी काय बोलतात किंवा करतात, ही इथं माझ्या चिंतेची बाब नाहीय. पण तुम्हाला उन्नत करणाऱ्या टीकेच्या आणि मतभेदाच्या परंपरेची अनुपस्थिती ही खरी चिंतेची बाब आहे. मी इथं नेहमीची पक्षांतली फाटाफूट आणि वस्तुनिष्ठ कल्पना आणि तत्त्वं, यांपासून रिक्त असणाऱ्या पक्षांच्या नेहमीच्या कुरबुरी यांबद्दल बोलत नाहीय. मी म्हणतोय की, अशा परिस्थितीत लेखकाने मुक्त असायला हवं. बाल सैनिकासारखं कूच न करता प्रवाहाच्या विरोधात जाणं हा त्याचा स्वभावच आहे. त्याच्याकडे जोखीम उचलण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाहीय. आणि आपल्याला याची चांगली कल्पना असायला हवी आणि आपण त्यासाठी तयारही राहायला हवं.
मूळ इंग्रजी मजकुराचा मराठी अनुवाद - विकास पालवे
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment