अन्नपूर्णा देवी स्वतःच स्वतःच्या कैदेत राहिल्या. त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. या एकांतानं त्यांचं संगीताशी असलेलं नातं मात्र अधिकच दृढ केलं
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
अंजली अंबेकर
  • ‘अन्नपूर्णा देवी : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ रिकलसीव्ह जिनियस’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि ‘लिनीएज’ या अल्बमवरील चित्र
  • Sat , 17 September 2022
  • ग्रंथनामा दखलपात्र अन्नपूर्णा देवी Annapurna Devi अन्नपूर्णा देवी : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ रिकलसीव्ह जिनियस Annapurna Devi : The Untold Story of a Reclusive Genius रविशंकर Ravishankar

अन्नपूर्णा देवींचं सगळं आयुष्य फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीताच्या अवतीभवतीच गेलं. त्या स्वतः ‘आकाशगंगा’ या इमारतीतील सहाव्या मजल्यावरच्या त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर फारशा पडल्या नाहीत, परंतु त्यांचं संगीत मात्र केव्हाच त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून साता-समुद्रापार पोचलंय. मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित सपन बंदोपाध्याय यांचं ‘Annapurna Devi’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. आणि आता नुकतंच अतुल मर्चंट जटायू यांचं ‘अन्नपूर्णा देवी : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ रिकलसीव्ह जिनियस’ हे पुस्तक प्रकाशित झालंय. मैहर-सेनिया घराण्यावर प्रकाशित बहुसंख्य पुस्तकं वाचली असली, तरी या संगीतातील अजोड घराण्याविषयी अधिकाधिक जाणून घ्यावंसं वाटतंच.

याच घराण्यातील अन्नपूर्णा देवी या केवळ ‘परफॅार्मर’ म्हणून नाही, तर ‘साधक’ आणि ‘गुरू माँ’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक परफॅार्मर घडवले. त्यांत पं.हरिप्रसाद चौरसिया, ब्रिजभूषण काबरा, सुरेश व्यास, आशिष खान, नित्यानंद हल्दीपूर यांसारख्या अनेक वादकांचा समावेश होतो.

अतुल मर्चंट जटायू हे व्यवसायाने हिरे-जडजवाहिर यांचे व्यापारी, वृत्तीने संगीतकार. हे ऐंशीच्या दशकापासून शिष्य म्हणून अन्नपूर्णा देवींशी संबधित आणि मधल्या काळात संगीताचं शिक्षण न घेताही सातत्याने संपर्कात राहिले. अन्नपूर्णा देवींचा त्यांच्या आयुष्यावर मोठाच प्रभाव राहिलाय. त्यांनी जवळपास तीन दशकं अन्नपूर्णा देवींना जवळून बघितलंय, त्यांच्या कौटुंबिक आयुष्याचे साक्षीदार राहिलेत, त्यांच्या इतर  शिष्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. एवढंच नव्हे तर अन्नपूर्णा देवींविषयी, त्यांच्या पूर्वायुष्याविषयी त्यांनी अनेक ठिकाणाहून जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. त्यांची फक्त पूजाच नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतील अनेक कंगोरे सायकोॲनेलिसिस पद्धतीने शोधण्याचाही प्रयत्न केलाय. हे सगळं करताना स्वतः चं शिष्य म्हणून, संगीतकार म्हणून आणि माणूस म्हणून शोध घेण्याचाही प्रयत्न केला आहे. त्या अर्थाने हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उस्ताद बाबा अल्लाउद्दीन खाँसाहेब, हे स्वतःच एक संगीताचं विद्यापीठ होतं. बांग्लादेशहून मध्य प्रदेशच्या मैहर या ठिकाणी येऊन ते स्थायिक झाले. तिथे त्यांनी संगीताची साधना सुरू ठेवली आणि अनेक उत्तम संगीतकार घडवले. पंडित पन्नालाल घोष, पंडित निखिल बॅनर्जी, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान आणि खुद्द अन्नपूर्णा देवी, ही काही महत्त्वाची उदाहरणं. बाबा केवळ भारतीय वाद्यांमध्येच नव्हे, तर व्हायोलिनसारख्या पाश्च्यात्य वाद्यांमध्येही पारंगत होते. त्यांनी त्यांच्या शिष्यांना केवळ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटच (तार वाद्य) नव्हे, तर वूड विंड इंस्ट्रुमेंट्स (वायू वाद्य)ही शिकवली. तीच परंपरा अन्नपूर्णा देवींनीही कायम ठेवली. बाबा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते आणि केवळ संगीत हाच त्यांचा धर्म होता.

मैहरचे राजे ब्रिजनाथ सिंग यांनी त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून त्यांचं अन्नपूर्णा हे नाव ठेवलं आणि तेच कायम झालं. ‘रोशन आरा’ या नावानं त्यांना कुणी ही ओळखत नाही. पुढे सांगीतिक अनुबंध राहावा, या उद्देशानं त्यांचं लग्न पंडित रविशंकर यांच्याशी करून दिलं. एवढंच नव्हे, तर अली अकबर खाँसाहेबांच्या मुलांची आशिष, ज्ञानेश आणि प्राणेश अशी नावं ठेवली.

अन्नपूर्णा देवी लग्नानंतर पूर्ण शाकाहारी बनल्या. अशा उत्तुंग प्रतिभा असणाऱ्या वडिलांची मुलं ही तितकीच प्रतिभावंत होती. अली अकबर खाँ आणि अन्नपूर्णा देवी यांनी हीच परंपरा सुरू ठेवली. पण यात वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार अपरिहार्यपणे आलेच. संगीत प्रतिभेतून निर्माण होणारे अहंभाव, श्रेष्ठत्वाची भावना, त्यातून निर्माण झालेल्या महत्त्वाकांक्षा आणि अंतिम साध्याबाबतचे वैचारिक मतभेद, नीती-अनीतीच्या कल्पना. अली अकबर खाँ आणि पंडित रविशंकर यांच्यातील कॅसानोवा सिन्ड्रोमबाबत, या पुस्तकात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

हे दोघंही भारतीय संगीताला जगात ओळख निर्माण करून देणाऱ्यांपैकी, परंतु त्या दोघांचंही वैयक्तिक आयुष्य अडचणीचं झालं आणि दोघांच्याही कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागला. पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्या आयुष्यावर आधारित हृषीकेश मुखर्जी यांनी ‘अभिमान’ हा चित्रपट बनवला. त्याची कथा या पुस्तकातून वाचायला मिळते.

पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी सुरुवातीला एकत्र परफॉर्म करायचे. पंडितजी सतार आणि अन्नपूर्णा देवी सुरबहार हे वाद्य वाजवायच्या. ही जुगलबंदी अनोखी असायची. त्या काळात मोजक्या महिला संगीतकारांमध्ये अन्नपूर्णा देवी यांचा समावेश होता. जाहीर कार्यक्रमांमध्ये जेव्हा त्यांचं अधिक कौतुक व्हायला लागलं, तेव्हा पंडितजींचा इगो दुखावला गेला आणि त्यांच्या नातेसंबंधांमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. अन्नपूर्णा देवी संगीताच्या बाबतीत शुद्धतेचा आग्रह धरायच्या, तर पंडितजी मूळ स्वरूपाला धक्का न लावता, नवनवीन प्रयोगांतून स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं मानायचे.

यातून त्यांचे मतभेद व्हायला लागले आणि पंडितजींची भ्रमर वृत्ती, अनेक स्त्रियांशी असलेले त्यांचे संबंध यातून त्यांचं नातं कधीच सांधता येऊ नये इतकं तुटत गेलं. पंडितजींनी वयाच्या १८ वर्षांपर्यंतच जग बघितलं होतं, तर अन्नपूर्णा देवी मैहरच्या बाहेर कधीच गेल्या नव्हत्या. स्वभाव, वृत्ती आणि पार्श्वभूमी यांतील मतभेद काही घटनांनंतर पृष्ठभागावर आले. औपचारिक घटस्फोट न घेताही हे दोघं ३० वर्षं विभक्त होते. क्वचितच एकमेकांना या काळात भेटले. त्यांच्या मुलाच्या शुभोच्या प्रकरणानंतर ते अजूनच मतभेद विकोपाला गेले. त्यातच शुभोचाही १९९२ला अकाली मृत्यू झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

५ एप्रिल १९९९ रोजी एका टीव्हीवरच्या मुलाखतीत पंडितजींनी अन्नपूर्णा देवींनी जाहीर मैफली करणं का सोडून दिलं, याबाबत काही विधानं केली. ती ऐकल्यावर असणाऱ्या अन्नपूर्णा देवींना पहिल्यांदाच त्याचं खंडण करायला हवं असं वाटलं. त्याबाबत एक मसुदा तयार करण्यात आला. त्यातले अनेक मुद्दे वस्तुस्थितीनुसार त्यांनी तपासले आणि अंतिम मसुद्याला मान्यता दिली. परंतु पंडितजींचा जगभर नावलौकिक होता. त्यांना ‘भारतरत्न’सह देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे संगीत क्षेत्रात त्यांच्याविरुद्ध जायला कुणी तयार होत नसे. या मसुद्यात सहभागी असणाऱ्या लोकांमध्ये अन्नपूर्णा देवींचे दुसरे पती रुशीकुमार पंड्या, सुरेश व्यास, समर्थ बाली, डॉ.शास्त्री, हेमंत देसाई, प्रदीप बारोट, नित्यानंद हल्दीपूर आणि स्वतः लेखक अतुल मर्चंट सहभागी होते, पण प्रत्यक्ष मसुदा प्रकाशित करण्याच्या वेळी फक्त नित्यानंद आणि लेखक दोघंच शिल्लक राहिले. नित्यानंद संगीत क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत असल्यामुळे, अतुल यांनी स्वतःच्या नावाने तो मसुदा अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध केला. या सांगीतिक कुटुंबातील विरोधाभास असा आहे की, अन्नपूर्णा देवींच्या मोठ्या बहिणीचं- जहाँ आराचं वैवाहिक आयुष्य संगीतामुळेच संपुष्टात आलं, म्हणून बाबांनी अन्नपूर्णा देवींचं लग्न, त्यांच्या संगीत प्रतिभेला वाव मिळेल म्हणून पंडितजींशी केलं आणि पण वेगळ्या अर्थाने त्यांचंही वैवाहिक आयुष्य संगीतामुळेच संपुष्टात आलं.

अन्नपूर्णा देवींचा आणि पंडितजी यांनी लौकिक अर्थानं विभक्त झाल्यानंतर ३० वर्षांनी घटस्फोट घेतला. त्या काळात पंडितजी एकदाच अन्नपूर्णा देवींना भेटले. तेही त्यांनी फोन करून सांगितलं की, मला तुझ्या हातचं जेवण करायचं आहे. ते त्यांना भेटले, त्यांच्या हातचा स्वयंपाक जेवले. त्यांनीही त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला. घटस्फोटानंतर अन्नपूर्णा देवींनी रुशीकुमार पंड्यांशी लग्न केलं. त्यानंतर पंडितजींशी त्यांचा कुठलाही संबंध राहिला नाही. २०१२मध्ये पंडितजींचं निधन झालं. अन्नपूर्णा देवींचीही प्रकृती वयोमानानुसार बिघडत चालली होती. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्या ग्लानीत असताना बोलायला लागल्या- ‘पंडितजी, आये हो क्या? खाना खाया? प्रोग्राम कैसा हुआ? कौनसा राग बजाया?’. अन्नपूर्णा देवी पंडितजींबाबत मनात राग ठेवून होत्या, परंतु त्यांच्या प्रतिभेबाबत, सांगीतिक कर्तृत्वाबाबत कुणी अनुद्गार काढलेले त्यांना आवडत नसे. पंडितजींच्या प्रतिभेबाबत, त्यांच्या साधनेबाबत आणि गुरू-भक्तीबाबत त्यांना नितांत आदर होता. त्यांच्या नात्यातले ताणेबाणे ही एक संगीत विश्वातील शोकांतिका ठरली. या विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या नातेसंबंधांचं उत्तम आरेखन लेखकानं या पुस्तकात केलंय.

अन्नपूर्णा देवींचा भावनाप्रधान स्वभाव, एककल्लीपणा, जगापासून अलिप्त होऊन जगण्याचा प्रयत्न, या सगळ्याचं विश्लेषण करण्याचा लेखकानं प्रयत्न केलाय. त्यांनी स्वतःला ‘आकाशगंगे’च्या सहाव्या मजल्यावर कोंडून घेतल्यामुळे, त्यांच्याबाबत फारच कमी माहिती आहे. त्या स्वतःची छायाचित्रं काढू देत नसत, मुलाखतींना त्यांचा विरोध होता. शिष्यांनाही त्या फार जवळ करत नसत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी कुणाकडून मदतीची अपेक्षा केली नाही. उलट त्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची उत्तम प्रकारे आवभगत करत. पैशाचं त्यांना यत्किंचितही आकर्षण नव्हतं. बाबा अल्लाउद्दीन खाँसाहेबांसारख्याच त्याही शिष्यांकडून फी घेत नसत.

त्याबाबतही अतुल मर्चंट जटायू यांनी पंडित हरिप्रसाद चौरसियांपासून अनेक शिष्यांचा संदर्भ देऊन लिहिलंय की, अनेकांनी अन्नपूर्णा देवींशी संबंध ठेवले नाहीत आणि शेवटी त्यांची साधी विचारपूसही केली नाही. परंतु नित्यानंद हल्दीपूर हे स्वतःचं करिअर, कुटुंब सोडून शेवटच्या त्यांच्या आजारपणात त्यांच्यासोबत येऊन राहिले, तेही साडेपाच वर्षं. असा शिष्य मिळणं ही गुरूचं भाग्यच. त्या काळात त्यांचा स्वभाव सांभाळणं आणि त्यांना आवडत नसलेली कुठलीही गोष्ट न करणं हेही हल्दीपूर यांनी आवर्जून केलं. नित्यानंद हल्दीपूर यांनी मैहर घराण्याला आदरांजली म्हणून ‘लिनीएज’ म्हणून एक अल्बम काढला, त्याची निर्मिती प्रक्रियाही या पुस्तकात दिली आहे.

या पुस्तकात अन्नपूर्णा देवींच्या सांगीतिक प्रतिभेबाबत ठिकठिकाणी गौरवोद्गार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावातील गाठी, एककल्लीपणा यांचं मानसशास्त्रीय विश्लेषणही केलंय. त्यांच्या हट्टीपणामुळे संगीतातील एक विलक्षण प्रतिभा चौकटीतच अडकून पडली, याची कारणमीमांसाही करण्याचा प्रयत्न केलाय. एवढ्या विलक्षण प्रतिभेच्या संगीतकार असूनही त्यांचं व्यवस्थित दस्तवेजीकरण होऊ शकलं नाही, याविषयी लेखकानं खंत व्यक्त केलीय.

अन्नपूर्णा देवींसोबत जगणं फारसं सोपं नव्हतंच. रुशी कुमार पंड्या यांनी हे शिवधनुष्य कसं पेललं असेल, असा प्रश्न पडतो. रुशी कुमार त्यांना पूरक नव्हते. दोघांचीही व्यक्तिमत्त्वं भिन्न होती. पंडितजींशी माझं लग्न करणं ही बाबांची चूक होती आणि रुशी कुमारांशी लग्न करणं, ही माझी चूक होती, असं अन्नपूर्णा देवींनीच कबुल केलंय. पंडितजींच्या आणि त्यांच्या नातेसंबंधांचा, त्यांच्या मुलावर शुभोवर विपरीत परिणाम झाला. त्याच्यासारख्या विलक्षण प्रतिभेच्या संगीतकाराला, कलावंताला आपली कलाकीर्द घडवता आली नाही. अन्नपूर्णा देवींच्या स्वभावाचाही त्याला त्रास झाला. त्याला कंटाळून तो पंडितजींसोबत अमेरिकेत गेला, पण तिथंही त्याला काही करता आलं नाही आणि वडिलांनाही तो दुरावला. त्यातच त्याचा अंत झाला. अन्नपूर्णा देवी लग्न करून, आई होऊनही आयुष्यभर एकाकीच राहिल्या. स्वतःच स्वतःच्या कैदेत राहिल्या. त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. त्यांच्या याच एकांतानं त्यांचं संगीताशी असलेलं नातं मात्र अधिकच दृढ केलं.

येहुदी मेन्युहिन आणि जॉर्ज हॅरिसन यांच्यासारख्या थोर संगीतकारांना अन्नपूर्णा देवींचं वादन ऐकण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांना मध्यस्थी करायला लावली. इंदिराजी आणि अन्नपूर्णा देवींचे संबंध दिल्लीच्या वास्तव्यापासून ममत्वाचे होते... जरी त्या फारशा एकमेकींना भेटल्या नसल्या तरी. मुंबईत असताना एकदा इंदिरा गांधी अन्नपूर्णा देवींना भेटायला आवर्जून आल्या होत्या. अन्नपूर्णा देवींनी दिल्लीत येऊन ‘पद्मभूषण’ पुरस्कार घेण्यास नकार दिला, तेव्हा इंदिरा गांधींनी तो त्यांना त्यांच्या घरी जाऊन द्यायची व्यवस्था केली आणि त्यांचा हट्टही पूर्ण केला. इंदिराजींच्या निर्घृण हत्येचं अन्नपूर्णा देवींना प्रचंड दुःख झालं होतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अतुल मर्चंट यांनी अन्नपूर्णा देवींच्या इतर शिष्यांशी तुलना करत, ते स्वतः कसे साधनेत कमी पडत आणि त्यामुळे त्यांनी अन्नपूर्णा देवींकडून शिक्षण घेणं कसं बंद केलं होतं, याचाही उल्लेख केला आहे. ते काही काळ नित्यानंद हल्दीपूर यांच्याकडून संगीत शिकत होते. शिक्षण बंद झालं तरी ते अन्नपूर्णा देवींच्या सातत्यानं संपर्कात होते. लेखकाच्या आयुष्यातही एक वळण असं आलं की, त्यांचा भौतिक सुखांमधला रस संपला. व्यवसायातूनही त्यांनी निवृत्ती घेतली आणि उर्वरित आयुष्य संगीत साधनेला वाहून घ्यायचं ठरवलं. हा त्यांच्यावरचा अन्नपूर्णा देवींचा प्रभाव. त्यांनी हे रूढ अर्थानं अतुलजींना शिकवलं नाही, परंतु वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत राहून झालेला हा आत्मसाक्षात्कार होता, जो त्यांना संगीताकडे पुन्हा खेचून घेऊन गेला.

या पुस्तकाची प्रस्तावना पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी लिहिली आहे. अन्नपूर्णा देवींच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनी ‘आराध्य- होमेज टू गुरुमा अन्नपूर्णा देवी’ हा कार्यक्रम पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या गुरूकुल प्रतिष्ठानने आयोजित केला होता. पंडितजींनी स्वतःही भुवनेश्वरला गुरुकुल प्रतिष्ठान या संगीत विद्यालयाची स्थापना केली आहे, तिथंही अन्नपूर्णा देवींचा स्वतंत्र कक्ष आहे.

भारताच्या संगीत इतिहासातील महत्त्वाच्या पर्वाबाबत माहिती देण्याच्या दृष्टीनं, हे पुस्तक महत्त्वाचं आहे. संगीत जाणकारांनी आवर्जून वाचावं.

Annapurna Devi : The untold story of a Reclusive Genius - Atul Merchant Jatayu

Penguin Random House India

Pages – 341

Price - 433 rs

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......