२७ सप्टेंबर २०१३ रोजी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मनमोहनसिंग सरकारचा एक अध्यादेश (संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भातला) पत्रकारांच्या समोर फाडून टाकला, आणि त्याला ‘संपूर्ण मूर्खपणा’ असे संबोधले. तेव्हा मनमोहनसिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि त्याच दिवशी अध्यक्ष ओबामा यांना भेटणार होते. राहुल यांनी केलेला (पंतप्रधानांचा, सरकारचा, देशाचा आणि काँग्रेस पक्षाचाही) अपमान इतका मोठा होता की, मनमोहनसिंग यांनी तडकाफडकी राजीनामा द्यायला हवा किंवा ते देतील, असे त्या दिवशी सर्वत्र बोलले-लिहिले गेले. पण मनमोहनसिंग देशात परतल्यावर सोनिया गांधींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माफी मागितली आणि नंतर राहुल यांनीही स्वतःहून किंवा सोनियांनी सांगितले म्हणून लेखी माफी मागितली. परिणामी मनमोहनसिंग यांचा राजीनामा आणि काँग्रेसची व देशाची आणखी नाचक्की टळली. पण तो टर्निंग पॉइंट होता, काँग्रेस पक्षाची जोरदार घसरण सुरू होण्याचा आणि देशाचे आणखी खराब दिवस येण्याचा! कारण काँग्रेसचे भावी नेतृत्व राहुल गांधी आहेत, हे तेव्हा मनमोहनसिंग यांच्यासह सर्वांनी स्पष्ट केले होते आणि त्याचदरम्यान नरेंद्र मोदी हे भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले होते, कारण त्यानंतर सहाच महिन्यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होणार होत्या.
बरोबर नऊ वर्षे झाली त्या घटनेला, म्हणजे अध्यादेश फाडण्याच्या कृतीला. तेव्हापासून आतापर्यंत (दोन वर्षे उपाध्यक्ष, नंतर चार वर्षे अध्यक्ष आणि त्यानंतरची तीन वर्षे अध्यक्ष नसताना अध्यक्षाचा आविर्भाव) राहुल यांच्या नेतृत्वाचा कालखंड राहिलेला आहे. बेजबाबदारपणा व बेमुर्वतखोरपणा आणि दारुण अपयशाची नऊ वर्षे, असे या कालखंडाचे वर्णन करावे लागेल. तेव्हापासून काँग्रेसची सर्वस्तरीय वेगवान घसरण सुरू आहे, ती थांबता थांबत नाही. ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणेच ती स्थिती आहे. मधल्या काळात पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या चार मोठ्या व महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळाली आणि २०१७च्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसने भाजपची दमछाक केली, एवढीच काय ती ‘वाळवंटातील हिरवळ’!
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मे २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्या घटनेलाही आता सव्वातीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे, आणि त्या आजारपणामुळे कार्यरत नाहीत. राहुल यांनी राजीनामा का दिला, दोन-तीन महिने तो स्वीकारला का गेला नाही आणि नंतर इतक्या कठीण काळात हंगामी अध्यक्षपद हा प्रकार इतका दीर्घकाळ का चालू ठेवला, याबाबतचे स्पष्टीकरण कधीही पुढे आलेले नाही. आणि आश्चर्य म्हणजे, राजीनाम्यानंतरही राहुल यांचा आविर्भाव अध्यक्षासारखाच का आहे, हेही स्पष्ट झालेले नाही.
२०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला ५०च्या दरम्यान जागा मिळाल्या आहेत, साडेपाचशेपैकी पन्नास म्हणजे जेमतेम दहा टक्के जागा! २०१४च्या पराभवाचे कारण संयुक्त पुरोगामी आघाडी : २चे सरकार, त्यामधील आदर्श ते टू-जी स्पेक्ट्रम ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अशी घोटाळे मालिका, याशिवाय अण्णा हजारे, बाबा रामदेव व केजरीवाल यांची आंदोलने कारणीभूत होती. म्हणून तिथे राहुल यांना दोषमुक्त करता येईल, परंतु मोदी राजवट आल्यानंतरची आठ वर्षे काँग्रेसची जी वाताहत चालू आहे, त्याची जबाबदारी राहुल, सोनिया आणि अर्थातच त्यांचे सल्लागार यांची आहे.
आता राहुल यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात या यात्रेचा प्रारंभ झाला आहे, १३ राज्यांतून ही यात्रा सहा महिन्यांनंतर काश्मीरला पोहोचणार आहे. या संपूर्ण काळात राहुल हे या यात्रेबरोबर सातत्याने राहतील का आणि राहिले तरी, जी काही थोडी धुगधुगी काँग्रेस पक्षात आहे, ती त्या यात्रेत ऊब निर्माण करण्यासाठी वापरली जाणार की, यात्रेतून काही ऊर्जा निर्माण होणार आणि देशभरातील काँग्रेसच्या लहान-मोठ्या संस्थानांमध्ये चिमुकले का होईना दिवे लागणार, हे येत्या काही काळातच दिसणार आहे.
मात्र २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसने बाय दिल्यात जमा आहे, असे सध्याचे तरी चित्र आहे. वस्तुतः अशी यात्रा त्यांनी २०१४मध्ये काढायला हवी होती आणि त्यानंतरही किती तरी वेळा त्यासाठी उपयुक्त ठरल्या असत्या. आता मात्र बैल गेला आणि झोपा केला, असेच घडण्याची शक्यता जास्त आहे. कारण काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत आणि जी-२३ गटाने उपस्थित केलेले प्रश्न, यावरून पक्षाचे व देशाचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीचा तर हा डाव नाही ना, अशी शंका कोणाच्याही मनात येऊन जाणे साहजिक आहे.
आज या देशात काँग्रेसची स्थिती कधी नव्हे इतकी दयनीय आहे. केवळ दोन मोठ्या राज्यांत काँग्रेसची पूर्ण सत्ता आहे, छत्तीसगड आणि राजस्थान. मधल्या काळात ‘दैव देते कर्म नेते’ असे प्रकार अनेक वेळा घडले. मध्य प्रदेश हातचा घालवला, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह. पंजाब हातातला घालवला, अमरिंद्र सिंह यांच्यासह. आणि आता काश्मीरमधून काँग्रेसचे नामोनिशान मिटण्याची शक्यता निर्माण झाली निर्माण झाली, गुलाब नबी आझाद बाहेर पडले म्हणून. सध्या अन्य कोणीही लहान पक्ष भाजपबरोबर जाणे तरी पसंत करत आहेत किंवा तटस्थता तरी दाखवत आहेत, मात्र काँग्रेसशी नाते दाखवायला फार कोणी तयार नाही. याचे कारण काँग्रेसला केंद्रीय नेतृत्व नाही आणि प्रदेश पातळीवरील नेतृत्व असून नसल्यासारखे आहे. काँग्रेसचे प्रमुख नेतेच भाजपला जाऊन मिळताहेत, स्वतःची कातडी बचावण्यासाठी किंवा स्वतःच्या पदरात अधिकचे पाडून घेण्यासाठी. अशा पक्षाकडे कोण कशाला आकर्षित होईल!
२०१७ व २०२२ या दोन्ही वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदासाठी, काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष एकत्र येऊन जो उमेदवार देतील, तो निवडून येऊ शकणार नव्हताच, इतकी भाजपची ताकद जास्त होती. शिवाय साम-दाम-दंड-भेद या कुटिल नीतीत त्यांनी मास्टरी मिळवली आहे. तर मग त्या पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवरून अक्षम्य उशीर का केला, या प्रश्नाचे उत्तरही राहुल व सोनिया यांच्याकडे नाही. त्या लढती चुरशीच्याच करायच्या किंवा अन्य फायदे मिळवायचे तर भाजपच्या आधीच डावपेच आखायला हवे होते, सामाजिक, राजकीय समीकरणे जुळवली जातील, असे उमेदवार काँग्रेसने अन्य विरोधी पक्षांसह द्यायला हवे होते. प्रत्यक्षात घडले उलटेच. ज्यांचा विजय निश्चित आहे, ते धडाडीने व लवकर निर्णय घेत आहेत, शिवाय आणखी राजकीय फायदा उकळण्यासाठी सामाजिक समीकरणे जुळून दाखवत आहेत, असे चित्र दिसले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्याआधी प्रणव मुखर्जी यांची नाराजी काँग्रेसबाबत होतीच, पण राष्ट्रपती केल्यानंतर ती नाराजी काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र ती कमी तर नाही झाली, उलट ते पंतप्रधान मोदी यांच्या आहारी गेले आणि नंतर थेट संघ कार्यालयात ‘बोधामृत’ पाजायला गेले. त्यांचे ते वर्तन काँग्रेससाठी तरी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच होते, परंतु त्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावरही ढकलावी लागेलच. कारण ते मुखर्जी यांना राष्ट्रपती केल्यानंतरही सांभाळू शकले नाहीत.
असाच प्रकार नरसिंहराव यांच्याबाबतही झाला. १९९२च्या बाबरी मशीद पतनाला जबाबदार धरून नरसिंहराव यांना काँग्रेसने कायम वाळीत टाकले. पंतप्रधानपदानंतरची सात-आठ वर्षे त्यांना बहिष्कृतासारखे तर वागवलेच, परंतु मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना थांबवली नाही. त्यांचे अंत्यविधी दिल्लीऐवजी हैदराबादला करण्यासाठी सोनिया व त्यांच्या चाहत्यांनी जे कटकारस्थान केले, ते अक्षम्य आणि लाजीरवाणे होते. नरसिंहराव यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे पंतप्रधानपद सांभाळले, देशाला नवे आर्थिक वळण दिले, अशी प्रशंसा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात देश-विदेशातील लहान-थोरांनी केली. मात्र त्यांच्याशी आमचे काही नातेच नाही, असा आविर्भाव काँग्रेसचा राहिला.
आणि विद्यमान मोदी सरकार नरसिंहराव यांना ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न करत असताना, काँग्रेसवाले मख्खपणे बसून होते. सरदार पटेल व सुभाष बाबू यांचा दुरुपयोग संघ, मोदी व भाजप राजरोसपणे करत आहेत आणि त्यांच्यावर हक्क सांगत आहेत. एवढेच नाही तर त्यांचे कार्यकर्तृत्व जणू काही स्वतःचेच आहे, असे सांगत काँग्रेसला झोडपून काढत आहेत आणि काँग्रेसवाले मात्र हात चोळत बसलेत, असे चित्र किती किती वेळा दिसले, याची गणतीच नाही.
हा नतद्रष्टपणा एक वेळ दुर्लक्षित करता येईल. पण इंदिरा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष २०१६-१७मध्ये आले आणि गेले, हे काँग्रेसच्या तळातील कार्यकर्त्यांना तर सोडाच वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आले नाही. ते कळूच नये, अशी तजवीच जणू काही काँग्रेसच्या नेतृत्वाने करून ठेवली होती. आणीबाणीचा काळ हा देशाच्या इतिहासात आणि काँग्रेस पक्षासाठीसुद्धा काळाकुट्ट आहे, त्याचे विस्मरणच व्हायला हवे! पण त्याचे समर्थन शक्य नाही म्हणून इंदिराबार्इंना चर्चेत आणायला नको, असा सल्ला एखाद्या अर्धवटरावाने दिला असावा आणि तो काँग्रेस नेतृत्वाने मान्य केला असावा.
परंतु १९६६ ते ८४ या काळातील १६ वर्षे त्या पंतप्रधान होत्या, त्यांच्याच काळात पाकिस्तान तुटले किंवा तोडले, बांगलादेश निर्माण केले; त्यांच्याच काळात हरित क्रांती व धवलक्रांती प्रत्यक्षात अवतरली, त्यांच्याच काळात पोखरण अणुस्फोट घडवून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली, विज्ञान तंत्रज्ञानातही देशाने त्याच काळात लक्षणीय प्रगती केली, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा दबदबा आताच्या तुलनेत जास्त होता. टीका करणारे करोत, पण इंदिराजी या देशातील तळागाळातील जनतेच्या प्रेमादरास पात्र ठरल्या, त्याच खऱ्या राष्ट्रवादी होत्या, त्यागाचे व बलिदानाचे प्रतीक होत्या, कणखर नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण होत्या, अशी मांडणी काँग्रेसला करता आली असती. त्यांनी लादलेली आणीबाणी ही ‘ऐतिहासिक चूक’ होती आणि त्यांच्या काळात पक्षात व सरकारमध्ये एकाधिकारशाही होती, हे आक्षेप कबूल करूनही इंदिरा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष काँग्रेसला देशभर गाजवता आले असते. तसे झाले असते तर मोदींच्या करिष्म्याला निश्चितच छेद दिल्यासारखे झाले असते.
त्याआधी २०१४ व २०१५मध्ये नेहरूंचे ५०वे स्मृतीवर्ष आणि १२५वे जयंती वर्ष लागोपाठ येऊन गेले. नेहरू हे केवळ भारताचे नाही, तर जगाच्या दृष्टीनेही मुत्सद्दी व शांतिदूत होते, हे त्या वर्षांत दाखवता आले असते. भारतीय ‘राज्यघटने’चे शिल्पकार जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, तसे भारतीय ‘लोकशाही’चे शिल्पकार खऱ्या अर्थाने नेहरू आहेत, हे जनतेच्या मनावर विशेषतः नव्या पिढ्यांच्या मनावर ठसवता आले असते. नेमके त्याच दोन वर्षांत नरेंद्र मोदींचे विदेश दौरे चर्चेत होते आणि जणू काही असा मसीहा भारतात पहिल्यांदाच अवतरलाय, असा त्यांचा आवेश व वावर होता. पण त्याच दोन वर्षांत नेहरूंचे कार्य आणि कर्तृत्व, त्यांची वैचारिकता आणि दूरदृष्टी, यांची उदाहरणे पेश करता आली असती तर, ‘असली’ मुत्सद्दीपणा आणि ‘नकली’ मुत्सद्दीपणा यातला फरक नव्या पिढीला फार चांगल्या प्रकारे कळला असता. पण तसे काहीही न करता, त्या दोन्ही वर्षांत मोदींपुढे काँग्रेसने पांढरे निशाण फडकावले.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१३० वर्षांचा वारसा असलेल्या आणि आधुनिक भारताची जडणघडण केलेल्या काँग्रेसची सध्याची स्थिती काय आहे? पक्षाला नेतृत्व नाही, कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम नाहीत आणि जनतेसाठी दिशादर्शन नाही. हीच गोष्ट मागील दोनेक वर्षांपासून जी-२३ गटातील नेते पोटतिडकीने सांगताहेत. पण त्यांचा उपहास केला गेला, त्यांना भाजपचे हस्तक ठरवले गेले. आनंद शर्मा, कपिल सिबल, गुलाम नबी आझाद हे कायम काँग्रेसनिष्ठच होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या तर हाडामांसात काँग्रेस आहे. खरा किंवा मूळ रूपातील काँग्रेसवाला कसा असू शकतो, हे दाखवायचे असेल तर आज तरी महाराष्ट्रात पृथ्वीराज यांचेच नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. त्यांच्या क्षमता किती उच्च प्रतीच्या आहेत, हे सिद्ध झालेले आहे. गेल्या काही महिन्यांत ते खूप धाडसीपणे काँग्रेस नेतृत्वाबद्दल जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते विशेष लक्षवेधी आहेत. त्यांच्यासारख्या काँग्रेसमध्येच उभी हयात घालवलेल्या बुद्धिमान व दूरदृष्टीच्या नेत्याची जी अवस्था काँग्रेसने केली, ती अक्षम्य आहे. ‘आताच्या परिस्थितीत भाजपने उभे केलेले देशाच्या लोकशाही समोरचे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही संघटित नाही झालो, तर भावी पिढ्या आम्हाला गुन्हेगार ठरवतील’, हे पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान तंतोतंत खरे आहे!
‘राहुल यांना नेता बनण्याची आकांक्षाच नाही’ हे गुलाब नबी आझाद म्हणाले, तेही खरे आहे, आणि ‘राहुल जेवढा जास्त काळ काँग्रेसचे नेतृत्व करतील, तेवढा आम्हाला जास्त फायदा होत राहील’, हे मोदी-शहा यांच्यापासून भाजपचे सर्व लहान-थोर नेते उपहासाने सांगत आलेत; तेही पूर्णतः खरेच आहे.
‘साधना’ साप्ताहिकाच्या १७ सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment