‘वृत्तपत्र’ हे लोकशिक्षणाचे व समाजाच्या हितासाठी झगडण्याचे साधन म्हणून ज्यांना पत्करावयाचे असेल, त्यांनी ‘व्रत’ पाळले पाहिजे…
पडघम - माध्यमनामा
ना. भि. परुळेकर
  • ना. भि. परुळेकर, दै. ‘सकाळ’चा पहिला अंक आणि ‘निरोप घेता’ या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ
  • Tue , 20 September 2022
  • पडघम माध्यमनामा सकाळ Sakal ना. भि. परुळेकर N. B. Parulekar निरोप घेता Nirop Gheta संपादक Editor पत्रकारिता Journalism

दै. ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर (जन्म – २० सप्टेंबर १८९७, मृत्यू – ८ जानेवारी १९७३) यांची आज १२५वी जयंती. त्यानिमित्त आज पुण्यात ‘द प्रिंट’चे संस्थापक-संपादक शेखर गुप्ता यांचे ‘माध्यमे – लोकशाहीचा चौथा स्तंभ : वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच या वेळी ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारां’चेही वितरण करण्यात आले.

परुळेकरांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ हे दैनिक सुरू केले. त्यानंतर मराठी वर्तमानपत्रांनी एक प्रकारे कात टाकली. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवले होते. त्यांचे ‘निरोप घेता’ हे आत्मचरित्र १९८३ साली, तर ‘निवडक परुळेकर - १’ हा निवडक लेख व भाषणांचा संग्रह १९७४ साली प्रकाशित झाले. प्रस्तुत मजकूर परुळकेरांच्या ‘निरोप घेता’ या आत्मचरित्रातून संपादित करून घेतला आहे…

.................................................................................................................................................................

आत्मचरित्रात काही तरी समर्थन, प्रतिपक्षावर मात, आपण मांडलेले सिद्धान्त पुनःपुन्हा उगाळून, पुन्हा एकदा उजळून लोकांपुढे मांडावयाचे असतात. लोकांनी आपल्याविषयी गैरसमज करून घेतला, अशा कल्पना असतात, त्या दूर करावयाच्या असतात. असे काही मला साधावयाचे नव्हते. इतकेच काय, गेल्या चाळीस वर्षांच्या वृत्तपत्रीय व सार्वजनिक जीवनात माझ्या वाट्याला गैरसमज काही थोडे आले नाहीत. या काळात मराठी वृत्तपत्रांतून माझ्याविरुद्ध शाई आणि शब्द जितके खर्ची पडले असतील, तितके दुसऱ्या कोणा एका व्यक्तीच्या वाट्यास क्वचित आले असतील. अब्रुनुकसानीबद्दल मी कोणाविरुद्ध कधी कोर्टात गेलो नाही, असे करणे चांगले, असे माझे म्हणणे नाही. परंतु माझ्या हातात पत्र असून, बचावासाठी किंवा आत्मसमर्थनार्थ खुलासे किवा कोर्टकचेरी करत बसलो असतो, तर माझ्या हातून लोकांची सेवा झाली नसती. मी तो वेळ व श्रम भलतीकडे खर्च केले असते.

त्याशिवाय माझी मुळात श्रद्धा आहे की, ‘सत्यमेव जयते’ हे नुसते तत्त्व नसून, अखेर सत्य प्रकाशात येते. वैयक्तिक आत्मसमर्थनापुरते बोलावयाचे झाल्यास, माणसाने खोट्याला पिटाळून लावावयाच्या भानगडीत न पडता, सरळ, रास्त आणि लोकहिताची कामे करत जावीत, लोकापवाद आपोआप वितळून जातात. निष्ठा हे कार्यकर्त्या माणसाचे सर्वांत प्रभावी कवच. ते जितके जवळ करावे तितके माणसाचे बळ वाढते आणि मन मध्येच इकडे तिकडे विचलित न होता, एकाग्रतेने प्रभावी कार्य करू शकते - त्याला व्यक्तिमत्त्व म्हणतात. ते लोकांपासून लपवून ठेवता येणार नाही. कोणी कितीही धूळ फेकली तरी, मलिन होत नाही. आयुष्यातील या सत्याचा लोकांना परस्पर प्रत्यय येऊ लागतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘सकाळ’चा वाढलेला व्याप पाहून, “नानासाहेब यांनी कोठून पैसे आणले?”, असे म्हणत लोक नानाविध तर्कवितर्क करत असतात. हा पैसा मी आणि ‘सकाळ’मधील माझे सहकारी यांच्या निढळ्या घामाचा आहे. यात बाहेरील कोणाचा वाटा, हिस्सा किंवा कोणाची मालमत्ता नाही. ‘सकाळ’चे मूळ आधार जाहिरातदार आणि त्याचे वर्गणीदार. परंतु ते उत्पन्न पुरत नसल्यामुळे बँकेकडून वेळोवेळी कर्ज काढावे लागते. लोकांचे तर्कवितर्क कसे चमत्कारिक असतात, याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे. ‘सकाळ’च्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली, त्या वेळेस काही जण म्हणू लागले- “पेशवे आणि नंतरच्या सरदार-मानकऱ्यांच्या घराण्यांतील लोकांच्या दासी या ठिकाणी राहत. त्यांनी पुरून ठेवलेले डबोले नानासाहेबांना आयते मिळाले असावे.” येथे पुरून ठेवलेले मला मिळाले, यात काही शंका नाही. तो एक पाच-साडेपाच फूट लांबीचा पुरुषाचा सांगाडा होता! प्लेगच्या दिवसांत इंग्रज सैनिक घरात शिरून लागण झालेल्याला घेऊन जात, प्रसंगी घरातल्या लोकांचा नानाप्रकारे छळही करत असत.  तेव्हा इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साथीत दगावलेल्यांची प्रेते कित्येकदा गुपचूप पुरून टाकण्यात येत. त्यांतील तो सांगाडा असावा, तो मी ससून हॉस्पिटलला देऊन टाकला.

माझी अशी श्रद्धा आहे की, मनुष्यप्राणी जन्माला येतो, तेव्हा पूर्वजन्मीच्या संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन येतो. यात चांगल्याबरोबर वाईटही असते. वाइटाला घालवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे चांगल्या संस्कारांचा पुरस्कार वाढवत जाणे. त्यात आणखी भर घालत राहणे, म्हणजे वाईट आपोआप गळून पडावयास लागते. पुराणांतील ‘मार्कण्डेय आख्यान’ ज्यांनी वाचले असेल, त्यांना मार्कण्डेयाला नेण्यासाठी यम आपले पाश घेऊन उपस्थित झाल्याचा प्रसंग आठवत असेल. त्या यमाला घालवून देण्यासाठी मार्कण्डेयाने स्नेही बोलावले नाहीत, दोन हात केले नाहीत; शंकराच्या पिंडीला विळखा मारून असा चिकटून राहिला की, यम दुबळा होऊन तेथून मुकाट्याने माघारी गेला. तेव्हा चांगले संस्कार मनःपूर्वक जतन करत राहिले तर, वाईट झडून जातात, चांगले आणखी प्रभावी होतात. ते प्रभावी करण्यात व्यक्तीबरोबर कुटुंबाचा वाटा असतो. कुटुंबातील वडील माणसे हे संस्कार ओळखून त्यांना जितके उत्तेजन देत राहतील, तितक्या प्रमाणात जुन्या व नव्या पिढीचा सांधा नीट जुळेल. कुटुंबात पैसा नसला तरी आनंद, आणि कमाई नसली तरी लहान-थोरांत समाधान निर्माण होईल.

हे येथे सांगण्याचे कारण मी जे पुढे लिहिणार आहे, त्यात प्रसंगाप्रसंगाने चांगल्या संस्कारांची शिदोरी, हाच कसा या जीवनात माणसाचा खरा आधार होऊ शकतो, हे दाखवावयाचे आहे. आयुष्य हे कोडे असले तरी, ते सोडवण्याला गणिताप्रमाणे रीति किंवा रसायनशास्त्राप्रमाणे प्रायोगिक प्रकार नाहीत. श्रीकृष्ण किंवा श्रीरामचंद्रांनी आत्मचरित्रे लिहिली असती तरी, त्यांत चमत्कार आले असते. सामान्य माणसाला जोपर्यंत स्वतः काही चमत्कार करण्याचा मार्ग नाही, तोपर्यंत मोठ्यांचे पराक्रम या पुराणांतील कथा होत. तेव्हा सामान्य व्यक्तीने दीर्घ काळ प्रयत्न व तपश्चर्या करून कुठेकुठे असामान्यता गाठली असेल, तर ती खरी मार्गदर्शक होऊ शकते. त्यासाठी आज कोणती मोठी अडचण असेल तर, लोकांच्या विचारांत आणि आचारांत मोठेपणाच्या खोट्या कल्पनांनी केलेली घरे, ती काढून टाकून माणसाने मूळ गणितावर आले पाहिजे. ते गणित जो पाहील, त्याला रस्ता अवघड असला तरी, आटोक्यातला आहे, हे ध्यानात येईल.

मार्कण्डेयाने शंकराच्या पिंडीला विळखा घातल्याने यम गेला असेल, पण माणसाच्या मनातली यमाची पकड इतक्या सहजासहजी जात नाही. पूर्वजन्मीच्या दुष्कृतीत या जन्मात माणसाची इंद्रिये आणखी भर टाकत असतात. त्या इंद्रियांचा निग्रह कसा करावा, ती आवरून सन्मार्गाला कशी लावावीत, याबद्दलचा उपदेश, कथा, संवाद यांनी पुराणे भरून गेली आहेत. ‘रामायण’-‘महाभारता’तील हा मुख्य विषय म्हटला तरी चालेल. साऱ्या उपनिषदांत व धर्मशास्त्रांत पुन:पुन्हा त्याची उजळणी केलेली दिसेल. जितेंद्रियत्व असल्याखेरीज बुद्धिमत्व येत नाही आणि बुद्धी नसेल तर, सुखाला दुःख आणि दुःखाला सुख म्हणून, कवटाळून माणसाचा जीव गोंधळतच जाईल.

कामावर मात करावयाची असेल, तर तप पाहिजे. चांगली गोष्ट पुन:पुन्हा निश्चयाने करणे म्हणजे तप. त्या तपापासून माणसाला दूर व भलत्या मार्गावर नेणारा अहंकार. त्या अहंकाराच्या पोटात एक तोतया ‘मी’ असतो. तो पुन:पुन्हा पुढे येऊन आपण राज्य करू म्हणतो. मान, सन्मान, यश, अपयश, राग, लोभ ही सारी त्या तोतयाची ओढ आणि संपत्ती. तेव्हा त्याला बाहेर घालवून दिल्याशिवाय हा संभार बाहेर जाणार नाही, माणसाला पीडा देत राहील. कांद्याच्या पापुद्ऱ्याप्रमाणे या तोतया ‘मी’ची पुटे खऱ्या ‘मी’वर चढलेली असतात. ती त्या त्या प्रसंगाने ओळखून, हेरून एकएक काढून टाकली पाहिजेत. ती पुढे इतकी पातळ, जवळजवळ अदृश्य आणि डोळ्यांना न दिसणारी, परंतु परिणामी असतात की, तपस्वी आणि विरक्ताच्या पोटांतदेखील अहंकाराचे हे तंतू घर करून बसलेले सापडतात. जन्मभर ते काढून टाकतच राहिले पाहिजे. हे जितके पूर्णतेने होईल त्या प्रमाणात मी वर सांगितलेले तप निर्मम आणि निरहंकारी होऊन, ‘गीते’त म्हटल्याप्रमाणे, त्या माणसाच्या आजुबाजूलाच, याच जगात त्याला स्वर्ग भेटेल.

ही काही मी संन्याशाची गोष्ट सांगत नाही, संसारी माणसाचा हा मार्ग आहे. तो धरून जितक्या प्रमाणात आपण जाऊ त्या प्रमाणात स्वतःला व जगाला आत्यंतिक सुख व संतोष देण्याची पात्रता माणसात येईल. ते सुख व तो संतोष यासाठी प्रयत्न करावा लागणार नाही, तो त्याच्या प्रकृतीचा गुण होऊन बसेल.

सारांश, आज प्रत्येक क्षेत्रात खोट्या कल्पना बोकाळल्या असून, त्या काढून टाकून मूळ व सोप्या व्यवहाराच्या पायरीवर माणसाने आले पाहिजे. शरीराचे पोषण, अखेरपक्षी सूक्ष्म रक्तवाहिन्या अन्नरस नेऊन पोहोचवतात त्यातून होते. त्याप्रमाणे शब्दांचा गुंतवळा टाकून माणूस तात्त्विक जीवनाचा परिपोष करू म्हणेल, तर संसारातील बारीकबारीक गोष्टी, निश्चय आणि सत्याच्या पायवाटा, त्याचे जीवन समृद्ध करू शकतील.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझ्या जीवनात अनुभव जसजसे आले आणि त्यातून जसे दिसले, ते वाचकांपुढे ठेवावेत, त्यांतून त्यांना काही घेता आले तर घ्यावे, यापलीकडे माझा काही संकल्प नाही. हे करत असताना साऱ्या आयुष्याची दृष्टी मजपुढे आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील विक्रम, सिद्धी किंवा त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान मला सांगावयाचे नाही. त्यामुळे हे माझे लिखाण जास्तीत जास्त समाजाला उपयोगी पडू शकेल, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत त्यातले काही घेता येण्यासारखे होईल, असे मला वाटते.

माझा मूळ पिंड शिक्षकाचा. तो वृत्तपत्राच्या चौकटीत आणून मी ओतला. हे काम अत्यंत जिकिरीचे. तारेवरची कसरत म्हटले तरी चालेल! शिक्षक स्वतंत्र बुद्धीचा, स्वतंत्र विचाराचा, कोणाशी बांधून न घेतलेला, केवळ विद्या व लोकहिताच्या दृष्टीने वागणारा असेल, तर त्याचा प्रभाव. हे गुण मी वृत्तपत्रात आणून सोडण्याची शिकस्त केली.

कोणाचीही आर्थिक मदत, कोणत्याही पक्षाचा किंवा श्रीमंत व्यक्तीचा आधार न घेता, स्वतःच्या पायावर वृत्तपत्र उभे करणे, ही फार कष्टाची गोष्ट. त्याबरोबर संयमही आला. अशा संपादकाला कोणाशी वैर साधावयाचे असत नाही. प्रसंगापुरता त्याचा विरोध राहील, परंतु तो संपताच या विरोधाचा अंश त्याच्या मनात राहता कामा नये, लिखाणात येता कामा नये. वृत्तपत्र म्हणजे चार शिकलेल्या माणसांतील वादाचे आणि चर्चेचे क्षेत्र, त्यातील किंवा त्याशी संबंधित चारचौघा मंडळींनी जमावे, गावातील कुटाळ विषयांवर चर्चा करावी, ज्यांचा संबंध सर्व जनतेच्या जीवनाशी नाही त्यांवर लिहावे; ‘राजकारण’ हा शब्द इतका उथळ झाला आहे की, तो हातात धरवत नाही, अशा विषयावर मल्लिनाथी करावी आणि मग वृत्तपत्रासाठी येणाऱ्या आयत्या बातम्यांवर आपला नित्याचा चरितार्थ भागवावा; ही परंपरा मी मोडून काढली. लोकांच्या जीवनात ‘सकाळ’ आणून सोडला आणि ‘सकाळ’च्या जीवनात लोकांचे प्रश्न उभे केले. ते धोरण केवळ आजकालचे नसून, चाळीस वर्षांपूर्वीपासून मी या उपक्रमाला सुरुवात केली, त्याची फळे आता दिसू लागली आहेत.

माझे तर असे मत आहे की, वर्तमानपत्र हा विषय काही भागापुरता करमणुकीचा. असला तरी, मुख्यतः लोकशिक्षणाचा आहे. समाजाचे चौफेर शिक्षण व जागृती वृत्तपत्रातून झाली पाहिजे. हे लिहिण्यात ‘मी’ हा शब्द वापरतो, तो केवळ व्याकरणाच्या अर्थाने प्रथम पुरुषी अवश्य म्हणून, त्यात अहंकाराचा लवलेश नाही. स्थानिक नगरपालिकांच्या प्रश्नांत ‘सकाळ’ने हिरीरीने भाग घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील लहान म्युनिसिपालिट्यांतील प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे म्हणून त्यांचा संघ स्थापन केला आणि त्या वाटेने कित्येक कामे करून घेतली. लहान गावच्या नगरपालिकेतील सभासद एकत्र येऊ लागले. लोणावळा, तळेगाव, कऱ्हाड, सातारा, मिरज, येथपर्यंत निवडणुकांच्या वेळी मी प्रचाराची व्याख्याने देत हिंडलो आहे. पुणे नगरपालिकेत तर ‘नागरी संघटना’ स्थापन केली. तीत केलेल्या कामाचा येथे उल्लेख करत नाही. पूर व दुष्काळनिवारणासाठी तेरा लाखांहून अधिक निधी मी व माझ्या सहकाऱ्यांनी गोळा केला. विजापूरपासून बंगालपर्यंत, तेथून राजस्थान, गुजरात, संगमनेर, पानशेत, कोयनेचा भूकंप, पंढरपूर, सोलापूर (मांगी तलाव) आणि शिरूर, असा चौफेर जनतेच्या साहाय्यासाठी ‘सकाळ’ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आटापीटा केला. सहकाऱ्यांचा मी येथे मुद्दाम उल्लेख करतो. निधी गोळा करण्यापासून शेवटचा पैसा योग्य तऱ्हेने खर्च होईपर्यंत कित्येक हजार लोकांनी मला साहाय्य दिले, हा माझा लोकसंग्रह काही लहान नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हर दोन-चार वर्षांनी मी परदेशी प्रवासाला जात असे. बहुतेक संपादक जातात ते समारंभासाठी. काही दिवसांपुरते. परंतु तेथे गेल्यानंतर सहा-सात आठवडे, काही वेळा दोन-तीन महिने मी निरनिराळ्या देशांत प्रवास करी, जीव धोक्यात घालून माहिती जमवी, त्याकरता लागणारी पूर्वतयारी म्हणून अगोदर प्रत्येक देशावरची पुस्तके वाचून ठेवी आणि हे मिळालेले ज्ञान ‘सकाळ’च्या वाचकांच्या ताटात आणून वाढी. हे लेख एकत्र केल्यास प्रत्येक देशावर एक ग्रंथ होईल. त्याखेरीज वैयक्तिक प्रश्न आणि गाऱ्हाणी हजारो मजकडे आली असतील. त्यांत अमूक लहान, अमुक मोठा म्हणून दुर्लक्ष केले नाही. प्रत्येक बाब तपासून, ती न्याय असेल तर, ती मिळवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले आहेत. सांगण्याचे तात्पर्य असे की, स्थानिक निवडणुकांपासून परदेशी राजकारणापर्यंत जनतेचा संबंध येणारे विषय, मग त्यासाठी श्रम, पैसा, वेळ कितीही खर्च होवो, तिकडे न पाहता, विविध ज्ञान गोळा करून, ‘सकाळ’मधून मी वाचकांना पुरवले आहे.

हे आत्मचरित्र नव्हे, असे मी वरच म्हटले आहे. तसे असते तर, ‘सकाळ’ व माझ्या जीवनातील प्रसंग मी कितीतरी गोळा करून ठेवले असते. वृत्तपत्रावर तो एक ग्रंथ झाला असता. लहान माणसाच्या जीवनाकडे किंवा प्रसंगाकडे पाहण्याची ‘सकाळ’ची दृष्टी कशी असते, याची फक्त तीन उदाहरणे येथे देतो. पुण्यात एक ऐंशी वर्षांची वृद्धा गोवऱ्या लावताना आमच्या फोटोग्राफरला दिसली. तो तिच्या घरापर्यंत गेला, तिथे त्याला दिसून आले की, या बाईचे आणखी दोन जोडधंदे आहेत. अर्ध्या आण्याची तिची डेअरी आहे. त्या गरीब वस्तीत तांबडा चहा, दूध मिळावयाचे नाही. कोणी पाहुणा आला तर दोन पैशाचे दूध चहा पांढरा दिसण्यापुरते आणून वापरावयाचे. ती गरज या वृद्धेची डेअरी भागवत असे. त्यानंतर दुपारच्या वेळेला चिंध्या स्वच्छ धुऊन, वाळत टाकून ती गोधडी शिवावयास बसे. तो एक तिचा तिसरा धंदा होता. मालकाकडे चौकशी करता तो म्हणाला, “महाराज, ही बाई माझी भाडेकरू, परंतु ती माझ्या मुलांची शाळा आहे. तिचे उद्योगाचे मूर्तीमंत उदाहरण माझ्या मुलांपुढे आहे, हा एक मी मोठा फायदा समजतो.” ही सर्व हकीकत देऊन त्या बाईचे चित्र पहिल्या पानावर अगदी डोक्यावर मी छापले. सध्या पुण्यात आणि सगळीकडे घरमालक व भाडेकरू यांची जी भांडणे चालली आहेत, त्या दोघांनाही मला वाटते, या वृद्धेच्या उदाहरणापासून पुष्कळसे शिकता येण्यासारखे आहे.

दुसरे उदाहरण पुण्यात एक गाढव मरणप्राय अवस्थेत पडले होते. मृत गाढवाचा फोटो पहिल्या पानावर छापला व म्हटले की, “जन्मभर कचरा खाऊन ज्याने मालकाला भाकरी मिळवून दिली, त्याला वृद्धापकाळी रस्त्यावर मरण यावे, ही पुण्याला लाजीरवाणी गोष्ट आहे. तेव्हा गाढवाचे मालक शोधून नगरपालिका व जीवदया संघाने याचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तिसरे पुण्याच्या मंडईचे उदाहरण. मुंबईला मंडईत संपामुळे माल उठेना, तेव्हा पुण्याला मटारचे ढीग येऊन पडले. बातमीदाराने मला हे सांगितले. मी म्हटले, हे बारीक टायपात टाकू नका, पान एकवर ठळक टायपात द्या. लोकांना मटार स्वस्तात आल्याचे कळेल, त्यांना खावयास मिळेल. दुसऱ्या दिवशी नेमके तेच घडले. हजारो लोक पिशव्या घेऊन आले, भराभर मटार विकला गेला, व्यापाऱ्यांचे पैसे सुटले!

हे सगळे सांगण्याचे कारण वृत्तपत्राचा संपादक होऊ इच्छिणाऱ्यात माझ्या मते चार गुण हवेत. पहिला गुण त्याच्याजवळ समाजाच्या सुखदुःखाची नेहमी कदर हवी व त्याचे अंतःकरण समाजाची दुःखे निवारण करण्याला वाहिलेले असले पाहिजे. त्या रोखाने लोकांना शिकवणे, जागे करणे, त्यांच्याकरता भांडणे, ही कामे त्याने करावयाची आहेत. दुसरा गुण, वाचन भरपूर पाहिजे. मी परदेशी व देशात हिंडतो, इतकी सार्वजनिक कामे करतो, तरी मी वाचलेल्या कितीतरी पुस्तकांवर खुणा केलेल्या दिसतील, इतकेच नव्हे, तर शेवटच्या पानावर टिपणे आढळतील. वाचन हे ज्ञानाचे साधन, ते सतत जागते ठेवणारा खरा व बहुश्रुत संपादक होऊ शकेल. तिसरा गुण या व्यवसायात अत्यंत कष्ट करण्याची तयारी हवी. वाचन, सार्वजनिक कामे आणि वृत्तपत्राचा रोजचा रगाडा सांभाळण्यात मला रोज कमीत कमी दहा ते बारा तास लागत. असले रोज श्रम करण्याची तयारी संपादकाची हवी. चौथा गुण इंग्रजी चांगले यावयास हवे. त्याचे नित्य वाचन ठेवून संपादकाने जगाशी संबंध राखला पाहिजे. हे चार गुण संपादकाच्या यशाची मी चतुःसूत्री समजतो. दुर्दैवाने त्यांतील एकेका गुणाचा अलीकडे लोप होत चालला असून, कष्टाच्या ठिकाणी गप्पा व थिल्लरपणा दिसू लागला आहे.

समाज बहुरंगी, त्याच्या गरजा अनेकविध, त्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट लेखक हवेत. परंतु वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे व समाजाच्या हितासाठी झगडण्याचे साधन म्हणून ज्यांना पत्करावयाचे असेल, त्यांनी मी वर सांगितलेले व्रत पाळले पाहिजे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Ravi Go

Wed , 21 September 2022

Sundar vivechan aani ajachya kaLaathi chapkhal basate.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......