अजूनकाही
१० जुलै २०२२ रोजी मराठीतील श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. त्यानिमित्ताने पॉप्युलर प्रकाशनातर्फे आयोजित पुणे येथील कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
जी.ए. कुलकर्णीचं वर्णन करत असताना, त्यांच्या कथासाहित्यामधून एक अमिट असं गारूड निर्माण झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे. काहींना त्यांची निर्मिती म्हणजे एक कोड वाटत आलेलं आहे. हे कोडं सोडवण्यासाठी समीक्षेने त्यांच्या लेखनाचे दोन भाग केले. त्यांच्या प्रारंभीच्या लघुकथा हा एक भाग आणि नंतरच्या प्रदीर्घ रूपक कथा हा दुसरा भाग. मात्र, या दोन्ही भागांतील एकात्मता शोधण्याचा प्रयत्न सहसा झालेला नाही.
जाणिवांच्या प्रदेशांच्या पलीकडे जाऊन नेणिवांतर्गत अबोध मनाची तपशीले तपासण्याचं सामर्थ्य जी.ए. कुलकर्णी यांच्याकडे असल्यामुळे, हा तपशील नोंदवताना त्यांनी रूपकांचा आधार घेतलेला दिसतो. भावनेच्या पलीकडे जाऊन आणि बुद्धिगम्यतेच्याही पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा हा दुर्मीळ प्रयत्न आहे. जगभरातील फार थोड्या लेखकांमध्ये असं सामर्थ्य, अशी चिंतनशीलता आणि प्रतिभेची झेप दिसून येते. मी जी.ए. कुलकर्णी यांना जगातल्या आणि सर्व भाषांमधल्या काही थोड्या श्रेष्ठ आणि अस्सल लेखकांच्या यादीमध्ये समाविष्ट करत आलो आहे.
त्यालाही आता काही वर्षं उलटून गेलेली आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या आणि माझ्या लेखनातला मूलभूत फरकदेखील नोंदवण्यात आला. जी.ए. कुलकर्णी मानवी दुःखाचं मूळ नियतीमध्ये शोधतात, त्याउलट भारत सासणे मात्र मानवी दुःखाचं मूळ माणसाच्या वर्तनामध्ये शोधतात, असा फरक सांगितला गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कथांमध्ये डोकावणाऱ्या कथित नियतीवादाबद्दल थोडक्यात सांगितलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माणूस नियतीबद्ध असून त्याची जीवनपरिणती नियतीसंचालित असते, असं काहीएक सूचन त्यांच्या कथांमधून होत आलेले आहेत. माणसाचा निर्णय, त्याची प्रयत्नशीलता या सगळ्यांवर नियतीची पकड असून शेवटचा डाव नियतीचाच असतो, असं काही कलात्मक पद्धतीने, या कथांमधून सांगितलं गेलं आहे. भारतीय सांस्कृतिक व वैचारिक परंपरेमध्ये नियतीशरणवाद नोंदवलेला आहेच. वैष्णवांनी मोद-प्रमोद ही मानवी संमोहनसूत्रे असल्याचे नमूद करून, मनुष्य नियतीबद्ध असल्याचं म्हटलं आहे. याची तार्किक परिणती भगवंतशरणता आहे.
शैवांनी त्याउलट असं म्हटलं आहे की, आमोद-प्रमोदाच्या पलीकडे ‘स्वभान’ दडलेलं असून माणसाला ‘स्वभाना’चं विस्मरण मात्र झालेलं आहे. याचं कारण म्हणजे मायेचं आच्छादन सृष्टीवर व म्हणून बुद्धीवरदेखील पडलेलं आहे. हे आच्छादन दूर केल्यानंतरचं ‘स्वभान’ आणि त्याअनुषंगाने आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. म्हणजेच शैवांनी नियतीशरण असण्यापेक्षा पुरुषाच्या प्रयत्नवादाला महत्त्व दिलं आहे. माणूस निबद्ध नसून स्वभान प्राप्त करण्यासाठी मुक्त आहे आणि अधिकारी आहे, असा हा संदेश. जी.ए. कुलकर्णी यांच्या कथाविश्वामध्ये नायकाचं अनेक पातळ्यांवरचं गुरफटत जाणं, त्याने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि तरीही अंतिमतः नियतीने उपस्थित होऊन त्याचा केलेला उपहास आणि प्रयत्नातला सांगितलेला फोलपणा, हे सगळे मुद्दे वैष्णव परंपरेतून येतात, आणि म्हणून ‘माणसाच्या दुःखाचं मूळ’ नियतीमध्ये दडलेलं आहे, असं काही त्यांच्या कथा सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याउलट, मी स्वतः माणसाच्या मुक्ततेची चाह बाळगतो आणि शैवांच्या परंपरेनुसार प्रयत्नवाद मांडत राहतो, हा थोडासा फरक येथे मुद्दाम नमूद करत आहे. माझ्या आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यामधील साम्यस्थळांबाबत यापूर्वी चर्चा झालेली आहे. म्हणून माहितीसाठी फरकसुद्धा नमूद करत आहे.
‘आदिबंधात्मक समीक्षा’ ज्यांनी रुजवली ते गंगाधर पाटील अमेरिकेच्या वास्तव्यात असताना आता काळाच्या पडद्याआड विलिन झाले आहेत. अनेक भयकारी प्रसंगातून जात असताना आलेले भयाचे अनुभव जनुकांवर, जीन्सवर कोरले जातात आणि या भयाच्या भावनेचा पुनःप्रत्यय येऊ शकतो, हे विज्ञानाने सांगितलं. जीएंच्या कथांचे नायक प्राचीन उद्ध्वस्त नगरीमध्ये किंवा प्राचीन मंदिरांच्या गूढ अशा परिसरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांना भयाचा अनुभव येतो. हा अनुभव म्हणजे आदिबंधच असून जगभरातील वेगळं लिखाण करणाऱ्या गॅब्रियल मार्कोस् इत्यादींच्या लेखनाच्या आणि जी.एं.च्याही लेखनाच्या अनुषंगाने मांडला गेला आहे. आणि म्हणूनच समीक्षा पहिल्यांदाच जी.ए. कुलकर्णीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागली, असे आपले निरीक्षण आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या लेखकाला आपण अन्य भाषांमधून नेलं पाहिजे आणि जगाला जी. ए. कुलकर्णी यांचं श्रेष्ठत्व सांगितलं पाहिजे. त्यांना दूरचे ध्वनी ऐकू येत असत असं म्हटलं गेलं. त्यांच्या चित्रांच्या संदर्भात बोलताना त्यांना रंगही ऐकू येतात, असं म्हटलं गेलं. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणि या उपक्रमांची सुरुवात करताना उद्घाटक या नात्याने अनवटशैलीच्या या श्रेष्ठ लेखकाला मी अभिवादन करतो.
‘प्रिय रसिक’ या मासिकाच्या जुलै २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment