यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे ते शेवटचे काही तास होते. मी दक्षिण दिल्लीतल्या एका ओक्याबोक्या थिएटरमध्ये आमीर खानचा ‘फारेस्ट गम्प’वर बेतलेला ‘लालसिंग चढ्ढा’ नावाचा सिनेमा बघण्यात वेळ घालवत होतो. त्या वेळी, अर्धशतकातल्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेल्या लालसिंग चढ्ढाच्या रोमहर्षक प्रवासाच्या कहाणीपेक्षा माझ्या आसपासच्या रिकाम्या खुऱ्याच खूप काही सांगत होत्या, सुचवत होत्या. दशकभरापूर्वी मध्यमवर्गावर ब्रँड आमीर खानच्या असलेल्या मोहिनीमुळे असा सिनेमा अगदी सहजपणे तगून गेला असता. हिट, सुपरहिट अशा पायऱ्या चढत आमीर खानची ब्रँड व्हॅल्यू वाढवता झाला असता. परंतु आज ‘लालसिंग चढ्ढा’ या सिनेमाला आलेल्या अपयशाने त्या ब्रँडच्या शेवटावर शिक्कामोर्तब केले आहे.
मध्यमवर्गीयांचा डार्लिंग
एक काळ असा होता, भारतासाठी आमीर खान प्रतिष्ठेच्या सर्वोच्च पायरीवरचा अभिनेता होता. म्हणजे, अमेरिकेत ओप्रा विन्फ्रे जर आमीरसारखीच सुपरस्टार असती, तर अमेरिकेतही तिला आमीर खानइतकीच सर्वोच्च प्रतिष्ठा मिळाली असती. ‘रंग दे बसंती’ (२००६) आणि ‘पीके’ (२०१४) या आठ वर्षांच्या कालखंडात आमीर खान हा भारतीय मध्यमवर्गीयांसाठी जणू अलौकिक अवतार बनला होता. या कालखंडाचा सर्वोच्च क्षण त्याने संचालित केलेला ‘सत्यमेव जयते’ (२०१२-२०१४) नावाचा सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा टॉक शो ठरला होता. या काळात आमीर खान त्याच्या खास प्रेक्षकांसाठी आकांक्षा आणि असंतोषाचा, आदर्श आणि धाकाचा वाहक बनला होता. नव्हे, अशा रितीनेच त्याने स्वतःला योजले होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मध्यमवर्गाला डंख संशयाचा
तत्पूर्वी २००० दशकाच्या मध्यापर्यंत येताना, भारतातल्या मध्यमवर्गामधल्या राजकीय व्यवस्थेविरोधातल्या खदखदीने फसफसून बाहेर पडायला सुरुवात केली होती. या अवस्थेचे वर्णन करताना, प्रोफेसर लीला फर्नाडिस यांनी त्यांच्या ‘इंडियाज न्यू मिडल क्लास’ नावाच्या पुस्तकात लिहिले होते की- जागतिकीकरण आणि उदारीकरणातोत्तर कालखंडापासून मध्यमवर्गाचे राजकारण हे नेहमीच मतपेढीच्या राजकारणापासून आणि जनाधारित राजकारणावर भ्रष्टांच्या असलेल्या दुष्प्रभावापासून लोकशाहीचे रक्षण करण्याच्या हेतूने प्रेरित होते, नाही असे नाही, परंतु त्याच वेळी या मध्यमवर्गाच्या मनामध्ये जनवादी संस्था-संघटनांबद्दल, आपल्यापेक्षा तळाला असलेल्या जातींबद्दल आणि मुस्लिमांबद्दल संशयही वाढू लागलेला होता. त्या टप्प्यावर मध्यमवर्गीयांच्या मनातल्या लोकशाहीविषयक चिंता दोन परस्परव्यापी प्रवाहामार्गे अभिव्यक्त होऊ लागल्या होत्या. याचा एक अर्थ असा होता की, हा मध्यमवर्ग दोन वेगवेगळ्या दिशेने, वेगळ्या तऱ्हेने अभिव्यक्त होऊ लागला होता.
यातला एक आवाज, बहुसंख्याकवादी हिंदूंचा होता. मुख्यतः बाबरी मशिदीचा विध्वंस घडवून आणल्या गेल्यानंतर हा आवाज वाढू लागला होता, मध्यमवर्गीयांमध्ये सर्वधर्मसमभावाऐवजी प्राधान्यक्रमाने हिंदुत्व विचारधारा भिनू लागली होती. राजकीयदृष्ट्या याचा परिणाम भारतातल्या मध्यमवर्गीयांनी काँग्रेसऐवजी आक्रमक हिंदुत्वाचा पुकारा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात दिसू लागला होता.
भ्रष्टाचारविरोधातली धुंदी
यातला दुसरा आवाज हा प्रचलित राजकारणाविषयी घृणा बाळगणाऱ्यांचा होता. राजकारणातल्या गिन्याचुन्या अभिजनवादी आणि भ्रष्ट मनोवृत्तीच्या नेत्यांमुळेच या देशाच्या प्रगतीला खीळ बसली असल्याचे या मंडळींचे उच्चारवाने म्हणणे होते. पुढे अण्णा हजारेंनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पुकारले, तसे राजकारणाबद्दल घृणा बाळगणाऱ्या या मंडळींच्या अभिव्यक्तीने शिखर गाठले. जलप्रपात व्हावा, अशा रितीने देशातला मध्यमवर्ग एका धुंदीत अण्णा हजारेंनी पुकारलेल्या आंदोलनात उतरला. त्यात आमीर खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या काही मोजक्या कलावंतांपैकी होता, ज्याने उघडपणे या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. शेवटी, आमीर खान नावाचा ब्रँड मध्यमवर्गाच्या मनातल्या कल्पनाचित्राशी सुसंगत असाच तर होता. मध्यमवर्गाच्या कल्पनेत या देशातली राजकारण हीच सगळ्यात मोठी समस्या ठरली होती. राजकारण हीच देशात उफाळून येणाऱ्या संघर्षाची, भेदभावाची, तडजोडी आणि भ्रष्टाचाराची जननी आहे, असा या मध्यमवर्गाचा ठाम समज होता. त्यामुळे भारताला घेरून असलेल्या समस्यांवरचे उत्तर प्रचलित भ्रष्टाचाराने लडबडलेले राजकारण हे नसून, तंत्रज्ञानातल्या जाणकारीवर बेतलेल्या प्रशासकीय प्रारूपात, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या उद्यमशीलतेत आणि बांधीलकी आणि प्रामाणीकरण या जीवनमूल्यांत त्या समस्यांचे उत्तर दडले आहे, यावर हा मध्यमवर्गीय विश्वास ठेवून होता. कालांतराने आपला आवाज पोहोचवण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’ हे या मध्यमवर्गाचे राजकीय वाहन बनले. राजकारणाच्या तिरस्कारातून आकारास आलेल्या आंदोलनातून नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला. मध्यमवर्गाला सशक्त व्यासपीठ मिळाल्याचा भास झाला.
प्रगतीवादाचे विद्वेषी प्रारूप
यातून जो प्रगतीवाद समाजात रुजत गेला, त्यातून आपल्याला म्हणजेच हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना ‘रंग दे बसंती’सारखा सिनेमा मिळाला. त्यात नीतिमूल्यांचे शहरी रक्षक असलेले तरुण प्रतीकात्मकरित्या, बिभत्स राजकारण्याचा खात्मा करतात आणि त्या कृतीने अवघा देश ढवळून निघतो. आमीर खानच्या मध्यमवर्गीय प्रेक्षकांसाठी तर हा मनातला सिनेमा होता. या सिनेमाने खदखदत असलेल्या मध्यमवर्गाला भगतसिंगांच्या धर्तीवर हिंसक क्रांतीचा मार्ग जणू मोकळा करून दिला होता, पण देशाच्या राजकारणात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या याच मध्यमवर्गाने नैतिक श्रेष्ठत्व मिरवण्याच्या धुंदीत भगतसिंगांच्या जात, वर्ग आणि धर्मविषयक क्रांतिकारक विचारांना आनंदाने झटकूनही टाकले होते.
नैतिकतेचा दंभ
सत्तेच्या परिघातल्या उतरंडीला झुगारून आकारास आलेला नैतिक श्रेष्ठत्वाचा हाच दंभ आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या टॉक शोमधूनसुद्धा प्रकषनि झळकला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजात जागृती घडवून आणत, जातभेद, स्त्री भ्रूणहत्या, बाललैंगिक शोषण, हुंडाप्रथा, वैद्यकीय क्षेत्रातली गैरकृत्ये आदी समस्यांमध्ये समाजाच्या हस्तक्षेपास प्रोत्साहन देण्याचा होता. हे सारेच अत्यंत महत्त्वाचे नि जळजळीत मुद्दे होते. परंतु टीकाकारांच्या मते, हा कार्यक्रम चांगला विरुद्ध वाईट किंवा सज्जन विरुद्ध दुर्जन, या संघर्षातून निर्माण होणाऱ्या क्षोभप्रधान नाट्यापलीकडे फारसा कधी गेलाच नाही.
पण, इथे आमीर खान सत्याची पाठराखण करत दुर्जनांचा नाश करू पाहणाऱ्या ‘राम’ आणि ‘युधिष्ठिरा’च्या भूमिकेत शिरलेला होता. किंवा या टप्प्यावर आपल्याला असेही म्हणता येते की, आमीर खानमध्ये तेव्हा ‘थ्री इडियट’वाला रँचो (आणि प्रतीक्षेत असलेला ‘पीके’मधला अवकाशमानव) डोकावत होता. तो मनाच्या चांगुलपणाच्या जोरावर किंवा इतरांपेक्षा श्रेष्ठ तर्काच्या आधारे देशात संस्थात्मक बदल घडवू पाहात होता. परंतु, हे दोन्ही सिनेमे त्यातला सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्य पाहता, एका अर्थाने ‘रंग दे बसंती’च्या तुलनेने फारसे प्रस्थापितविरोधी नव्हते. ते समाजाला पोखरून काढणाऱ्या घातक व्यक्तीविरोधात अधिक होते.
पॉला चक्रवर्ती आणि श्रीला सरकार या दोन अभ्यासकांच्या मते, ‘सत्यमेव जयते’ने मध्यमवर्गीय उद्यमींच्या चांगल्या कार्यातला आणि अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकारमधला फरक ठळक केला. पुढे जाऊन या कार्यक्रमाने सामाजिक चुकांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवरच्या मनाला समाधान देणाऱ्या उपायांना वलय देण्याचा प्रयत्न केला. यामुळे झाले असे की, वर्तमानातल्या समस्या होऊन बसलेल्या लैंगिकता आणि लिंगभेदविषयक नीतिनियमांतून उद्भवणाऱ्या समस्यांना भिडताना आवश्यक असलेल्या राजकीय संघर्ष किंवा राजकीय लढ्याच्या संबंधांतल्या चर्चेलाच अटकाव घातला गेला.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
ब्रँड आमीरवर बालंट
परंतु या सगळ्यांतूनच प्रगतीवादाच्या स्वीकाराची सुखावह भावना देणारा ब्रँड आमीर खान मध्यमवर्गीयांना भुरळ घालत गेला. या ब्रँडचे यश, ‘तुम्हीच खरेखुरे नीतिमूल्यांचे वाहक आहात, देशाला पोखणारे, अधोगतीकडे घेऊन जाणारे जे काही चुकीचे घडत आहे, ते तुमच्या या नीतिमूल्यकेंद्री व्यवस्थेच्या बाहेर घडते आहे, त्यात दोष तुमचा नाहीच आहे’, असे मध्यमवर्गीयांच्या मनावर ठसवण्यात होते. वस्तुतः हेच मध्यमवर्गीय होते, जे १९९१ नंतरच्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेचे सगळ्यात मोठे लाभधारक ठरले होते. याच काळात सरकारने सामाजिक न्यायकेंद्री कल्याणकारी धोरणांना तिलांजली देत भांडवलदारांना अमर्याद संपत्तीसंचयासाठी आणि ग्राहकांना बाजारपेठ खली करून देण्यासाठी उद्योगस्नेही धोरणे राबवली होती. एरवी, जात आणि वर्ग व्यवस्थेचे सगळ्यात जास्त फायदे तर याच मध्यमवर्गाच्या वाट्याला आले होते. जगात असे लाभ अभावानेच कुणा समूहांना मिळाले होते.
जर नेहरूकालीन मध्यमवर्ग हा जर तळाच्या जातींची उपेक्षा करणारा होता असे म्हटले, तर उदारीकरणानंतरचा मध्यमवर्ग वर्ग विषमतेविषयी, जातीयतेविषयी अंधत्व बाळगून होता, असेच म्हणावे लागेल. ज्या क्षणी आमीर खानने मध्यमवर्गाच्या या अंधत्वाला आव्हान दिले, जाणीवपूर्वक जोपासलेल्या अनभिज्ञतेला सवाल केले, त्या त्या क्षणी ब्रँड आमीरला खोक पडत गेली.
बहुसंख्याकवादाला उधाण
आजचा मध्यमवर्ग एकाच आवाजात बोलत आहे. त्याला काय म्हणायचे आहे, तेही सुस्पष्ट आहे. हा आवाज हिंदू बहुसंख्याकवादी मध्यमवर्गीयांचा आहे. मी त्याच दक्षिण दिल्लीतल्या थिएटरमध्ये बसून लालसिंगचा सिनेमातला बऱ्यापैकी उथळ, अ-राजकीय, सत्कर्मकेंद्री मानवतावाद (हाच ब्रँड आमीरचा गाभाही राहिला आहे.) अनुभवत होतो, पण तो मानवतावाद रिकाम्या खुर्च्यांवर आणि बोळे घातलेल्या प्रेक्षकांच्या कानांवर आदळत होता.
याच थिएटरमध्ये काही महिन्यांपूर्वी मी राष्ट्रवादाच्या चढत्या झिंगेस प्रतिसाद देणारा दुसरा एक सिनेमा पाहिला होता. थिएटर खचाखच भरलेले होते. प्रत्येक दृश्याला प्रेक्षकांच्या दणाणून टाकणाऱ्या घोषणांचा प्रतिसाद मिळत होता. भावनेच्या भरात प्रेक्षक रडत होते, मुसमुसत होते, त्वेषाने चित्कारत होते. त्या सिनेमाचे नाव ‘दी काश्मिर फाइल्स’ हे होते. या सिनेमाची मांडणी सरळसरळ इस्लामद्वेषाची पेरणी करणारी होती. तो सिनेमा जाणीवपूर्वक जनभावनेच्या लाटेवर स्वार होऊन अपेक्षित परिणाम साधताना दिसत होता.
राजकारणाला आणि मध्यमवर्गाला कलाटणी
हे स्पष्ट होते. राजकारणविरोधी आवाज आता सहजपणे हिंदुत्वाच्या आवाजात मिसळून गेल्याचे दिसत होते. याचे एक कारण, राजकारणविरोधी आवाज भुसभुशीत अशा नैतिक पवित्र्याच्या आधारावर आकारास आलेला होता. तो त्या अर्थाने स्खलनशीलही होता. तर हिंदुत्वाच्या आवाजाला कडवट विचारधारेचे अधिष्ठान होते. त्यामुळे अंतिमतः घडले असे होते की, अण्णा हजारेंनी पुकारलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या लाटेवर अत्यंत चलाखीने स्वार होत आधी नरेंद्र मोदी आणि तदनंतर योगी आदित्यनाथ यांसारख्या आक्रमक नेत्यांनी स्वतःला ‘भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ’ या प्रतिमेत पेश करण्यास प्रारंभ केला होता. ते करताना, ते त्यांच्या विरक्तीयुक्त जगण्याचे सातत्याने दाखले देत होते. आमचे ना कौटुंबिक हितसंबंध आहेत, ना वर्गीय हितसंबंध आहेत, हेच त्यांना त्यातून जनतेच्या मनावर प्राधान्याने ठसवायचे होते.
एकीकडे, टीव्ही न्यूज मीडिया आणि ‘सत्यमेव जयते’ या टॉक शोने तंत्राधारित व्यवस्थेचा आग्रह जोरकसपणे लावून धरलेला होता. त्यामुळे राजकारण ही अर्थराजकीय व्यवस्थेच्या परिघातली शासनसत्तेच्या आणि साधनसंपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी आवश्यक अशी वाटाघाटीची अव्याहत प्रक्रिया असते, याचे भान सोडून घेतल्या गेलेल्या सर्वव्यापी कार्यक्षमतेच्या ध्यासामुळे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आकारास आलेल्या ‘मंडल पॉलिटिक्स’ला आणि डाव्या पक्षांच्या जनचळवळकेंद्री राजकारणाला मोठाच धक्का बसला. या नंतर झालेल्या पडझडीतून जी नवी भूमी आकारास आली, त्यावर हिंदुत्ववादी शक्तींनी ताबा मिळवला. ‘सबका साथ, सबका विकास’ हा या शक्तीचा सातत्यपूर्ण नारा आहे. फक्त या ‘सबका साथ’मधून मुस्लीम अल्पसंख्याकांना वगळण्यात आले आहे.
हिंदुत्वकेंद्री अजेंड्याचे वाहक
मधल्या काळात, या मध्यमवर्गीयांवर हिंदुत्ववादी विचारांचा अक्षरशः चहूबाजूंनी मारा होत आलेला आहे. त्यातून बहुसंख्यांकवादी अजेंडा रेटण्याचे काम अव्याहत सुरू आहे. आपल्या सगळ्या चिंता, मनातली भीती, राग, द्वेष, विखार ‘परक्या’ मुस्लिमांकडे वळवण्याचे आता त्यांना पुरेसे प्रशिक्षण मिळालेले आहे. हाच मध्यमवर्ग आता अग्रक्रमाने हिंदुत्वाच्या विचारधारेचा कडवा समर्थक बनलेला आहे. थोडेसे आश्चर्यचकित करणारे, बऱ्याच प्रमाणात भयकारक वाटणारे रेसिडेंशियल सोसायट्यांमधले व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्वस्तरीय मध्यमवर्गीयांच्या हिंदुत्वकेंद्री राजकीय मतांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.
ब्रँड आमीरला ग्रहण
गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेत झालेले हे बदल हेरून ‘आम आदमी पार्टी’ने अत्यंत चाणाक्षपणे दोन तडजोडी केल्या, एक म्हणजे, त्यांनी हिंदुत्वाशी जोडलेल्या प्रतीकांना आपलेसे करण्यास सुरुवात केली. दुसरे म्हणजे, जनतेला मोफत सेवा पुरवण्याचे नवे राजकीय प्रारूप विकसित केले. त्यात, त्यांनी मध्यमवर्गाचाही समावेश असेल, असे पाहिले. त्यामुळे आता चित्र असे दिसते, दिल्लीतला मध्यमवर्ग यशस्वी प्रशासकीय प्रारूपामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला भरभरून मतदान करतो आणि जेव्हा लोकसभेची निवडणूक असते, तेव्हा हाच मध्यमवर्गीय मतदार आपले वैचारिक सख्य असलेल्या भाजपला मते देतो. याचमुळे आम आदमी पार्टी अजूनही हिंदुत्वाने प्रेरित-भारित मतदारांना आपला आवाज देण्यासाठी, त्यांना पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यासाठी मोठमोठ्याने हातपाय मारताना दिसत आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या सर्व पार्श्वभूमीवर ब्रँड आमीर खानला लागलेले ग्रहण खूप मोठा धडा देताना दिसत आहे. तो म्हणजे, आजचे प्रगतीशील राजकारण हा सत्तेत प्रभावी स्थानी असलेल्या नीतिवानांच्या कृतीचा परिपाक जराही नाही, तर राजकीय संघर्षात टिकून राहण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून त्यांना सत्तेच्या पटावर चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचा हा परिणाम आहे.
‘लालसिंग चढ्ढा’ सिनेमाच्या अखेरच्या भागात देहभान सुटलेला नायक धावायला सुरुवात करतो, धावता धावता तो गाव-शहर-प्रांत असे पार करत जातो आणि एका क्षणी अचानक थांबतो. आपण आतापर्यंत काय करत होतो नि आता काय करतोय, यासंबंधातले गोंधळलेले भाव त्याच्या चेहऱ्यावर मटतात, जणू त्याला स्वतःलाच प्रश्न पडतो- व्हॉट वॉज दी पॉइंट... या साऱ्याचा अर्थ तरी काय?
प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना जाहीर दिलगिरी व्यक्त करून आणि आपल्या देशभक्तीची ग्वाही देऊनही, आमीर खान ‘लालसिंग चढ्ढा’ या सिनेमाला अपयशापासून रोखू शकला नाही. अशा वेळी, या साऱ्याचा अर्थ तरी काय आहे? कदाचित हाच प्रश्न आपल्या ब्रँडबाबत या घडीला आमीर खानला छळत असणार आहे...
.................................................................................................................................................................
असीम अली हे दिल्लीस्थित राजकीय संशोधक आणि सदरलेखक आहेत.
अनुवाद - टीम ‘मुक्त-संवाद’
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘दी टेलिग्राफ’ या दैनिकात २० ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment