भारतातील लोकशाही संस्थांचा स्वातंत्र्योत्तर काळातील संक्षिप्त विश्लेषकीय इतिहास मी माझ्या आधीच्या स्तंभलेखामध्ये नोंदवला होता. प्रस्तुत लेखात मी पुस्तकांची एक यादी वाचकांसमोर ठेवतो आहे. आपल्या प्रजासत्ताकाची गुंतागुंतीची वाटचाल समजून घेण्यासाठी व्यक्तीशः मला ही पुस्तकं उपयुक्त ठरली आहेत. संख्यात्मक सुसंगतीसाठी पंचाहत्तर पुस्तकं निवडायला मला आवडलं असतं, पण लेखाच्या शब्दमर्यादेमध्ये तसं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी पन्नास पुस्तकं निवडली आणि हा आकडासुद्धा चांगल्यापैकी भरीव आहे. मी ही निवड केवळ १९४७नंतरच्या कालखंडापुरती मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे ही वाचन-यादी ‘भारतीय इतिहासा’संदर्भातील नसून ‘स्वतंत्र भारता’संदर्भातील आहे. प्रत्येक पुस्तकाच्या प्रथम प्रकाशनाची तारीख कंसात दिली आहे.
सुरुवातीला मी ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांच्या ‘द इंडियन कॉन्स्टिट्यूशन : कॉर्नरस्टोन ऑफ अ रिपब्लिक’ (१९६६) या पुस्तकाचं नाव घेईन. संविधाननिर्मितीवेळी झालेल्या वादचर्चेवरचं हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याचसोबत काळाचा अधिक मोठा टप्पा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून तपासणारं नीरजा गोपाल जयाल यांचं ‘सिटिझनशिप अँड इट्स डिसकन्टेन्ट्स : ॲन इंडियन हिस्ट्री’ (२०१३) हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भारत स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतरच्या पहिल्या दशकामधील सर्वांत महत्त्वाच्या घडामोडींमध्ये संस्थानांचं विलिनीकरण आणि भाषावार प्रांतरचना यांचा समावेश होतो. या विषयाचा वेध घेणारं सर्वोत्तम पुस्तक म्हणजे व्ही. पी. मेनन यांचं ‘इंटिग्रेशन ऑफ द इंडियन सेट्ट्स’ (१९५६) (मेनन हे सरदार पटेलांचे जवळचे सहकारी होते आणि या प्रक्रियेत त्यांनी कळीची भूमिका निभावली होती). भाषेच्या प्रश्नावर रॉबर्ड डी. किंग यांचं ‘नेहरू अँड द लँग्वेज पॉलिटिक्स ऑफ इंडिया (१९९७) हे पुस्तक पाहावं.
आता महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची चरित्रं पाहू. या प्रकारातील महत्त्वाचे ग्रंथ असे : वॉल्टर क्रॉकरलिखित ‘नेहरू : अ कन्टेम्पररी’ज् एस्टिमेट’ (१९६६), राजमोहन गांधीलिखित ‘पटेल : अ लाइफ’ (१९९०), कॅथरीन फ्रँकलिखित ‘इंदिरा : द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ (२००१), सी.पी. शीवास्तवलिखित ‘लालबहादूर शास्त्री’ (१९९५), धनंजय कीरलिखित ‘आंबेडकर’ (१९५४; सुधारित आवृत्ती : १९९०), ॲलन व वेंडी स्कार्फलिखित ‘जेपी : हिज बायॉग्रफी’ (१९७५; सुधारित आवृत्ती : १९९८), आणि एलन कॅरल द्यूबॉ व विनय लाल संपादित ‘अ पॅशनेट लाइफ : रायटिंग्ज बाय अँड ऑन कमलादेवी चट्टोपाध्याय’ (२०१७).
महात्मा गांधी स्वातंत्र्यानंतर लगेचच मरण पावल्यामुळे त्यांच्या चरित्राची शिफारस मी इथं केलेली नाही. परंतु, गांधींच्या शाश्वत प्रभावामध्ये रस असणाऱ्यांनी रजनी बक्षी यांचं ‘बापू कुटी : जर्नीज् इन रिडिस्कव्हरी ऑफ गांधी’ (१९९८) हे पुस्तक वाचायला हवं.
स्वतंत्र भारताच्या आघाडीच्या राजकीय नेत्यांपैकी आंबेडकर व नेहरू हे महत्त्वाचे विचारवंतसुद्धा होते. त्यामुळे ‘द इसेन्शिअल रायटिंग्ज ऑफ बी.आर. आंबेडकर’ (२००२) हे व्हेलरीन रॉड्रिग्ज यांनी संपादित केलेलं पुस्तक आणि ‘हू इज भारतमाता? हिस्ट्री, कल्चर अँड द आयडिया ऑफ इंडिया : रायटिंग्ज बाय अँड ऑन जवाहरलाल नेहरू’ (२०१९) हे पुरुषोत्तम अग्रवाल यांनी संपादित पुस्तक, यांची मी शिफारस करेन. अलीकडच्या काळात आंबेडकर व नेहरू यांच्याइतका, किंवा बहुधा त्यांच्याहून जास्त प्रभाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक माधव सदाशिव गोळवलकर यांचा असावा, त्यामुळे ‘अ बंच ऑफ थॉट्स’ (१९९६) या गोळवलकरांच्या लेखनाचं प्रमाणित संकलन असलेल्या पुस्तकाचा समावेश मी माझ्या यादीत करतो आहे.
स्वतंत्र भारतातील राजकीय प्रक्रियांचा उत्कृष्ट आढावा ‘ऑक्सफर्ड कम्पॅनिअन टू इंडियन पॉलिटिक्स’ (२०१०) या नीरजा गोपाल जयाल व प्रताप भानू मेहता यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. भारताने प्रौढ मताधिकार कसा व का स्वीकारला, या संदर्भात ओर्नित शनी यांचं ‘हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक’ (२०१७) हे पुस्तक वाचावं. निवडणुकीय राजकारणाची अधिक वेगवान बाजू समजून घेण्यासाठी मिलान वैष्णव यांनी लिहिलेलं ‘व्हेन क्राइम पेज् : मनी अँड मसल इन इंडियन पॉलिटिक्स’ (२०१७) हे पुस्तक पाहावं. अभ्यासक व कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या ‘मेकिंग सेन्स ऑफ इंडियाज डेमोक्रसी’ (२०२०) या पुस्तकामध्ये भारतीय राजकारणाची उत्तम ओळख करून दिलेली आहे. शेवटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचं सर्वोत्तम पुस्तक देस राज गोयल लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ (१९७९) हेच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक धोरणाचा इतिहास काळजीपूर्वक रेखाटण्याचं काम फ्रॅन्साइन फ्रँकेल यांच्या ‘इंडियाज् पॉलिटिकल इकनॉमी, १९४७-२००४’ (२००५) या पुस्तकात केलेलं आहे. भारतासमोरील सध्याची आर्थिक आव्हानं समजून घेण्यासाठी नौशाद फोर्ब्स यांचं ‘द स्ट्रगल अँड द प्रॉमिस : रिस्टोअरिंग इंडियाज् पोटेन्शिअल’ (२०२२) हे पुस्तक पाहावं. भारताच्या संरक्षणविषयक धोरणाचा व परराष्ट्रीय धोरणाचा उत्कृष्ट आढावा अनुक्रमे शीनाथ राघवन यांच्या ‘वॉर अँड पीस इन मॉडर्न इंडिया’ (२००९) व शिवशंकर मेनन यांच्या ‘चॉइसेस् : इन्साइड द मेकिंग ऑफ इंडियाज् फॉरेन पॉलिसी’ (२०१६) या पुस्तकांमध्ये आहे. आपल्या शेजारच्या महाकाय चीनसोबतच्या आपल्या गुंतागुंतीच्या संबंधांविषयी कांती वाजपेयी यांनी लिहिलेलं ‘इंडिया व्हर्सेस चायना : व्हाय दे आर नॉट फ्रेंड्स’ (२०२१) हे पुस्तक वाचावं.
संसद, सर्वोच्च न्यायालय व सनदी सेवा, यांसारख्या संस्था म्हणजे आधुनिक राज्यसंस्थेचा कणा असतात. या संस्थांच्या भूमिकेची उपयुक्त ओळख करून देणारं ‘रिथिंकिंग पब्लिक इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया’ (२०१९) हे पुस्तक देवेश कपूर, प्रताप भानू मेहता व मिलान वैष्णव यांनी संपादित केलं आहे. स्टिव्हन विल्किन्सन यांच्या ‘आर्मी अँड नेशन : द मिलिटरी अँड इंडियन डेमोक्रसी’ (२०१५) या पुस्तकात भारतीय सैन्य हा विषय हाताळला आहे. प्रसारमाध्यमं ही आणखी एक महत्त्वाची संस्था आहे. मोदीपूर्व (किंवा ‘गोदीमीडिया’पूर्व) युगातील प्रसारमाध्यमांच्या उत्क्रांतीचं विश्लेषण रॉबिन जेफरी यांच्या ‘इंडियाज् न्यूजपेपर रिव्होल्यूशन : कॅपिटलिझम, पॉलिटिक्स अँड द इंडियन लँग्वेज’ (२०००) या पुस्तकात केलेलं आहे.
यानंतर आधुनिक भारतातील सामाजिक संरचनेवरील व सामाजिक बदलावरील काही ग्रंथांचा आपण विचार करू. ग्रामीण भागांतील जातीय समीकरणं समजून घेण्यासाठी मी दोन मानवसमाजवर्णनपर पुस्तकांची शिफारस करेन - भारतीय अभ्यासक एम.एन. श्रीनिवास यांचं ‘द रिमेम्बर्ड व्हिलेज’ (१९७७) आणि डच अभ्यासक जॅन ब्रीमन यांचं ‘पॅट्रोनेज अँड एक्सप्लॉयटेशन’ (१९७४). स्वतंत्र भारतातील मुस्लिमांच्या दुर्दशेविषयी मुशिरुल हसन यांचं ‘लिगसी ऑफ अ डिव्हायडेड नेशन : इंडियाज् मुस्लिम्स सिन्स इंडिपेन्डन्स’ (१९९७) आणि आदिवासींच्या दुर्दशेविषयी नंदिनी सुंदर यांनी संपादित केलेलं ‘द शेड्युल्ड ट्राइब्स अँड देअर इंडिया’ (२०१६) ही दोन पुस्तकं वाचावीत.
भारतीय संघराज्यातील राज्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व पर्यावरणीय संदर्भात प्रचंड भिन्नता आहे. दुर्दैवानं, यातील मोजक्याच राज्यांचा सखोल संशोधनाधारित इतिहास लिहिला गेला आहे. अशा दुर्मीळ अपवादांमध्ये रॉबिन जेफरी यांचं ‘पॉलिटिक्स, विमेन अँड वेल-बीइंग : हाऊ केरळ बिकेम अ मॉडेल’ (१९९२) व नरेंद्र सुब्रमण्यम यांनी तामिळनाडूविषयी लिहिलेलं ‘एथ्निसिटी अँड पॉप्युलिस्ट मोबिलायझेशन’ (१९९९) या पुस्तकांचा समावेश होतो.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आता सामाजिक चळवळींकडे वळू. दलित चळवळीसंदर्भात डी. आर. नागराजलिखित ‘द फ्लेमिंग फीट : द दलित मूव्हमेन्ट इन इंडिया (२०१०); स्त्रियांच्या चळवळीसंदर्भात राधा कुमारलिखित (जुनं, पण आजही मूल्यवान असणारं) ‘अ हिस्ट्री ऑफ डुइंग : ॲन इलस्ट्रेटेड अकाउन्ट ऑफ मूव्हमेन्ट्स फॉर विमेन्स राइट्स अँड फेमिनिझम’ (१९९३) आणि मागास जातींच्या संघर्षांसंदर्भात ख्रिस्तॉफ जेफ्रो यांचं ‘इंडियाज् सायलेन्ट रिव्होल्यूशन’ (२००३); पर्यावरणवादी चळवळीसंदर्भात शेखर पाठक यांचं ‘द चिपको मूव्हमेन्ट : अ पीपल्स हिस्ट्री’ (२०२०) ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत.
आता भारतातील प्रमुख संघर्षक्षेत्रांसंबंधीची काही पुस्तकं पाहू. काश्मीरवादाचा उगम व पुढील मार्गक्रमणा याबद्दल अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. शिशीर गुप्ता यांनी लिहिलेलं ‘काश्मीर : अ स्टडी इन इंडिया-पाकिस्तान रिलेशन्स’ (१९६५) हे यातील एक जुनं आणि सर्वोत्तम पुस्तक आहे. भारत व पाकिस्तान या दोघांच्याही राष्ट्रीय मिथकांसाठी काश्मीर खोऱ्यावरील ताबा कळीचा का आहे, याचा उलगडा या पुस्तकात केला आहे. ईशान्य भारत या दुसऱ्या एका धगधगत्या प्रदेशाविषयी संजिब बरुहा यांचं ‘इन द नेम ऑफ द नेशन : इंडिया अँड इट्स नॉर्थ ईस्ट (२०२०) हे पुस्तक पाहावं. मध्य भारतातील माओवाद्यांची सशस्त्र बंडखोरी आणि त्याचे व्यापक परिणाम, या संदर्भात नंदिन सुंदर यांचं ‘द बर्निंग फॉरेस्ट’ (२०१६) हे पुस्तक वाचनीय आहे.
आत्तापर्यंत नोंदवलेली सर्व पुस्तकं अभ्यासकांनी लिहिलेली आहेत; ती सखोल संशोधनावर आधारित असून तळटिपा व संदर्भ यांचा त्यात स्वाभाविक समावेश आहे. आता अधिक लोकसुलभ पद्धतीनं लिहिलेल्या काही पुस्तकांची शिफारस मी करतो आहे. यातील दोन पुस्तकं अकादमिक अभ्यासकांची आहेत; ज्याँ द्रीझ यांनी लिहिलेलं ‘सेन्स अँड सॉलिडॅरिटी : झोलावाला इकनॉमिक्स फॉर एव्हरीवन’ (२०१७) आणि आंद्रे बेतेली यांचं ‘क्रोनिकल्स ऑफ अवर टाइम’ (२०००). या दोन्ही पुस्तकांद्वारे संबंधित लेखकांनी त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचं व अभ्यासाचं सार व्यापक वाचकवर्गासमोर ठेवलेलं आहे. द्रीझ हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे विकासविषयक अर्थशास्त्र आहेत, आणि बेतेली हे आपले सर्वोत्तम समाजशास्त्रज्ञ आहेत, असं मी मानतो.
आता मी पत्रकारांनी लिहिलेल्या चार चांगल्या पुस्तकांकडे येतो. कॅथरीन बू यांनी लिहिलेलं ‘बिहाइंड द ब्युटिफुल फॉरेव्हर्स’ (२०१२) हे पुस्तक मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील जीवनाचा उत्कृष्ट वृत्तान्त सांगतं; पी. साईनाथलिखित ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गुड ड्रॉट’ हे पुस्तक ग्रामीण भारतातील जगण्याच्या व संघर्षाच्या कथा सांगतं; राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेलं ‘2019 : हाऊ मोदी वोन इंडिया’ (२०२०) हे पुस्तक भारतातील अगदी ताज्या सार्वत्रिक निवडणुकाचा बातमीदाराच्या दृष्टीतून वेध घेतं. मार्क टुली हे भारतातील बहुधा सर्वाधिक कौतुकादर मिळालेले परदेशी पत्रकार असावेत. त्यांच्या परस्परसंबंधित निबंधांचं संकलन ‘नो फुलस्टॉप्स इन इंडिया’ (१९९१) या पुस्तकात केलेलं आहे.
काळाच्या संदर्भात जीवनाची कहाणी सांगणारं चरित्र सामाजिक व राजकीय इतिहासाकडे पाहण्याची खिडकी पुरवणारं असतं. आत्मचरित्राबाबतसुद्धा हे म्हणता येतं. त्यामुळे लेखाच्या शेवटाकडे मला विशेष आवडलेल्या काही आत्मकथनांची यादी मी देतो आहे. यातील दोन आत्मकथनं दलितांनी लिहिलेली आहेत- एक, सुजाता गिड्ला यांचं इंग्रजीतच लिहिलेलं ‘अँट्स अमाँग एलिफन्ट्स’ (२०१७); दुसरं, ओमप्रकाश वाल्मिकी यांचं मूळ हिंदी असणारं आणि अरुण मुखर्जी यांनी इंग्रजीत भाषांतरित केलेलं ‘झूठन’ (२००४). दोन आत्मकथनं स्त्रियांची आहेत - पद्मा देसाई यांनी इंग्रजीत लिहिलेलं, मध्यमवर्गीय जगण्याची पार्श्वभूमी असणारं ‘ब्रेकिंग आउट’ (२०१२); आणि मुळात मराठीत लिहिलं गेलेलं, कामगार वर्गीय पार्श्वभूमीवरचं, मल्लिका अमर शेख यांचं ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ हे आत्मकथन जेरी पिंटो यांनी ‘आय वॉन्ट टू डिस्ट्रॉय मायसेल्फ’ (२०१९) या नावानं इंग्रजीत भाषांतरित केलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शेवटी, काही इशारे. प्रस्तुत यादीमध्ये १९५०पासून पुढील काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा समावेश असला, तरी ही यादी आर्थिक किंवा सांस्कृतिक वा ऐतिहासिक विषयांपेक्षा सामाजिक व राजकीय विषयांकडे कलणारी आहे. शिवाय, ‘न्यू इंडिया फाउंडेशन’च्या विद्यमाने प्रकाशित झालेली पुस्तकं मी या यादीतून वगळली आहेत, हे नमूद करायला हवं. मी अनेक वर्षं या संस्थेशी संबंधित असल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला.
इथं शिफारस केलेल्या पन्नास पुस्तकांपैकी काही पुस्तकांचा शोध घ्यायला वाचकांना प्रेरणा मिळेल, याची मला खात्री आहे. यातील जवळपास सर्वच पुस्तकं आजही बाजारात उपलब्ध आहेत (अगदी मोजकी पुस्तकं बाजारात नसली तरी https://archive.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत). यापैकी अनेक पुस्तकांची हिंदी व इतर भाषांमध्ये भाषांतरंसुद्धा झालेली आहेत.
मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद - प्रभाकर पानवलकर
‘साधना’ साप्ताहिकाच्या १७ सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment