ज्येष्ठ सामाजिक नेते, विचारवंत आणि ‘युक्रांद’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जीवन आणि कार्याचा बहुआयामी वेध घेणारा ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य’ हा डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेला ग्रंथ कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे २१ ऑगस्ट २०२२ रोजी गांधीभवन कोथरुड, पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित झाला. २१ ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. सप्तर्षी यांनी ८१व्या वर्षांत पर्दापण केलं. त्यानिमित्ताने या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. यात डॉ. सप्तर्षी यांचा एक लेख आहे...आपल्या आजवरच्या प्रवासाकडे मागे वळून पाहणारा... त्याचं हे पुनर्मुद्रण...
.................................................................................................................................................................
वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतर मनात काय विचार येतात, याचे मी परीक्षण करतोय.
अनेकांच्या वयाची एवढी वर्षे पूर्ण होतात. त्यांच्या मनात काय विचार येत असतील, याचा साधारण अंदाज घेता येतो. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणे हा काही अद्वितीय योगायोग नव्हे. तुम्ही जगत जाता अन वय वाढत जातं. वय झालं की मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि दुरून ओळखणारे लोक आपल्याविषयी बरं बोलू लागतात. थोडाफार आदर दाखवतात. आतून बरे वाटते. साफल्याचा अनुभव येतो. वय झाल्याचा आणखी एक फायदा! लोक दोष टाळून या प्रसंगी तुमच्या गुणांबद्दल बोलतात. त्यांना तुमच्या आवडलेल्या गोष्टी आवर्जून सांगतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातून लोकांना काय मिळाले, त्यांना काय हवे आहे, त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, याचा अंदाज येतो. त्यातून उर्वरित आयुष्य कसे जगले पाहिजे, आपल्याकडून समाजाची काय अपेक्षा आहे, हे माहीत होते.
नसलेले गुणही लोक चिकटवितात. उर्वरित आयुष्य तरी लोकांच्या मनाप्रमाणे गुण संपादन करून जगायला सुरुवात करावी, असे वाटू लागते. दोष काढून टाकावेत असेही वाटते. तसा संकल्प करण्याचा हा प्रसंग! हाती उरलेले दिवस मात्र कमी. म्हणजे आयुष्यात जो काही नवा अर्थ भरायचा, तो ठळक आणि ठासून भरलेला हवा. जेव्हा आयुष्याचा मोठा पल्ला शिल्लक असतो, तेव्हा प्रसंगापुरता निर्णय घेऊन आपण जगत असतो. फारशी प्रगल्भता अंगी असते, असा दावा करता येत नाही. आता ती सबब नाही. आयुष्य प्रगल्भतेने व निर्चूकपणे जगले पाहिजे. उत्स्फूर्तपणे स्वैर जगण्याचा लाभ कमी मिळणार, याची खंत वाटते. असो. सहजतेने जगावे, आनंदी राहावे आणि प्रसन्नभाव ठेवून निघून जावे, हेदेखील सुंदरच आहे!
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मला विसंगतीने भरलेले बालपण लाभले. नगर जिल्ह्याच्या एका टोकाच्या आडवळणाच्या गावी जन्म झाला. गावाचे नाव खेड. गाव आणि कुटुंब यांच्यात विसंगती होती. वडील डॉक्टर. प्रत्येक गावकरी पेशंट म्हणूनच माहीत व्हायचा. नंतर वडलांची बदली राशीन या मोठ्या गावात झाली. घरात वडील जे सांगायचे, शिकवायचे ते कधीच राशीनच्या प्राथमिक शाळेतील शालेय जीवनात अनुभवायला मिळत नव्हते. गुरुजी वर्गात भक्कम शिव्या देऊन बोलायचे. घरात टॉयलेट होते. संपूर्ण गावात एकही टॉयलेट नव्हते. वर्गमित्र घरातच घाण करणारे म्हणून चिडवायचे.
जिल्ह्याच्या ठिकाणी अहमदनगरला शिकायला आलो. ज्यांच्या घरी राहात होतो, ते अगदी बेताबाताच्या परिस्थितीत राहणारं कुटुंब. सुट्टीत घरी आल्यावर मात्र श्रीमंतीचा अनुभव यायचा. नगरमध्ये हायस्कूलचे शिक्षण घेताना चुलीचे पोतेरे घेणे, दळण आणणे, पाणी भरणे ही कामे करावी लागत. घरापासून दूर असल्याने दंगा-मस्ती करताना कुणाकडून तरी सजा होईल, याची भीती वाटायची. मूळची भाषा ग्रामीण. भोवताल मात्र शहरी भाषेचा. पदोपदी न्यून जाणवायचे. न्यूनगंडाने पछाडलो. ज्यांच्या घरी राहत होतो, त्या बाई बालविधवा होत्या. काटकसरीच्या संसारात त्या त्रासून जात. त्यांची करमणूक एकच. प्रवचन अन कीर्तन. त्यांच्यासोबत मीही जायचो. महाभारत, रामायण, पुराणे यांच्या कथा ऐकत पिंड तयार झाला. त्यातला धार्मिक गाभा अजिबात कळायचा नाही, पण सारे रोचक वाटायचे. नकळत अध्यात्माचा धबधबा अंगावर येत होता. अध्यात्माचे पाणी डोक्यावरून वाहून जायचे. कळायचे काहीच नाही. वाढत्या वयात शरीर वाढू लागले. आत्मविश्वास वाढला. न्यूनगंड घटला. एन्.सी.सी.त प्रवेश मिळाला. ऐटीत चालणे शिकलो. बंदुकीतून गोळी मारणे शिकलो. नेमबाजीत प्राविण्य मिळवले. घरापेक्षा मित्रांत रमायचो. वाचनाचा छंद जडला. रहस्यकथा अन विवेकानंदांपाशी रमलो. महाविद्यालयीन शिक्षणात मित्रांचा मोठा संच उभा राहिला. कॉलेजमधल्या निवडणुका सतत जिंकल्या.
तरुणपणी भरपूर व्यायाम केला. उंची वाढली. आत्मविश्वास वाढला. सुट्टीत खेड्यात परतल्यानंतर चौथीपर्यंतच्या जुन्या वर्गमित्रांना गोळा करू लागलो. त्यांच्या व माझ्या मनोविश्वात अंतर पडले होते. मित्रांसोबत पडलेले अंतर कसे काटायचे असा प्रश्न पडला. कालांतराने या प्रश्नाचे उत्तर मिळाले. माणसामाणसांमधील अंतर कमी करणे म्हणजे परिवर्तन. मग समाजात परिवर्तन झाले पाहिजे वा आपल्याला परिवर्तनाचे वाहक व्हायचे असेल, तर आपल्यातही परिवर्तन झाले पाहिजे, हे जाणवू लागले. संवादाशिवाय कोणी कोणात परिवर्तन करू शकत नाही, हेही उमगले. घरात ब्राह्मणी भाषा, तर मित्रांमध्ये खेडवळ. दोन्हीमध्ये पारंगत झालो. जुन्या मित्रांना प्रवचनकाराच्या शैलीत बांधून ठेवावे असे वाटायचे. म्हणून विवेकानंद, सुभाषबाबू, जागतिक युद्धातल्या कथा वगैरे जे वाचले, ते त्यांच्या समोर अन-लोड करायचे, असे सुरू झाले.
गावातल्या तालमीतही जायचो. ब्राह्मणांपैकी एकही जण तालमीत जायचा नाही. त्यांच्याकडे दुर्बल माणसं म्हणून लोक बोट दाखवायचे. ब्राह्मणाचा मुलगा कुस्ती खेळतो, याचे गावाला अप्रूप वाटे. मला मात्र सामाजिक न्यूनगंडामधून मुक्त झाल्याचा आनंद मिळे.
हे सांगतोय राशीन गावातील घटनांबद्दल. गाव नमुनेदार गावगाड्याचे. जातवार वस्त्या. उच्चनीचतेचा भाव प्रखर. गावात बदल करावा, असे आम्हा मित्रांच्या मनात आले. मित्रांमध्ये भेदभाव नव्हता, पण गावातील समाजात होता. माणुसकीचे मूल्य आम्हा सर्वांच्या मनात जागे झाले होते. पण मैत्रीला जातिव्यवस्थेचा शाप होता. एका जातीला सर्वांना मिळून फक्त एकच मेंदू असावा. देवाकडे मेंदूची कमतरता असल्याने जातवार एकेका मेंदूचे वाटप झाले असावे. पुढे डॉक्टर झाल्यावर खात्री झाली की, प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिलेला आहे. म्हणजे देवाची चूक नाही. माणसे जातीतले मेंदू स्वतःच बंद करतात. मग जातीपुरता एकच मेंदू शिल्लक राहतो.
त्या काळात ११वीला मॅट्रिक म्हणायचे. नगरच्या कॉलेजात गेलो. इंटर सायन्स पूर्ण करून पुण्यात आलो. पुण्यामध्ये अनेक माणसे भेटली. परिवर्तन, क्रांती, समाजसुधारणा हे शब्द पावलोपावली ऐकू येऊ लागले. मग वाटू लागले की, किरकोळ सुधारणा वगैरे कशाला, संपूर्ण समाजरचनाच बदलावी. त्यालाच ‘क्रांती’ म्हणतात, हे नंतर कळले. मूळ प्रेरणेचा विकास झाला. माणसामाणसांमधील अंतर कमी करणे म्हणजेच क्रांती अशी व्याख्या मनात पक्की रुतली. वैद्यकीय शिक्षण घेताना तर साक्षात्कारी ज्ञान मिळाले. विश्वातला प्रत्येक माणूस एकसारखा आहे, याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले. आमचा अॅनॉटमी हॉल, जिथे आम्ही मृत शरीरांची चिरफाड करायचो, ते आमचे रणांगण वा ज्ञानांगण होते. भगवान श्रीकृष्णावाचून आत्मज्ञान झाले. सर्व माणसे त्यांच्यातील अणुरेणूसह एकच आहेत, याची खात्री पटली. वैद्यकीय महाविद्यालयात कॉलेज लीडर बनलो. कॉलेजच्या निवडणुकीत पूर्ण शक्तिनिशी उतरायचो. पुढील चार वर्षं आमचेच पॅनल निवडून यायचे. त्या वेळी संघटन कौशल्याची कसोटी लागे. सर्व मुलींशी संवाद ठेवायचो. सभ्यपणे वागायचो. आपोआप दरवर्षी मुलींच्या मतदानाचा गठ्ठा मिळे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे मला नाव-गाव-कौटुंबिक परिस्थिती हे सारे माहीत असायचे. आपण लोकांच्या मनात असलो आणि आपल्या मनात लोक असले तर परस्पर सद्भाव आपोआप निर्माण होतो, हे सूत्र कळले. मतदानात परस्पर स्नेहभाव प्रकटतो. स्नेहभावनेत जातीपातीचे अंतर संपते.
पुण्यात सर्व राष्ट्रीय पुढारी भाषण द्यायला येत. शनिवारवाड्याच्या पटांगणातील एकही सभा चुकवली नाही. तो वक्ता जिथे मुक्कामाला असेल, तिथे त्याला दुसऱ्या दिवशी भेटायचो. हा आवडीचा कार्यक्रम. या सत्संगातून बरेच काही शिकता आले. सत्संग हे जणू जीवनमूल्यच बनले. याच काळात अध्यात्माच्या क्षेत्रातदेखील डोकावून आलो. स्वामी पूर्णानंद, आचार्य रजनीश वगैरेंना ऐकण्याचा नाद लागला. वाचनही केले. संपादन केलेल्या संघटन कौशल्याचा क्रांतीसाठी उपयोग करावा असा विचार मनात बळावू लागला. आपल्यासारखाच विचार करणारे राजकीय पक्ष अस्तित्वात असतील, तर त्यांच्यामध्ये सामील व्हावे, असा व्यावहारिक विचार करून पुरोगामी पक्षांचा अभ्यास केला. तोपावेतो वैचारिक बैठक तयार झाली होती. समाजवाद ही धारणा बनली होती, पण समाजवादी पक्षाशी तार जुळेना. समाजवादी समाजरचना ही अत्यंत सोपी, सर्वांना पटू शकेल अशी तर्कसंगत अन् प्रभावी कल्पना आहे. पण समाजवादी मंडळींच्या कार्यपद्धतीच्या चुकांमुळे त्यांच्यामार्फत समाजवादाची गंगा भारतात अवतरणार नाही, हे मनात पक्के झाले. यातून ‘युवक क्रांती दला’ची स्थापना झाली. नवी कार्यपद्धती व नवीन शैली घेऊन तरुण पिढ्यांना समाजवादी क्रांतीसाठी तयार करायचे, असा संकल्प केला.
ज्ञान विविध मार्गातून आपल्या मेंदूत शिरते. चिंतन, मनन, संवाद, सत्संग, ग्रंथवाचन, निरीक्षण हे सारे मार्ग आहेतच. पण यापेक्षा विशेष असे काही गुरूंकडून लाभते. खरे म्हणजे गुरू आपणच निवडतो. जिथे आपण अडलेले असतो, तिथून पुढचा मार्ग दाखवण्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाचा उपयोग होतो. जयप्रकाश नारायण, आचार्य दादा धर्माधिकारी, एस्. एम.जोशी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, बाबा आमटे, साथी विनायकराव कुलकर्णी, बाळासाहेब भारदे हे माझे सात गुरू! प्रत्येक गुरूने माझ्या कार्याचा प्रवास सातत्याने खळखळत ठेवला. हे त्यांचे माझ्यावर मोठे ऋण आहे. या प्रवासात काही मूल्ये अनुभवाने भक्कम झाली. पायाभूत बनली. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला डळमळीतपणा किंवा संदिग्धपणा आला नाही. जे बोलायचे वा करायचे ते स्पष्ट, ठसठशीत व परिणामकारक असले पाहिजे. प्रामाणिकपणा हाच सर्वांत मोठा डावपेच आहे. म्हणून क्षुद्र डावपेच करायचे नाहीत. दुसऱ्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी, त्याच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले, तर लोकशक्ती बांधता येते. लोकशक्ती एकजातीय किंवा एक धर्मीय होऊ लागली की, ती निरुपयोगी होते. सामाजिक कार्यकर्त्यांकडे लोक उत्स्फूर्तपणे यायचे असतील तर अमाप उत्साह, पारदर्शकपणा, तडफ व कामाचा उरक हे गुण अंगी असावे लागतात. जात जन्माने म्हणजे अपघाताने मिळते. अपघाताचा अहंकार बाळगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, हे पटले होते.
लोक कसेही असले तरी त्यांच्याबद्दल आपार जिव्हाळा वाटला पाहिजे. लोकांचे वेदनाशमन केले की, ते आपल्याला भगवान मानतात. देव होण्याची आकांक्षा माणुसकीला मात्र गायब करते. म्हणून भगवान म्हणजे सामर्थ्यवान माणूस आणि समाजातील एक शक्तिकेंद्र एवढाच लाक्षणिक अर्थ घ्यायचा. आंदोलन म्हणजे शासनसंस्था व प्रस्थापित वर्ग यांच्या बरोबरचा मुकाबला. राडेबाजीने प्रश्न सुटत नसतात. शासनाच्या प्रबळ शक्तीपुढे निराशापूर्ण वैताग व्यक्त करणे म्हणजे राडेबाजी! प्रस्थापितांच्या विरोधात दमदार मुकाबला करण्यासाठी आणि क्रांतीच्या प्रक्रियेत दीर्घकाळ टिकण्यासाठी ‘आक्रमक अहिंसा’ हे तत्त्व सर्वश्रेष्ठ ठरते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लोकांच्या मनात अनेक भीती असतात. त्यात सर्वांत मोठी भीती मृत्यूची आणि दुसरी तुरुंगवासाची. तरुण पिढीला तुरुंगवास हे जीवनातील ‘आनंदमय पर्व’ कसे आहे, हे पटवून देण्याची मी पराकाष्ठा केली. तुरुंगाला ‘विद्यापीठ’ मानले. तुरुंगातून परत आलेला सत्याग्रही आपोआपच निर्भय बनतो, प्रगल्भ बनतो. कच्चे गाडगे भाजून पक्के होते, पण ती निर्भयता प्रासंगिक असते. क्रांतीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नेत्याने निर्भयतेची अखंड उपासना करावी लागते. निर्भय होण्यासाठी लोकांना अभय प्रदान करावे लागते. जसे आपण कोणाला भीता कामा नये, तसेच अन्य कुणीही आपल्याकडे भयाच्या भावनेने पाहू नये, ही साधना आवश्यक असते. तेव्हा निर्भयता परिपूर्ण होते. आपल्या गरजा सीमित ठेवल्या तर निर्भय राहाणे सोपे जाते. संघर्ष करताना आपल्यावर हल्ले होणार, हे गृहीत धरावे लागते. म्हणून लबाड्या, मालमत्ता किंवा कोणतीही हाव या पासून दूर राहिले पाहिजे.
मालमत्तेची हाव जडणे, पुढच्या पिढ्यांसाठी मालमत्ता जमा करून ठेवणे, हा निव्वळ अडाणीपणा आहे. आपण मर्त्य मानव आहोत, याचा विसर पडतो म्हणून माणूस मेल्यानंतर प्रॉपर्टीच्या रूपाने जिवंत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट मिळवताना त्याची गरज आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारावा. गरजेपेक्षा जादा भौतिक गोष्टी गोळा केल्या की, चारित्र्य मलीन होते. संघर्ष करताना धार कमी होते. साधने बोथट होतात.
सत्याग्रहाचे शस्र व शास्र त्या काळात विझत चालले होते. गांधीजींचे अनुयायी सत्तेवर होते. ते म्हणत की, ‘सत्याग्रह फक्त परक्यांविरुद्ध करायचा असतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता समाजकारणात व राजकारणात सत्याग्रहाला काही स्थान नाही.’ या प्रचारात त्यांचा मतलब डोकावत होता.
आचार्य विनोबा भावे हे गांधीजींचे पट्टशिष्य. ‘भूदाना’च्या चळवळीमुळे त्यांनी संघर्ष बाजूला ठेवून समन्वयाची कास धरली. विनोबांचे शिष्य सत्याग्रह विसरले. संघर्षाला दूर ठेवू लागले. यामुळे सत्याग्रह बाजूला पडला हे उमगले. परंतु सत्याग्रह हे दिव्य अस्र आहे, एवढे कळले होते. १९६७ ते १९७७ या कालखंडामध्ये मी सत्याग्रहाचे मूळचे स्वरूप अधिक विकसित केले. काळानुरूप त्याला आकार दिला. म्हणून चळवळीत एकदाही अपयश मिळाले नाही. विविध सत्याग्रही आंदोलनात मला ६२पेक्षा अधिक वेळा अटक झाली. प्रत्येक वेळी यशच मिळाले. सत्याग्रह हे एक शास्त्र आहे. त्याचे काटेकोर पालन केले, तर हमखास यश मिळते. समाज फक्त यशस्वी लोकांनाच आदर देतो, हे कटू वास्तव आहे.
आपल्या आयुष्याचे खतपाणी घालून सत्याग्रहाचे बीज सतत वाढते ठेवावे लागते. आपल्या समाजात अनंत काळ सत्याग्रहाबद्दलचा आदर टिकून राहणार आहे. अलीकडच्या काळात सत्याग्रह या नावाखाली जे केले जाते, त्यात लोक उथळपणे कृती करतात, म्हणून त्यांना यश लाभत नाही. विशेष लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे उपोषणबाजीला सत्याग्रह मानता कामा नये. सत्याग्रह हा एका व्यक्तीचा पुरुषार्थ कदापि नसतो. सामुदायिक पुरुषार्थाला सत्याग्रह म्हणतात. अलीकडे सत्याग्रहाचे दर्शन दीर्घकाळ चाललेल्या शेतकरी आंदोलनात घडले.
मला काही काळ संसदीय राजकारणाचा अनुभव घेता आला. मी सत्याग्रही पद्धतीनं प्रचार करून आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. जनता पक्षाने ‘सत्याग्रही समाजवाद’ हे तत्त्वज्ञान स्वीकारलेले नव्हते. परस्परविसंगत अशा वैचारिक धारणांचा तो एक शंभूमेळा होता. त्यामुळे त्यात सत्याग्रही राजकारण विकसित करण्याला फारसा वाव नव्हता. एवढेच समाधान होते की, काही समविचारी व्यक्ती त्या पक्षात उच्चस्थानी होत्या. त्यामुळे त्या काळात शासनविरोधी जनआंदोलनांची उभारणी करता येत नव्हती, पण संसदीय क्षेत्र आणि सत्याग्रहाचे जनआंदोलन यात मूलभूत विसंगती नाही, याची खात्री झाली.
आजही माझी आंतरिक प्रेरणा शाबत आहे. आंतरिक प्रेरणा हाच चैतन्याचा झरा असतो. आपण जिवंत असल्याचा तो पुरावा असतो. १९ ते २५ या वयोगटातील तरुण रोज भेटतात. संवाद करतात. प्रश्न विचारतात. त्यांच्या परीक्षेला रोज बसावे लागते. त्यांनी पास केले तरच आपल्या प्रेरणा त्यांच्यामध्ये संक्रमित करता येतात. म्हणून २००१ साली ‘युक्रांद’ची पुनस्र्थापना केली. तरुणांशी संवाद साधताना मला अनामिक आनंद लाभतो. त्यांना मी सांगतो की, “जन्माने म्हणजे अपघाताने मिळालेली जात सोडून द्या. जातिमुक्त व्हा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सुगंध येईल. दुसऱ्या जाती-समूहावर झालेल्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरा. त्यातून खऱ्या अर्थाने तुम्ही जातिमुक्त व्हाल. भारतीय समाजात माणसांमधील अंतर खूप वाढले आहे. ते कमी करण्यासाठी तुमचे आयुष्य झोकून द्या. त्याचे सोने होईल. सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा ही जुळी भावंडे आहेत. सत्तेसाठी लोक मरमर करतात. कारण त्यातून त्यांना संपत्ती व प्रतिष्ठा मिळते. क्रांती कधी होईल याची तारीख सांगता येत नाही. तुम्ही संपूर्ण क्रांतीचा म्हणजे जीवनातील सर्व क्षेत्रांतील क्रांतीचा ध्यास घ्या. त्यातील रोखीचा व्यवहार म्हणजे तुम्हाला हमखास प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही प्रतिष्ठेच्या अंगाने जा, मग तुम्हाला क्रांतीसाठी आवश्यक असलेली सत्ताही मिळेल. भारताला आधुनिक राष्ट्र करण्यासाठी नागरिकांमध्ये बंधुभाव हवा. म्हणून जे सार्वजनिक जीवन जगाल त्यात वैयक्तिक स्वार्थ ठेवू नका. ही लांब पल्ल्याची लढाई आहे.”
आपला पिंड आपण जपावा लागतो. त्यावर आच आली की, मरणप्राय दुःख होते. तुम्ही संपता. अशा वेळी आपल्या रीतीनुसार दुसऱ्या मार्गाने क्रांतीची प्रक्रिया पुढे न्यावी लागते. या धारणेमुळे जनता पक्षाचे काम सोडून मी माझ्या जन्मगावी परतलो. तिथे विकासाचे विविध उपक्रम राबवले. शैक्षणिक केंद्र उभे केले. क्रांतिपूर्व काळात लोकशिक्षण करावे लागते. चळवळ ही बिगर भिंतीची मोठी शाळाच असते. शिक्षणकेंद्र उभारणे ही अल्प स्वरूपातील चळवळच असते. या कार्यासाठी ‘भारतीय समाज विकास व संशोधन संस्था’ या संस्थेची स्थापना केली. त्या कामात प्रचंड अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आणि अखेरीस साफल्याचे समाधानही लाभले.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘सत्याग्रही विचारधारा’ हे मासिक आणि ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे उपक्रम याच भूमिकेतून चालवत आहे. संघर्ष, विधायक व संसदीय क्षेत्र अशी कृत्रिम विभागणी केली जाते. ती चुकीची आहे. त्यातील प्रत्येक क्षेत्राचे बाह्यरंग वेगळे असले तरी अंतरंग एकच आहेत. ज्या काळात ज्या माध्यमातून लोकसंग्रह वाढेल ते माध्यम वापरावे. जीवनाला भिडण्याची ही विविध माध्यमे आहेत. ज्या माध्यमातून लोकसंग्रह वाढत नाही, त्या माध्यमातून लवकरात लवकर जमेल तसे बाहेर यावे.
क्रांतिकारक प्रेरणा कायम जिवंत राखण्यासाठी कौटुंबिक जीवन आणि सार्वजनिक जीवन यात सुसंगती हवी. अन्यथा आंतरिक प्रेरणा मोडून पडतात. या बाबतीत मी भाग्यवान आहे. माझी सहचारिणी उर्मिला ही मित्र आणि कॉम्रेड आहे. जीवनात मिळालेल्या तिच्या साथीमुळे मी लोकांच्या प्रशंसेस प्राप्त झालो. पत्नी, मुलगा, सून या सर्वांच्या जीवनविषयक मूलभूत धारणा एकच आहेत. सर्व धर्मांतील माणुसकीची मूल्ये एकत्र करून तयार झालेला ‘मानवता धर्म’ आम्ही मानतो. माझा व मुलाचा आंतरजातीय विवाह आहे. एक बडबड्या नातू रेहान आणि एक गोड नात आहाना कुटुंबात झालेली भर आहे. ते कोणत्याही जातिधर्माचे होऊ नयेत, त्यांनी केवळ चांगली माणसे व्हावे, अशी अपेक्षा आहे. हेच जीवनाचे सार आहे. पैसे, बँका, प्रॉपर्टी यात मला रस नाही आणि गम्यही नाही. संसाराला बचतीची शिस्त लावून संसार उभा करण्याचे श्रेय उर्मिलाचे आहे. तणाव तर असतातच. पण प्रेमाने संसाराचा भवसागर तरून जाता येतो.
मी मित्रलोभी आहे. शक्यतो मित्रांचे रूपांतर क्रॉमेडमध्ये करण्याचा नकळत माझा प्रयत्न असतो. एकटा माणूस झिरो असतो. सार्वजनिक जीवनात लोकसंग्रह ही खरी संपदा असते. त्याबाबतीत मी बऱ्यापैकी श्रीमंत आहे, असा माझा दावा आहे. सुमारे एक लाख कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या सत्याग्रहात माझ्यासोबत अथवा माझ्या नेतृत्वाखाली तुरुंगात आले होते. कुणी एक दिवसासाठी तर कोणी १९ महिन्यांसाठी. हा संग्रह वाढत गेला. प्रवाही झाला. गंगोत्रीची गंगा बनली. जीवन आनंदाने भरून गेले. सार्वजनिक कार्यातील यशाचे हे साथीच खरे धनी आहेत. सारे श्रेय त्यांचेच आहे. या प्रवाहातला मी एक थेंब आहे. क्रांती झाली नाही, उलट सध्या भारतात प्रतिक्रांतीचा जोर आहे. पुढची पिढी प्रतिक्रांतीवर मात करील अशी आशा आहे.
आपली इनिंग आपण संपूर्ण शक्तीनिशी हातचे काही राखून न ठेवता खेळलो याचे समाधान आहे. कोणतीही खंत नाही. प्रारंभी एकटा होतो, बघता बघता साथी मिळाले. समविचारी लोकांचा जनप्रवाह बनला. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. मर्यादा तुटल्या. बिंदुवत असलेला मी लोकसंग्रहाच्या सोबतीने अथांग झालो, उन्नत झालो!
‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य’ - संपादक डॉ. अंजली सोमण
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पाने - ४६० (मोठा आकार)
मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment