संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यातली ही काही महाराष्ट्री गर्जणारी व्यक्तिमत्त्वंं...
.................................................................................................................................................................
राजू शेट्टी : शेतकऱ्यांचा नायक
महाराष्ट्रातल्या ऊस, कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या रस्त्यावरील लढाईचे नायक आहेत राजू शेट्टी. ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ ही फक्त घोषणा नाही. शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातला एक मंत्र आहे.
शेतकरी आंदोलनाचं एक महत्त्वाच नाव म्हणून शेट्टी यांची देशात ओळख आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगलेचे खासदार म्हणून त्यांची कारकीर्द देशात गाजली. शेतकरी नेते शरद जोशी यांचा लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांनी चळवळीत प्रवेश केला. आणि पुढे शरद जोशींशी मतभेद झाल्याने शेट्टींनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ची पताका फडकवली. आंदोलक नेता म्हणून लोकांमध्ये रुजलेल्या शेट्टी यांची जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार म्हणून संसदीय कारकीर्दही देदीप्यमान ठरली.
.................................................................................................................................................................
बाळासाहेब थोरात : निष्कलंक
सत्ता धार्जिन आहे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना. कुटुंबात सत्ता, तालुक्यात एकहाती सत्ता. राज्यात पक्षात वरचष्मा. काँग्रेस हायकमांडजवळ वजन. असा सत्तेचा सुकाळ आसपास. पण बाळासाहेब थोरात नम्र राहतात. मितभाषी आहेत. महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिलेत, आहेत. पण सत्ता डोक्यात जाऊ देत नाहीत. सतत लोकांत राहतात. भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडू देत नाहीत. विकासाच्या राजकारणात रमतात. सहकार, शेती, ग्रामीण भागाचा विकास हे त्यांचं सत्तासूत्र दिसतं. बाकीच्या भानगडीत ते पडतच नाहीत.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
रामराजे नाईक निंबाळकर : महाराष्ट्र भगीरथ
आधी कायद्याचे प्राध्यापक. मग फलटणचे नगराध्यक्ष. आमदार. मंत्री. आता विधानपरिषदेचे सभापती. फलटणच्या निंबाळकर घरण्याचे २९वे वंशज. रामराजे नाईक निंबाळकर यांचा असा उज्ज्वल जीवनप्रवास आहे. १९९५ साली पहिल्यांदा निवडून आले आमदार म्हणून. तेही अपक्ष. नंतर ते कायम लाल दिव्याच्या गाडीत राहिले. २००४मध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी मोठं काम केलं. त्याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळातून कर्नाटकला जाणारं महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी वाचवण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्रासाठी तो भगीरथ प्रयत्न होता.
निंबाळकरांचं वाचन खूप आहे. कायद्याचा अभ्यास तर आहेच. पण समकालीन राजकारणाचं आकलन पक्कं असतं त्यांचं. मोठ्या राजघराण्यातले. पण वागणं जमिनीवरचं. सभ्य, सुसंस्कृत. त्यांची आणखी एक ओळख आहे. एकेकाळी ते गाजलेले क्रिकेटपटू आहेत. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ मानला जातो. जसे निंबाळकर आहेत.
.................................................................................................................................................................
सतेज पाटील : ताईत
आमचं ठरलंय म्हणत सतेज उर्फ बंटी पाटलांनी कोल्हापुरातली प्रत्येक राजकीय कुस्ती जिंकली आहे. दुसरी लाट आली म्हणून पक्ष बदलला नाही. काँग्रेसचा झेंडा आणि काँग्रेसची मूल्यं यावर त्यांची अविचल निष्ठा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातलं राजकारण त्यांच्या विचारांशी प्रतारणा करणारं कधी होता कामा नये, याचं भान त्यांनी कायम राखलं. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने सामिल व्हावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सहकार, उद्योग आणि शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात त्यांची पाटीलकी आहे. कोल्हापूरमधल्या तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत.
.................................................................................................................................................................
अमरिशभाई पटेल : शिरपूर पॅटर्न
राजकीय नेता किती वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रभावी काम करू शकतो, ते अमरीशभाई पटेलांकडे बघून कळतं. शिरपूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष. शिरपूरचे आमदार. राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून कामाचा ठसा उमटवला. मुंबईतल्या श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्षही आहेत. मुंबईतील ही सर्वांत मोठी संस्था. आता देशातल्या बहुतेक मोठ्या शहरांमध्ये तिचे कॅम्पस आहेत. मिठीबाई आणि एनएम कॉलेज. एनएमआयएमएस. मॅनेजमेंट स्टडीजमध्ये देशात अव्वल आहे. जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न अमरिश भाईंच्या कल्पनेतूनच साकार झाला. आदिवासी दुष्काळी भागात अमरिशभाईंनी केलेले पाण्याचे प्रयोग भगीरथ आहेत. आदिवासी हिताच्या प्रश्नावर अमरिशभाई राजकीय तडजोडही कधी करत नाहीत. शिरपूर एज्युकेशन सोसायटी, प्रियदर्शिनी स्पीनिंग मिल या संस्था अमरिशभाईंच्या नेतृत्वाखाली वाढल्या. शिक्षण, उद्योग, राजकारण, जलसंधारण, शेती, आरोग्य अशा विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करण्याचा शिरपूर पॅटर्न म्हणजे राजकीय नेतृत्वातून बदल कसा घडवायचा याचा लोकविलक्षण प्रयोग आहे.
.................................................................................................................................................................
कपिल पाटील : दुबळ्यांचा आवाज
दिलीपकुमार कपिल पाटील यांच्याबद्दल म्हणत, ‘कपिल म्हणजे दुबळ्या वर्गाचा आवाज. न हटता लढतो.’ ‘आज दिनांक’चे संपादक म्हणून ते गाजले. विद्यार्थी - शिक्षण चळवळीतील नेता. मुंबईतून शिक्षकांचे तीन टर्म आमदार. शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या लढाईचा नवा चेहरा बनले आहेत कपिल पाटील. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले होते, ‘वंचितांचा आवाज आहेत कपिल पाटील.’ मुद्दा खैरलांजीचा असो की खर्डा, कोपर्डीचा. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो की, मराठा आरक्षणाचा तिढा. कपिल पाटील सरकारविरोधात लढाई करतात आणि वंचितांच्या बाजूने रदबदलीही. निखिल वागळे एकदा म्हणाले, ‘बहुजनांशी जोडलेला माणूस आहे, कपिल. राजकारणाच्या गटारगंगेतून काही पॉझिटिव्ह काढू शकणारा महत्त्वाचा माणूस.’ अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणतात, ‘कपिल यांना जसे आपण बाहेर पाहतो, तसेच ते सभागृहात दिसतात. पोलीटिकल विल असणारे महत्त्वाचे नेते आहेत ते.’
शिक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा राजकीय अजेंड्यावर आणला तो कपिल पाटील यांनीच. संघर्ष सडकेवर असो की विधानपरिषदेत ते तयारीत असतात. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही आहेत ते. शिक्षक, मच्छिमार, विद्यार्थी, कंत्राटी कामगार, शेतकरी, अंगणवाडी ताई, असंघटित मजूर अशा सर्व गरीबांचा झेंडा कपिल पाटील यांच्या खांद्यावर असतो.
.................................................................................................................................................................
अशोक बेलसरे : गुरुवर्य
भाजप शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला असलेला मुंबई शिक्षक मतदार संघ कपिल पाटील यांनी खेचून आणला. तेव्हा विलासराव देशमुख म्हणाले, ‘या विजयाचे शिल्पकार आहेत अशोक बेलसरे’. रात्रशाळांच्या लढाईत विलासरावांनी बेलसरे सरांना पाहिलं होतं. तात्या सुळे, प्रकाश मोहाडीकर, साखरदांडे यांच्यासोबत बेलसरे सरांनी काम केलं. महाराष्ट्रातल्या रात्रशाळांचं संघटन उभारलं. ‘छात्र भारती’ला हात दिला. ‘शिक्षक भारती’ची स्थापना केली. कोकणातल्या ‘नवनिर्माण शिक्षण संस्थे’चेही ते एक संस्थापक. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकांचे नेतेही अशोक बेलसरे सरांचा उल्लेख ‘गुरुवर्य’ या एकाच शब्दाने करतात.
.................................................................................................................................................................
उदय सामंत : कोकणचा नेता
कोकण नाथ पै आणि मधू दंडवतेंचं आहे, याचं भान ठेवत राजकारण करणारा नेता म्हणजे उदय सामंत. अनेक महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक प्रकल्प त्यांनी खेचून आणलेत. सिंधुदुर्गच्या विमानतळाला नाथ पैंचं नाव. रत्नागिरीच्या विमानतळाला लोकमान्य टिळकांचं नाव. आणि मधू दंडवतेंच्या नावानं विद्यापीठ उपकेंद्र, ही उदय सामंतांची कल्पकता... आणि निष्ठाही. उच्च शिक्षणमंत्री असूनही कुठेही वादात नाहीत, हे आणखी त्यांचं कसब.
.................................................................................................................................................................
अमित देशमुख : विलासरावांचे प्रतिबिंब
एकविसाव्या वर्षी लातूर नगरपरिषद निवडणुकीत स्टार प्रचारक होते अमित देशमुख. विलासराव देशमुख यांचा लेक म्हणून लातूरकर कौतुकानं भाषण ऐकत असत. हुबेहुब विलासरावांसारखी बोलण्याची लकब, शब्दफेक, काम करण्याची पद्धत. युवक काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. २००९पासून आमदार. आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव आहेत. फक्त लातूरकर नव्हे महाराष्ट्रातील काँग्रेसजन अमित यांच्यामध्ये विलासरावांना बघत असतात. २०१४ साली पर्यटन, अन्न, औषध प्रशासन खात्याचे काही काळ राज्यमंत्री होते. प्रशासनावर पकड आहे. राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास आहे. सतत अपडेट राहणाऱ्या तरुण नेत्यांपैकी ते एक. महाराष्ट्र काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याची क्षमता असलेले ‘राजकीय मटेरियल’ त्यांच्यात आहे.
.................................................................................................................................................................
एकनाथ शिंदे : एकच नाथ
आनंद दिघेसारखी फक्त दाढी आणि दिसणं नाही एकनाथ शिंदे यांचं. कामांची पद्धत आणि कार्यकर्ते सांभाळण्याची शैलीही तशीच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून शिवसेनेत त्यांनी भरारी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतले कर्तबगार सहकारी आहेत ते. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा गढ त्यांनीच राखला आहे. शिवसैनिक त्यांना ‘एकच नाथ’ म्हणून संबोधतात. त्यातून शिवसैनिकांचं त्यांच्याबद्दलचं नातं स्पष्ट होतं. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या खोऱ्यातले. एक सामान्य रिक्षाचालक शिवसैनिक ते मुरब्बी नेता, मंत्री असा शिंदे यांचा अचंबित करणारा प्रवास आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चंद्रकातदादा पाटील : भाजपचे दादा
गिरणी कामगाराचा लेक ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री. आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष. चंद्रकांतदादा पाटील यांचा स्वप्नवत जीवन प्रवास आहे हा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खास गोटातला नेता. देशभर कौतुकानं बोललं जातं हे. चंद्रकांतदादा असे खास झाले त्यामागे मोठा राजकीय होमवर्क आहे. सलग १३ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक होते दादा. उत्तम संघटन कौशल्यवाला नेता अशी स्वतंत्र ओळख आहे त्यांची. कायम समर्पित भावनेनं काम करण्याची वृत्ती. आमदारकी, मंत्रीपद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार पुढे नेण्याची साधनं असं मानणारा हा नेता आहे. सर्वोच्च सत्तेत राहून साधं राहता येतं याचं जीवंत उदाहरण म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष उभारला. शेटजी-भटजींचा अशी टीका असलेला पक्ष बहुजनांचा झाला. चंद्रकांतदादांचा वाटा त्यात आहे. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवायची या ध्यासाने रात्रंदिन पछाडलेलं असतं त्यांना.
.................................................................................................................................................................
जितेंद्र आव्हाड : राष्ट्रवादीचा वाघ
मुंबऱ्याचा वाघ नुसता मंत्री नाही. मंत्री म्हणून मध्यम मार्गी नाही. भाजपला नाही तर संघ आणि हिंदुत्वाला अंगावर घेणारा राष्ट्रवादीचा वाघ ही त्यांची प्रतिमा आहे. शरद पवारांच्या पक्क्या विश्वासातला. पवारांना बाप मानणारा. दलित आणि अल्पसंख्याकांना आपला वाटणारा. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना मानणारा. गांधींना मानणारा. पण एकाला दोन देताना भीडभाड न ठेवणारा. महात्मा गांधी, छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्यावर कुणी शिंतोडे उडवले, शरद पवारांबद्दल कुणी अपशब्द उच्चारले तर तुटून पडणारा मंत्री म्हणजे जितेंद्र आव्हाड. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी मुंबईत निवारा देणारा आणि काम करणाऱ्या एकट्या महिलांसाठी वर्किंग वुमन्स हॉस्टेल्स् बांधणारा सहृदय गृहनिर्माण मंत्री ही त्यांची ओळख. रखडलेले रि-डेव्हलपमेंटचे प्रोजेक्टस् आव्हाडांनी मार्गी लावले आहेत.
.................................................................................................................................................................
गिरीश महाजन : ग्रासरूटचा पुढारी
जामनेरचे सरपंच ते महाराष्ट्र भाजपचा प्रभावशाली नेता असा प्रवास आहे गिरीश महाजन यांचा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सार्वजनिक जीवनात एंट्री केली त्यांनी. तळागाळातला राजकीय कार्यकर्ता म्हणून खस्ता खाल्ल्या. प्रचारात भिंती रंगवल्या. पत्रकं वाटली. पोस्टर चिकटवली. जामनेर तालुका विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष झाले. तिथून त्यांनी मागे फिरून पाहिलंच नाही. भारतीय जनता युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष झाले. नंतर जामनेरचे आमदार. फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि जलसंधारण या खात्याचे मंत्री म्हणून प्रभावी काम केलं त्यांनी. सहा टर्म आमदार आहेत ते. ‘कुंभमेळा मंत्री’ म्हणून हेटाळणी केली काहींनी त्यांची. पण नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नेत्रदीपक काम त्यांच्या नावावर जमा आहे.
.................................................................................................................................................................
भाई जगताप : झुंजार
सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. राजकीय पक्षात त्यांच्या नेतृत्वाला धुमारे फुटले. कामगार चळवळीत ‘आंदोलनवाला’ म्हणून प्रतिमा बनली. अशोक जगतापचे भाई जगताप झाले. कामगारांसाठी सतत आंदोलन, संघर्ष करतात. त्यामुळे मुंबईच्या कामगार क्षेत्रात झुंजार नेता असा दरारा आहे.
कोकणातल्या मंडणगडचे भाई मुंबई काँग्रेसची धुरा ताकदीने पेलताहेत. आक्रमक वक्ते, अभ्यासू आणि संघटन कुशल आहेत.
.................................................................................................................................................................
नाना पटोले : आक्रमक काँग्रेसी
महाराष्ट्र काँग्रेसच्या कठीण काळात अध्यक्ष झाले नाना पटोले. मूळचे आक्रमक, उंचेपुरे नाना अधिक झेपावले. केंद्र सरकारवर तुटून पडतात. भाजपच्या दुटप्पी राजकारणाचा पर्दाफाश करतात. घणाघाती भाषणं करतात. सततच्या पराभवाने काँग्रेसजन निस्तेज झाले होते. नाना राज्य पिंजून काढत आहेत. पत्रकार परिषदा, महागाई विरोधी मोर्चे, आरक्षण समर्थन सभा घेत आहेत. काँग्रेसजनांना जागवायचं काम करताहेत नाना. एक नंबरचा काँग्रेस पक्ष आज चौथ्या स्थानावर आहे. नाना त्याला जुने दिवस आणून देण्यासाठी खटाटोप करताहेत. त्यांचा आटापिटा कामी येईल का? येत्या काळात ते दिसेल.
.................................................................................................................................................................
सुनील केदार : विदर्भवीर
दिग्गज नेते होते एकेकाळी विदर्भात. जाबुवंतराव धोटे, नाशिकराव तिरपुडे, शेषराव वानखेडे. त्यांच्यानंतर विदर्भवीर कोणाला म्हणता येईल, तर ते सुनील बाबासाहेब केदार यांना. सत्ता अनेकांना मिळते. मंत्री बरेच जण होतात. मिळालेल्या सत्तेचं मोल जाणणारे सत्ताधारी मोजके. सुनिल केदार त्यापैकी एक. विदर्भातील बलदंड प्रभावी नेता म्हणून त्यांचा दरारा आहे. पक्के काँग्रेसी. पक्के सेक्युलर. गरिबांचा वाली ही आणखी एक ओळख. पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री आहेत राज्याचे. नागपुरात वाढले. १९९ पासून सावनेरमधून निवडून येतात.
.................................................................................................................................................................
पंकजा मुंडे : मुंडेंची लेक
लोकांच्या मनातली मुख्यमंत्री व्हायचं होतं पंकजा मुंडे यांना. निवडणुकीत त्यांना भावानेच पाडलं.
सत्ता गेली, पण गोपीनाथ मुंडेंची ही लेक हरली नाही. भगवानगडावरची गर्दी काही सरली नाही. उमेद अजून कायम आहे. पक्ष पुन्हा संधी देईल ही आशा त्यांनी सोडलेली नाही.
.................................................................................................................................................................
धनंजय मुंडे : वादळ वारं
महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यांना संधी स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावरच मिळवावी लागते. धनंजय मुंडे यांनी जे काही मिळवलंय ते कष्टातून आणि हिमतीने. मुंडेंच्या म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, हे ओळखलं. राष्ट्रवादीचा रस्ता पकडला. स्वतःचं फॉलोईंग असलेला राष्ट्रवादीतला पवार कुटुंबाबाहेरचा भूजबळांनंतरचा दुसरा नेता आहेत धनंजय मुंडे. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी स्वतःला घडवलं. राज्यभर लोकप्रियता मिळवली.
ज्यांच्या प्रतिक्रिया, भाषणं लाईव्ह पाहिली जातात, अशा मोजक्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे आहेत. वादळ वाऱ्यात टिकून आहेत.
.................................................................................................................................................................
युवराज संभाजीराजे : छत्रपती शाहूंचा वारसा
आरक्षणाच्या मागणीसाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’ छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली संघटीत झाला. मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर फिरून जनजागृती त्यांनी केली. हे आंदोलन खेड्यापाड्यात नेलं.
कोल्हापूरच्या गादीचा सामाजिक न्यायाचा वारसा ते चालवत आहेत. राज्यसभेचे खासदार होते. ‘छत्रपती शिवराय आणि शाहू महाराज यांचा वारसा मी चालवतोय. समतेवर आधारलेला स्वतंत्र समाज घडवण्यासाठी काम करतोय’, अशी त्यांची भूमिका असते.
.................................................................................................................................................................
छत्रपती उदयनराजे भोसले : तुफानी क्रेझ
त्यांचं कॉलर उडवणं, खुर्च्यांवर खुर्च्या रचून त्यावर बसणं, बेधडक बोलणं. एकाहून एक. पण तरीही सातारच्या गादीचे वारस म्हणून राज्यात जनमनात उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आदर आहे. ते सध्या भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार आहेत. विधानपरिषद सदस्य म्हणून राजकारणात उतरले. नंतर सातारचे खासदार झाले. भर पावसात पवारांचं भाषण झालं आणि उदयनराजे २०१९ची लोकसभा निवडणूक हरले. पण म्हणून उदयनराजेंची क्रेझ काही कमी झाली नाही. महाराष्ट्रभरच्या थिरकत्या, जोशील्या तरुण वर्गात त्यांची लोकप्रियता तुफान आहे. त्यांना कार रेसिंगचा छंद आहे. स्वत: वेगात कार चालवतात. त्या वेगासारखीच त्यांची कार्यशैली फास्ट आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आशिष शेलार : धाडसी
राजकारण खिलाडू वृत्तीने करायचं. खेळांच्या संस्थात राजकारण आणायचं नाही. पॉलिटिक्स आणि स्पोर्ट या दोन्ही क्षेत्रात रूची असलेल्या अॅड. आशिष शेलार यांचं हे वेगळेपण. पेशाने वकील आहेत. नगरसेवक, आमदार, मंत्री आता मुंबई भाजपचे अध्यक्ष असा राजकारणातला चढता आलेख. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. खेळ संघटक म्हणून त्यांचे काम दिमाखदार आहे. सतत लोकांमध्ये राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा. त्यामुळे त्यांना ‘पीपल्स मॅन’ म्हणतात. आक्रमक वक्ते आहेत. विरोधकांना अंगावर घेण्याचं धाडस बाळगून असतात सतत. त्यामुळे मीडियात चर्चेत असतात.
.................................................................................................................................................................
रश्मी ठाकरे : सीएमची सावली
ठाकरे घराण्याची सून म्हणून कर्तव्य बजावणं सोप्पं नाही. रश्मी उद्धव ठाकरे यांनी ते शिवधनुष्य पेललं. सत्ताधारी कुटुंबात महत्त्वाचा रोल बजावतात, पण सत्ता संघर्षात पडत नाहीत. ‘सामना’च्या संपादक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत सावलीसारख्या उभ्या आहेत.
आदित्य, तेजस यांना घडवणारी आई आहेत त्या. श्रीमंत कुटुंबातली मुलं वाया जाण्याचा धोका असतो. रश्मी ठाकरे यांनी आदित्यला ‘नेता’ म्हणून घडवला. तेजसमधला ‘संशोधक’ जपला. मीनाताई, बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवाराची देखभाल त्यांनी खंबीरपणे केलीय. करताहेत.
.................................................................................................................................................................
मिलिंद नार्वेकर : ‘मातोश्री’चा माणूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास गोटातील विश्वासू आहेत मिलिंद नार्वेकर. १९८५ साली ते शिवसैनिक झाले. अल्पवाधीतच ‘मातोश्री’मधील महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवली जाऊ लागली.
२०१७ साली शिवसेनेचे सेक्रेटरी म्हणून बढती मिळाली. उद्धव ठाकरे यांचे दौरे, सभा, भेटी गाठी यांचं काटेकोर नियोजन ते करतात. व्यवस्थापन कौशल्य दांडगं आहे. शिवसेनेत अनेक वादळं आली, गेली. अनेक नेते बाहेर पडले. तेव्हा मिलिंद नार्वेकरांवर आरोप प्रत्यारोप झाले. पण त्यांचावरचा ‘मातोश्री’चा भरोसा काही ढळला नाही. आता मिलिंद नार्वेकर तिरुपती बालाजी ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
.................................................................................................................................................................
‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर
लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई
पाने - १४०
मूल्य - २००० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment