अजूनकाही
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ची धामधूम सुरू असतानाच तिकडे बिहारमध्ये सत्तापालट झाला. भाजपसोबत (अपेक्षित) घटस्फोट घेऊन नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत पुन्हा एकदा घरोबा केला आहे. वरवर पाहता भाजपची साथ सोडून नितीशकुमार राष्ट्रीय जनता दलासोबत गेले, असं वाटत असलं तरी, काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या उंबरठ्यावरच हे घडलं असल्यानं नितीशकुमार तिरकी चाल तर खेळलेले नाहीत ना, असं वाटतं.
‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्तानं काँग्रेसला संजीवनी प्राप्त करून देणं आणि नरेंद्र मोदी व भाजप विरुद्ध देशभर जनमत संघटित करणं, हे जरी हेतू आहेत तरी राहुल गांधी यांचं नेतृत्व देशाच्या तळागाळापर्यंत पंतप्रधान म्हणून रुजलं जावं, हाही एक सुप्त हेतू असणं अगदी स्वाभाविकच आहे. आणि नितीशकुमार यांच्या संदर्भात शंका निर्माण होण्यासाठी तोच कारक ठरणारा आहे. कारण भाजप आणि काँग्रेसेत्तर विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून राष्ट्रीय पातळीवर तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचाली नितीशकुमार यांनी सुरू केल्या आहेत.
कोणत्याही निवडणुका हाकेच्या अंतरावर आल्या की, विदर्भातील अनेकांना स्वतंत्र विदर्भाची उचकी लागते, तसं नितीशकुमार यांचं झालेलं आहे. एक निवडणुकीआड पंतप्रधानपदाचे पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचं नाव पुढे येतं किंवा नितीशकुमार यांच्या कच्छपी लागलेली माध्यमे ते पुढे आणतात. आणि हे सातत्यानं घडत आलेलं आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९८५ साली सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि आता ७२ वर्षीय असलेल्या नितीशकुमार यांची भाजपच्या विरोधात उभं राहण्याबाबत नियत साफ नाही, असाच त्यांचा गेल्या अडीच दशकांचा प्रवास सांगतो. २००१पासून आतापर्यंत जवळजवळ १५ वर्षं ते भारतीय जनतासोबत घरोबा करून होते. १९९८ ते २००४पर्यंत तर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. या काळात रस्ते वाहतूक, कृषी आणि रेल्वे यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत. त्यानंतर २०१३पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरच नितीशकुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.
२०१४च्या निवडणुकांआधी जेव्हा भाजपनं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव निश्चित केलं, तेव्हा नितीशकुमारांच्या वाट्याला घोर निराशा आली. तेव्हाची कारणं स्पष्ट होती – अटलबिहारी वाजपेयी अंथरुणाला खिळलेले होते. लालकृष्ण अडवाणी यांना जाणीवपूर्वक बाजूला टाकण्यात आलेलं होतं, अशा वेळी एनडीएचा सर्वसंमतीचा आणि तडजोडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचं नाव पुढे येईल, अशा अटकळी देशाच्या राजकीय वर्तुळात बांधल्या जात होत्या. ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही, असं म्हणतात, त्याप्रमाणे कुठे ना कुठे काहीतरी खुट्ट वाजल्याचा आवाज होत नाही, तोपर्यंत त्याची बातमी होत नाही! पंतप्रधानपदाचं हे खुट्ट नितीशकुमार यांच्याच गोटातून वाजवलं गेलं होतं, हे स्पष्टच आहे. (या काळात प्रस्तुत पत्रकार दिल्लीत राजकीय संपादक म्हणून कार्यरत होता, म्हणूनच ही माहिती!)
नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होताच नितीशकुमार यांचा अर्थातच स्वप्नभंग झाला आणि भाजप ‘धर्मांध’ पक्ष असल्याचा साक्षात्कार नितीशकुमार यांना झाला. त्या वेळी नितीशकुमार यांनी केवळ भाजपचीच साथ सोडली नाही, तर एनडीएतूनही ते बाहेर पडले. मात्र त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत युती करून बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वत:कडे राखण्यात यश मिळवलं.
२०१७मध्ये पुन्हा एकदा भाजप आपला मित्र पक्ष असल्याचा दैवी (?) साक्षात्कार नितीशकुमार यांना झाला आणि ते नरेंद्र मोदी पंतप्रधान असूनही पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी झाले. एव्हाना बिहारमध्ये नितीशकुमार यांनी चांगल्यापैकी जम बसवलेला होता. त्यांना सोबत घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झालेली होती. मात्र अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवानला समोर करून भाजपनं नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दलाला चांगलचं बॅकफूटवर नेलं. निवडणूक निकालानंतर भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं, तरी नितीशकुमार खुश नव्हते. अखेर त्याचा परिणाम गेल्या महिन्यात बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट होण्यात झाला.
राष्ट्रीय जनता दल भ्रष्ट असल्याचा आरोप करून २०१७ साली युती मोडणाऱ्या नितीशकुमार यांनी त्याच्याच सोबत सरकार स्थापन केलं आहे आणि ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच आता नितीशकुमार यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत. हा असा उफराटा प्रवास नितीशकुमार यांनी तत्त्व म्हणून सात्त्विक वृत्तीनं तर नक्कीच केलेला नाही.
नितीशकुमार यांचा राजकीय इतिहास ‘भाजपानुकूल’ समाजवाद्यांना तंतोतंत शोभणारा आहे. शिवाय भाजपसोबत जो काही तळ्यात-मळ्यातला खेळ सत्तेसाठी नितीशकुमार खेळले आहेत, तो ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचे भारतीय राजकारणातले महामेरू भजनलाल यांनाही लाजवणारा आहे.
थोडक्यात, देशातल्या विद्यमान राजकारणात सत्तेसाठी संधीसाधूपणा करणारे नितीशकुमार हे ‘विश्वगुरू’ आहेत. असाच खेळ त्यांनी त्यांच्याच पक्षाचे शरद यादव यांच्यासोबत मांडला होता. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबतही सत्तेसाठी कोलांटउड्या मारणारे नितीशकुमारच आहेत. नैतिकतेचा आव आणून जीतन राम मांझी यांना काही काळ मुख्यमंत्रीपदावर बसवणारे आणि डोईजड होत आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांना उचलून फेकणारेही नितीशकुमारच आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी स्थापन करणारे आणि नंतर त्याच फर्नांडिस यांना धोबीपछाड देणारे नितीशकुमार आहेत. त्यांची प्रत्येक चाल दीर्घकाळ भाजपसोबत राहून इतर पक्षांना टांग मारण्याची, म्हणजेच भाजपचा फायदाच करून देणारी आहे, हे लक्षात घेतलं की, नितीशकुमार यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचा तिसरा पर्याय म्हणून समोर आणण्याचा जो खटाटोप सुरू केला आहे, तो राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला अपशकून करण्याची तिरकी चाल तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो.
२०१४नंतर नितीशकुमार नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेले नाहीत, उलट सत्तेसाठी दोनदा भाजपच्याच वळचणीला राजरोसपणे जाऊन आलेले आहेत. मात्र याच काळात नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर थेट वार करण्याचं धाडस एकट्या राहुल गांधी यांनीच दाखवलेलं आहे. (या काळात काँग्रेसचेही नेते राहुल गांधी यांच्यासोबत संघटितपणे उभे राहिलेले नव्हते.) २०१४नंतर झालेल्या बहुतेक सर्व निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला तरी राहुल गांधी यांची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही, उलट किंचित का होईना वाढलेलीच आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंस्त्र व धर्मांध हिंदुत्वाची झापड न बांधलेल्या तरुणांमध्ये राहुल गांधी यांची क्रेझ वाढत चालली आहे. ‘भारत जोडो यात्रे’तून त्यांची प्रतिमा अधिक उजळ आणि भाजपेत्तर पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा दावा भक्कम होत जाणार आहे.
राहुल गांधी यांचं नेतृत्व ममता बनर्जी, मायावती, मुलायमसिंग यादव, नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू या नेत्यांना मान्य होणारं नाही, हे स्पष्टच आहे. कारण हे सर्व नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. यापैकी एकही नेता राष्ट्रीय मान्यतेचा नसला तरी देशाचं नेतृत्व भविष्यात राहुल गांधी यांच्याकडे जाऊ नये, याबद्दल मात्र या सर्व नेत्यांमध्ये राष्ट्रीय एकमत आहे.
काँग्रेस आणखी किमान एक लोकसभा निवडणूक होईपर्यंत, म्हणजे २०३०पर्यंत तरी नक्कीच सरकार स्थापन करू शकणार नाही. या काळात राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचा एकमेव पर्याय म्हणून मान्यता मिळू नये, ही या नेत्यांची स्वाभाविक इच्छा असणार. त्या सर्वांच्या इच्छांच्या वाटांवर चालण्याची ‘तिरकी चाल’ नितीशकुमार खेळत आहेत, असं म्हणायला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment