गर्जती महाराष्ट्री १ : हिंमतवान, बिनटाका डॉक्टर, गाडगेबाबांचा वारकरी, अंजूमनचा नेता, आरोग्य समाजवादी, बेडर सीपी, निषक्ष अधिकारी, कल्पक कर्तबगार, जॉर्जचा वारसा, सावरपाडा एक्सप्रेस, निडर बेबाक....
ग्रंथनामा - झलक
संपादक राजा कांदळकर
  • ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 05 September 2022
  • ग्रंथनामा झलक १०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे 101 Prabhavshali Maharashtriyan aani 21 Ugavate Tare राजा कांदळकर Raja Kandalkar

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यातली ही काही महाराष्ट्री गर्जणारी व्यक्तिमत्त्व...

.................................................................................................................................................................

प्रतिभा शिंदे : हिंमतवान

दिल्लीत महाराष्ट्रातून एक हजार महिला शेतकऱ्यांना त्या घेऊन गेल्या होत्या. पंजाबच्या शेतकरी नेत्यांनी प्रतिभा शिंदे यांना आपल्या कोअर टीममध्ये सामावून घेतलं होतं. प्रतिभाताई नुसत्या हिंमतवान नाहीत, झुंजार लढवय्या आहेत. तितक्याच जिद्दी नेत्याही. कुशल संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य महिला नेतृत्वामध्ये अभावाने आढळतं, असा आपला समज आहे. प्रतिभताईंनी तो खोटा पाडला.

साक्रीच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या प्रतिभाताई महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज बनल्या आहेत. ‘लोकसंघर्ष मोर्च्या’च्या माध्यमातून खान्देशातल्या आदिवासींना आधार मिळाला. जळगावला १२८ बेड्सचं निःशुल्क कोविड हॉस्पिटल त्यांनी उभं केलं होतं. शेतकरी आणि आदिवासींच्या लढाईत याहा मोगीचं रौद्र रूप धारण करणाऱ्या प्रतिभाताईंच्या हृदयात अपार माणुसकी भरलेली आहे.

.................................................................................................................................................................

डॉ. तात्याराव लहाने : बिनटाका डॉक्टर

दोन लाख डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणारा डॉक्टर. ऐकून थक्क व्हायला होतं ना! पद्मश्री नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहानेंची कर्तबगारी आहे ही. बिनटाक्याच्या नेत्र शस्त्रक्रियेत नाव आहे त्यांचं.

लातूरच्या मकेगावातले तात्याराव मुंबईत आले, डॉक्टर झाले. जे.जे. हॉस्पिटलचे डीनही झाले. आरोग्य क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कामाला देशभर मान्यता मिळालीय.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नवनाथ गेंड : वाडी वस्तीवर

महाराष्ट्रात करोना काळात २५०० साने गुरुजी बालभवनं ‘राष्ट्र सेवा दला’च्या शिक्षकांनी सुरू केली. त्यासाठी पुढाकार घेतला नवनाथ गेंड यांनी. राष्ट्र सेवा दलाचा बाल-किशोरांसाठीचा हा अभिनव उपक्रम लाखभर बाल-किशोरांना कोविड काळात मोठाच मानसिक व शैक्षणिक आधार बनला. बालभवन हा उपक्रम वाचनालय, खेळघर, गाणी, गप्पागोष्टी मनोरंजनातून विचारप्रेरणा आणि समाजभान बाल-किशोरांमध्ये जागवण्याची चळवळ बनला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या वस्तीशाळा शिक्षकांना सन्मान मिळवून देण्याच्या यशस्वी लढाईचं संघटन नवनाथ गेंड यांनी केलं.

नवनाथ गेंड आता राष्ट्र सेवा दलाचे राज्य सचिव आहेत. प्राथमिक शिक्षकांचे नेते आहेत.

.................................................................................................................................................................

डॉ. झहीर काझी : अंजूमनचा नेता

जानेमाने शिक्षणतज्ज्ञ आहेत डॉ. झहीर काझी. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देणाऱ्या अंजूमन-ए-इस्लाम या देशातल्या सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. व्यवसायाने डॉक्टर आहेत. आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा आहे त्यांचा. न्यायमूर्ती बद्रूद्दीन तय्यबजी यांनी १८८०मध्ये स्थापन केलेल्या अंजूमन-ए-इस्लामचं २१व्या शतकात नेतृत्व करताहेत डॉ. झहीर काझी. महाराष्ट्रातील अंजूमन ही एक आदर्श शैक्षणिक संस्था आहे. १०० हायस्कूल, कॉलेजेस, पॉली टेक्नीकल असा या संस्थेचा महाप्रसार आहे. जामिया मिलिया आणि अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या तोडीचं दर्जेदार शैक्षणिक वातावरण इथं निर्माण करण्यात डॉ. काझी यांनी यश मिळावलंय. अमेरिकेतून मेडिकलचं उच्च शिक्षण घेतलं त्यांनी. राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत आहेत. सामाजिक सलोख्यासाठी मुंबईत आघाडीवर असतात. दिलीपकुमार यांच्यासोबत मुस्लीम ओबीसी मूव्हमेंटमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलंय. मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक सुधारणांचा देशातला प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड असेल, मायनॉरिटीचा सवाल असेल किंवा देशातल्या शैक्षणिक धोरणाचा मामला डॉ. काझी यांच्या मताला मोठं वजन आहे.

.................................................................................................................................................................

शब्बीर अन्सारी : पिंजाऱ्याची कमाल

पस्मांदा मुसलमानांची बात पहिल्यांदा केली अब्दुल कयुम अन्सारी यांनी. पन्नासच्या दशकात. डॉ. राममनोहर लोहियांच्या पिछड्यांच्या चळवळीचा झेंडा घेऊन नव्वदच्या दशकात जनार्दन पाटील आणि कपिल पाटील यांच्यासोबत उभे राहिले शब्बीर अन्सारी. मुस्लीम ओबीसींचा प्रश्न मंडल आयोगाच्या सोबत ऐरणीवर आला. या कारगिर अलुतेदार बलुतेदार बिरादरींचं संघटन उभं केलं शब्बीर अन्सारी यांनी. जालन्याला १९८३मध्ये मुस्लीम ओबीसी संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी आले होते चौधरी ब्रह्मप्रकाश, रामविलास पासवान, रा.सु. गवई आणि डॉ. असगर अली इंजिनिअर. पुढे दिलीपकुमार यांचं समर्थन मिळालं आणि देशभर मुस्लीम ओबीसी संघटना उभ्या राहिल्या आणि त्यांचं राजकारणही. महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत मुस्लम ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला, त्यामागे शब्बीर अन्सारा यांची मेहनत होती. आधीची १० वर्षं या पिंजाऱ्याने मुस्लिमाच्या मागासपणाचा कापूस पिंजून काढला होता. आजही तेच मिशन घेऊन शब्बीरभाईंची पायपीट सुरू असते.

.................................................................................................................................................................

बद्रीनाथ महाराज तनपुरे : गाडगेबाबांचा वारकरी

साने गुरुजींच्या पंढरपूरच्या उपोषणाला तनपुरे महाराजांनी आपल्या मठाची जागा दिली. त्या मठाचे वारस आहेत ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे. संत गाडगे महाराजांची परंपरा आणि वारकरी परंपरा यांचा समन्वय म्हणजे तनपुरे महाराज. वारकरी परंपरा आणि सामाजिक समतावादी, परिवर्तनवादी विचारांची सांगड घातली त्यांनी. गेली चार दशके ते प्रबोधन कार्य करत आहेत. वारकरी संप्रदायावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. धार्मिक प्रवचनांबरोबर समाजाला सर्वांगीण विकासदिशा देणाऱ्या कार्यक्रमांवर त्यांचा भर असतो. विविध शैक्षणिक, धार्मिक आणि समाजसेवी संस्था सुरू केल्या. राज्यातील २५ हजार कीर्तनकारांनी एक गाव दत्तक घ्यावे, अशी संकल्पना महाराजांनी मांडली होती. पंढरपुरातील आपल्या आश्रमात अनेक सामाजिक, मानवतावादी उपक्रम राबवत असतात तनपुरे महाराज. राज्य सरकारने ‘ज्ञानोबा तुकाराम’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

.................................................................................................................................................................

डॉ. अभिजीत वैद्य : आरोग्य समाजवादी

आरोग्याच्या हक्कासाठी ‘आरोग्य सेना’ झटते. प्रत्यक्ष आपत्तीत धावून जाते. कोविड काळात या आरोग्य सेनेने १०२ रिक्षा अॅम्ब्युलन्स पुण्यात चालवल्या. या आरोग्य सेनेचे अध्यक्ष, सेनापती आहेत डॉ. अभिजीत वैद्य. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त होते. आरोग्य सेनेच्या माध्यमातून त्यांनी देशभर काम केलं. सात राज्यांत १४ हजार आरोग्य स्वयंसेवकांचं जाळं विणलं त्यांनी. गेली २४ वर्षं रुग्णांवर उपचार करत आहेत. पूर, भूकंप, दुष्काळ, करोना काळ अशा आपत्तीत डॉ. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून काम करतात. डॉ. वैद्य देशातले एक नामांकित हृदयरोग तज्ज्ञ आहेत. हृदयरोग या विषयावर त्यांनी देश-विदेशात शेकडो व्याख्याने देऊन जागृती केलीय. आरोग्य समाजवादाचा सेनापती आहेत अभिजीत वैद्य. समाजवादी नेते भाई वैद्य यांचा वारसा चालवणारा.

.................................................................................................................................................................

आप्पासाहेब धर्माधिकारी : सेवाधर्मी

धर्मातलं कर्मकांड दूर लोटून सेवाधर्म वाढवायचा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा तो ध्यास आहे. वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा बैठक संप्रदायाचा वारसा पुढे नेताहेत. रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा गावातून सुरू झालेली सेवाधर्माची चळवळ आता जगभर पोचलीय. वृक्षारोपण, रक्तदान कॅम्प, मोफत आरोग्य शिबिरं, स्वच्छता अभियान, नोकरी मार्गदर्शन मेळावे, व्यसनमुक्ती कॅम्प आप्पासाहेबांचे अनुयायी घेतात. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या सेवाधर्माचा गौरव केलाय.

.................................................................................................................................................................

संजय पांडे : बेडर सीपी

लोकल ट्रेनने प्रवास करणारा महाराष्ट्राचा पहिला डीजीपी. बातमी सनसनाटी असली तरी खरी होती. संजय पांडे आहेत सरळ साधे. शिस्तप्रिय कर्तव्यकठोर. आयआयटी कानपूरचा स्कॉलर स्टुडंट ते कर्तबगार आयपीएस अधिकारी हा प्रवास रोल मॉडेल ठरणारा आहे. सध्या ते मुंबईचे सीपी आहेत.

१९९२-९३च्या मुंबई दंगलीत धारावीतली हिंसा कंट्रोलमध्ये राहिली ती संजय पांडे यांच्या पोलीसी दराऱ्यामुळे. श्रीकृष्ण कमिशनने त्यांचं कौतुक केलंय. या कामगिरीसाठी कर्तव्य बजावताना संजय पांडे यांनी बड्या पुढाऱ्यांशी पंगा घेतला. खाकी वर्दीशी इमान राखलं. लोकांशी नातं जपलं.

.................................................................................................................................................................

मनुकुमार श्रीवास्तव : निषक्ष अधिकारी

कुठल्याही राजकीय गटातटात न पडलेले अधिकारी आहेत मनुकुमार श्रीवास्तव. राज्याचे मुख्य सचिव. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव. मुद्रांक शुल्क अधिकाधिक वाढवण्यासाठी त्यांनी प्रशासनात प्रयत्न केले. जमिनीच्या दाखल्यांचे संगणीकरण करणं हे त्यांचं कौतुकास्पद काम. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना त्यातून मोठा दिलासा मिळाला. गैरव्यवहार कमी झाले.

नगरविकास खात्यात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचा कारभार लोकभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले महाराष्ट्राला पुढे नेणारे ठरले. ते भौतिकशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांना उत्तम गाता गळा आहे. रुक्ष प्रशासनाला सुरेल करण्याची तशीच त्यांची हातोटी आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नितीन करीर : अचूक

प्रखर बुद्धिमत्ता. अचूक आकलन. निष्पक्षता. त्यातून आलेला किंचित तुसडेपणा, पण लोकांच्या प्रश्नांची जाण. जी जी पदं भूषवली, तिथे आपला ठसा नितीन करीर यांनी उमटवला आहे. त्यांच्या दालनात दोन फोटो आवर्जून असतात- एक गांधींचा आणि दुसरा साने गुरुजींचा.

नगरविकास, महसूल, जलसंपदा अशा महत्त्वांच्या खात्यांमध्ये प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. या खात्यांमध्ये काम करताना त्यांनी नवनवे प्रयोग केले. त्याचं कौतुकही झालं

.................................................................................................................................................................

भूषण गगराणी : कल्पक कर्तबगार

मराठी भाषेतून परीक्षा देऊन आयएएस झालेत भूषण गगराणी. इंग्रजी भाषेचा न्यूनगंड म्हणून युपीएससीची परीक्षा मराठी भाषेमध्ये देणे योग्य नाही. स्वतःला सिद्ध करायचे असल्यास तसे करा, असे सांगणारे आयएएस भूषण गगराणी. युपीएससी परीक्षा मराठी भाषेतून व मराठी हा विषय घेऊन देशात तिसरा क्रमांक मिळवला होता त्यांनी.

वनसंवर्धन, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, ग्रीन आर्मी असे उपक्रम त्यांनी प्रशासनात काम करताना राबवले. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, रस्ते विकास महामंडळ, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव ते मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव असा प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा. महाराष्ट्रातल्या प्रशासनातले कल्पक आणि कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून ओळखलं जातं त्यांना. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना ते हवे असतात.

.................................................................................................................................................................

विश्वास नांगरे पाटील : मन में है विश्वास!

सिल्वर ओकवरचा हल्ला शिताफीने परतवला विश्वास नांगरे पाटील यांनी. मुंबईवर २६/११ला दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ताज हॉटेलात पोचणारे पहिले पोलीस अधिकारी होते विश्वास नांगरे पाटील. तेव्हा देशभर नाव झालं त्यांचं. जिगरबाज पोलीसवाला म्हणून. दहशतवाद्यांशी तेव्हा झुंज दिली म्हणून त्यांना त्या शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक बहाल केलं गेलं.

पुणे जिल्ह्यात रेव्ह पार्टी प्रकरणी त्यांची कारवाई गाजली. नाशिकमधला करोनाविरुद्धचा त्यांचा लढा वाखाणला गेला. ‘मन में है विश्वास’ हे त्यांचं मोटीव्हेशनल पुस्तक गाजतंय. त्याचा हिंदी अनुवादही पसंतीस उतरलाय लोकांच्या.

.................................................................................................................................................................

इक्बाल सिंग चहल : मुंबई मॉडेल

१९८९च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे कल्पक आयएएस अधिकारी आहेत इक्बाल सिंग चहल. कोरोना काळात त्यांच्या मुंबई मॉडेलचं देशभर कौतुक झालं. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आहेत. मुंबईत कोविड १९वर नियंत्रण ठेवण्याचे श्रेय चहल यांना दिले जाते. भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयानेदेखील चहल यांच्या ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक केले.

त्यांनी नवीन फिल्ड हॉस्पिटलद्वारे हजारो खाटा जोडल्या. खाजगी सुविधांनी त्यांचे कोविड १९ वॉर्ड सरकारकडे सुपूर्द केले. ८०० वाहने रुग्ण्वाहिकांमध्ये बदलली. धारावीसह ५५ झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक सक्रिय दृष्टीकोन वापरला. मुंबईतील सर्व चाचणी अहवाल ‘वॉर रूम’मधून पाठवण्यात आले.

.................................................................................................................................................................

कविता राऊत : सावरपाडा एक्सप्रेस

नाशिक जिल्ह्यातील सावरपाड्याच्या कविता राऊतने २०१०च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावलं. आणि ती भारतात ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाऊ लागली. लांब पल्ल्याची भारताची धावपटू म्हणून तिचा लौकीक झाला. नाशिकच्या ग्रामीण आदिवासी भागातून आलेली कविता भारतातल्या तरुण तरुणींची आयकॉन बनलीय. शाळेत असताना नाशिकमध्ये ती अनवाणी पायाने एका स्पर्धेत धावली होती. तेव्हा प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी कविताची प्रतिभा आणि जिद्द ओळखली. तिला संधी दिली. कवितासाठी विक्रम नवे नाहीत. शाळेत पायात घालायला साधे बुट नव्हते. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणावे लागत असे. काट्याकुट्यांच्या वाटा तुटवत डोंगरमाथे पार करत ती शिकत होती. वाऱ्याच्या वेगाने ती धावत असे. बिकट आर्थिक परिस्थितीवर तीने मात केली. प्रशिक्षण, हजारो तासांचा सराव पूर्ण करत तीने यश मिळवलं. तिच्या यशस्वी वाटचालीचा पाठ्यपुस्तकात धडा आहे. जिद्दीचा प्रवास कसा असतो, याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे कविता राऊत.

.................................................................................................................................................................

शशांक राव : जॉर्जचा वारसा

मुंबईचे बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस आणि शरद राव यांचा वारसा आहे शशांक राव यांच्याजवळ. मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात आहे, पण ते संयमी आहेत. अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्यांचा. मुंबई बंद करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आंदोलनं उभी करतात. संघर्ष खडा करतात. मुंबईतील बेस्ट कामगारांची त्यांची लढाई अलीकडेच महाराष्ट्राने पाहिली. या लढाईतून बेस्ट कामगारांना त्यांचे हक्क मिळालेत. रिक्षा, फेरीवाले, टॅक्सीवाले यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटतात ते. मुंबईतील गरीब, कष्टकरी मोठ्या आशेने पाहतात शशांक राव यांच्याकडे.

.................................................................................................................................................................

अभिजीत पवार : प्रभावी

राज्यातलं प्रभावी दैनिक आहे ‘सकाळ’. त्याची सूत्रं अभिजीत पवारांनी पेललीत. व्यवस्थापकीय संपादक आहेत ते. महाराष्ट्र, गोव्यात व्याप आहे सकाळ मीडिया ग्रुपचा.

‘साम’ चॅनेल अल्पावधीत लोकप्रिय झालं अभिजीत यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे. अधिक बातम्या, सर्वसमावेशक भूमिका हे सूत्र आधी प्रतापराव पवारांनी रुजवलं, त्या रोपाचं झाड बनवलं अभिजीत पवारांनी. पत्रकारांची प्रभावी टीम घेऊन ‘सकाळ’ची विकास पत्रकारिता मजल दरमजल करत आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राजेंद्र दर्डा, विजय दर्डा : ‘लोकमत’चे दोन झुंबर

‘लोकमत’ नाही असं गाव महाराष्ट्रात सापडणार नाही. राजेंद्र दर्डा, विजय दर्डा यांची किमया आहे ती. ‘लोकमत’चे मीडिया साम्राज्य या दोन बंधूंनी वाढवले. दोघेही व्यवस्थापन, संपादनात तरबेज. लेखनही करतात प्रभावी. राजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री, उद्योगमंत्री म्हणून गाजले. विजय दर्डाची खासदारकी देशात नावाजली.

सध्या लोकमत मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक म्हणून राजेंद्र दर्डा यांच्या खांद्यावर धुरा आहे. ‘झुंबर’ हे राजेंद्र दर्डाचं पहिलं मराठी पुस्तक गाजलं. युरोप, अमेरिकेतल्या मुशाफिरीचा हा यात्रावृत्तांत आहे. ‘आमचे विद्यापीठ’ हे त्यांच्यावरचं पुस्तक लक्षवेधक आहे. ख्यातनाम पत्रकारांनी राजेंद्र दर्डीच्या संपादक व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेले लेख आहेत त्यात. राजकारण, समाजकारण, उद्योग अशा विविध क्षेत्रात दोघे दर्डा बंधू कार्यरत आहेत.

.................................................................................................................................................................

अविनाश भोसले : उद्योगातले भोसले

एबीआयएल म्हणजे काय? अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. राज्यातला प्रभावी बांधकाम उद्योग समूह. अविनाश भोसले सर्वेसर्वा आहेत. संगमनेरातल्या मध्यमवर्गातल्या घरात जन्म. बारावीपर्यंत शिक्षण घेता आलं, पण जिद्द आणि धडाडीच्या जोरावर अविनाश यांनी बांधकाम उद्योगात साम्राज्य उभं केलं. सर्वपक्षातल्या नेत्यांशी सलोखा. नवे प्रयोग करण्यात धाडस. या जोरावर त्यांचा उद्योग प्रगतीप्रथावर आहे. पुण्यात एबीआयएलचं ऑफिस आहे, पण राज्यभर बोलबाला आहे.

.................................................................................................................................................................

अमृता फडणवीस : निडर बेबाक

बँकर आहेत. गायिका, सामाजिक कार्यकर्त्याही आहेत अमृता फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी म्हणून पडद्याआड राहिल्या नाहीत. आपली स्वतंत्र ओळख आणि व्यक्तिमत्त्व जपतात त्या. परखड बोलतात. हजरजबाबी असतात. विरोधकांशी भिडतात. बुजत नाहीत क्षणभरही. पुरून उरतात. बेधडक. निडर आणि बेबाक.

उच्च विद्याभूषित आहेत अमृता फडणवीस. कॅशिअर ते व्हाइस प्रेसिडेंट असा त्यांचा अॅक्सिस बँकेतल्या करिअरचा प्रवास. गायिका म्हणून त्यांचं करिअर ग्लॅमरस आहे. प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’मधलं ‘सब धन मती’ हे गाणं त्यांनी गायलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरच्या ‘संघर्ष’ चित्रपटात त्यांनी गायलेलं गाणं वाखाणलं गेलं.

.................................................................................................................................................................

‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर

लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई

पाने - १४०

मूल्य - २००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......