अजूनकाही
डेल कार्नेगी हे लोकप्रिय अमेरिकन लेखक व व्याख्याते. त्यांनी आत्मविकास, विक्री कौशल्य, कॉर्पोरेट प्रशिक्षण, वक्तृत्व कला आणि संभाषण कला हे अभ्यासक्रम विकसित केले. आणि या विषयावर पुस्तकंही लिहिली. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा जगभरातल्या अनेक भाषांत अनुवाद झाला आहे आणि त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली, होत आहे. ‘आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर लेखकां’मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला जातो तो त्यामुळेच.
मराठीतही त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘हाऊ टू एन्जॉय युवर लाइफ अॅण्ड युवर जॉब’ या पुस्तकाचा प्रा.आराधना कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास करून अनेक उपयुक्त व वैश्विक निष्कर्षाप्रत येणं, हे त्यांच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आपल्या कामात\व्यवसायात संतुष्ट कसं राहावं, स्वतःची बलस्थानं कशी वृद्धिंगत करावीत, कंटाळा व नैराश्यावर कशी मात करावी, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल कसा साधावा, या बाबतीत हे पुस्तक मार्गदर्शन करतं. थोडक्यात, हे पुस्तक व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरूकिल्ली आहे.
अर्थात केवळ पुस्तकं वाचून आयुष्य सुधारतंच असं नाही, मात्र काही पुस्तकं वाचून आपल्याला दिशा नक्की मिळू शकते. जीवनातल्या असंख्य प्रश्नांवर, छोट्या-मोठ्या अडी-अडचणींवर काही पद्धती वापरून आयुष्य कसं समृद्ध करता येतं, हे डेल कार्नगी यांनी उदाहरणांसह स्पष्ट केलं आहे. स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांवरून आपण जीवनविषयक एक विचार मांडतो आणि तो अनुभव सर्वांचाच असेल तर एका निश्चित निष्कर्षाप्रत येतो. एखाद्या व्यक्तीचा विचार जेव्हा वैश्विक होतो, तेव्हा तत्त्वज्ञानाचा जन्म होतो. डेल कार्नेगी यांनी निरीक्षणांतून व अनुभवांतून मांडलेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान सर्वांनाच आपलंसं वाटतं. कारण ते त्यांच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून आलेलं आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
डेल कार्नगी यांनी सभोवतालच्या परिस्थितीतून काढलेले निष्कर्ष आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात आणि त्यातून प्रेरणा कशी मिळवायची याचे धडे देतात. ते म्हणतात, ‘मित्र मिळवा आणि लोकांना प्रभावित करा’. लोकांना तुम्ही आवडावं म्हणून काय करावं, हे सांगताना निष्क्रियतेतून भीती व शंका निर्माण होतात. कृतिशीलता आत्मविश्वास व धैर्य वाढवते. जर तुम्हाला भीतीवर विजय मिळवायचा असेल, तर घरात बसून राहू नका, बाहेर पडा आणि स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवा.
व्यवहार कसा असावा, हे सांगताना ते म्हणतात, हे लक्षात ठेवा की, तुमचा आनंद तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय मिळवलं, यावर अवलंबून नसतो, तो फक्त तुमच्या विचारावर अवलंबून असतो. थकवा व चिंतेला दूर ठेवण्यासाठी ते म्हणतात, आपल्या थकव्याचं कारण काम नसून त्यातून निर्माण होणाऱ्या चिंता, नैराश्य व उद्वेग असतं. आनंद न घेणारे लोक क्वचित यशस्वी होतात. त्यामुळे कंटाळा हद्दपार करायला हवा.
हवं ते मिळवणं म्हणजे यश, पण मिळालेलं हवंसं वाटणं म्हणजे आनंद. स्वतःचा शोध घ्या आणि स्व:स्वरूपात राहा, असेही सांगतात. टीकेचा विचार न करता चांगलं काम करत रहा, तसंच आनंद देण्यातून आनंद घेणं हेच कलाविष्काराचं सार आहे. जे नाही त्याचं दुःख न करता, जे आहे त्यात आनंद मानायला शिका.
डेल कार्नगी यांच्या या आणि अशा अनेक विचारांतून केवळ उपदेश नाही, तर जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. पुस्तकं व माणसं वाचण्यानं आणि त्यांच्यातल्या गोष्टी आत्मसात करण्यानं माणसं बदलतात, बदलली आहेत. संस्कार ही माणसं, पुस्तकं व निरीक्षण यातून झिरपणारी गोष्ट आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकानं एका पिढीवर निश्चित संस्कार केला आहे. तरुण पिढीसमोर अशी चांगली पुस्तकं जर आली, तर निश्चित वर्तन बदल होऊ शकतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
जीवन जगण्याचं काही निश्चित असं सूत्र नसतं. योग्य रस्ता सापडला तर भरकटणं टळतं आणि वेळेत ध्येय गाठता येतं. योग्य रस्ता सापडण्यासाठी मोठ्यांच्या अनुभवाचे बोल, चांगली पुस्तकं आवश्यक असतात. त्यापैकीच हे एक पुस्तक. आयुष्य म्हणजे नक्की काय, हे जसं व्याख्येत सांगता येत नाही, तसंच आयुष्य आनंदी कसं जगायचं, हेही व्यक्तीसापेक्ष असतं. तरीही काहीतरी मार्गदर्शनासाठी आवश्यक असतं. फक्त नियम किंवा संकल्पना यांच्या जोरावर आयुष्य जगता येत नाही.
डेल कार्नेगी यांच्या विचारातील सुलभता आणि स्पष्टता अनेक वर्षांपासून जगभरच्या कितीतरी वाचकांना मार्गदर्शक ठरत आली आहे. मानवी वर्तनाचं अचूक आकलन त्यांना असल्यानं त्यांच्या लेखनातून सम्यक निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळतं. आपल्यातील उपजत क्षमतांचा विकास करून त्यांचा परिपूर्ण उपयोग कसा करावा, याविषयी ते नेटकेपणाने सांगतात… मग ते विक्री कौशल्य असो वा संप्रेषण असो वा विपणन असो की सुख-समाधान असो.
प्रा.आराधना कुलकर्णी यांनी अनुवाद इतका सहज आणि ओघवता केला आहे की, जणू डेल कार्नेगीच आपल्याशी संवाद साधत आहेत, असं वाटतं.
‘हाऊ टू एन्जॉय युवर लाईफ अँड युवर जॉब’ - डेल कार्नेगी
अनुवाद - प्रा.आराधना कुलकर्णी
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पाने - १८२
मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
अनिल कुलकर्णी
anilkulkarni666@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment