अजूनकाही
२६ जूनचा एक कार्यक्रम. Voice of Youth, विविध धर्मांच्या तरुणांचा आवाज बऱ्याच वर्षांनंतर ऐकला आणि मेंदूत डोपामाइन पाझरले. कष्टकऱ्यांची, तरुण-तरुणींची क्रांतिगीतं ऐकली. गेल्या काही वर्षांत जमा झालेल्या निराशेच्या झाकोळात आतून कुठेतरी एक सोनेरी कवडसा पडावा, असं वाटलं. सगळ्यांचा आक्रोश एकच- धर्मद्वषाचं राजकारण नको. आमचे धर्म कोणतेही असले तरी आम्ही भारतीय आहोत. आम्हाला सलोख्याने राहायचे आहे. संदर्भ होता १५ ऑगस्टला साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा.
गेल्या काही वर्षांत सगळ्यात विस्कळीत झालेलं समाज आणि अर्थकारणाचं चक्र उलट दिशेनं फिरवणाऱ्यांचा चहूबाजूला मोकाट वावर... घरवापसी, लव्ह जिहाद, गोरक्षेच्या नावे होणारी हिंसा आणि दंगली. हेही कमी म्हणून आरोग्यावर घाव घालायला आलेला करोना. पंचाहत्तर वर्षांपूर्वी स्वतंत्र देशाचे नागरिक बनलेल्या विविध धर्म-जातीच्या भारतीयांना पुनश्च त्यांच्या जाती-धर्मांत विभागून आणि जाती-धर्मांच्या जाणिवा टोकदार बनवून आपापसात कलह माजवण्यासाठी टपून असलेल्या विघातक धर्मांध शक्तींना आपापसातील प्रेमाने व विश्वासाने एकत्र येऊन उत्तर देण्याची एक नामी संधी या निमित्ताने मिळेल, असे वाटल्याने या यात्रेत सामील व्हायचा निश्चय केला.
त्यानिमित्ताने भारतीय संविधान, सर्वधर्मसमभाव यांबाबत आस्था असणाऱ्या विचारी लोकांशी संपर्क होईल, असेही वाटून गेले. आज ही धार्मिक द्वेषाची भावना आपल्या जवळच्या नातेवाईकांतही फारच जाणवत असल्याची खंत मनात होती. तशातच ‘तिरंगा यात्रा’ या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले आणि १५ ऑगस्टला दुपारी तीन वाजता वीर कोतवाल उद्यान गाठले.
सत्ताधारी इव्हेंटला आव्हान
खरं तर २६ जानेवारी २००२ पासूनच भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी आपल्या घरावर सन्मानपूर्वक व नियमानुसार तिरंगा फडकवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पण आजतागायत कधीही त्याचा ‘इव्हेंट’ केला गेला नव्हता. तो या वर्षी झाला. नव्हे, आपले सर्वस्तरीय अपयश झाकण्यासाठी जाणीवपूर्वक रचला गेला. पण तो साजरा करायचा म्हणजे, प्रायोजकत्व आणि व्यापारीकरणाशिवाय पर्याय नाही. या बाजारपेठीय घटकांना राष्ट्रवादाचा मुखवटा चढवला की, देशभक्तीच्या गंगेत सर्व पापे नष्ट होतात आणि त्याच्या आडोशाने दुसऱ्याला राष्ट्रद्रोही ठरवणंही सोप्पं होऊन जातं. नेमका तोच उद्देश ‘घर घर तिरंगा’ या इव्हेंटमध्ये होता. या भेदभावाच्या अभद्र संस्कृतीला एकीने उत्तर द्यायला पाहिजे, म्हणूनच हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख अशा सर्व धर्मीयांची पाऊले मुंबईतल्या दादर पश्चिमेकडील वीर कोतवाल उद्यान येथून चैत्यभूमीकडे निघाली, तेव्हा अतिशय आनंद वाटला...
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ऐक्य आणि समतेचे दर्शन
आपल्या स्वातंत्र्यामागचे सर्व धर्मीयांचे प्रयत्न आणि कष्ट यांना योग्य न्याय देणे, आणि त्यांच्यातील विद्वेष कमी करून सर्वांना ‘भारतीय’ म्हणून एकत्र आणण्यासाठी ही यात्रा होती. भले आमचे धर्म भिन्न असतील, पण आम्ही एक आहोत, कारण आम्ही आधी भारतीय आहोत आणि मग हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन व अन्य आहोत, हा या यात्रेचा संदेश होता.
ही ऐक्याची भावना सतत जागृत ठेवण्यासाठी मानवी उत्क्रांतीचा इतिहास आठवावा लागेल. रानावनात कंदमुळे, फळे, मिळेल ती शिकार खाऊन जगणारे, सतत भटकणारे आपले पूर्वज जगातल्या विविध प्रदेशात शेती करत स्थायिक होऊ लागले. साधारण दहा हजार वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेव्हापासून एकत्रित राहण्यामुळे काहीएक व्यवस्था निर्माण होऊ लागली. वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळाले, अन्नाची हमी जशी वाढली, तशी मेंदूच्या उत्क्रांतीला गती मिळाली. थोडा मोकळा वेळ मिळू लागला. देवता, नातेसंबंध, देवघेव, कुटुंब, समान परंपरा, चालीरिती अशा संकल्पनांचा जन्म झाला. एकाच प्रकारच्या संकल्पना मानणाऱ्या टोळ्या भावनिकदृष्ट्या अधिक जवळ आल्या, वाढत गेल्या. भौगोलिक परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार शतकानुशतके एकाच प्रदेशात वास्तव्य केल्याने मानवी संस्कृती उदयाला आली. आक्रमकता, महत्त्वाकांक्षा, कार्यक्षमता, विविध कौशल्ये, व्यापार-उदीम अशा गुणांनुसार विविध उतरंडी तयार होऊ लागल्या. कामाची विभागणी झाली. काही ठिकाणी राजेशाही, सरंजामशाही, वतनदारी आली, तर काही ठिकाणी वर्णव्यवस्था.
सार्वभौमत्वामागील प्रेरणा आणि स्वातंत्र्याचा जागर
आताचा आपला भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातसुद्धा ही घुसळण सुरू होती. परकीय आक्रमणे व्यापार यांच्या माध्यमातून विविध धर्मांचे आगमन झाले. पण जसा धर्माचा जाच वाढू लागला, त्या जाचक बंधनांतून मुक्त होण्याच्या भावनेतून काही नवीन संप्रदाय, धर्म निर्माण झाले. वेगवेगळ्या राजाश्रयाने ते नांदू लागले. विविध कला, परंपरा, भाषा, पोशाख, खाद्यपदार्थ या सर्वांसह भारतीय संस्कृती उदयाला आली. हा आपला इतिहास.
ब्रिटिशांनी अठराव्या शतकात या सर्वांवर हळूहळू एकत्रितपणे आपली सत्ता लादली. या विरोधात हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन या सर्वांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाचा विरुद्ध एकत्रित होत लढा दिला. समता व बंधुता यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आणि ७५ वर्षांपूर्वी ‘भारत’ या सार्वभौम राष्ट्राचा जन्म झाला. म्हणूनच यावर कोणत्याही विशिष्ट धर्म व जातीच्या लोकांचा अधिकार नाही. पण गेल्या काही वर्षांत धर्माच्या आधारे अनैसर्गिक विषमतेचे समर्थन करून भारताच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर आधारित लोकशाहीवर संविधानविरोधी शक्ती प्रहार करताना दिसत आहेत. म्हणूनच आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर समतेवर आधारित, भेदभावरहित, प्रेम, करुणा, सहिष्णुता अशा मूल्यांना जपणारा समाज निर्माण करावा लागेल. त्यासाठी स्वातंत्र्याचा जागर अविरतपणे करावा लागेल.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पृथ्वी, मानव आणि या मानवी इतिहासाचे अभ्यासक, वैज्ञानिक आता आज हेच ओरडून सांगत आहेत की, परस्परांविषयी सहकार्य, दुसऱ्याबाबतची सहानुभूती, करुणा, प्रेम आणि आदरानेच या पृथ्वीवर माणसाला स्थैर्य प्राप्त करून दिले आहे... तर सर्व प्रकारचा द्वेष, तिरस्कार, अहंभाव, संकुचित वृत्ती यांनीच मानवाला विनाशाकडे लोटले आहे. असे असताना पंचाहत्तर वर्षांपूर्वी जे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन मिळवले आहे, त्याला तिलांजली द्यायची की, ते अबाधित राखायचे, याचा विचार करून त्यानुसार क्रियाशील राहण्याची जबाबदारी आज आपल्यावर येऊन पडलेली आहे. त्या क्रियाशीलतेच्या दिशेने एक पाऊल म्हणजे ही तिरंगा यात्रा होती.
सणांना तिरंगा यात्रेची जोड हवी
या यात्रेत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर विविध धर्मांचे धर्मगुरू, प्रतिष्ठित नागरिक यांचीही उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. या यात्रेत देशभक्तीपर गीते गायिली गेली. गांधी, नेहरू, टिळक, मौलाना आझाद, डॉ. आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अश्फाक उल्ला, चंद्रशेखर आझाद इत्यादी देशभक्तांची आणि नेत्यांची छायाचित्रे, असंख्य तिरंगी झेंडे आणि घोषणांचे फलक आणि सतत दिल्या जाणाऱ्या घोषणा यांनी दादर परिसर दणाणून गेला होता.
अशा तिरंगा यात्रा प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी सर्व धर्मीयांनी मिळून आयोजित करायला हव्यात. कारण जेव्हा विविध धर्मामध्ये विद्वेषाची भावना निर्माण केली जाते, तेव्हा आपले स्वातंत्र्यच नव्हे तर राष्ट्रही धोक्यात आलेले असते. याची जाणीव ठेवून जेव्हा देशामध्ये ठिकठिकाणी अशा यात्रांचे आयोजन केले जाईल, तेव्हा धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या शक्तींना आपोआप पायबंद बसेल आणि हा देश धार्मिक ऐक्य साधेल आणि देशाचे स्वातंत्र्य आचंद्रसूर्य अस्तित्वात राहील, असा विश्वास वाटतो. या यात्रेत सहभागी झाले, याचा अभिमान वाटतो.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment