‘७५ सोनेरी पाने : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे’ हा अविनाश धर्माधिकारी यांचा ग्रंथ नुकताच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा आपल्या देशानं खूप काही जास्त साध्य केलं, मिळवलं, कमावलं. पुरावे हवेत? ते सगळे या अमृत महोत्सवी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ग्रंथात पाहायला मिळतात. या ग्रंथाला धर्माधिकारी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
शतकानुशतकानंतर आणि शतकानुशतकांच्या अथक संघर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्य आता अमृत महोत्सव साजरा करत आहे.
हा अमृत महोत्सव केवळ होऊन गेलेल्या पंचाहत्तर वर्षांचा उत्सव नाही; तर तो येणाऱ्या किमान २५ वर्षांचाही उत्सव आहे, अशी माझी धारणा आहे.
एक देश, समाज, संस्कृती म्हणून आपण उज्ज्वल भवितव्याकडे निघालो आहोत, हा झालेल्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा निश्चितपणे अर्थ आहे. मात्र उज्ज्वल भवितव्याकडे निघालो आहोत, याचा अर्थ तिथे पोहोचूच याची कोणतीही ऐतिहासिक हमी नाही. कारण इतिहास कधीच सरळ रेषेत पुढे सरकत नाही. त्याचे चक्रनेमिक्रम फार उलटसुलट तऱ्हेनं चालतात. झालेल्या ७५ वर्षांचं बळ सोबत घेत, पुढच्या २५ वर्षांकडे वाटचाल करणं आपल्या हातात आहे. ते काम आपण सर्व जण आपापल्या परीनं उत्तम करू या.
७५ वर्षं हा एखाद्या राष्ट्राचा, समाजव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा पुरेसा मोठा कालखंड आहे. अनेक वेळा समाजात त्याबद्दल काहीसा नकारात्मक सूर उमटताना जाणवतो. ‘स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरीही अजून...’ अशी त्या नकारात्मक सुराची प्रस्तावना असते. ‘यापेक्षा ब्रिटिश राज्य परवडलं!’ असं म्हणण्यापर्यंत काही जण जातात. म्हणून स्वातंत्र्योत्तर वाटचालीची ७५ सोनेरी पानं पाहायला, समजून घ्यायला हवीत. ७५च का, कमी किंवा जास्त का नाहीत, असं निश्चित म्हणता येईल. परंतु एक संकेत किंवा रूपक म्हणून ७५ वर्ष पूर्ण करतानाची ७५ सोनेरी पानं असं म्हणता येईल. स्वातंत्र्योत्तर वाटचालीत भारताच्या ऐतिहासिक म्हणाव्यात अशा मोठ्या ७५ उपलब्धी.
त्या ठरवताना विद्यार्थी आणि विचारवंत यांच्याशी मोठ्या प्रमाणात विचारविनिमय करण्यात आला आहे. मात्र ७५ची अंतिम यादी माझी आहे. तेव्हा त्या निवडीचं पाप-पुण्य माझ्या खात्यात जमा होईल. आणखी अमुक-अमुक पानं हवी होती किंवा यात असलेली काही नको होती, ही चर्चा होणं अर्थातच साहजिक आहे. सर्व मतांचा मी आदर करतो.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
७५ वर्षांचा अमृतमहोत्सवी प्रवास करताना एका बाजूला आपण कुठून निघालो, म्हणजे १९४७मध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रांत देशाची काय स्थिती होती आणि ती पाहता आज कुठे पोहोचलो आहोत, याचा परामर्श घेणं हा एक दृष्टीकोन आणि ७५ वर्ष पूर्ण करताना आपण कुठे पोहोचलेलो असायला हवे होतो, त्या भव्य मुक्कामावर पोहोचूसुद्धा शकलो असतो, हा दुसरा दृष्टीकोन झाला. कुठे पोहोचलो आहोत, हे लक्षात घेतल्यास या दोन दृष्टीकोनांचा तोल सावरला जातो.
भारताच्या अलीकडे-पलीकडे १०-२० वर्षांमध्ये स्वतंत्र झालेले अनेक देश आज कोसळून पडण्याच्या (फेल्ड स्टेट्स) उंबरठ्यावर आहेत. तिथली लोकशाही, राज्यघटना कधीच उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक देशांमध्ये तहातहांचे भीषण हिंसाचार आणि रक्तपात झाले आहेत.
तर अर्थातच दुसऱ्या बाजूला भारतासोबतच स्वतंत्र झालेले काही देश आज भारताला कुठल्या कुठे मागे टाकून पुढे निघून गेले आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण कोरियासारखा छोटा देश. १९८०च्या दशकाची सुरुवात होताना तो दलदलीनं ग्रस्त असलेला, मागासलेला, ‘तिसऱ्या जगा’तला देश होता. मात्र आधुनिक विकासाची गती पकडत दरडोई उत्पन्नापासून जगातल्या अद्ययावत तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रांत दक्षिण कोरियानं फार मोठी मजल गाठली. आग्नेय आशियातील अनेक देशांविषयी असं म्हणता येतं. याचा प्रतिवाद म्हणून असंही म्हणता येतं की, हे देश आकारानं छोटे आहेत, त्यांच्या समस्या आणि त्यावरच्या उपायांचा जीवही छोटाच आहे.
म्हणून अशा वेळी अपरिहार्य असलेली चीनशी तुलना समोर येते. खंडप्राय आकार, तशीच प्रचंड लोकसंख्या, शिवाय प्राचीन संस्कृतीचे समान धागे या सर्वांमुळे सतत भारत आणि चीन ही तुलना तर होणारच. १९८१पर्यंत हा चीन सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताच्या मागे होता. मात्र १९७९ ते ८१ या कालावधीत दंग झाव फंग यांच्या नेतृत्वाखाली माओंची साम्यवादी आर्थिक धोरणं सोडून चीननं जागतिकीकरणाच्या नव्या वाटेवर पाऊल टाकलं. ४० वर्षांच्या त्या वाटचालीनंतर आता चीन एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेसमोर उभा ठाकतो आहे. काही अपवाद सोडता जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आज तरी चीन भारताच्या खूप पुढे आहे. याचं भान ठेवून वाटचाल केल्यास पुढच्या २५-३० वर्षांमध्ये भारत नुसता चीनची बरोबरी करू शकतो असं नाही, तर चीनला मागे टाकू शकतो. ती क्षमता भारताकडे आहे. त्या क्षमतेला योग्य धोरण, कार्यक्रम आणि संपूर्ण समूहाच्या अथक कष्टाची जोड आवश्यक आहे. याचं भान बाळगत ही ७५ पानं मांडण्याचा प्रयत्न आहे.
‘माय ग्लास इज हाफ एम्प्टी’ या नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा ‘माय ग्लास इज हाफ फुल’ असा ‘सकारात्मक’ दृष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथात नाही. तर राष्ट्रीय जीवनाच्या शक्यतो सर्व क्षेत्रांचा वेध घेत आधुनिक भारतीय असण्याचा आनंद आणि सार्थ अभिमान वाटावा असं या ७५ वर्षांत जे घडलं, ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून या वाटचालीत काही ठळक घटना (उदाहरणार्थ, १६ डिसेंबर १९७१ला पाकिस्तानची भारतासमोर बिनशर्त शरणागती), तर मुख्यत: अनेक घटनांचा मिळून तयार होणारा घटनाक्रम, त्यातून व्यक्त होणारी प्रक्रिया, त्यातून दिसून येणारा राष्ट्रीय वाटचालीचा ‘ट्रेंड’ आणि व्यक्ती किंवा त्या-त्या वेळच्या काही घटना सामावून घेत, तरीही त्यांच्यापलीकडे जात राष्ट्रीय जीवन चालवणाऱ्या संस्थांची वर्तणूक - असं सगळं कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तरीही त्याचं मला तर कधीही समाधान वाटत नाही. अभ्यासच अपुरा आहे, तो सतत करत राहायला हवं, अशी माझी कायम भावना असते. कारण ‘आता माझा अभ्यास पूर्ण झाला’ असं कधी असतच नाही, हे मला कळलं आहे. अखंड ज्ञानसाधनेचं गणित ‘f(x) टेंड्स टू’ आहे. ‘एक्स’ म्हणजे ज्ञानसाधना, कर्मसाधना. ती कधी पूर्ण झाली, असं असतच नाही. अनंताकडचा, पूर्णत्वाकडचा आपला सर्वांचा प्रवास चालू असतो. आता माझा तो प्रवास जणू पूर्ण झाला, असं असतच नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहत, एका शुद्ध दृष्टीनं आणि संशोधनाची एक कार्यपद्धती वापरून दिसणारं सत्य सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
फिजिक्समध्ये शास्त्रज्ञ हझेनबर्ग याचा ‘अनिश्चिततेचा सिद्धान्त’ (प्रिन्सिपल ऑफ अन्सर्टन्टी) सांगितला जातो. अणुगर्भातल्या हालचालींचा अभ्यास करायचा झाल्यास त्यातल्या कणांची स्थिती किंवा त्यांची गती यांपैकी कोणा एकाचंच निरीक्षण करता येतं. स्थिती (पोझिशन)चं निरीक्षण करायचं झाल्यास, तो एका क्षणाचा जणू स्टिल फोटोग्राफ (स्नॅपशॉट) येतो. त्यात गतीची निरीक्षणं येत नाहीत. याउलट गतीची निरीक्षणं नोंदवायला प्रयोग सेट केला, तर त्यात अणुकणांच्या स्थितीची निरीक्षणं येत नाहीत. विज्ञान म्हणतं, स्थिती आणि गती या दोन्हींच्या नोंदी घेता आल्या, तर पुढचं सगळं भविष्य सांगता येईल. मात्र वैज्ञानिकदृष्ट्या या दोन्हींच्या नोंदी घेता येणंच शक्य नाही, म्हणून सगळ अनिश्चित आहे.
तर हे फक्त विज्ञान आणि त्याच्या अणुगर्भातल्या हालचालींना लागू नाही, तर आपल्या वैयक्तिक जीवनापासून समाजात घडणाऱ्या घडामोडींनाही लागू आहे. आपण त्या घटनांच्या ‘स्थिती’चा किंवा ‘गती’चा वेध घेऊ शकतो. असा वेध घेईपर्यंत मूळ परिस्थितीत बदल झालेला असतो. काही वेळा आपण म्हणतो, की संस्कृती संक्रमणकाळात आहे. मात्र संस्कृती संक्रमणकाळात नसते, असा क्षण केव्हा असतो? व्यक्तीच्या जीवनापासून संपूर्ण संस्कृती सतत संक्रमणकाळातच असते. म्हणून स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांच्या वाटचालीचा हा एक ‘स्नॅपशॉट’ आहे. मुक्त स्त्रीशक्तीविषयी आनंददायक काही म्हणेपर्यंत रोजच्या अत्यंत दुःखद बातम्या येतच राहतात. त्यामुळे त्या-त्या मुद्द्याचं आकलन बदलतं राहू शकतं. जीएसटीच्या निमित्तानं करप्रणालीतील मूलभूत बदलांना सोनेरी पान म्हटलं, तर त्याचं शब्दांकन करून ते मांडेपर्यंत जीएसटीसंदर्भात अनेक बदल होतात! त्यातून निदान प्रश्न पडणं चालू होतं की, त्याला सोनेरी पान म्हणायचं का? किंवा त्या सोनेरी पानाची कडा काळवंडली गेलीय?
एकाहून एक असामान्य चित्रपट देणारे शांताराम बापूसुद्धा म्हणून गेले की, त्यांना स्वतःच्या एकाही चित्रपटाबद्दल कधीही संपूर्ण समाधान नसतं. कारण तो शूट करण्यापासून पुढचं सगळं एडिटिंग इत्यादी प्रक्रिया होईपर्यंतच्या मधल्या काळात व्ही. शांताराम यांच्यातल्या दिग्दर्शकाला असं वाटणं चालू झालेलं असतं की, एखाद्या प्रसंगाला असा-असा दिग्दर्शकीय स्पर्श देता आला असता. म्हणून असमाधान हीच एक बोचरी पण सर्जनशील प्रक्रिया आहे.
शिवाय त्या-त्या घटना किंवा प्रक्रियेकडे आपण केव्हा पाहतो आहोत, यावरूनसुद्धा त्या घटनेचं आकलन ठरतं आणि बदलत्या काळानुसार तेही बदलू शकतं. ‘एव्हरी जनरेशन हॅज टू राइट इट्स ओन हिस्टरी’ - ‘प्रत्येक पिढीला आपला इतिहास स्वत: लिहावा लागतो’, असं फार अर्थपूर्ण विधान इतिहासाच्या अभ्यासाच्या संदर्भात केलं जातं. कारण आपलं मन आणि बुद्धी १९५०च्या दशकात नेली, काळ जसा पुढे सरकतो, तसा होऊन गेलेल्या काळाचा अन्वयार्थसुद्धा बदलत जातो. आपण तर नव्या उभरत्या भारताचं ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ हे एक सोनेरी पान वाटू शकतं. पण पुढे सगळीच मसलत बिघडत गेली. १९६२चा फटका देशाला सोसावा लागला. त्यावरून आकलनही बदलत जातं. तसं हे आजच्या स्थिती-गतीच्या अनिश्चिततेचं भान बाळगून मांडलेलं आकलन आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तशी तर प्रत्येकच घटिताचा अन्वयार्थ मांडण्यात सापेक्षता असतेच. ती देशकालवर्तमानसापेक्ष आहे. विज्ञानमहर्षी आइन्स्टाइन सांगून गेले. ‘ट्रुथ इज रिलेटेड टू द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर’ -‘निरीक्षकाच्या जागेवरून त्याला दिसणारं सत्य कळतं, बदलू शकतं’. प्लॅटफॉर्मवर तुम्ही कुठे उभे आहात यावरून तुमच्याकडे येणाऱ्या आणि तुम्हाला पार करून पलीकडे जाणाऱ्या रेल्वेचं तुमचं आकलन ठरतं. तेव्हा घडामोडींचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त अन्वयार्थ लागणं अगदी शक्य आहे. ‘क्वांटम मेकॅनिक्स’ मांडणारे नील्स बोर असं म्हणून गेले की, कोणत्याही घटनेचे किमान दोन, संपूर्णपणे परस्परविरुद्ध अन्वयार्थ लावता येणं शक्य आहे, आणि ते दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकतात. भारतीय विचारात याला ‘अनेकांतवाद’ आणि ‘स्यादवाद’ अशी नावं आहेत. खरं म्हणजे या सर्व जाणिवेतूनच सहिष्णू वैचारिक दृष्टीकोन तयार होतो. ७५ सोनेरी पानांचं हे मला झालेलं दर्शन. जसं मला झालं, तसं मांडतो आहे.
या ७५ वर्षांमध्ये भारताचं राष्ट्रीयत्व सर्व संकटांचा सामना करत अधिकाधिक बळकट होत गेलं. या देशातली लोकशाही आणि राज्यघटना यांची पाळंमुळं खोलवर पोहोचत अधिकाधिक पक्की होत गेली. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातली प्रगतीसुद्धा प्रत्येक भारतीयाला आपल्या भारतीय असण्याबद्दल आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास वाटावा अशी आहे. दुग्धोत्पादन, औषधनिर्माण, टेलिकॉम, ऊर्जा अशा क्षेत्रांचा परामर्श घेताना भारतानं करून दाखवलेली जागतिक पातळीची प्रगती आपल्याला आपल्या भारतीय असण्याचा अभिमान आणि आत्मविश्वास देईल.
अजूनही अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत ज्या भारताला ‘स्थितिवादी’ - न बदलणारा म्हणतात, त्या कोट्यवधींच्या खंडप्राय भारतानं ज्या वेगानं अनेक बदलांचा स्वीकार केला आहे, असे बदल स्वीकारून काही क्षेत्रांत तर येणाऱ्या बदलांचं नेतृत्व करू शकेल अशा स्थितीपर्यंत पोहोचला आहे, हीसुद्धा ७५ वर्षांतली आनंददायक वाटचाल आहे. या देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाच्या प्रवासात चढ-उतार होत चालत आलेला शाश्वत सांस्कृतिक आत्मा कायम ठेवून त्याला बदलत्या काळानुसार नवनवे आयाम भारत देश देऊ शकला आहे. अर्थातच अजूनही अनेक अपयशं, अडचणी आणि आव्हानं आहेत. पण आपण ती पेलू शकू, हा आत्मविश्वास बाळगण्याइतकी वाटचाल ७५ वर्षांत आपण केली आहे.
चीनशी असलेल्या स्पर्धेला किंवा शत्रुत्वाला सुद्धा फार मोठा जागतिक अर्थ आहे, हे आपण विसरायला नको. चीनची राज्यव्यवस्था सर्वकषवादी एकपक्षीय हुकूमशाही आहे. भारतानं उघड्या डोळ्यांनी लोकशाहीचा स्वीकार केला. सामान्य माणसाला सन्मानाचं जिणं देण्यापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्जनशील अभिव्यक्ती करण्यापर्यंत हकूमशाहीपेक्षा लोकशाही अधिक प्रभावी ठरते, हे दाखवून देण्याची आपली सर्वांची ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती पेलण्यासाठी मिळालेल्या अनमोल स्वातंत्र्याचं मोल आपण सर्वांनी उरात बाळगलं पाहिजे. ज्यासाठी हजारो सत्याग्रहींनी छातीवर लाठीचे वार सोसले, शेकडो क्रांतिकारक हसत-हसत फासावर लटकले; त्यांच्या बलिदानातून मिळालेलं हे अनमोल स्वातंत्र्य आहे. त्याचं जतन करणं, संवर्धन करणं आणि आपल्या स्वतंत्र प्रतिभेतून त्यात सर्जनशील असं नवयोगदान देणं, हे आपलं सर्वांचं काम आहे. ते काम करायला ही ७५ सोनेरी पानं प्रेरणा देऊ शकली, तर मी स्वत:ला धन्य समजेन.
‘७५ सोनेरी पाने : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे’ - अविनाश धर्माधिकारी
राजहंस प्रकाशन, पुणे
मूल्य - १००० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment