‘७५ सोनेरी पाने : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे’ हा अविनाश धर्माधिकारी यांचा ग्रंथ नुकताच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा आपल्या देशानं खूप काही जास्त साध्य केलं, मिळवलं, कमावलं. पुरावे हवेत? ते सगळे या अमृत महोत्सवी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ग्रंथात पाहायला मिळतात. या ग्रंथाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी धर्माधिकारी यांना लिहिलेल्या या पत्रात या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया सांगितली आहे...
.................................................................................................................................................................
१७ ऑगस्ट २०२२
प्रिय अविनाश,
लेखक, कलाकार, नाट्य-सिनेनिर्माते अनेक कलाकृती निर्माण करतात, हे खरं असलं, तरी त्यांपैकी चार-पाच कलाकृतीच त्यांची ओळख बनून जात असतात. अगदी मराठी नाट्यक्षेत्रासंबंधी बोलायचं झाल्यास-विक्रम गोखले म्हणजे ‘बॅरिस्टर’, डॉ. लागूंचं नाव घेतलं की, ‘नटसम्राट’, भक्ती बर्वे म्हणजे ‘फुलराणी’ आणि निळू फुले म्हणजे ‘बाईंडर’ असं आपण म्हणतो. प्रकाशन व्यवसायाबाबत असंच काहीसं म्हणता येईल. ‘राजहंस’नं आजवर प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या हजाराच्या जवळपास असेल; पण ‘राजा शिवछत्रपती’, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘टॉलस्टॉय’, ‘कार्व्हर’, ‘पानिपत’, ‘झाडाझडती’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘सत्तावन्न ते सत्तेचाळीस’ असे मोजके ग्रंथ ‘राजहंस’ची ओळख बनून गेलेत. आता आजपासून तुमची ‘सोनेरी पाने’ अशीच ‘राजहंस’ची नवी ओळख बनून जाईल, याचा मला आनंद वाटतो व हा आनंद केवळ आणि केवळ तुम्ही मला दिलात, याबद्दल मी आपले औपचारिक आभार मानत नाही, पण हा आनंद मी लपवू शकत नाही.
गेले चार महिने तुम्ही एखाद्या व्रताप्रमाणे हा लेखनयज्ञ केलात, त्याची आज एका अर्थी सांगता होत आहे. आपल्या आणि ‘राजहंस’च्या प्रवासातील हा भाग्ययोग आहे. लेखक या नात्यानं आपला यात मोलाचा वाटा आहेच, पण संपादक या नात्यानं शिरीष सहस्रबुद्धे यांचंही योगदान मी नजरेआड करत नाही. तुम्हा दोघांचं मन:पूर्वक अभिनंदन!
माझा एक लाडका सिद्धान्त आहे, जो मी अनेकदा गमतीनं भाषण-लेखनातून मांडत असतो. कोणतंही पुस्तक अथवा कलाकृती त्याचं नशीब घेऊन जन्माला येते. व्यक्तीची जशी एक कुंडली असते; तशी पुस्तकाची, नाटकाची, सिनेमाची, गाण्याची असते का? माहीत नाही. एरवी तीन-चार मान्यवर प्रकाशकांकडून नकार घेऊन आलेली ‘पानिपत’ कादंबरी नागनाथ पाराजवळ धडकल्यावर विक्रीच्या आघाडीवर इतिहास निर्माण करते, याचं उत्तर मिळत नाही. जयवंत दळवींनी त्यांच्या ‘ठणठणपाळ’मध्ये लिहिलं होतं की, ‘पानिपत लढाईत दीड लाख मराठी बांगडी फुटली असं इतिहासकार खुशाल म्हणोत, पण आम्ही वर्तमानात म्हणतो की, ‘पानिपत’ कादंबरीनं पाटलीणबाईंच्या हातात सोन्याच्या बांगड्या भरल्या’.
लताबाई-शांताबाईंची कोळीगीतं अत्यंत गाजली. त्यासंबंधी बोलताना हृदयनाथ मंगेशकर एकदा म्हणाले की, “ज्या म्युझिक कंपनीनं ती प्रकाशित केली, ती कंपनी त्या वेळी कमालीच्या आर्थिक गर्तत होती. कोळीगीतं प्रकाशित करावीत का नाही, या विचारात असताना त्यांनी ती प्रकाशित केली. ती इतकी लोकप्रिय झाली की, कंपनी आर्थिक आपत्तीतून बाहेर आली. त्यातही योग असा, की, जे ‘मी डोलकर, मी डोलकर’ गाणं तुफान गाजलं, ते मूळ योजनेत नव्हतंच. आठ-नऊ मिनिटांची कॅसेट भरून काढण्यासाठी ऐनवेळी शांताबाईंनी स्टुडिओत ते गाणं लिहिलं आणि तेच सर्वांत लोकप्रिय ठरलं.”
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हे तुम्हाला फार दूरचं वाटेल, तर वाळिंबे यांच्या ‘सत्तावन्न ते सत्तेचाळीस’ची कथा सांगतो. ‘राजहंस’नं रशिया, फ्रान्स, चीन, क्यूबा, व्हिएतनाम अशा अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्यांचे इतिहास वाचकांना सादर केले. त्यामुळे ९७ साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भारतीय स्वातंत्र्यलढा ग्रंथरूपानं सादर करण्याची एक जबाबदारी माझ्यावर होतीच. त्या दृष्टीनं वर्ष-दीड वर्ष आधीच मी तयारीला लागलो होतो. वि.स. वाळिंबे श्री.गं.प्रमाणे माझेही स्नेही. राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं आम्ही खूप निकट आलो. साहजिक त्यांच्याशी या विषयावर सतत बोलणं व्हायचं. अनेक लेखकांची नावं चर्चेत यायची. काहींना आम्ही भेटायचो. चर्चा होत असत. मला आठवतं, कर्नल श्याम चव्हाण यांना मुंबईहून एक-दोन वेळा बोलावून घेतलं. विषयाची सविस्तर कल्पना दिली. वाचनासाठी पुस्तकं दिली. तेही अत्यंत उत्साहानं, जिद्दीनं करायला लागले. एक-दोन प्रकरणं त्यांनी लिहून पाठवली, पण मनासारखी भट्टी पेटली नाही. त्यांनाही ते जाणवलं.
यात सहा महिने गेले. मनासारखा लेखक मिळत नाही, म्हणून मी निराश झालो आणि एका भेटीत सहज वाळिंब्यांना म्हणालो, “तुम्हीच का करत नाही?” ते क्षणभर माझ्याकडे बघत राहिले…म्हणाले, “तुम्हाला वाटतंय मला झेपेल?” मी म्हणालो, “ ‘नाझी भस्मासुर’च्या अफाट लोकप्रियतेनंतर तुम्ही पुन्हा ‘हिटलर’ लिहिलात आणि वाचकांनी तो उचलून धरला, इतकी ताकद तुमच्या लेखणीत आहे, हे विसरू नका. हे शिवधनुष्य तुम्ही निश्चित पेलाल. फक्त ‘हो’ म्हणा.”
आणि तुम्हाला सांगतो, १४ ऑगस्ट ९६ रोजी त्यांनी पहिलं प्रकरण लिहिलं आणि २६ जानेवारी ९७ रोजी स्वातंत्र्यसंग्रामाचा दोन खंडांतला इतिहास वाचकांसमोर सादर झाला. वाचकांनी त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पहिली मोठ्या संख्येची आवृत्ती आगाऊ नोंदणीत संपली. विजयाराजे शिंदे यांनी तो पाहिला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळांसाठी त्याची एक आवृत्ती खरेदी केली. एका महत्त्वाच्या कालखंडाचा इतिहास आपण ग्रंथरूपात वाचकांना दिला, हे समाधान या ग्रंथानं ‘राजहंस’ला दिलं. हे सर्व मी तुम्हाला का सांगतोय, हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेलही.
पण History repeats.
तुमच्या ‘सोनेरी पानां’ची कथाही याहून फार वेगळी नाही.
जवळपास वर्षापूर्वी डॉ. सदानंद बोरसे, आनंद हर्डीकर, शिरीष सहस्रबद्धे यांच्याशी या विषयावर बोलणी होत असत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. विषयाच्या रूपरेषा आखून झाल्या. अनुक्रमणिका लिहून झाल्या. नमुन्याचं लेखन झालं, पण काही ना काही कारणानं ते पुढे सरकेना. विषयाची चौकट कोणाच्या मनात भरत नव्हती. विषयाची मान पकडता येत नव्हती. यात सहा-आठ महिने गेले. ठाव सुटत चालला. एक प्रकारची निराशा येत गेली.
एका सुटीच्या दिवशी माझ्या घरच्या लायब्ररीत कुठलंसं पुस्तक शोधत होतो. ते न मिळता सहज हाताशी सावरकरांचं ‘सहा सोनेरी पाने’ पुस्तक लागलं. ते नाव वाचलं आणि आतल्या आत एक टाळी दिली. माझं काम झालं होतं. पुस्तक पूर्वी वाचलेलं होतं. आता मी ते उघडूनही पाहिलं नाही. त्या क्षणी मला तीन गोष्टी मिळाल्या. ‘७५ सोनेरी पाने’ हे ग्रंथाचं नाव ठरलं. विषयाचा परीघ आखला गेला आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ग्रंथाचं टोक सकारात्मकतेकडे वळवायचं, हे मनाशी योजलं.
करोनानंतरच्या काळावर विशेषतः भोवताली असणाऱ्या आजच्या राजकीय, सामाजिक वातावरणामुळे काहीशा निराशेचं, उद्विग्नतेचं झाकोळ आलेलं आपल्या सर्वांनाच तीव्रतनं जाणवत आहे. त्यात वृत्तपत्रं, टीव्ही वाहिन्या आणि समाजमाध्यमं यात नित्य भर घालत आहेत. हे निराशेचं सावट काहीसं दूर करायचा प्रयत्न करावा, खोटा आणि भाबडा आशावाद न जागवता अधिकाधिक वस्तुनिष्ठपणे, समतोल दृष्टीनं हे करायचा प्रयत्न करावा, असं मनानं घेतलं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ताबडतोबीनं डॉक्टर आणि शिरीषला फोन लावले. दोघांनीही होकार भरला. माझा उत्साह वाढला. आता लेखकशोध सुरू झाला. ‘राजहंस प्रकाशन’ परिवारातील नावं डोळ्यांसमोर येत होती, जात होती. यात दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी माझ्या नेहमीच्या वाडेश्वर कॉफी अड्डयावर माझा मित्र अंशुमान तांबे यांच्याबरोबर कॉफी घेत असताना अचानक आतून तुम्ही बाहेर आलात. आपण हसलो. जुजबी बोललो. तुमची पाठ वळली आणि मी अंशुमानला म्हणालो, “अहो, अविनाश हे नाव आमच्या विचारात नव्हतंच.” अर्थात माझा-तुमचा संबंध २५-३० वर्षं तसा आलाच नव्हता. तुम्ही, तुमचं पूर्वीचं लेखन, भाषणं यांविषयी ऐकत होतो; पण संपर्क असा नव्हता. पण त्या दिवशी तुमचं नाव डोक्याशी घेऊन घरी आलो.
दुसऱ्या दिवशी शिरीषला सांगितलं, त्याचा चेहरा खुलला. “फारच छान होईल,” तो म्हणाला. त्यातून दुसऱ्या दिवशी तुम्हाला माझा फोन झाला. तुम्ही चार दिवस विचारासाठी मागून घेतले, पण तुमच्या आवाजातून होकार डोकावत होता. त्या दिवसांत तो मला पुरेसा होता. नंतर आपण सगळे भेटलो. तुम्ही होकार भरलात, पण हाती असलेल्या मर्यादित वेळेत ही लढाई तुम्हाला लढायची होती. पहिल्या-दुसऱ्या भेटीत तुमच्या चेहऱ्यावर हा ताण मला स्पष्ट दिसत होता. तुम्हाला खात्री नव्हती, पण आम्हाला विश्वास होता. तुम्ही महिने-दिवस-तासांचा हिशेब मांडत लेखन वेळापत्रक मांडत होतात. अधिकाधिक सांभाळत होता. शिरीष आणि त्यांचे सहकारी विशेषतः सुश्रुत कुलकर्णी, चंद्रमोहन कुलकर्णी, जयदीप कडू, अपूर्वा, आरती घारे, सारिका, तृप्ती, संदीप यांनी वेळा-काळाचं भान सांभाळलं. आणि अखेर तुम्हा सर्व मंडळींनी हे शिवधनुष्य पेललं. एक अनमोल ग्रंथ निर्माण केलात.
यात माझ्या दृष्टीनं आनंद-समाधानाचा भाग कोणता होता? विचाराल, तर वेळ मिळेल तेव्हा शिरीष भेटायचा आणि तुम्ही हातावेगळ्या केलेल्या लेखनाचं दिलखुलास कौतुक सांगायचा. त्याच्या मोजून-मापून-तोलून बोलण्याचा सवयीनं त्याच्याकडून मिळालेली दाद किती ‘वजनी’ आहे, याचा मला अंदाज यायचा. त्यातून तुमचं कौतुक त्याच्या हाताबाहेर गेलं की, तो बोलणं थांबवायचा आणि म्हणायचा, “असं करा, हे दोन-तीन लेख तुम्ही वाचाच.” त्यामुळे या संपूर्ण ग्रंथातील ७५ लेखांपैकी मी फार तर पंधरा-वीस लेख वाचले असतील, पण त्यावरून सांगतो; शिरीषच्या तोंडातून तुमच्या कौतुकाचा एकही अधिकचा शब्द गेला नाही.
एक-दोन लेखांविषयी सांगतो. विनोबांच्या भू-दान चळवळीविषयी लिहिताना ब्रिटिशांनी अत्यंत पद्धतशीरपणे इथे जमीनदार वर्ग कसा निर्माण केला, पुढे घटनाकारांनी दूरदृष्टीनं ‘कसेल त्याची जमीन’ कायदा कसा आणला, पुढे या जमीनदार वर्गाकडून त्याला न्यायव्यवस्थेत आव्हान कसं देण्यात आलं, त्यातून तेलंगणात कम्युनिस्ट पक्षाचा उठाव कसा झाला... या सर्व घटनाक्रमाची तुम्ही आवश्यक तपशिलासह, एकाही अनावश्यक शब्दाची सांडलवंड न करता पार्श्वभूमी उभी करता आणि विनोबांच्या भू-दान प्रयोगाचं महत्त्व सांगता. लेखाचा शेवट करताना तुम्ही लिहिलंय ते खरंय की, ‘भू-दान चळवळीचं व्यावहारिक अपयशसुद्धा भव्य आणि प्रेरणादायी ठरावं.’
मला अनेकदा वाटतं की, आपल्याकडे गांधींच्या विचार आणि व्यक्तिमत्त्वाचा विविध कोनांतून जसा विचार झाला, अभ्यास झाला; तसा विनोबांचा झाला नाही किंवा झाला तो मर्यादित वर्तुळात बंदिस्त राहिला, का विनोबा आपल्याला झेपले नाहीत? याच विचारानं एके काळचे मार्क्सवादी विचारवंत - ज्यांनी मार्क्सचं अप्रतिम चरित्र मराठीत लिहिलं, जे उत्तरायुष्यात गांधी-विनोबांचे अभ्यासक झाले; त्यांच्याकडून मी विनोबांचं चरित्र लिहून घेतलं. अगदी अलीकडेच डॉ.अभय बंग यांना गडचिरोलीला जाऊन भेटलो आणि ‘तुम्ही वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून विनोबा चरित्र लिहाल का?’ अशी विचारणा केली. ते म्हणाले, “मी गांधी-विनोबांच्या विचारांवर पोसला गेलेलो आहे, माझं सारं अस्तित्व त्यांच्या विचारांवर आहे. तुम्हाला अभिप्रेत असणाऱ्या वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून मी त्यांच्याकडे बघू शकणार नाही आणि लिहू शकणार नाही.” मला त्यांचा प्रामाणिकपणा भावला.
ग्रंथातला ‘अमूल’चा लेख वाचताना जाणवलं की, ‘राजहंस’चं ‘अमूल’ आणि ‘कुरियन’ यांवर दोनशे पानांचं पुस्तक आहे. उत्तम आहे. पण अवघ्या चार पानांच्या धावत्या तपशिलातून तुम्ही ‘अमूल क्रांती’ व त्यातील प्रमुख आणि एक-दोन मोजक्या प्रसंगांतून ‘कुरियन’चं व्यक्तिमत्त्वही साकारता. शेवटी ‘अमूल’ प्रकल्पाचं मोठं यश सांगून अजूनही भारताची उत्पादकता जगाशी तुलना करण्यायोग्य नाही, ही वस्तुस्थितीही नोंदवता.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘केशवानंद भारती खटला’ वाचताना तर मला एक प्रकारचा कॉम्प्लेक्स आला. मी सांगतो, हा लेख वाचेपर्यंत मी केशवानंद हे नाव फक्त ऐकून होतो, बाकी सर्व अज्ञान. तुमचा लेख मला तितक्या महत्त्वाच्या खटल्याबाबत सज्ञान करून गेला. या खटल्यातील गुंतागुंतीच्या विणीचे पदर तुम्ही अलगद उलगडून दाखवले आहेत. लेख वाचल्यावर पुन्हा एकदा लक्षात येतं, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं द्रष्टेपण. लोकसभेलासुद्धा घटनाबदलाचे अनिर्बंध अधिकार नकोत, असे त्यांनी पं. नेहरूंना सांगितलं आणि त्यातून जन्माला आलं कलम ३६८.
असो. केवळ काही लेखांच्या वाचनातून मला जाणवलेली तुमच्या लेखनातील ही वैशिष्ट्यं. संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्यावर एकदा सवडीनं बोलू.
तुमच्या लेखनशैलीविषयी आता मी नव्यानं काय लिहू? ती विलक्षण प्रवाही असल्यानं वाचनीय तर आहेच, पण जोडीला भारदस्त आहे. तुमचं आकलन आणि विचारांचा पल्ला मोठा आहे. एका वेळी घडणाऱ्या अनेक घटना-घडामोडी तुम्ही सुसंगतपणे वाचकाला उकलून दाखवता आणि वाचक सहजपणे त्यात गुंतत जातो. ७५ वर्षांतील अनेक घटनांचा हा फार मोठा ऐवज आपण वाचला, या सर्व घटनांचे जणू आपण साक्षीदार होतो, हा प्रत्यय तुम्ही वाचकाला देऊ शकलात, हे या ग्रंथाचं आणि तुमच्या लेखणीचं सामर्थ्य आहे, असं मला वाटतं. आता थांबतो. सुरुवातीला पत्र म्हणून लिहायला घेतलं खरं, पण ते पत्राचा समास सोडून इतरत्र धावत गेलं आणि पत्राच्या केव्हा गप्पा झाल्या - मलाच समजलं नाही.
बाकी आजपर्यंत तुम्ही आणि या ग्रंथाचा निर्मितिसंघ यांच्यामध्येच बंदिस्त अशी ही ‘सोनेरी पाने’ उद्या केवळ आपली राहणार नाहीत. ती वाचकांची होणार आणि वाचक जो कौल देतील, त्याचा आपण सगळेच आदर करू.
दूरवरच्या प्रवासाला निघालेल्या जहाजाला आपण सगळे ‘शुभास्ते पन्थानः’ असा निरोप देऊ.
‘७५ सोनेरी पाने : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे’ - अविनाश धर्माधिकारी
राजहंस प्रकाशन, पुणे
मूल्य - १००० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vishnu Date
Mon , 19 September 2022
खूप छान, उत्कट लेख! ७५ सोनेरी पानांची उत्सुकता वाढवणारा.....!