‘घाव मेरा घेहरा, हैं अगला नंबर तेरा’ असा संदेश लिहीत हातात कोयता घेत व्हॉट्सअॅपला फोटो लावणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी बारामती येथे एका प्रौढ व्यक्तीची हत्या केली.
नेपोलिअन हिल या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाने म्हटले आहे की, जेव्हा माणसं पहिल्यांदा गुन्ह्यांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते त्याचा तिरस्कार करतात, मात्र हळूहळू गुन्ह्याच्या सहवासात राहून लोकांना त्याची सवय होऊन काही काळानंतर त्यांना ते आवडायला लागतात. सध्या असंच काहीसं आपल्या आजूबाजूला घडत आहे. सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे. मोबाइल दिला नाही म्हणून आईची हत्या, सिगरेट दिली नाही म्हणून मित्राचा जीव घेणं, अशा बातम्या नित्याच्या होऊ लागल्या आहेत. करोना काळापासून हे प्रमाण आणखीनच वाढलं आहे.
गेल्या ५-१० वर्षांत स्मार्टफोनमुळे आपल्या सगळ्यांच्या मेंदूत नको त्या गोष्टी शिरल्या. त्यातही ओटीटी व सोशल मीडियामुळे २४ बाय ७ नको ते आपल्या मेंदूवर आदळत आहे. स्मार्टफोन व सोशल मीडियाची रचनाच जाणीवपूर्वक आपल्या मेंदूला गुंतवून ठेवण्यासाठी केलेली आहे. यासाठी जगभरातील हुशार मानसशास्त्रज्ञ तंत्रज्ञांसोबत काम करतात. दारू, सिगरेट, अंमली पदार्थ घेतले की, जी नशा येते, तशीच नशा स्मार्टफोन व सोशल मीडिया वापरल्यावर येईल, अशी सोय केलेली असते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्यामुळे जे आई-वडील आपल्या लहान बाळाला जेवू घालताना यु-ट्युब दाखवतात, ती एकप्रकारे त्याला दारूच पाजत असतात, असं म्हणता येईल. सतत मोबाइल खेळत राहिल्याने लहान मुलांमध्ये काही लक्षणीय बदल घडतात. त्यातून आक्रमकता व हिंसक वृत्ती तयार होते. स्मार्टफोनवरील वेगवेगळ्या अॅप्सचा संबंधित मोबाईलधारक जास्तीत जास्त वापर कसा करेल, अशाच प्रकारे बनवलेली असते. त्यासाठी रीतसर मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.
ही अॅप्स या दोन प्रकारची असतात. पहिला, supplement आणि दुसरा, addictive. Supplementमध्ये बँक, उबेर, ओला, झोमॅटो यासारखी अॅप्स येतात, तर addictiveमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिकटॉक, इन्स्टाग्राम व ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म येतात. ही अॅप्स Persuasive Designच्या तत्त्वांचा वापर करून बनवलेली असतात. त्यामुळे त्यांची रचना मानवी मेंदूवर वेदनाशामक औषधासारखा परिणाम करते.
अल्बर्ट बंडुरा या मानसशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार लहान मुलं-मुली आजूबाजूच्या मोठ्या लोकांकडूनच आक्रमक वर्तणूक शिकतात. त्याचे काय परिणाम होतात, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे काय करावं, करू नये हे सांगणारे आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक नसतील, तर ही मुलं हमखास चुकीच्या मार्गाला लागतात.
बंडुरा यांचा अभ्यास टीव्ही व सिनेमा यांच्यावर आधारित होता. त्यामुळे त्याला काही प्रमाणात बंधनं होती, मात्र इंटरनेट व सोशल मीडियाच्या काळात कोणीही कधीही काहीही बघू शकतं. त्याचा कोवळ्या वयातील मुलांवर वाईट परिणाम होत आहे. थेरगाव क्वीन हे एक उदाहरण होतं. प्रत्यक्षात अशी असंख्य उदाहरणं आहेत, त्यातली अनेक प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचत नाहीत.
Association of Adolescent and Child Care in India (AACCI) या मुंबईस्थित संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई व गुरगाव येथील शाळेतल्या मुला-मुलींमध्ये आक्रमकता व हिंसा यांचं प्रमाण चिंताजनक आहे. सर्वच माध्यमांतून भांडण, मारामार्या व धक्काबुक्की हे जगण्याचं एकमेव अस्त्र असल्याप्रमाणे मिरवलं जातं. आई-वडील किंवा आजूबाजूची मोठी माणसं तेच करत असतील आणि वृत्तवाहिन्या, सिनेमा, टीव्ही, यांवरही पाहायला मिळत असेल, तर मुलांना तेच खरं वाटू लागतं.
सध्या ‘नेटफ्लिक्स’वर सुरू असलेल्या ‘The Sandman’ या वेबसिरीजमधली सगळी पात्रं काल्पनिक असली, तरी ज्या खुबीनं ती लिहिली व पडद्यावर दाखवली जात आहेत, ते ‘बायबल’ समजलं जाईल की काय, अशी भीती वाटते.
संज्ञात्मक मज्जातंतूशात्रज्ञ (cognitive neuroscientist) डॉ. कॅरोलिन लीफ यांच्या मते ऑनलाइन असताना आपला मेंदू तार्किक विचार करू शकत नाही. सोशल मीडियावर तुम्ही काय बघता, यावरून तुमचा मेंदू प्रत्येक क्षणाला बदलतो. त्यामुळे त्याची काम करण्याची तऱ्हा बदलून जाते, तो गोंधळून जातो. १९७० सालच्या मेंदूच्या ब्रेन मॅपिंग प्रतिमा व इन्स्टाग्रामच्या काळातील ब्रेन मॅपिंग प्रतिमा यांत खूप फरक आहे. इन्स्टाग्राम काळात मेंदू वेड्यासारखं वागतोय, असंही डॉ. कॅरोलिन लीफ यांना आढळून आलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मोबाईलचे लहान मुलांच्या मेंदूवर काय व कसे परिणाम होतात?
१) सतत मशीन सोबत राहिल्यानं सामाजिक क्षमता कमी होऊन माणसांसोबत व्यवहार करण्याची, नाती जोडण्याची व निभावण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते.
२) मशीन बटन दाबलं की, चटकन मनाप्रमाणे वागतं, मात्र माणसं तशी वागत नाहीत. परिणामी लहान मुलांचा संयम कमी होऊन चिडचिड होते.
३) ज्यांना घरी माया मिळत नाही, त्यांना सोशल मीडियाचं व्यसन लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.
४) मानवी मेंदू २५पर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही. त्यामुळे २५च्या अगोदर लागलेलं कुठलंही व्यसन सहजासहजी सुटत नाही. उलट अशी मुलं-मुली उतावळी, अति-आक्रमक, सारासार विचार न करू शकणारी अशी होतात.
५) ज्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात दुःख, एकटेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, दुबळी स्व-प्रतिमा, आर्थिक विवंचना अशा समस्या असतात, ते मोबाईलचा वापर तात्पुरती सुटका व चटकन मिळणारा आनंद यासाठी करतात.
६) पूर्वी वाढत्या वयातील मुलं-मुली घरी प्रेम व काळजी मिळत नसेल तर बाहेर प्रेम शोधत. सोशल मीडियामुळे त्याला ‘समाजमान्यता’ मिळाली आहे. हजारो फॉलोअर्स असल्याने १०वी नापास मुलीलाही आपण सेलिब्रिटी असल्याचा ‘फील’ येतो.
७) राजकीय नेत्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत वाढवलेला सोशल मीडियाचा वापर हासुद्धा अजाणत्या वयातील मुला-मुलींच्या मनावर खोल परिणाम करतो आहे. मोठी मंडळी करतात, तर आपण का नाही, असं म्हणत सगळेच ट्रेंड फॉलो करतात. जे करत नाहीत, त्यांची टर उडवली जाते.
८) जी मुलं-मुली एरवी मोबाईल बघत नव्हती, तीही करोना काळातल्या ऑनलाईन शिक्षणामुळे पॉर्न, व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली आहेत.
९) मोबाईलच्या वापरामुळे ADHD म्हणजे Attention-deficit hyper activity disorderचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. याला मराठीत ‘अति-चंचलतेचा आजार’ म्हणता येईल.
१०) ब्रेन फॉग म्हणजे लक्ष केंद्रित करू न शकणं, विचारात सुस्पष्टता नसणं, झोप नीट न लागणं, विसर भोळेपणा, दृष्टी कमजोर होणं… ही लक्षणं वाढत्या वयातील मुलांमध्ये दिसून येत आहेत.
Pew Researchने केलेल्या संशोधनानुसार अमेरिकेत पौगंडावस्थेतील मुलांना मोठ्या प्रमाणावर टिकटॉक व इन्स्टाग्रामचं व्यसन लागलं आहे, त्यांचा फेसबुकचा वापर मात्र कमी झाला आहे. पहा -
https://www.pewresearch.org/internet/2022/08/10/teens-social-media-and-technology-2022/
२०१९च्या एका संशोधनानुसार फोनच्या सततच्या वापरामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींमध्ये कानाच्या मागच्या बाजूच्या हाडाची अतिरिक्त वाढ (शिंगासारखं हाड) आढळून येत आहे. हे तीन वर्षांपूर्वीचं संशोधन आहे. करोना काळात तर सर्वच वयोगटातल्यांकडून स्मार्टफोनचा अति वापर झाला आहे. त्यावरून त्यांच्या मेंदूचं काय झालं असेल, याची कल्पना येऊ शकते. पहा -
गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये आत्महत्येचं प्रमाण आधीच्या तुलनेत प्रचंड वाढलं असून आठवड्याला सरासरी चार शालेय मुला-मुलींच्या आत्महत्या होत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियाचा सर्वांत जास्त प्रभाव होता, असा लंडनच्या Royal College of Psychiatristsचा अभ्यास आहे.
World Psychiatric Associationच्या एका संशोधनानुसार सोशल मीडिया मेंदूला लवकर म्हातारं करतो. मानवी मेंदू कोणत्याही प्रतिमेला शब्दांच्या तुलनेत ६०,००० टक्के लवकर लक्ष देतो. सोशल मीडिया हे प्रतिमेचं जग असल्यानं आपल्या मेंदूची मूळ रचना बदलत आहे. सतत स्क्रोल करत राहिल्यानं मेंदूतील प्रेरणा स्थानाला लकवा मारल्यासारखं होतं. एवढी माहितीवर प्रक्रिया करताना मेंदूत भीती निर्माण होते. ते अनैसर्गिक आहे. यामुळे मेंदू अर्थपूर्ण गोष्टी, उदा., चांगला संवाद करण्याचा कामाचा राहत नाही. किनार्याजवळच्या उथळ पाण्यात सतत राहिल्यानं खोल सागरात जाण्याची सवय किंवा हिंमत होत नाही, त्याचप्रमाणे मेंदू क्लिष्ट व अर्थपूर्ण गोष्टी करू शकत नाही.
Baroness Greenfield यांच्या मते कल्पना करण्यामुळे मेंदूला बौद्धिक खाद्य पुरवलं जातं (हे अल्बर्ट आइनस्टाईननेदेखील कित्येक दशकापूर्वी सांगून ठेवलं आहे). आपली अंतर्गत विचार करण्याची पद्धत आपल्या नियंत्रणात असते. ती सोशल मीडियाने पूर्णपणे काबीज केली आहे. त्यामुळे मेंदू विकृतीकडे झुकत आहे.
हिंसेच्या उदात्तीकरणासोबत लैंगिक सुखासंबंधीच्या कल्पना इंटरनेट व सोशल मीडियाने कोवळ्या मेंदूत घुसवल्या आहेत. पॉर्न कोणत्याही वयाच्या व्यक्तीला उपलब्ध आहे. त्यामुळे सतत लैंगिकदृष्ट्या हवंसं वाटेल असं वागणं (कपडे, मेकअप), सतत सेक्सशी संबंधित गोष्टी करणं, लहान वयात शरीरसंबंध प्रस्थापित करणं, त्यातून गर्भारपण, शारीरिक आजार, हे प्रकार वाढताना दिसत आहेत.
भारतात लग्न शक्यतो जातीत केलं जातं, पण लग्नाच्या अगोदर आणि हल्ली नंतरसुद्धा सतत लैंगिक सुखात वैविध्य शोधण्याचे प्रकार खूप आहेत. जी मंडळी असं करत नाही, त्यांना नपुंसक, भित्रा किंवा अगदी समलिंगी ठरवण्यापर्यंत भारतीयांची मनोवृत्ती गेली आहे. हिंसा व लैंगिकता यांनी ओसंडून वाहत असलेले मेंदू १०० टक्के गुन्हेगारीकडे वळतात. हिंसा व लैंगिक सुख हे लक्ष्य असलेल्या मेंदूला दुसरी नशाही लागतेच, त्यासाठी अंमली पदार्थ, दारू, सिगरेटचा वापर होतो.
हे सर्व प्रकार प्रामुख्यानं अमेरिका व ब्रिटनमध्ये सुरू झालेले असले तरी त्यांना आता भारतासारख्या १४० करोड जनता असलेल्या देशातही आपलं बस्तान बसवलं आहे. पण अमेरिका व ब्रिटनकडे असलेली आरोग्य यंत्रणा व कडक प्रशासन यामुळे त्यांना यावर उपाययोजना करणं सोपं जाईल. याउलट आपलं आहे. आपल्या देशात एकीकडे राजकारणीच सोशल मीडिया वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहन देतात, तर दुसरीकडे सायबर यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. मग हे आव्हान कोण समजून घेणार?
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
इन्स्टाग्रामवरील १०-१५ सेकंदांचे रील्स बघण्यामुळे मेंदूचा लक्ष्य देण्याचा कालावधी (attention span) कमी होत चालला आहे. कारण माहिती ग्रहण (information overload) अति प्रमाणात झाल्यामुळे नवीन माहिती घेण्याची व ती प्रक्रिया करत साठवण्याची मेंदूची क्षमता शिल्लक राहत नाही. फेसबुक व इन्स्टाग्रामवरील टुकार व बिनकामाच्या रील्सची संख्या आणि त्यांना मिळणारे लाखो व्ह्यूज बघितले की, सर्वच वयोगटातील भारतीय आपला अमूल्य वेळ किती मोठ्या प्रमाणावर वाया घालवत आहेत, यावर शिक्कामोर्तबच होतं.
१९८९ नंतरची मिलेनिअल पिढी व १९९७ नंतरची जेन झेड पिढी निव्वळ सोशल मीडियावर प्रदर्शन मांडणं व कामात चाल-ढकल करण्यात अग्रेसर आहे. सर्वच प्रकारच्या नात्यातील गोंधळ आता हिंसक होत चालला आहे. मध्यंतरी पैठणमधील बाजारपेठेत दोन मुलींच्या गटात एका मुलावरून झालेली हाणामारी याचं आणखी एक बोलकं उदाहरण आहे. फेसबुक २००४ला सुरू झालं, इन्स्टाग्राम २०१० साली, तर टिकटॉक २०१६. या सर्व कालखंडात जन्माला आलेल्या पिढ्यांची मेंदूची रचना आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच वेगळी झाली आहे. त्याचे हिंसक परिणाम सध्या सर्वत्र दिसत आहे.
यावर उपाय काय?
१) सोशल मीडियावर विशिष्ट वयाच्या खाली प्रौढ कंटेंट दिसू नये, असा अल्गोरिथम सोशल मीडिया कंपन्यांना सक्तीचा करायला लावणं. इंटरनेट जेवढं होईल, तेवढं स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं.
२) पालक व शिक्षक यांना जागृत करणं.
३) स्मार्टफोनऐवजी साधा हँडसेट मुलांना देणं.
४) वय वर्ष १५पर्यंत मुलांना कोणत्याही प्रकारचा मोबाइल/कॉम्पुटर वापरू न देणं.
५) सायबरतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांच्या साहाय्याने सायबर यंत्रणा मजबूत करणं.
६) समुपदेशन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणं.
.................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment