अजूनकाही
‘स्टालिनग्राड - १९४२-४३’ हे रवींद्र कुलकर्णी यांचे पुस्तक नुकतेच अनघा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक शशिकांत पित्रे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
जर्मन आणि रशियन सेनादलात १९४२च्या उत्तरार्धात झालेली स्टालिनग्राडची लढाई ही दुसऱ्या महायुद्धातील सर्वांत घनघोर लढायांपैकी एक म्हणून गणली जाते. त्यात जवळजवळ २० लाख लोकांची जीवहानी झाली. ते जर्मनीसाठी एक कठोर वळण ठरले. त्यांना पूर्व आघाडीवरील सैनिकांच्या संख्येतील क्षती भरून काढण्यासाठी इतर भागांतून सैन्य हलवावे लागले. रशियाचे खच्ची झालेले अवसान स्टालिनग्राडमधील विजयानंतर पुनश्च भरून आले आणि प्राबल्याचा समतोल पुन्हा रशियाच्या बाजूला झुकला.
सामरिकदृष्ट्या रशियातील तीन सर्वाधिक महत्त्वाची शहरे म्हणजे मॉस्को, लेनिनग्राड आणि स्टालिनग्राड. दक्षिण रशियातील वोल्गा नदीवरील स्टालिनग्राड हे त्या तिन्हीत उजवे म्हणावे लागेल. ते औद्योगिक व वाहन केंद्र होते. परंतु त्यापेक्षाही अधिक, कॉकॅशसमधील प्रचंड तेल आगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते मोक्याचे स्थळ होते. खालावत चाललेला तेलाचा साठा हे जर्मनीच्या चिंतेचे कारण झाले होते. बाकू परिसरातील तेलाचा स्त्रोत हस्तगत करण्यासाठी हिटलरने संपूर्ण सहावी आर्मी आणि चौथ्या पँझर आर्मीचे काही घटक या संमिश्र सेनाबलासह स्टालिनग्राडवर जंगी आक्रमण केले. त्यांना जर्मन वायुदल ‘लुफ्टवाफ’चे पाठबळ लाभले. जर्मन विमानदलाने स्टालिनग्राडचा अक्षरश: चुराडा केला. शेवटी ही लढाई घराघरामधून लढली गेली. दोन्ही बाजू त्या भग्न परिसरात अधिकाधिक कुमक ओतत राहिल्या. नोव्हेंबर १९४२च्या मध्यापर्यंत जर्मन सेनेने रशियाच्या संरक्षण फळीला वोल्गाच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका अरुंद पट्टीत कोंडले होते.
सैनिकी इतिहासात कोणत्याही एका बाजूने शरणागती पत्करेपर्यंत लढाई संपली असे म्हणता येत नाही. १९ नोव्हेंबरला रशियन सैन्याने ‘ऑपरेशन युरॅनस’ हा प्रतिहल्ला हाती घेतला. सहाव्या आर्मीच्या डाव्या आणि उजव्या फळीचे रक्षण करण्याच्या कामावर तैनात केलेली रुमानियाच्या सैन्याची तुकडी अत्यंत कमजोर होती, हे त्यांना ठाऊक होते. ते हल्ल्याचे लक्ष्य होते. या दोन्ही फळ्या रशियन सैन्याने उदध्वस्त केल्या आणि सहाव्या आर्मीला त्यांनी परिणामकारक वेढा घातला. वास्तविक या वेळीच सहाव्या आर्मीचा कमांडर फिल्डमार्शल पॉलसने हा वेढा तोडून बाहेर पडण्याची (ब्रेकआऊट) मागितलेली परवानगी जर हिटलरने दिली असती, तर पुढचा अनर्थ टळला असता. परंतु हिटलर कोणत्याही परिस्थितीत त्या शहरावरील पकड ढिली करू इच्छित नव्हता. रशियन सैन्याने जर्मन सैन्याच्या २२ डिव्हिजन्सना घट्ट पेचात पकडले होते. जर्मन सैन्यात खाद्यपदार्थ, पेट्रोल, दारूगोळा आणि जाळायचे लाकूड या जरुरीच्या वस्तूंचा पुरवठा आटू लागला. ब्रेडचे राशन अर्धे करण्यात आले. ख्रिसमससाठी त्यांना ४००० घोडे मारून खाण्याची परवानगी देण्यापर्यंत हलाखीच्या परिस्थितीची मजल गेली.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हिटलरने मग सहाव्या आर्मीला त्या कचाट्यातून सोडवण्यासाठी फिल्डमार्शल फॉन मॅनस्टाइनला पाठवले. १० डिसेंबर १९४२ रोजी मॅनस्टाइनच्या देखरेखीखाली चौथ्या पँझर आर्मीची आगेकूच चालू झाली. परंतु कर्नल जनरल हॉथच्या ५७ पँझर कोअरला रशियन सैन्याकडून कडाडून प्रतिकार होऊ लागला. त्यांना ३० मैल पुढे जाण्यासाठी एक आठवडा लागला. त्यांनी शेवटी अक्से नदीवर दोन पूल काबीज केले. आता ते सहाव्या आर्मीपासून फक्त ४५ मैल दूर होते. याच वेळी मार्शल झुकॉवने धडक मारून इटलीच्या आठव्या आर्मीच्या फळीत ६० मैलाचे खिंडार पाडले आणि दक्षिणेला रोस्टोवकडे मुसंडी मारली. त्यामुळे कॉकॅशसमध्ये पोचलेल्या फॉन क्लाइस्टच्या आर्मी ग्रुपचे दळणवळण मार्ग धोक्यात आणले. २६ डिसेंबरला रशियन सैन्याने अक्सेवरील दोन्ही पूल काबीज केले आणि ५७ पँझर कोअरचा धुव्वा उडवला.
आता सहाव्या आर्मीला कोणीही वाचवू शकत नव्हते. १५ जानेवारीला हंगेरी सैन्याची दुसरी आर्मी विस्कळीत झाली. उत्तरेत त्याच दिवशी लेनिनग्राडवरील जर्मन सैन्याचा वेढा तोडून काढण्यात आला. २२ जानेवारीला फॉन मॅनस्टाइनच्या सल्ल्याने जनरल झीटझ्लरने धाडस करून हिटलरला आता तरी सहावी आर्मी शरण जाऊ शकते का, ते विचारले. हिटलरने साफ नकार दिला आणि सांगितले की, शेवटचा सैनिक ठार होईपावेतो प्रतिकार चालू राहिला पाहिजे. सहावी आर्मी त्यांच्या सहनशक्तीच्या टोकाला पोचली होती. ३१ जानेवारीला पॉलसने शरणागती पत्करली. आदल्या दिवशीच त्याची फिल्डमार्शल पदावर बढती झाली होती.
हिटलरने २० जर्मन डिव्हिजन्स गमावल्या. त्यातील तीन आर्मर्ड आणि तीन मोटराइज्ड डिव्हिजन्स होत्या. त्यात ६०००० गाड्या, १५०० रणगाडे आणि ६००० तोफा होत्या. २,८०,००० सैनिक वेढ्यात सापडले होते. ४२००० जखमींना विमानाने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. ९१०००नी शरणागती पत्करली. त्यापैकी केवळ ६००० घरी पोचेतोपर्यंत जिवंत राहिले.
तसा मित्र राष्ट्रांनाही त्याआधी अनर्थांचा सामना करावा लागला होता, परंतु त्यांच्यापैकी एकाचीही स्टालिनग्राडच्या अरिष्टाशी तुलना करता येणार नाही. खरोखरच १९४२च्या नोव्हेंबरमध्ये हिटलरचे भाग्य संपुष्टात आले होते : मॉंटगोमरी अल-अमीनमध्ये विजयी झाला होता, आयसेनहॉवरने उत्तर आफ्रिकेत प्रवेश केला होता आणि रशियनांनी वोल्गा नदीच्या तीरावर हल्लेखोरांना कचाट्यात पकडले होते.
स्टालिनग्राडची लढाई दुसऱ्या महायुद्धातील कदाचित सर्वांत हिंसक लढत ठरली. जर्मनीचा त्यात दारूण पराभव झाला. किंबहुना तो तिचा इतिहासातील सर्वांत मोठा पराभव होता. पूर्व आघाडीवरील जर्मनीविरुद्ध युद्धासाठी ते महत्वाचे वळण ठरले. जर्मन सैन्याने त्या आधीच्या ‘केस ब्लाऊ’मध्ये संपादन केलेले धवल यश धुळीला मिळाले. फिनलंडसोडून जर्मनीचे इतर युरोपीय सहकारी देश उध्वस्त झाले. रविंद्र कुलकर्णी यांनी चोखंदळ मराठी वाचकांसमोर ठेवण्यासाठी ही लढाई निवडावी, हे औचित्यपूर्ण आहे.
इंग्रजीमध्ये युद्धसाहित्य अमाप आहे, परंतु भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखक आणि प्रकाशक फारसे त्याच्या वाटेला जात नाहीत. मराठीही त्याला अपवाद नाही. त्याची अनेक कारणे आहेत. लष्करी डावपेचांच्या बाबतीत वापरले जाणारे वाक्प्रचार, संज्ञा आणि विशिष्ठ शब्दांना मराठीत प्रतिशब्द उपलब्ध नाहीत. अलीकडे बऱ्याच लेखकांनी आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित असलेल्या पत्रकारांनी त्या बाबतीत बरेच परिश्रम घेतले आहेत, परंतु ना ते सर्वसमावेशक आहेत, ना त्याचे मानकीकरण झाले आहे. सैन्यदलात ‘ग्लॉसरी ऑफ मिलिटरी टर्म्स’ नावाच्या पुस्तिकेत विशिष्ठ शब्द किवा वाक्प्रचार यांचा मतितार्थ विशद करण्यात आला आहे. ‘विथड्रॉ’, ‘ अॅडव्हान्स’, ‘इंटेलिजन्स’ वगैरे प्रत्येक शब्दांत काही विशिष्ट लष्करी कार्यवाही सामावलेली आहे. तो वापरला की, वाचकाला ती इंग्रजीमधील वाचकांना अचूक समजू शकते. सैन्यातील वेगवेगळ्या दलांना, भागांना, तुकड्यांना विशिष्ट नावे आहेत.
कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिव्हिजन, कोअर, आर्मी आणि आर्मी ग्रुप ही चढती भाजणी आणि त्यांची रचना इंग्रजी वाचकास सर्वसाधारणपणे ज्ञात असते. मराठी वाचकांसाठी त्याचे प्रत्येक वेळा विवेचन करणे अशक्य होऊन जाते. जे वाचक याच्याशी परिचित आहे, तेच केवळ युद्धकार्यवाहीची संकल्पना करू शकतात. ही झाली काही कारणे. इतर अनेक सांगता येतील. त्यांच्यामुळे प्रकाशक आणि लेखक लष्करी विषयावरील पुस्तके हाताळण्यास तयार नसतात. अगदी याच कारणासाठी मी या पुस्तकाचे लेखक रवींद्र कुलकर्णी आणि प्रकाशक अमोल नाले यांचे अभिनंदन करू इच्छितो.
रवींद्र कुलकर्णी हे होतकरू आणि प्रथितयश लेखक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या लष्करी विषयांवरील ग्रंथांवर लिहिलेली परीक्षणे वाचण्याचा योग आला आहे. त्यावरून त्यांची या विषयातील अभिरुची, आकलन आणि ज्ञान यांच्या गहनतेची कल्पना येते. युद्धविषयावरील ग्रंथाचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विषयाचे वेगवेगळ्या उपशीर्षकांखाली विभाजन केल्याने वाचकाचे आकलन वाढू शकते. कोणत्याही लष्करी मोहिमेच्या किंवा लढाईच्या कथनाच्या आरंभी त्यात दोन्ही बाजूच्या भाग घेणाऱ्या प्रमुख तुकड्या, युद्धप्रदेशाचे संकलित विश्लेषण आणि वेगवेगळ्या टप्प्यांतील कारवायांचा सारांशाने आढावा आरंभी घेतला तर ते वाचकास समजण्यास सुलभ होऊन जाते. त्याचप्रमाणे आर्मी ग्रुप, आर्मी, कोअर, पँझर कोअर, पँझर/ आर्मर्ड/ इन्फंट्री/ मोटराइज्ड डिव्हिजन या तुकड्यांशी एक विशिष्ट परिमाण जोडलेले आहे. त्यांचे भाषांतर केल्याने त्यांच्यात वाचकाची गल्लत होऊ शकते. नकाशे त्याच्या आसपास आलेल्या आशयाशीच संबंधित असले पाहिजेत आणि त्यातील ठिकाणे नकाशात स्पष्टपणे दाखवली गेली पाहिजेत. या काही गोष्टींवर लेखकाने लक्ष द्यावे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
रवींद्र कुलकर्णी यांनी स्टालिनग्राड लढाईशी संबंधित त्या पूर्वीच्या सर्व मोहिमांचे अत्यंत सुबद्धतेने विवेचन केले आहे. ऑपरेशन बार्बारोसापासून आरंभ करून स्मोलेन्स्कची लढाई, ऑपरेशन ब्लाऊ, हिटलरचा आदेश क्रमांक ४५, रोस्तोवाची लढाई, कलचची लढाई, रशियन सैन्याचे ऑपरेशन युरेनस हे महत्वाचे टप्पे सविस्तरपणे विशद करून त्यानंतरच ते स्टालिनग्राडच्या पडावावर येऊन पोचले आहेत आणि त्याचे त्यांनी अत्यंत सविस्तर आणि उद्बोधक वर्णन केले आहे. छोट्या छोट्या चकमकींचे केलेले वर्णन स्वारस्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ रशियनांनी एक धान्य कोठार कसे लढवले आणि शेवटी जर्मनांच्या हातात ते कसे पडले याचे त्यांनी केलेले वर्णन.
स्टालिनग्राड लढाईच्या अंतिम टप्प्यात विमाने आणि रणगाडे कुचकामी ठरले. भग्न इमारतीच्या ढिगाऱ्यात नवनवीन डावपेच विकसित करून रशियन सैनिकांनी मशीनगन आणि रायफल्सच्या सहाय्याने शक्तिमान पँझर डिव्हिजन्सना हरवले. स्टालिनग्राड लढाईचा सर्वांत महत्त्वाचा वस्तुपाठ म्हणजे जिद्द, चिवटपणा आणि निग्रहाने लढवलेली संरक्षण फळी अंतोगत्वा कोणतेही बलदंड आणि घणाघाती आक्रमण परतवू शकते. दुर्दम्य नेतृत्व ‘पराभवाचे विजयात रूपांतर’ करू शकते.
रवींद्र कुलकर्णी यांची ‘स्टालिनग्राड’ची संहिता युद्धशास्त्राचा हा दंडक वाचकांपर्यंत पोचवण्यात खचितच यशस्वी होते. त्यांनी युद्धविषयावर असेच साहित्य निर्माण करत राहावे, ही शुभेच्छा.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment