रात्री सुरक्षारक्षकाने येऊन सांगितलं, “सर, स्वातंत्र्य आलं आहे”.
नेता विचारात पडला.
म्हणाला, “स्वातंत्र्य? कोणतं स्वातंत्र्य?”
यावर सुरक्षारक्षक काय बोलणार! तो हात बांधून चुपचाप उभा राहिला.
नेता विचार करत त्याला म्हणाला, “ठीक आहे, पाठवा. पाहू.”
सुरक्षारक्षक जायला लागला, तेव्हा नेता म्हणाला, “हे बघ, नीट तपासणी कर.”
“जी सर” म्हणून सुरक्षारक्षक निघून गेला. थोड्या वेळानं स्वातंत्र्य नेत्यासमोर येऊन उभं राहिलं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
नेत्याने त्याच्याकडे पाहिलं, त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला. अनेकदा डोळ्यांची उघडझाप केली. मग त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं.
“इतक्या रात्री?” नेत्याचे डोळे अजूनही स्वातंत्र्यावरून हटले नव्हते.
“हो, आणीबाणी होती!” स्वातंत्र्याने येण्याचं कारण सांगितलं.
“हं” नेत्याने फक्त एवढाच प्रतिसाद दिला.
“मी बराच वेळ उभा होतो. तुम्हाला भेटू इच्छित होतो, परंतु मला कोणीच आत सोडायला तयार नव्हतं.” स्वातंत्र्याने एकाच दमात सर्व सांगून टाकलं.
“आल्या आल्या तक्रार करायला लागला तुम्ही” नेता मोठ्या प्रेमानं म्हणाला.
“नाही नाही, मी माझे हाल सांगत आहे.” स्वातंत्र्याने स्पष्टीकरण दिलं.
“असं थोडीच कुणीही, कधीही आत येऊ शकतो!” नेता हसत हसत म्हणाला.
स्वातंत्र्याने नेत्याला चमत्कारिक नजरेनं पाहिलं.
“देशाला आता स्वातंत्र्य मिळालं आहे” स्वातंत्र्य जरा मोठ्या आवाजात बोललं.
हे ऐकताच नेता उठून उभा राहिला. त्याने आपला कुर्ता झटकला. टॉयलेटमध्ये गेला. थोड्या वेळानं स्वातंत्र्याच्या कानावर फ्लशचा आवाज पडला. नेता बाहेर आला. स्वातंत्र्याला अजूनही खुर्चीवर बसलेला पाहून तो थोडा बिचकला. त्याने जड मनानं औपचारिकता निभावली.
“आज कसं काय येणं केलं इकडे!” नेत्याने सोफ्यावर बसत विचारलं.
स्वातंत्र्य तर जणू काही याच संधीची वाट पाहत होतं. त्याने सांगायला सुरुवात केली -
“जेव्हा मी इकडे यायला निघालो, तेव्हा मला असं दिसलं की, एका गावात खूप गर्दी जमली आहे. तिथं अनेकांनी बंदुका ताणल्या होत्या. काही लोक गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते, तर काही लोक हात जोडून विनंती करत होते. मी विचारपूस केली, तेव्हा समजलं की, काही लोक नवरदेवाला घोड्यावर बसू देत नाहीयेत. मी विरोध करणाऱ्यांना सांगितलं की, ‘बसू द्या भाऊ, आता कशाला भानगडी करता? आता तर स्वातंत्र्य मिळालं आहे’. हे ऐकताच त्या लोकांनी मला तेथून पळवून लावलं. ते म्हणत होते की…”
स्वातंत्र्य पुढे सांगू लागलं, तोच नेत्याने मध्येच अडवलं, “मी यात काय करू शकतो? हा तर पोलिसांचा मामला आहे.”
“तुम्ही श्रेष्ठींपैकी आहात, सर्व निर्णय येथूनच घेतले जातात. इथं येण्याआधी मी माहिती घेतली, म्हणून तर तुमच्याकडे आलोय…”
‘श्रेष्ठी’ हा शब्द ऐकून नेत्याला जरा बरं वाटलं. त्याला कुर्त्याची बटनं तटतटल्याची जाणीव झाली.
“ज्या सामाजिक स्तरातून नवरदेव येतो, ती आमची वोट बँक नाही.” नेत्याने अगदी थोडक्यात उत्तर दिलं.
“ही वोट बँक काय भानगड आहे?” स्वातंत्र्याला काही कळलं नाही.
नेत्याने स्वातंत्र्याकडे पाहिलं. ते भोळाभाबडं दिसत होता. नेत्याला वाटलं की, स्वातंत्र्य भले कितीही वर्षांचं होवो, पण अजून ते ‘मॅच्युअप’ काही झालेलं नाही.
“वोट बँक ही अशी एक चीज आहे की, जिथं आम्ही संविधानाला लॉकरमध्ये बंद करून ठेवतो.” नेत्याने दोन-तीन वेळा मनातल्या मनात हे वाक्य उच्चारलं, जणू काही तो संकल्पाचा पुनरुच्चार करत आहे. मग तो मनातल्या मनातच म्हणाला, ‘आणि जेव्हा कधी सत्ता हवी असते, तेव्हा सत्तेद्वारे आम्ही हे लॉकर खोलून त्याच्यावर एक नजर टाकतो.’ आता कुठे त्याच्या मनातली गोष्ट पूर्ण झाली!
स्वातंत्र्याच्या या प्रश्नाला टाळत तो म्हणाला,
“तुमचं काही वैयक्तिक काम असेल तर सांगा.”
स्वातंत्र्य पटकन म्हणालं, “काल एका हॉटेलात जात असताना मला बाहेर एक अर्ध नग्न मनुष्य दिसला. माझी मान शरमेनं खाली गेली. जशी…”
“हल्ली लोक फालतूच्या फॅशन करायला लागले आहेत.” नेता मध्येच म्हणाला.
“त्या हॉटेलच्या आत गेलो नव्हतो, तोपर्यंत मलाही तसंच वाटलं होतं. पण जेवण केल्यानंतर मी बिल पाहिलं, तेव्हा प्रकरण माझ्या लक्षात आले. बिल चुकवण्यापायी त्याचे कपडे उतरवण्यात आले असावेत. कशी तरी माझी अब्रू वाचली. आजकाल बाहेर फिरताना मला अशा बऱ्याच व्यक्ती दिसतात. वाढत्या महागाईने दोन वेळचं जेवणही कठीण करून टाकलं आहे. मी स्वतः दुकानात जाऊन दरपत्रक पाहून आलो आहे. त्यातल्या त्यात बेकारीच्या प्रश्नानेही आगीत तेल ओतण्याचंच काम केलं आहे.” असं म्हणून स्वातंत्र्य गप्प बसलं. आता कुठे त्याला मोकळं झाल्यासारखं वाटलं. या वेळी बोलताना नेत्याने त्याला अडवलं नाही, स्वातंत्र्याला आश्चर्य वाटलं.
“हे बघा, राहिला प्रश्न बेरोजगारीचा, तर तरुणांना आम्ही आता दुसऱ्या कामात गुंतवलं आहे आणि ते त्यात खुश आहेत… तुम्ही त्याबाबत काळजी करण्याचं कारण नाही…”
स्वातंत्र्य, ते दुसरं काम कोणतं असावं, ते समजून घेऊ इच्छित होतं, परंतु त्याने आपलं लक्ष ‘महागाई’वर केंद्रित केलं असल्यानं विचारलं, “पण महागाईचं काय? मी स्वतः अनुभवलं आहे की, इतक्यात किमतीत खूपच वाढ झाली आहे…”
“साला खरंच! किमती बऱ्याच वाढल्या आहेत.” नेता स्वत:शीच बोलला.
परंतु स्वातंत्र्याने ते ऐकलं. त्याला खूपच आनंद झाला. मोठ्या उत्साहात ते म्हणालं,
“माझ्या एकातरी प्रश्नाशी तुम्ही सहमत झालात. मला फार बरं वाटलं की, तुम्हालाही भाजी-भाकरीचा भाव माहीत आहे!”
नेत्याने स्वातंत्र्याकडे पाहिलं. तो त्याच्यावर मोहित झाला. हसतच म्हणाला, “मी आमदारांची गोष्ट करत आहे मामाजी आणि तुम्ही भाजी-भाकरीसारख्या किरकोळ गोष्टींची चर्चा करत आहात.”
स्वातंत्र्य गडबडलं.
नेता पुढे म्हणाला, “तुम्हाला हे माहीत आहे काय, सरकार बनवणं आणि पाडणं आजकाल किती महाग झालं आहे? सुरुवातीला आमदार एक-दोन कोटी घेत. आता सालं, ५० कोटींपेक्षा खाली कोणी राजीच होत नाही.” नेता आवंढा गिळत म्हणाला.
“हां, पण तुम्हाला काय कमी आहे? तुमचं गोदाम तर ठासून भरलेलं आहे.” हॉलच्या चारी बाजूंना आपली नजर फिरवत स्वातंत्र्य म्हणालं.
“पण मार्जिन कमी होतं ना! हा सर्व धंद्याचा मामला आहे, तुम्हाला नाही समजणार.” नेता थोडा वरमला.
“तुमच्या दुःखापुढे तर त्या सर्वसाधारण लोकांचं दुःख काहीच नाही.” स्वातंत्र्य हॉलमध्ये चकाकत असलेल्या झुंबराकडे पाहत म्हणालं.
नेता गप्पच होता. त्याला माहीत होतं की, स्वातंत्र्य आपल्याला टोमणा मारत आहे.
“इकडे तुम्ही आमदार खरेदी करत आहात आणि तिकडे सर्वसामान्य जनता भाजी-भाकरीही खरेदी करू शकत नाही.” स्वातंत्र्य मुद्द्यावर आलं.
“खोटं आहे हे सगळं, तसंच काही नाही. हा सर्व प्रोपगंडा आहे.” नेता मोठ्या रागात म्हणाला. काही क्षण थांबून पुढे म्हणाला, “राष्ट्रनिर्माणाच्या कामात बलिदान तर द्यावं लागतंच ना.”
“सरकार बनवण्याच्या कामाला तुम्ही राष्ट्र निर्माण म्हणता? या देशासाठी किती जणांनी आपली आहुती दिली, हे तुम्ही विसरलात?” इच्छा नसतानाही स्वातंत्र्याचं दुःख बाहेर पडलं.
नेता गप्पच राहिला. त्याला या प्रश्नावर काही स्पष्टीकरण द्यावं, असं वाटलं नाही.
“तसं, राष्ट्रनिर्माणाचा काही आराखडा आहे का तुमच्याकडे?” स्वातंत्र्याने विचारलं.
“आराखडा नाही, ओरखडा आहे” असं म्हणून नेता हसला.
“अहो महाराज, राष्ट्र निर्माण कसं करणार?” स्वातंत्र्याने चिडून विचारलं.
‘ठोकूनठाकून, वाजवून.”
“मला समजलं नाही.”
“जे गद्दार असतील, त्यांना ठोकलं जाईल आणि जे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अडथळे आणतील, त्यांना वाजवलं जाईल.” नेता उत्साहात येऊन बोलला. त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. डोळे लाल झाले. त्याची छाती फुगली. तो सोफ्यावरून पाच-सहा फूट उंच उडत असल्याचं जाणवू लागलं.
हे सर्व ऐकून-पाहून स्वातंत्र्य घाबरलं. त्याचा श्वासोश्वास वाढला.
स्वातंत्र्याची अवस्था पाहून नेता हसला. म्हणाला, “अरे, मी तर गंमत करत होतो.”
स्वातंत्र्याचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते अजूनही घाबरलेलंच होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नेता स्वातंत्र्याला चुचकारत म्हणाला, “ही तर एक म्हण आहे. एक जुमला आहे फक्त. ‘ठोकूनठाकून– वाजवून’, म्हणजे ‘पाहून, पारखून’. आपण म्हणतो ना की, कोणतीही वस्तू घेत असताना ‘ठोकून ठाकून, पाहून घेतली पाहिजे’. होय की नाही?”
स्वातंत्र्याने पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न केला.
“काही रचनात्मकसुद्धा करायला पाहिजे.” स्वातंत्र्याने गंभीर होत म्हटलं.
“तसं पाहिल्यास यापेक्षा जास्त रचनात्मक आणखी काय होऊ शकतं? परंतु तुमच्या समाधानासाठी सांगतो की, यापेक्षाही आम्ही बरंच काही रचनात्मक करत आहोत.” नेत्याने मोठ्या गर्वानं सांगितलं.
“उदाहरणार्थ?”
“आम्ही इतिहास दुरुस्त करत आहोत.” नेता आपले हात चोळत म्हणाला.
“इतिहासाला कुणी कसं काय बदलवू शकतं?” स्वातंत्र्याला आश्चर्य वाटलं.
“लिहून”
“लिहून?”
“होय, आमच्या माणसाकडून लिहून घेऊन.”
“तो तर खोटेपणाचा कळस होईल! धूर्तपणा होईल!” स्वातंत्र्याने विरोध केला.
“बस्स, यापुढे एकही शब्द बोललात तर याद राख!” नेत्याचा आवाज चढला.
स्वातंत्र्य घाबरलं. त्याची अशी हालत पाहून नेत्याला हसू आलं.
स्वातंत्र्याला घाम फुटला. आणखी काही वेळ जर आपण इथं थांबलो तर आपला जीव जाईल, असं त्याला वाटू लागलं. ते नेत्याला म्हणालं, “बरं, तर मग आता मी चलू?”
“अरे, असं कसं? तुमच्या येण्याच्या आनंदात तर आम्ही एक अभियान चालवतो आहोत.”
“कोणतं अभियान?”
“डीपी बदला महोत्सव अभियान!” नेता खूश होत म्हणाला.
“डीपी बदला अभियान! त्याने काय होणार आहे!” स्वातंत्र्य आता कुठे नरम पडलं.
“यात लोक आपल्या मोबाईलचा डीपी बदलून त्यावर तिरंगा लावतील. हां, एक गोष्ट आणखी. जीडीपी नाही, ‘डीपी अभियान’ ”, नेत्याने समजावलं.
“होय, मी सुद्धा तेच तर म्हटलं आहे. ‘डीपी बदला अभियान’.” स्वातंत्र्य नम्रतापूर्वक म्हणालं.
नेत्याने स्वातंत्र्याकडे रागानं पाहिलं. अचानक त्याचा चेहरा लालबुंद झाला. त्याच्या शरीराच्या हालचालीत काही बदल होत असल्याचं जाणवलं.
“इकडे येण्यापूर्वी तू कोणाला भेटला होतास?” नेता अचानक ‘तुम्ही’वरून ‘तू’वर आला. स्वातंत्र्याने काही बोलण्याअगोदरच तो म्हणाला, “गँगला भेटून तर आला नाहीस ना?” नेता अचानक सोफ्यावरून उठून उभा राहिला.
“कोणती गॅंग?” स्वातंत्र्याने घाबरत घाबरत विचारलं.
“तुझा आविर्भाव पाहून मला अगोदरच शंका आली होती… आल्यापासूनच मी तुझं पाहतो आहे. प्रश्नावर प्रश्न विचारत आहेस. अरे, त्या डफली वाजवणाऱ्या मुला-मुलींच्या गॅंगला भेटून आला ना तू?” नेता स्वातंत्र्याचे हात मुरगळत म्हणाला.
स्वातंत्र्य जोरात ओरडलं. थरथर कापत म्हणालं, “मी भेटलो नाही, पण ते मला भेटले!”
“आम्हाला स्वातंत्र्य हवं!” नेता दात खात काही वेगळ्याच ढंगानं म्हणाला.
“इथं तर खूप बडबड करत आहेस. तिथं तुझ्या तोंडून निघालं नाही की, मी तुमच्यासमोरच आहे आणि साल्यांनो तुम्हाला कोणतं स्वातंत्र्य पाहिजे!” नेत्याने आपले दात ओठ खाल्ले. त्याचा एकूण आविर्भाव पाहून स्वातंत्र्याचा जीव घाबराघुबरा झाला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
“आता बोल ना!” नेता ओरडला.
“ते म्हणत होते की, मी अपूर्ण आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवं.” असं म्हणत स्वातंत्र्य गप्प झालं.
“गप्प का झाला! पुढे सांग!” नेत्याने स्वातंत्र्याचे कान पिरगाळले.
“ते म्हणत होते की, जिथं बोलण्याचंसुद्धा स्वातंत्र्य नाही, त्याला काय स्वतंत्र देश म्हणावं?” स्वातंत्र्य उसासा टाकत म्हणालं.
“बोलण्याचं स्वातंत्र्य नाही? खोटं बोलतात ते सगळे! लोक बोलत आहेत! खुल्लमखुल्ला बोलत आहेत! आणि खूप बोलत आहेत! थांब, मी तुला पुरावे देतो.”
नेत्याने आपल्या मोबाईलमध्ये काही सर्च केलं आणि एक व्हिडिओ दाखवला. त्यात स्वातंत्र्याला दिसलं की, मोबाईलमध्ये एक मुलगी म्हणत होती- ‘स्वातंत्र्य तर इंग्रजांनी आम्हाला ‘लीज’वर दिलं आहे.’
नेत्याने पटकन दुसराही व्हिडिओ दाखवला. त्यात एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणत होती की, ‘स्वातंत्र्य तर आम्हाला भीक मागून मिळालं आहे. खरं स्वातंत्र्य तर आम्हाला आत्ताच, काही वर्षांपूर्वीच मिळालंय.’
हे सर्व पाहून तर स्वातंत्र्य स्तब्धच झालं.
त्याने मोठी हिंमत करून नेत्याला विचारलं- ‘मग मी कोण आहे?”
“सध्या तरी तू माझा ओलीस आहेस!” नेत्याने सद्यस्थिती स्पष्ट केली.
त्या रात्री स्वातंत्र्याला नेत्याच्या बंगल्यात शिरताना तर लोकांनी पाहिलं, मात्र बाहेर पडताना त्याला कोणीच पाहिलं नाही!
मराठी अनुवाद - कॉ.भीमराव बनसोड
.................................................................................................................................................................
हे मूळ हिंदी व्यंग्यलेखन ‘देश-विदेश’ या हिंदी मासिकाच्या ऑगस्ट २०२२च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखनासाठी पहा –
https://deshvidesh.net/entries/view/ajadi-ko-aapne-dekha
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment