बातमीच्या शीर्षकात ‘डकवर्थ-लुईस’नामक चेटकीचा उल्लेख हा वाचकाने ‘क्लिक’ करावे म्हणून लावलेला सापळा असतो…
पडघम - क्रीडानामा
मंदार काळे
  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत या सामन्यातील भारतीय क्रिकेटपटू
  • Thu , 22 September 2022
  • पडघम क्रीडानामा डकवर्थ-लुईस Duckworth-Lewis वेस्ट इंडिज West Indies भारत India क्रिकेट Cricket

१९९२मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे २२ वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून- त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करून- आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

ही विश्वचषक स्पर्धा- त्या काळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई, तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द. आफ्रिकेने अगदी सहज खेळ केला. पण ४२ षटके आणि पाच चेंडूंचा खेळ झालेला असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. वाया गेलेला नि खेळासाठी शिल्लक राहिलेला वेळ विचारात घेता, या डावातील षटकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पुढे जाण्यापूर्वी क्रिकेट आणि फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी वा तत्सम अन्य लोकप्रिय आंतरराष्ट्रीय खेळांमधला फरक अधोरेखित करून ठेवू या. अन्य खेळांमध्ये प्रत्येक खेळाडू नियमानुसार खेळला, तर (किंवा संघाने बदली खेळाडू उतरवला नाही तर) सामन्यात संपूर्ण वेळ खेळू शकतो. क्रिकेटप्रमाणे ‘खेळाडू बाद होणे’ हा प्रकार त्यात नसतो. त्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू सारख्याच संख्येने मैदानावर असतात, तेवढाच वेळ नि बव्हंशी एकाच कौशल्याचा खेळ खेळत असतात. याचा अर्थ संधीचा विचार केला तर दोनही संघांना नेहमीच सारखी संधी मिळत असते… क्रिकेटखेरीज बहुधा केवळ बेसबॉल हा एकच खेळ असा असावा, ज्यात दोन संघ एका डावात एकच कौशल्य वापरत असतात. या दोन्हींमध्ये प्रत्येक संघ फलंदाजी आणि गोलंदाजी (बेसबॉल/सॉफ्टबॉलमध्ये ‘पिचिंग’) असे वेगवेगळे डाव आलटून-पालटून खेळत असतात. बाकी फुटबॉल वगैरे खेळांत असा बाजूबदल नसतो.

क्रिकेटशी तुलना करता बेसबॉलसह बहुतेक खेळांच्या सामन्याचा एकूण वेळ मोजक्या तासांचाच असतो. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आला तरी पाऊस थांबल्यावर उरलेला वेळ भरून काढणे शक्य असते. क्रिकेटचा एकदिवसीय सामना हा इतर कोणत्याही प्रचलित खेळापेक्षा दीर्घकाळ खेळला जातो. प्रत्येकी चार तासांचे दोन डाव, असा अंदाजे आठ तासांचा खेळ होत असतो. जवळजवळ संपूर्ण दिवसच खेळ होत असल्याने वाया गेलेला वेळ भरून काढण्याइतका वेळ सामन्यानंतर शिल्लक राहील, याची शक्यता फारच कमी उरते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यात जर दुसरा डाव पहिल्यापेक्षा कमी वेळेचा अशी स्थिती निर्माण झाली, तर खेळाचा समतोल बिघडतो. त्यामुळे दुसर्‍या डावातील संधीच्या प्रमाणात पहिल्या डावातील कामगिरीतही काटछाट करणे अपरिहार्य होऊन बसते. क्रिकेटमध्ये षटकांच्या मोजमापात खेळ होत असतो. त्यामुळे जेवढी षटके दुसर्‍या डावात खेळणे शक्य आहे, तितकीच पहिल्या डावात खेळली गेली असती तर पहिल्या संघाची कामगिरी काय असावी, याचे गणित करावे लागते. त्यानुसार त्या संघालाही मागाहून खेळणार्‍या संघाला मिळणार्‍या संधीच्या पातळीवर आणावे लागते.

वर उल्लेख केलेल्या विश्वचषक उपान्त्य सामन्याच्या काळात हे गणित दोन प्रकारे केले जात असे. पहिले म्हणजे त्या पहिल्या डावातील एकुण धावांची सरासरी काढून जेवढी षटके कमी झाली, त्यातून त्या सरासरीनुसार धावा कमी केल्या जात, आणि ते नवे लक्ष्य पुढच्या संघाला विजयासाठी दिले जाई. सरासरी हा शब्द असल्याने वरवर पाहता हा न्याय्य नियम वाटू शकेल. पण वास्तविक हा नियम प्रथम खेळलेल्या संघावर अन्याय करणारा आहे.

यात मागाहून खेळणार्‍या संघाला पहिल्यापासून एका निश्चित सरासरीने खेळता येते. पाऊस पडल्यामुळेही त्यात काही बदल होत नाही. षटके कमी झाल्याचा उलट त्यांना फायदाच मिळतो. कारण षटके कमी झाली, तरी तेवढेच खेळाडू खेळत असल्याने त्यांना अधिक धोका पत्करण्याची संधी मिळते. उलट प्रथम खेळलेल्या त्यांच्या दहा खेळाडूंना पन्नास षटके खेळण्याचे नियोजन करावे लागत असल्याने धोका पत्करण्याची क्षमता सुरुवातीला कमी असते. (फुटबॉल वगैरे खेळांत खेळाडू बाद होणे, हा प्रकारच नसल्याने ही शक्यताच निर्माण होत नाही. दोन्ही संघ सारख्याच पातळीवर खेळत असतात.)

याबाबत दुसरा नियम होता तो केवळ ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये वापरला जात असे. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्याने त्यातही हाच नियम लागू करण्यात आला होता. त्यानुसार दुसरा डाव चालू असताना पाऊस आला, तर जेवढी षटके कमी करावी लागतील, तेवढीच षटके पहिल्या डावातूनही कमी करावीत. पण सरासरीचा नियम न वापरता पहिल्या डावात सर्वांत कमी धावा झालेली षटके आधी वगळावीत, असा नियम होता. हा पहिल्या डावात खेळलेल्या संघाला न्याय देण्याचा थोडा प्रयत्न होता.

यामागचा तर्क असा की, आता षटके कमी झाल्यामुळे दुसरा डाव खेळणार्‍या संघाला कमी षटके खेळण्यासाठी तेवढेच फलंदाज शिल्लक आहेत. थोडक्यात, त्यांची धोका पत्करण्याची क्षमता अनायासे वाढली आहे. त्यामुळे पारडे समतोल करण्यासाठी पहिला डाव खेळलेल्या संघाला झुकते माप मिळायला हवे. त्यादृष्टीने हे उद्दिष्ट योग्यच होते. फक्त या उपान्त्य सामन्यात त्याचा जो परिणाम झाला, त्यामुळे त्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या सामन्यांत द. आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूंत २२ धावा आवश्यक होत्या. पाऊस थांबला तेव्हा उरलेल्या वेळेचे गणित करून दोन षटके कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी इंग्लंडच्या डावातून कमीत कमी धावा झालेली दोन षटके वगळण्यात येणार होती.

इंग्लंडच्या डावामध्ये द. आफ्रिकेच्या मेरिक प्रिंगल याने दोन षटके निर्धाव टाकली होती. ती वगळल्यामुळे इंग्लंडच्या एकुण धावांमधून एकही धाव कमी झाली नाही. परिणामी राहिलेल्या एकाच चेंडूमध्ये २२ धावा काढण्याचे अशक्यप्राय आव्हान आफ्रिकेला देण्यात आले. थोडक्यात, पाऊस येण्यापूर्वी शक्यतेच्या पातळीवर असलेला आफ्रिकेचा मध्ये आलेल्या पावसाने अशक्य होऊन बसला होता.

वर म्हटले तसे, वास्तविक हा नवा नियम सरासरी नियमापेक्षा अधिक समतोल होता. तरीही हे असे का झाले? याचे कारण असे की, हे दोनही नियम तसे सरधोपट आहेत. क्रिकेटसारख्या गुंतागुंतीच्या खेळातील फलंदाजी, गोलंदाजी या दोनही क्षेत्रांतील बर्‍याच शक्यतांचा विचार ते करत नाहीत.

इथलेच उदाहरण पाहिले तर, एखादे षटक निर्धाव खेळले जाणे हे फलंदाजाने धोका न पत्करल्याचे निदर्शक असेल, तसेच ते गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केल्याचेही असू शकेल. त्यामुळे त्या निर्धाव षटकांचा फायदा इंग्लंडला देताना, ती निर्धाव षटके टाकणार्‍या प्रिंगलवर अन्याय झाला होता. वास्तविक इतर सर्व गोलंदाज प्रति-षटक सरासरी पाचहून अधिक धावा देत असताना, प्रिंगलने दोन षटके निर्धाव टाकतानाच जेमतेम चारच्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याने इतर गोलंदाजांहून सरस कामगिरी केली होती. ज्याचा त्याच्या संघाला उलट तोटाच झाला.

क्रिकेटचा सामना ५० षटकांचा आहे की, २० षटकांचा आहे की, पाच दिवसांचा यावरून फलंदाज नि गोलंदाजांचे खेळाचे नियोजन असते. ५० षटकांच्या सामन्यात पुरी षटके फलंदाजी व्हावी, ती पुरेपूर वापरली जावीत, याचे नियोजन केले जात असते. त्यातून शक्य असलेल्या धोका पत्करुन ज्या वेगाने खेळाडू खेळू शकतील, त्याहून २० वा ३० षटकांमध्ये खेळताना, फलंदाजांची संख्या तेवढीच असल्याने, अधिक धोका पत्करू शकतात. त्यामुळे अधिक वेगाने धावा करण्याची संधी त्यांना मिळत असते. त्यामुळे सुरुवात ५० षटकांचा डाव गृहित धरून केली, पण पावसासारख्या कारणाने एखादा डाव मध्ये कमी झाला की, तो खेळणार्‍यांचे नियोजन - त्यांची चूक नसता- बिघडते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

याउलट नंतर खेळणार्‍या संघाला किती धावा करायच्या, नि किती षटकात याचे नेमके लक्ष्य आधीच मिळते. त्यामुळे फलंदाजीतील क्रमवारी बदलण्यापासून अनेक फायदे त्यांना घेता येतात. पण फायदा केवळ नंतर फलंदाजी करणार्‍या संघालाच होतो, असेही नाही. गोलंदाजी करणार्‍या संघालाही होऊ शकतो. अशा एकदिवसीय सामन्यांत पन्नास षटकांपैकी ‘जास्तीत जास्त दहा षटके (२० टक्के) एका गोलंदाजाला दिली जाऊ शकतात’ असा नियम आहे. दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने षटके कमी झाली, तर ही संख्याही कमी व्हायला हवी. पण पंचाईत अशी की, पाऊस येण्यापूर्वीच एखाद्या गोलंदाजाने आपली दहा षटके पुरी केली असणेही शक्य आहे. त्याचे काय करायचे?

त्याची जास्तीची षटके धावफलकातून (scorecard) रद्द करायची? आणि तसे केले तर मग त्या षटकांत काढल्या गेलेल्या धावांचे काय? त्याही फलंदाजांच्या धावांमधून वजा करायच्या? त्याहून वाईट म्हणजे त्या रद्द केलेल्या षटकांमध्ये बाद झालेल्या फलंदाजांचे काय करायचे? त्यांना खेळायला परत बोलवायचे? तसे असेल तर नंतर इतर गोलंदाजांची षटके यांना खेळायला मिळालेली नव्हती, ती परत टाकायची? पण मग त्यातून सामना लांबेल त्याचे काय?...

की त्याबाबत काहीच न करता त्यातील धावाच तेवढ्या वगळायच्या? तसे असेल तर पावसाची चिन्हे दिसत असेल तर दुसर्‍या डावात गोलंदाजी करणार्‍या संघाचा कर्णधार आपल्या हुकमी गोलंदाजांची षटके आधी पुरी करून घेऊ शकतो. (हीच संधी पहिल्या डावातही घेता येईल.) जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला अवघड षटके अधिक खेळावी लागतील. 

पण यात एक धोकाही आहे. कारण पाऊस आलाच नाही, तर दुय्यम गोलंदाजांना शेवटाकडे अधिक गोलंदाजी करावी लागेल नि फलंदाजी करणारा संघ शिल्लक फलंदाजांच्या संख्येनुसार अधिक धोका पत्करुन त्याचा फायदा करून घेऊ शकतील. पण हल्ली हवामानाचे अंदाज बरेचसे अचूक ठरत असल्याने तो धोका पत्करणे सहज शक्य होते.

हे सारे विवेचन सामन्यातील ‘पहिल्या डावात पावसाने पुरा खेळ झाला नाही तर’ या एकाच शक्यतेभोवती फिरते. या पलीकडे मुळात पहिला डाव पुरा हौन दुसरा डाव सुरू होण्यासच उशीर झाला, किंवा तो ही सुरू होऊन मध्येच व्यत्यय आला किंवा व्यत्ययानंतर खेळच झाला नाही .... अशा आणखी शक्यता आहेत. प्रत्येक वेळी दोन्ही संघांना समान संधीच्या पातळीवर आणण्याची पद्धत वेगवेगळी असणार आहे.

गोळाबेरीज सांगायची तर खेळादरम्यान अशा अनेक शक्यता उद्भवतात. त्या प्रत्येकीचा फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर होणारा परिणाम जोखता आला पाहिजे, त्यानंतर त्यांचा धावांच्या स्वरूपात रूपांतरित करता आले पाहिजे. गणित करता आले पाहिजे. विविध शक्यता (possibilities) आणि त्यांच्या संभाव्यता (probabilities) मांडणे, त्यांचे धावांच्या रूपात मूल्य काढणे आणि ते सारे एकत्रितरित्या वापरून सुधारित लक्ष्य देणे हे आव्हानात्मक होते. यासाठीची सुधारित नियमावली फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन शक्यताविज्ञानाच्या अभ्यासकांनी तयार केली आणि पुढे प्रा. स्टर्न यांनी त्यात भर घातली.

त्यांनी डावाच्या प्रत्येक टप्प्यावर दोन्ही संघांना उपलब्ध असणारी खेळाची ‘मानवी सामग्री’ (resources) मोजून, त्यानुसार प्रत्येक संघ समान संधीच्या पातळीवर असण्यासाठी किती धावा असायला हव्यात त्याचे गणित मांडले. या ‘सामग्री’मध्ये गोलंदाजांची उपलब्ध षटके आणि फलंदाजीस उपलब्ध असणार्‍या खेळाडूंची संख्या यांचा समावेश होता. पुढचे गणित जरी समजून घेतले नाही, तरी त्यामागचा दृष्टीकोन समजून घेतला तरी त्याबद्दल अज्ञानमूलक शेरबाजी करणे टाळता येईल.

पण स्वत:च्या अस्मिता, अहंकार नि गटाच्या सोयीच्या इतिहासाच्या आवृत्त्यांमध्ये रमलेल्या भूतकालभोगी नि पाठांतरप्रधान भारतीय समाजात गणित हा विषय मुळातच आधी नावडता असतो. त्यातच असा शक्यतांचा विचार करणे ही काळे-पांढरे, चांगले-वाईट, देव-सैतान अशा द्विदल भूमिकाच घेऊ शकणार्‍या मेंदूंना शिक्षाच असते. जे आपल्याला समजत नाही ते मुळातच वाईट, चुकीचे वा घातक असते हा सोपा निवाडा बहुसंख्य निवडत असतात. त्याला अनुसरून ‘डकवर्थ-लुईस नियमावली ही एक चेटकी आहे आणि पावसाने वा अन्य कारणाने वेळ वाया गेला की, तिची ताकद वाढून ती एका संघावर हल्ला करते’, असा काहीसा सार्वजनिक समज आहे.

माध्यमे हाती असलेले त्याच समाजातून येत असल्याने त्यांची स्थितीही वेगळी नाही. एवढेच नव्हे तर ‘आधीच मर्कट...’ तशी त्यांची गत असते. माध्यमे हाती असल्याने ‘आपण लिहू ते सत्य’ अशी काहीशी त्यांची धारणा असते. त्यातच ‘नफा हेच सर्वस्व’ मानणार्‍या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या मर्कटाला वृश्चिकदंशही झाल्याने त्यांच्या लीला अगाध असतात. आता हेच उदाहरण पाहा.

नुकताच म्हणजे २७ जुलै २०२२ या दिवशी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात असाच प्रत्येकी ५० षटकांचा सामना खेळला गेला. भारत पहिला डाव खेळत असताना वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर या डावात भारताला ३६ षटकेच फलंदाजी करता आली. त्यांत भारताने ३ गडी गमावून २२५ धावा केल्या. षटके कमी केल्यामुळे दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजसाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार २५८ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

२५८ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम २६ षटकांत १३६ धावांतच संपुष्टात आला. म्हणजे सुधारित लक्ष्य तर सोडाच, पण भारताने केलेल्या २२५ धावांच्या जवळपासही तो संघ पोहोचू शकला नव्हता. भारताच्या केवळ पाच फलंदाजांनी मिळून केलेल्या धावा वेस्ट इंडिजच्या अकरा जणांनाही करता आल्या नव्हत्या. त्यांना पुरी छत्तीस षटके फलंदाजीही करता आलेली नव्हती, तब्बल दहा षटके शिल्लक असतानाच त्यांचा डाव संपला होता. क्रिकेटच्या इतिहासात ज्यांना दणदणीत म्हणावेत असे जे विजय असतात त्यातील हा एक. पण दुसर्‍या दिवशी ‘लोकसत्ता’च्या पोर्टलवर (कदाचित छापील वृत्तपत्रातही) या बातमीचे शीर्षक होते. ‘...डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात.’

‘घात करणे’ याचा अर्थच मुळी ते कारण नसते तर ज्याचा घात झाला आहे, त्याची परिस्थिती वेगळी/चांगली असती, त्याला वा तिला यश मिळण्याची शक्यता असती किंवा असलेली वाढली असती असा असतो. डकवर्थ-लुईस नियम नसता, तरीही इथं वेस्ट-इंडिजचा दारुण पराभवच झालेला आहे. एकवेळ वेस्ट-इंडिजने २२५ हून जास्त पण २५७ हून कमी धावा केल्याने ते पराभूत झाले असते तर ‘कदाचित’ हे शीर्षक देता आले असते. माझ्या मते तरीही ते चूकच ठरले असते. पण एखाद्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाचा वापर झाला की, अशा वृत्त-जुळार्‍यांच्या जगात त्याच्या बातमीच्या शीर्षकात त्याचा उल्लेख अपरिहार्य असतो. शास्त्र असते ते.

सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर ९८ धावांवर नाबाद राहिल्याने शतक हुकलेल्या शुबमन गिलचा घात झाला आहे. पुरी पन्नास षटके सोडा, अजून एखादे षटक खेळायची संधी मिळाली असती तरी त्याला तो टप्पा पार करता आला असता. पण तो डकवर्थ-लुईस नियमाने नव्हे, तर पावसाने केला आहे. १९९२ च्या त्या उपान्त्य सामन्यात त्यावेळच्या त्या जुन्या नियमाने मेरिक प्रिंगलचा घात केला आहे. कारण त्या नियमामुळे त्याने केलेली उत्कृष्ट गोलंदाजी संघाला हितकारक ठरण्याऐवजी अपायकारक ठरल्यामुळे तो नायक ठरण्याऐवजी खलनायक ठरला आहे.

डकवर्थ-लुईस नियम ही शिक्षा नव्हे. ती वस्तुनिष्ठ मूल्यांकनातून गणित करणारी नियमावली आहे. २०१० मधले १०० रुपये नि आजचे १०० रुपये यांचे मूल्य एकसमान नसते. मधल्या काळात परिस्थिती बदलते, महागाई वाढते, आंतरराष्ट्रीय बाजारामुळे रुपयाचे मूल्य कमी-जास्त होते. त्यातून त्याच १०० रुपयांत किती टक्के जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात, याचे गणित बदलते. त्यामुळे वेतन/श्रममूल्यही बदलावे लागते. या बदलाची व्याप्ती २०१०-२०२२ या दरम्यान जितकी असेल त्यापेक्षा २०२०-२०२२ या दोनच वर्षांच्या टप्प्यात कमी असेल. हे समजत असेल तर बर्‍यापैकी विचार करू शकणार्‍याला डकवर्थ-लुईस नियमावली मागचे धोरण समजण्यास अवघड जाऊ नये.

या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात झाले तसे प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने ‘प्रत्यक्षात केलेल्या धावांपेक्षा त्यांनी अधिक धावा केल्या असत्या’ हे संभाव्यतेचे गणित बहुतेकांच्या पचनी पडत नाही. अशा स्थितीत मागाहून फलंदाजी करणार्‍या संघावर अन्याय केला जातो आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. याचे कारण आपण त्या संघाला नाकारल्या गेलेल्या संधींचा विचार केलेला नसतो. याच सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर भारताचे फक्त पाचच फलंदाज मैदानावर उतरू शकले होते. सुरुवातीलाच सामना ३६ षटकांचा आहे असे ठाऊक असते, (जसे वेस्ट इंडिजला दुसर्‍या डावात ठाऊक होते) तर हेच पाच फलंदाज अधिक धोका पत्करून अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न करु शकले असते. त्यातून २२५ हून अधिक धावा जमवणे शक्य होते.

पण इथं बाद झालेल्या खेळाडूंचा विचारही करायला हवा. भारताचे तीन फलंदाज बाद न होता, सहा फलंदाज बाद झाले असते गणित वेगळे झाले असते. कारण शिल्लक सहा फलंदाज उरलेल्या १४ षटकांत जितका धोका पत्करुन खेळू शकले असते तितके शिल्लक तीन फलंदाज खेळू शकले नसते. तीन अधिक बळी घेतल्याचे श्रेय मिळून वेस्ट इंडिजचे सुधारित लक्ष्य २४२ धावांचे म्हणजे २५८ हून बरेच कमी असते. वेस्ट इंडिजने भारताचे अनुक्रमे आठ किंवा नऊ फलंदाज बाद केले असते तर हेच लक्ष्य २११ आणि १९३ म्हणजे भारताने केलेल्या एकुण धावांहून कमी असते! (प्रत्यक्ष सामन्यात हे १९३ धावांचे लक्ष्यदेखील वेस्ट इंडिजला पार करता आलेले नाही!) म्हणजे हा नियम केवळ एकाच बाजूला फायदेशीर ठरतो असे नाही, पण इतके समजून घेण्याची तसदी कोण घेतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बातमीबार पोर्टल्सचा आलेला महापूर, क्लिकवर आधारित उत्पन्न, सतत नव्या बातम्या वा पोस्टची खायखाय... या लोंढ्यामध्ये पत्रकार केव्हाच मेले, बातमीदारही अस्तंगत होत आहेत. आता हे बसल्याबसल्या संगणकावर बातम्यांची जुळणी करणारे जुळारी (compositor) उरले आहेत. सनसनाटीकरण, वैय्यक्तिक अज्ञान, ते जाहीर करण्याची खुमखुमी, एका बातमीच्या चार बातम्या खरडण्याचे कौशल्य... या अलीकडे बातमी-जुळार्‍यांसाठी अर्हता (eligibility) असाव्यात.

एका वृत्तपत्राच्या पोर्टलवरचे एक क्रीडावृत्त-जुळारी  प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी आज कुणाला डच्चू मिळणार याचे भाकित नव्हे, निर्णय जाहीर करत असतात.  पण त्यांचा हा अभ्यासू निर्णय न जुमानता दुष्ट भारतीय कर्णधार भलत्याच कुणाला डच्चू देतात, किंवा मागचाच संघ कायम ठेवतात. पण त्यांना वा त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलला त्याने काही फरक पडत नाही. कारण दरम्यानच्या काळात क्लिकार्थ साधून त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलने आपला खिसा भरून घेतलेला असतो. मैदानावर वा पॅव्हेलियन वा डग-आऊटमध्ये कुणाची कणभर तीव्र प्रतिक्रिया दिसली, वा कुणी मतभेद व्यक्त करताना दिसले की, हे महाशय त्याची भलीमोठी बातमी करतात नि शीर्षकातच त्यांचा फार लाडका शब्द ‘राडा’ वापरून पुन्हा क्लिकार्थ साधतात. बातमीच्या शीर्षकात डकवर्थ-लुईसनामक चेटकीचा उल्लेख हाही असाच वाचकाने क्लिक करावे म्हणून लावलेला सापळा असतो. ‘नफा हेच मुख्य नि अंतिम उद्दिष्ट आणि क्लिकार्थ हे साध्य’ मानणार्‍यांच्या अहमहमिकेमध्ये माध्यमांची विश्वासार्हता लयाला जाणे, हे ओघाने आलेच.

बहुतेक सार्‍या शक्यता विचारात घेऊन शक्यताविज्ञान (Statistics) नियम बनवत असते. केवळ चार ओळी लिहिता येतात म्हणून वाटेल ते खरडणार्‍या या बातमी-जुळार्‍यांसारखे मन:पूत निवाडे देणे त्याला परवडत नाही. ज्यांना त्यातील काही कळत नाही, शक्यतांची भाषाच समजत नाही, अशा अडाण्यांनी कितीही आगपाखड केली तरी जगण्यातले बहुतेक सारे हे त्या नियमांच्या आधारेच सुरळीत चालत असते.

१. डकवर्थ-लुईस-स्टर्न लक्ष्याचे गणित https://www.omnicalculator.com/sports/duckworth-lewis येथून साभार.

२. बातमीबार पोर्टल्स = बातमीचे बार काढणारी पोर्टल्स

३. क्लिकार्थ - वाचकाने क्लिक(click) करण्यातून मिळालेले अप्रत्यक्ष उत्पन्न.

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......