२१ उगवते तारे : तेजस ठाकरे, सुरज येंगडे, कुणाल कामरा, रणजितसिंह डिसले, कौस्तुभ विकास आमटे, राहुल घुले, राज कांबळे, उमर खालिद, सुजात आंबेडकर, कुणाल राऊत, रोहित पवार, आलिया भट, रिंकू राजगुरू...
ग्रंथनामा - झलक
संपादक राजा कांदळकर
  • ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 02 September 2022
  • ग्रंथनामा झलक १०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे 101 Prabhavshali Maharashtriyan aani 21 Ugavate Tare राजा कांदळकर Raja Kandalkar

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यातले हे २१ उगवते तारे...

.................................................................................................................................................................

तेजस ठाकरे : पर्यावरणवादी ठाकरे

बाम माशाची नवी प्रजाती शोधली आणि तेजस ठाकरे जगभर प्रसिद्ध झाला. पण हे एका रात्रीत झालं नाही. पक्षीतज्ज्ञ सलीम अली मुंबईकर. देशाला माहीत होते. त्यांच्यानंतर ही जागा भरून काढली तेजसने. त्याच्या घरातला वारसा राजकारणाचा. पण ज्युनिअर ठाकरे नवा सलीम अली झाला. तेजस रमतो वनात. सागर किनाऱ्यावर. वन्य जीव संशोधनात.

या संशोधनात त्याला गोड्या पाण्यात राहणारा आंधळा मासा सापडला. प्रवीणराज, अनिल मोहापात्रा आणि अनम पवन कुमार या सहकाऱ्यांसह तेजसने हा मासा शोधला. या माशाचं नाव त्यांनी ‘रक्थमिचिस मुंबा’ असं ठेवलं. खेकड्यांच्या पाच जाती त्याने शोधल्या. ‘बोइगा ठाकरे’ ही सापाची एक नवी जातही त्याने शोधलीय. तेजसची ओळख आता तरुण पर्यावरणवादी अशी जगभर होतेय.

.................................................................................................................................................................

डॉ. सुरज येंगडे : ग्लोबल आंबेडकरवादी

‘कास्ट मॅटर्स’ या इंग्रजी बेस्ट सेलर म्हणून गाजलेल्या पुस्तकाचा लेखक म्हणून सूरज सध्या सुपरिचित आहे. हे पुस्तक नुकतेच मराठीतही अनुवादित झाले आहे. भारतीय संशोधक, मानवाधिकार कार्यकर्ता, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ता आणि वकील अशी सूरज येंगडे याची ओळख आहे.

तो मूळचा नांदेडचा असून अमेरिकेतली हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलमधील ‘इनिशिएटिव्ह फॉर इन्स्टिट्युशनल अँटि-रेसिझम अॅण्ड अकाउन्टेबिलिटी’मध्ये पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून तो कार्यरत आहे. जातव्यवस्थेचा अभ्यासक म्हणून सूरजला जागतिक मान्यता मिळाली आहे. तो विविध वृत्तमाध्यमांतून कॉलत लिहीत असतो. याशिवाय ‘द रॅडिकल इन आंबेडकर’ या पुस्तकाचे सह-संपादन केले आहे. ‘जीक्यू इंडिया’ मासिकानं २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये त्याचा समावेश केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कुणाल कामरा : निर्भिड कॉमेडियन

जानेवारी २०२०. कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो विमान कंपनीने प्रवासासाठी बंदी आणली. त्यानंतर इतर कंपन्यांनीही बंदी घातली त्यांच्या प्रवासावर. तेव्हा जगभर स्टॅण्डअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या बाजूने लोक उभे राहिले. इंडिगो विमानात पत्रकार अर्णब गोस्वामीला थेट भिडला होता तेव्हा तो. पण त्याआधीच मुंबईकर कुणालचे जगभर १८२ मिलियन लोक चाहते झाले होते. त्याच्या युट्युब चॅनलचे २ मिलियन सबस्क्रायबर आहेत.

राजकीय व्यक्ती, घटनांवर विनोदी कॉमेंट करत कामरा राजकीय नेते, व्यवस्था यांचा लोक विरोधी चेहरा आहे तसा दाखवतात. सोशल मिडियात हिरो आहे कुणाल कामरा. केंद्र सरकार टरकन असतं त्याला. विनोद करण विदूषकाचं काम नाही. मोठी प्रगल्भ बुद्धिमत्ता लागते विनोद निर्मितीला. कुणाल कामरा हे त्याचं जितं जागतं उदाहरण.

.................................................................................................................................................................

राहुल कोसंबी : विचारक

राहुल हे समकालीन मराठी साहित्यातले वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘उभं आडवं’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१७ युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात कोसंबी यांचे साहित्य, संस्कृती, दलित, अत्याचार अशा विविध विषयांवरील निबंध एकत्रित केले आहेत. राहुल यांनी सामाजिक विषयांवर राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक अंगानं सातत्यानं लेखन केलं आहे. शिवाय ‘नॅशनल बुक ट्रस्ट’साठी मराठी आणि कोकण विभागाचे काम पाहतात. त्यांनी नॅशनल बुक द्रस्टच्या अन्य भाषेतले दर्जेदार बालसाहित्य मराठीत अनुवादित केलं आहे. ते ‘मुक्त शब्द’चे संपादकीय सल्लागार आहेत. सध्या ते ‘दलित नवमध्यमवर्ग’ या विषयात संशोधन करत आहेत.

.................................................................................................................................................................

राहुल कराड : यंग लीडर्स विद्यापीठ

आधी शिक्षण संस्थाचालक. पुण्यातील एमआयटी या शिक्षण संस्थेमार्फत विविध प्रयोग करणारे शिक्षणतज्ज्ञ अशी ख्याती आहे राहुल विश्वनाथ कराड यांची. एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत ते. एमआयटीच्या छत्रीखाली ७० संस्था आहेत. त्यांचं नेतृत्व करतात राहुल कराड.

काही करणाऱ्याची ऊर्जा असलेल्या, उद्याच्या नेतृत्वाची शक्यता असलेल्या देशभरातील शेकडो तरुणांची ‘युवा संसद’ दरवर्षी ते भरवतात. उद्याच्या यंग लीडर्सची युनिर्व्हसिटी बनला आहे त्यांचा हा उपक्रम. देशातल्या टीचर्स काँग्रेसचे ते संस्थापक आहेत. पाच हजार शिक्षक जोडलेले आहेत त्या संस्थेशी. शिक्षण, शांतता, लोकशाही आणि राजकीय नेतृत्व प्रशिक्षण या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

.................................................................................................................................................................

रणजितसिंह डिसले : ग्लोबल टीचर

ग्लोबल टीचर प्राइज हा एक दशलक्ष डॉलर्सचा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय टीचर म्हणजे डिसले गुरुजी. २०२०मध्ये वार्की फौंडेशनने त्यांचा हा जगप्रसिद्ध पुरस्कार देऊन गौरव केला. माहिती तंत्रज्ञान आणि क्युआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं नवं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं.

सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शाळेत ते शिकवतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांना टेक्नोसॅव्ही होण्याची प्रेरणा देणारी छोटेखानी आयटी प्रयोगशाळाच त्यांनी सुरू केलीय. जून २०२१ ते जून २०२४ या काळासाठी जागतिक बँकेचे शिक्षणविषयक सल्लागार आहेत डिसले गुरुजी.

.................................................................................................................................................................

कौस्तुभ विकास आमटे : सेवेचा वसा

आनंदवनाची धुरा सध्या सांभाळताहेत डॉ. कौस्तुभ विकास आमटे. आनंदवन हा बाबा आमटे यांचा अचाट आणि अदभुत जीवन प्रयोग. कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर, आदिवासी यांना माणूसपणानं जगता यावं म्हणूनचा खटाटोप. चंद्रपूर जिल्ह्यात वरोराजवळ हा प्रकल्प आहे. कोविडच्या काळात डॉ. कौस्तुभ यांच्यातला नेतृत्वगुण उजळून निघाला. कुष्ठरुग्णांना औषध उपचार आणि व्हॅक्सीन त्यांनी दिली. सर्वांना अडचणीत मायेनं सांभाळलं. आनंदवन समाजभान अभियानाचं नेतृत्व करताहेत.

.................................................................................................................................................................

डॉ. राहुल घुले : वन रुपी क्लिनिक

खेड्यातल्या शिक्षकाचा मुलगा. मराठवाड्यातल्या भूम परांड्याचा. मुंबईत केईएमच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला. डॉ. राहुल घुले. अलीकडच्या काळात त्यांच्या ‘वन रुपी क्लिनिक’ची चर्चा आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर त्यांनी हे क्लिनिक सुरू केले.

कोविड काळात कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात डॉ. घुले यांनी चार तात्पुरती कोविड हॉस्पिटल्स उभी केली होती. २५००हून अधिक बेड्स त्यांची टीम सांभाळत होती. डॉ. घुले आणि त्यांच्या टीमच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल आघाडी सरकारमधील बहुतेक नेत्यांनी घेतली.

लोकांना परवडणाऱ्या आरोग्य सोयी मिळाव्यात यासाठी नवेनवे प्रयोग करतात डॉ. राहुल घुले. ते छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष होते. ओबीसी मेडिकोचंही संघटन त्यांनी बांधलं होतं. चळवळ्या स्वभाव आहे त्यांचा. आरोग्य क्षेत्रातही त्यांची चळवळ सुरू आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राज कांबळे : राजमुद्रा

जाहिरातीच्या क्षेत्रात जगभर पोचलेलं नाव म्हणजे राज कांबळे. कितीतरी Cannes आणि सूवर्णपदकं. १५० अवॉर्डस नावावर आहेत. नेस्ले, पीएनजी, बर्गर किंग, युनिलिव्हर, व्हॅसलिन आणि गुगल. प्रत्येक बॅण्डवर राजमुद्रा आहे. कधी लंडन, कधी न्यूयॉर्क, कधी मुंबई असा सतत प्रवास असतो. कोझिकोडे आयआयएमच्या बोर्डावर, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि केलॉग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील व्याख्याते. माझगावच्या मराठी शाळेत शिकलेत राज कांबळे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून गोल्ड मेडल मिळवलंय. ओबामाच्या कॅम्पेनमध्येही होते राज कांबळे. प्राऊड मुंबईकर असलेले राज कांबळे आजही जमिनीवर आहेत. नम्र आणि हसरे. तितकेच हेल्फफुल.

.................................................................................................................................................................

उमर खालिद : अमरावतीकर उमर

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय उमर खालिद. दोन वर्षे जेलमध्ये आहे.

फेब्रुवारी २०२०मध्ये दिल्ली दंगल झाली. आरोपीचे चेहरे व्हायरल व्हिडिओ फुटेजमधून जगाने पाहिले. दिल्ली पोलिसांनी दोषी सोडून अनेक निष्पापांना गुन्हेगार ठरवून जेलमध्ये कोंबलं आहे. उमर खालिद त्यापैकी एक!

सध्या दिल्लीकर असलेला उमर हा ‘मराठी माणूस’ आहे. त्याचे वडील विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ‘तळेगाव’चे निवासी. आपल्या विविध भाषणांत तो महाराष्ट्राशी असलेलं नातं अभिमानानं मिरवतो.

मुंबईच्या छात्र भारती संमेलनात त्याचं भाषण सर्वांत प्रभावी होतं. तो म्हणाला होता, ‘वो लाठी चलायेंगे, हम तिरंगा उठायेंगे. वो गोली चलायेंगे, हम सिने को संविधान लगायेंगे.’ त्याचं प्रत्येक भाषण जामियाच्या पायऱ्यांवरून मौलाना आझाद यांनी दिलेल्या भाषणाची आठवण करून देतं. एकतेची हाक देणारं आणि गांधी मार्गाचं आग्रह धरणारं,

.................................................................................................................................................................

रोहित पांडे : ‘नवा’ काळ

जयश्री निळकंठ खाडिलकर यांचा मुलगा रोहित पांडे हे आता ‘नवाकाळ’चे नवे संपादक आहेत. शंभर वर्षांची पत्रकारितेची देदिप्यमान परंपरा आहे ‘नवाकाळ’ला. निळकंठ खाडिलकर अग्रलेखांचा बादशहा झाले. ‘नवाकाळ’ गरिबांचे मुखपत्र बनले.

सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवून हादरुन सोडणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जयश्री खाडिलकरांनी पेलला. आता ‘नवाकाळ’चा ‘नवा’ काळ रोहित पांडेंच्या हातात आहे

.................................................................................................................................................................

निखिला म्हात्रे : टीव्ही९चा चेहरा

बातमी वाचायची नसते तर सांगायची असते. मग ती लोकमनाला भिडते. टीव्ही९ मराठीच्या निखिला म्हात्रे यांनी बातमी सांगायचा ट्रेंड प्रभावी केला. टीव्ही९चा चेहरा म्हणजे निखिल म्हात्रे, असं घराघरात समीकरण बनलंय. महिला पत्रकारांची परंपरेतल्या त्या तरुण आणि आश्वासक संपादक, पत्रकार आहेत. अँकर आणि प्रेक्षक यांच्यातलं अंतर टीव्ही९ने कमी केलंय, त्यात निखिला यांचा वाटा महत्त्वाचा. बातमीचं अचूक विश्लेषण, स्पष्ट भाषा, अभ्यासू वृत्तनिवेदन हे निखिल म्हात्रे यांचं विशेष.

.................................................................................................................................................................

सुजात आंबेडकर : पणतू बा भीमाचा

वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे युवा नेते. सुजात आंबेडकरांची ही ओळख आता विस्तारत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत. त्यांच्या आई डॉ. अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या विश्वस्त असून समाजवादी चळवळीतल्या आघाडीच्या नेत्या आहेत. सुजातला घरातूनच आंबेडकरवादी आणि समाजवादी आंदोलनाचे बाळकडू मिळाले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून बी.ए.चे शिक्षण घेतल्यानंतर त्याने एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम, चैन्नई येथून पत्रकारितेचा कोर्स केला. नुकतेच लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. सुजात कला-साहित्यात रमतो. उत्तम ड्रमर आहे. ‘अल्टर थिअरी’ नावाच्या बँडशीदेखील संलग्न आहे. भविष्यात संगीतच्या माध्यमातून पॉलिकिल स्टेटमेंट करणारा बँड तयार करण्याचा त्याचा मानस आहे. जेएनयूचे विद्यार्थी कन्हैया कुमार यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यकमात सुजात आणि त्याच्या समर्थकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा

खोटा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. सर्व स्तरांतून मोठी टीका झाल्यावर प्राचार्यांनी आरोप मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर पहिल्यांदा चर्चेत आला.

.................................................................................................................................................................

सत्यजीत तांबे : ग्लोबल शैली

सत्यजीत सुधीर तांबे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते. त्यांनी व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलीय. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनडी स्कूलमधून त्यांचं शिक्षण झालं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी छाप पाडली. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी राबवलेल्या ‘सुपर ६०’ या उपक्रमामुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळाली. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. ‘युवकांचा जाहीरनामा’ काढून त्यांनी ‘युवा धोरणा’वर विशेष भर दिला. सत्यजीत यांना लिखाणाची आवड असून, त्यांनी लिहिलेले ‘आंदोलन’ हे पुस्तक विशेष गाजले. गविन न्यूजन यांनी लिहिलेल्य शहरीकरण आणि लोकसहभाग यावर आधारित ‘सिटीझनविले’ या इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी भाषांतर केले आहे.

.................................................................................................................................................................

कुणाल राऊत : आंबेडकरी सूर

पाच लाख अठेचाळीस हजार मतं घेऊन कुणाल राऊत महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालाय. मास कम्युनिकेशनमध्ये एम.ए. केलंय. व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली त्याने. विद्यार्थिदशेतच राजकारण आणि समाजकारणात रस घेतला. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे ते सुपुत्र. आंबेडकरवादी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या घरात कुणालला राजकारणाचे धडे मिळाले. ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाला. सलग दोन टर्म युवक काँग्रेसचे सरचिटणीस पद सांभाळले. जातीयवादी आणि भांडवली शक्तींच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनआंदोलन उभं करण्याचा त्याचा मानस आहे.

.................................................................................................................................................................

आदित्य ठाकरे : सभ्य युवा नेता

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण चेहरा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे आदित्य ठाकरे प्रमुख आहेत. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.ए.चे शिक्षण घेतले, तर के.सी. लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण. आदित्य यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. मराठी अस्मितेचे राजकारण उभे करणारे बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पोत बदलणारा नेता म्हणून आदित्यकडे पाहिलं जात आहे.

‘माय थॉट इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ हा त्यांचा कवितासंग्रह इंग्रजी, हिंदी, मराठीत प्रकाशित झाला आहे. तर गीतांचा ‘उम्मीद’ नावाचा अल्बम.

त्यांनी बदललेली एकेकाळची बकाल वरळी पहायला स्वतः अजितदादा गेले होते. तिथले रस्ते, चौक अन् फुटपाथ त्यांच्या कवितेसारखे सुंदर झालेत. शाळा दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या. भगव्या रंगाचा कुठेही सोस नाही. आधुनिकतेचा स्पर्श मात्र सर्वत्र आहे. आदित्य यांची शिवसेना आता व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत नाही.

.................................................................................................................................................................

रोहित पवार : पवारांचा नातू

रोहित पवार हे शरद पवारांचे नातू. मात्र नात्यागोत्याच्या पलीकडे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं काही कळत नाही, ही गृहितकं मोडीत काढली त्यांनी. त्यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही. शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. शरद पवारांकडे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे. त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते. परदेशात शिक्षणासाठी न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची धुरा खांद्यावर घेतली. व्यवसायात सक्रीय झाले. पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात उतरले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ‘सृजन’ हा उपक्रम त्यातीलच एक. सृजनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण, तरुणींना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजनही ते करत असतात. कर्जत - जामखेडचे आमदार आहेत ते.

.................................................................................................................................................................

आदिती तटकरे : हजरजबाबी अभ्यासू

सुनील तटकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळात महत्त्वाचे मंत्री होते. त्यांची दोन्ही मुलं विधिमंडळात आहेत. त्यांच्यासारखीच सभ्य आणि सुसंस्कृत. मुलगा अनिकेत विधानपरिषदेत आहे, धाकटी आदिती विधानसभेत. आदितीला राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली, पण पहिल्याच अधिवेशनात मोठ्या बापाची बुजरी मुलगी ही प्रतिमा आदिती तटकरे यांनी पुसून टाकली. प्रश्नांचं आकलन, पक्कं होमवर्क आणि अभ्यास यांच्या जोडीला हजरजबाबी उत्तरं यामुळे आदिती तटकरे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

राज्यमंत्र्याला फार वाव नसतो म्हणतात, पण सभागृहात उत्तरं देण्याची संधी मिळते. आदिती तटकरे यांनी या संधीचं पहिल्याच दणक्यात सोनं केलं. राज्यमंत्री म्हणून अनेक खाती असतात. त्याचं दडपण कधीच नसतं. तयारी करूनच त्या सभागृहात येतात. मंत्रालयात बसतात तेव्हा रिझल्ट देतात. शरद पवार आणि सुप्रिया ताईंची निवड अचूक ठरली आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आलिया भट  : फिमेल सुपरस्टार

सध्याची सर्वांत लोकप्रिय मुंबईकर अभिनेत्री आहे आलिया महेश भट.

बॉलिवुडचा अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केलं. म्हणून काही तिची लोकप्रियता नाही. ‘गंगुबाई काठीयावाडी’ हा चित्रपट गाजतोय तिचा. या चित्रपटाची नायिका आहे ती. कामाठी पुयातलं सेक्स वर्करचं जीवन त्यात आहे. त्या महिलांची नेता म्हणून गंगुबाई सर्वांच्या लक्षात राहते.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून ती पडद्यावर आली. त्यानंतर ती अल्पावधीतच सर्वांत प्रभावी ठरली.

तिच्या ‘राजी’ चित्रपटाने एक अरबपेक्षा जास्त कमाई केली. महिलाप्रधान चित्रपट एवढी कमाई करू शकतो, हे बॉलिवुडमध्ये पहिल्यांदा घडलं.

.................................................................................................................................................................

रिंकू राजगुरू : मराठी सुपरस्टार

‘सैराट’ची आर्ची सर्वांच्या पसंतीत उतरली. प्रत्येक मराठी घरात पोचली रिंकू राजगुरू. रिंकूचं मूळ नाव प्रेरणा महादेव राजगुरू. अकलूजच्या या मुलीने विशीच्या आत अभिनेत्री म्हणून फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची जागा पक्की केली. नागराज मंजुळेने तिला अचूक शोधलं. अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवून तिने स्वतःला सिद्ध केलं. नागराजने ‘झुंड' या पहिल्या हिंदी सिनेमासाठी तिलाच निवडलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिने आपली जागा तयार केली आहे.

.................................................................................................................................................................

रितेश देशमुख : लय भारी

हिंदी सिनेमात स्वतःचं स्थान असणारा मराठी चेहरा म्हणजे रितेश विलासराव देशमुख. अभिनेता, कॉमेडीयन, टीव्ही स्टार आणि चित्रपट निर्माता. ‘हाऊसफुल’, ‘नमस्ते लंडन’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि इतर हिंदी फिल्मस्मध्ये रितेश यांचा अभिनय पसंतीस उतरला. ‘लय भारी’ या मराठी सिनेमातील रितेश यांचा अभिनय सर्वांच्या लक्षात आहे. बॉलिवुडमध्ये मोठा झालेला मराठी स्टार रितेश देशमुख आता मराठी अस्मितेचा एक भाग झाला आहे.

.................................................................................................................................................................

‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर

लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई

पाने - १४०

मूल्य - २००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......