अजूनकाही
१९८०चे दशक तीन जागतिक नेत्यांमुळे चांगलेच गाजले. या त्रिकुटाने जागतिक अर्थव्यवस्थेची आणि राजकारणाची दिशा बदलली. यापैकी पहिले नेते रोनाल्ड रेगन. त्यांनी आर्थिक सुधारणांचा धडाकेबाज कार्यक्रम राबवून व्हिएतनाम युद्धामुळे रसातळाला गेलेली अमेरिकेची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिली. अमेरिकी अर्थव्यवस्थेला नवउदारमतवादाकडे वळवले. दुसऱ्या नेत्या मागरिट बँचर. या खमक्या बाईने भांडवलशाहीला गोंजारत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने ब्रिटनच्या खंगलेल्या अर्थव्यवस्थेला धुमारे फुटण्यास सुरुवात झाली. या दुकलीबरोबर आपल्या देशात नवसुधारणा घडवून आणणारा, बुरसटलेली मने प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे, सोविएत रशियाचे मिखाईल गोर्बाचेव्ह.
गोर्बाचेव्ह यांची हाक
गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनोस्त (खुलेपणा) आणि पेरिस्त्रोइका (पुनर्निर्माण)चा गजर करत जगाचा इतिहास नाही, तर भूगोलही बदलला. आक्राळ- विक्राळ पसरलेला सोविएत संघ गोर्बाचेव्ह यांच्याच कालखंडात विखंडित झाला. अमेरिकेला शह देणाऱ्या महासत्तेचा हा शेवटचा सुधारणावादी प्रमुख, पण दुर्दैवाने सोविएत रशिया हा देश गोर्बाचेव्हप्रणित सुधारणांना पचवू शकला नाही. अर्थात, सोविएत रशियाच्या पतानामगे फक्त यांचाच हात नव्हता. त्यांच्या पूर्वसुरींचे योगदानसुद्धा यात मोठ्या प्रमाणावर होते, पण अखंड रशियाचा शेवट झाला, तो गोर्बाचेव्ह यांच्याच काळात.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
इतिहास हा प्रवाहाच्या रूपाने काम करतो. मागच्या चुका जर दुरुस्त केल्या नाहीत, तर साम्राज्ये लयाला जातात. सोविएत रशियन राज्यकर्त्यांनी याच चुका केल्या, त्या अखेरच्या दिवसात सुधारणा करणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ३० ऑगस्ट २०२२ रोजी आपला अखेरचा श्वास घेतला. या टप्प्यावर त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणे सयुक्तिक ठरावे.
रक्तरंजित इतिहासाचे वारस
मिखाईल गोर्बाचेव्ह हे १९१७च्या रशियन राज्यक्रांतीनंतर जन्माला आलेले पहिलेच सोविएत संघांचे प्रमुख. त्यांचा सारा परिवार काळाचा महिमा असलेल्या रशियन राज्यक्रांतीने भारावलेला. वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेला, तर आई कामगार. याच काळात जोसेफ स्टॅलिनने समूह शेती कल्पना योजना राबवण्यास सुरुवात केली होती. कल्पना उदात्त होती. कम्युनिस्ट विचारसरणीत या गोष्टीला खूपच मोठे यश प्राप्त होते. पण स्टॅलिनच्या या कल्पनेला विघातक हुकूमशाहीची जोड होती. या योजनेला नकार देणाऱ्या हजारो-लाखोंना स्टॅलिनने मृत्यूच्या दारात लोटले. या बळीमध्ये गोर्बाचेव्ह यांचे वडिलांकडील आणि आईकडील दोन्ही आजोबा होते.
महाविद्यालयीन जीवनात कायद्याचे शिक्षण घेतल्यामुळे आणि मार्क्स, लेनिन यांच्यासोबत २९व्या शतकातील इतर अनेक समाजवादी विचारवंतांचा अभ्यास केल्यानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे खंदे समर्थक बनले. स्टॅलिनने भलेही रशियाची औद्योगिक प्रगती साधली होती, पण आपल्या संकल्पनांना विरोध करणाऱ्यांची मुस्कटदाबीही स्टॅलिनने मोठ्या प्रमाणात केली होती. या अप्रिय गोष्टीचे भानही गोर्बाचेव्ह यांना होते. पुढे जाऊन त्यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण केले. त्यामुळे कृषी क्षेत्रात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याचे भानही त्यांना आले. निकिता क्रुश्चेव्ह यांच्या काळात सोविएत रशिया प्रगतीवर होता. अमेरिकेसाठी एक पर्यायी बलस्थानसुद्धा ठरला होता. पण कृश्चेव्ह यांच्या काळानंतर ही स्थिती बदलायला सुरुवात झाली. याच काळात गोर्बाचेव्ह यांनी आपल्या स्तावरोपोल या प्रांतात पक्षप्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
मोडकळीस आलेल्या रशियाचा वारसा
क्रुश्चेव्ह यांच्यानंतर ब्रेझनेव्ह आले. त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली. ती म्हणजे १९७९ मध्ये आपल्या फौजा त्यांनी अफगाणिस्तानात पाठवल्या. अफगाणिस्तानात जाणे तर सुलभ असते, पण माघारी येणे अवघड. तसेच काहीसे रशियाच्या बाबतीतही घडले. खरे तर याच दशकात अमेरिकेचे व्हिएतनाममध्ये हात पोळले होते. काळ रशियासाठी अनुकूलही होता, पण ही अनुकुलता रशिया पचवू शकला नाही. अफगाणिस्तानातील आक्रमणामुळे सोविएत रशियाची आर्थिक स्थिती आणखीनच डळमळली. याच काळात गोर्बाचेव्ह कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीत आले होते. या गोष्टीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम त्यांनी अनुभवला होता. ब्रेझनेव्ह यांचे शेवटचे दिवस खंगत खंगत गेले. एक तर हा माणूस म्हणावा तेवढा कार्यक्षम नव्हता. त्याचा फटका सोविएत युनियनला बसला. ब्रेझनेव्ह यांच्यानंतर प्रमुखपदावर आलेले आंद्रे उरीपाव्ह आणि चेनस्को हे अनुक्रमे १५ आणि १३ महिनेच टिकले.
या काळात सोविएत अर्थव्यवस्थेत मूलभूत बदलांची गरज होती. आयात मोठ्या प्रमाणात या काळात वाढली होती. उत्पादन घटले होते. अशा या कमालीच्या अस्थिर परिस्थितीत सोविएत रशियाच्या प्रमुखपदी गोर्बाचेव्ह यांची निवड झाली. त्यांनी आपल्या शपथविधीच्या भाषणातच आपल्या महत्त्वाकांक्षा प्रकट केल्या. गोर्बाचेव्ह इतर तत्कालीन प्रमुखांच्या मानाने तरुण होते. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी सत्तापद सांभाळले होते. पॉलिट ब्युरोचे सदस्य असताना अनेक देशांत प्रवास केला असल्यामुळे नव विचाराचे वारे त्यांना स्पर्शले होते. सोविएत रशियाच्या समस्या समजावून घेण्यास हे महाशय उत्सुक होते.
विकासाची चतुःसूत्री
सत्तेत आल्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी आपली चतुःसूत्री मांडली. यातील पहिले सूत्र होते, ग्लासनोस्त (खुलेपणा), पेरिस्त्रोइका (पुनर्रचना), डेमोक्रेटिझासिया (लोकशाहीकरण), उस्कोरेनिया (अर्थविकासाला चालना). कामगारांनी घडवून आणलेली क्रांती मानल्या गेलेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर सामान्य लोकांची गळचेपी होत गेल्याने रशियाच्या इतिहासात मोठीच चूक घडून गेली होती. नोकरशाहीने थैमान घातले होते. सोविएत रशिया या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटलेला होता. या टप्प्यावर रशियन व्यवस्थेची पुनर्रचना आवश्यक होती. बंदिस्त होऊन गेलेल्या रशियाला खुलेपणाची आवश्यकता होती. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांनी रशियामध्ये पहिल्यांदा बहुपक्षीय निवडणुकांची घोषणा केली. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची घोषणा केली. तुरुंगात बंदी असलेल्या अनेक नेत्यांची सुटका केली. रोनाल्ड रेगन यांच्याबरोबर करार करून अण्वस्त्रस्पर्धेला लगाम घातला. या सुधारणांमुळे पाश्चात्य देशात गोर्बाचेव्ह आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
जागतिक स्थितीने घात केला
पण या सुधारणांचे अपेक्षित फळ ना गोर्बाचेव्ह यांना मिळाले, ना सोविएत रशियाला. पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांचे एकीकरण याच काळात झाले. बाल्कन राष्ट्रे रशियापासून अलग झाली. मध्य आशिया याच काळात तुटून बाजूला झाला. या प्रक्रियेला ना गोर्बाचेव्ह थांबवू शकले, ना कम्युनिस्ट विचारधारा या गोष्टीला रोखू शकली. ही राष्ट्रे फुटून बाहेर पडण्याची अनेक कारणे होती. कम्युनिस्ट विचारधारा यांना एकसंध ठेवू शकली नाही. शेवटी बर्लिनची भिंत पाडली गेली. एका तडाख्यात १५ राष्ट्रे सोविएत रशियापासून तुटून बाजूला पडली. शेवटी कुठे ना कुठे या देशांत कट्टरपंथी राष्ट्रवाद काम करतच होता. त्याचा जबर फटका गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांना बसला. रशियात सुधारणांचा खोडा बसला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यामुळेच भलेही गोर्बाचेव्ह रशियाबाहेर नायक ठरले असतील, पण रशियामध्ये त्यांना योग्य तो बहुमान मिळाला नाही. जिच्यावर मनापासून प्रेम केले, त्या पत्नीचे १९९९ मध्ये निधन झाल्यानंतर बहुमानाला वंचित राहिलेला नेता, सर्वार्थाने एकटा पडला. एकटाच जीवन कंठत गेला. पत्नीचे दफन करून आल्यानंतर एका अभिनेत्याने गोर्बाचेव्ह यांना गाण्याची विनंती केली. तेव्हा या नेत्याने ‘alone set out on the road. The final path is sparkling in the mist’ ही कविता उत्स्फूर्तपणे गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
आता, त्या एकटेपणाचाही अंत झाला आहे. शेवटी, समाजाच्या काय किंवा देशाच्या काय अखेरच्या टप्प्यातल्या सुधारणा या परिणामकारक ठरत नाहीत. सुधारणांसाठी दीर्घकालीन मार्ग आखावा लागतो, काळाप्रमाणे त्यात सुधारणा कराव्या लागतात, तेव्हा त्या फळाला येतात. अशा प्रकाराने सूत्रबद्ध सुधारणा करण्यात सोविएत रशिया आणि या देशाचे नेते अपयशी ठरले. गोर्बाचेव्ह यांची चूक ही ठरली की, त्यांनी विघटनाच्या अक्षरशः अखेरच्या टप्प्यावर सुधारणांचा प्रयत्न करून पाहिला. ‘अखेरचा अयशस्वी सुधारक’ अशीच इतिहासाने त्यांची नोंद घेतली.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment