लेखांक एक
“संघाच्या कार्यात भाग घ्यायचा, तर स्वयंसेवकाला स्वतःची विश्लेषणात्मक बुद्धी आणि स्वतःचा विवेक यांना तिलांजली द्यावीच लागेल,” हे गोळवळकर गुरुजी यांचे वाक्य, प्रसिद्ध कन्नड लेखक देवनुरू महादेव यांनी त्यांच्या सध्या गाजत असलेल्या ‘आरएसएस - खोली आणि व्याप्ती’ या पुस्तकात उदधृत केले आहे. हे पुस्तक वाचताना त्यांनी संघाला विरोध करण्याच्या भरात आपल्या विवेकाला आणि विश्लेषणात्मक बुद्धीला तिलांजली दिली आहे काय, असे वाटू लागते.
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा आणि सध्याचे आघाडीचे विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव या दोघांनीही या पुस्तकाची भरमसाठ स्तुती केली आहे. त्यामुळे या वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ विरोधकांनीसुद्धा आपला विवेक सोडून दिला आहे काय, असे वाटते.
संघाने आणि विशेषतः भाजपने खोटेपणाची आणि अपप्रचाराची राळ देशभर उडवून दिली आहे. त्याला त्याच पद्धतीने विरोध करण्याची गरज काही लोकांना वाटू शकते, पण संघाच्या खोटेपणाला तेवढ्याच विखारी खोटेपणाने उदारमतवादी जर उत्तर देणार असतील, तर त्यांच्या आणि संघाच्या मनोवृत्तीत फरक तो काय राहिला?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
म. गांधी यांचे एक फार महत्त्वाचे वाक्य आहे - “You must be the change you want to see in the world.” (या जगात जो बदल तुम्हाला करायचा आहे तो पहिल्यांदा तुमच्या स्वतःमध्ये दिसला पाहिजे.) संघाची जीवनदृष्टी खोट्या सिद्धान्तांवर उभी आहे. तिचा पराभव करायचा असेल तर आपण पहिल्यांदा ‘खरे’ बोलायला शिकले पाहिजे. आणि नेमके हेच देवनुरू महादेव यांच्या पुस्तकात दिसत नाही. संघाचे लोक आततायी सिद्धान्त मांडून आततायी निष्कर्ष काढताना दिसतात. त्यासाठी पुरावे म्हणून सोयीच्या गोष्टी अधोरेखित करतात. तीच पद्धत देवनुरू महादेव वापरणार असतील, तर त्यांनी उदारमतवादाच्या छावणीमध्ये संघाची एक शाखा उघडली आहे, असेच म्हणावे लागेल. थोडक्यात, एखादा संघवाला आपल्या विरोधकांवर जशी टीका करेल, त्याच पद्धतीने देवनुरू महादेव यांनी संघावर टीका केली आहे.
संघ ही एक मनुवादी संघटना आहे, हे मांडताना देवनुरू महादेव गोळवळकर गुरुजींची आणि सावरकरांची वाक्ये उदधृत करतात. पन्नासच्या दशकामध्ये नुकत्याच जन्माला आलेल्या भारताच्या घटनेला संघाने कसा विरोध केला होता, हे सांगतात. त्याचबरोबर भारताच्या घटनेच्या ठिकाणी ‘मनुस्मृती’ची स्थापना व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन संघाने कसे केले होते, हेसुद्धा सांगतात. या आधारावर ते म्हणतात की, संघाला आज पुन्हा एकदा ‘मनुस्मृती’ची स्थापना घटनेच्या ठिकाणी करायची आहे.
आजच्या जगात स्त्रियांची कर्तबगारी तळपू लागली आहे. आरक्षणामुळे जी काही थोडीफार आर्थिक सुबत्ता वाट्याला आली आहे, त्यामुळे दलितांच्या एकंदर आत्मविश्वासात वाढ झाली आहे. या दोन गोष्टी बघता, ‘मनुस्मृती’च्या स्थापनेचा विचार संघाला कधी करता येईल, असे वाटत नाही.
सत्ताधीश कितीही समर्थ असला तरी जनमताचा रेटा काय आहे, हे बघूनच त्याला आपले राजकारण करावे लागते. सर्वंकष सत्ता हासील केलेल्या मोगलांना हे चुकले नाही. तीनशे वर्षे अनिर्बंध सत्ता असूनदेखील अखंड भारताचे सोडा, एका उत्तर प्रदेशाचेसुद्धा संपूर्ण ‘इस्लामीकरण’ त्यांना करता आले नाही. सर्वशक्तिमान ब्रिटिश साम्राज्याचे हात १८५७च्या बंडात पोळले. तेव्हापासून त्यांनी भारताच्या धर्मकारणामध्ये जनक्षोभ होईल, अशी ढवळाढवळ करायची नाही, असे ठरवले. संघाला या सगळ्याची जाणीव आहे. आपण या आधुनिक युगात ‘मनुस्मृती’चे रूपांतर घटनेत करायचे म्हटले, तर किती गोंधळ उडेल, याची संघनेतृत्वाला पुरेशी जाणीव आहे.
‘संस्कार भारती’ नावाची एक संघप्रणित संघटना आहे. ती कला आणि संस्कृती संदर्भातील गोष्टी हाताळते. ‘मनुस्मृती’मध्ये काही दुरुस्त्या केल्या पाहिजेत, अशी मागणी या ‘संस्कार भारती’ने नुकतीच केली आहे. स्त्रिया आणि दलित, यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह भाग ‘मनुस्मृती’मधून गाळले जावेत, अशी ही मागणी आहे. (संदर्भ - इंडियन एक्सप्रेस १४ मे २०१७.)
अशा चर्चांमध्ये संघ अर्थातच उतरत नाही. आपल्यामध्ये जो बदल करावा लागतो आहे, तो बदल करून संघ मोकळा होतो. हा सगळा प्रकार चालू असताना मधूनच ‘मनुस्मृती’चा उदोउदो संघप्रणित संघटना करत असतात. हे सारे संघाच्या उच्चवर्णीय प्रतिगामी अनुयायांना खुश करण्यासाठी केले जाते.
जी गोष्ट ‘मनुस्मृती’ची, तीच आरक्षणाची. संघाचे उच्चवर्णीय प्रतिगामी अनुयायी आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात एखादे वाक्य संघनेतृत्वाला अधून-मधून बोलावे लागते. (तेवढे एक वाक्य, या प्रतिगामी लोकांना पुरते ही एक वेगळीच मौज आहे!)
खरं तर, संघाने राजस्थानात घेतलेल्या आपल्या ‘समन्वय बैठकी’त आरक्षणावरची आपली भूमिका जाहीर केली आहे. या वेळी “भारतातील सामाजिक आणि आर्थिक विषमता बघता आरक्षण राहिले पाहिजे, या मतावर संघ पोहोचला आहे” असे संघाने स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय, “हे आरक्षण, लाभार्थी जातींची इच्छा असेपर्यंत चालू राहायला हवे” असेही स्पष्टपणे जाहीर केले आहे. (संदर्भ - द प्रिंट, ९ सप्टेंबर २०१९)
२०१५च्या बिहार निवडणुकीच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, “आरक्षण नीतीबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.” या वाक्यामुळे संघाच्या उच्चवर्णीय प्रतिगामी समर्थकांमध्ये उत्साहाची आणि आनंदाची लाट उसळली होती. खरं तर, हे वाक्य भागवतजी मनापासून बोलले होते, असे म्हणता येणार नाही. त्यांचे हे वाक्य, आपल्या उच्चवर्णीय आणि प्रतिगामी अनुयायांना खुश करण्यासाठी होते, असेच म्हणावे लागेल. कारण २०१५च्या बिहार निवडणुकीत लालू यादव आणि नीतीश कुमार एकत्र होते. भाजप निवडणूक हरणारच होती. मग आपल्या प्रतिगामी समर्थकांना का खुश करायचे नाही?
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हेच मोहन भागवतजी पुढे २०२० साली म्हणाले होते, “आरक्षणाचा लाभ सर्व लाभार्थींना मिळत नसल्यामुळे भाजपला निवडणुकांमध्ये मोठे नुकसान होऊ शकते.” यापुढे जाऊन ते असेही म्हणाले की, “जोपर्यंत लाभार्थी जातींना गरज वाटते आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे.” (संदर्भ - दै. जनसत्ता, २० ऑक्टोबर २०२०).
‘मनुस्मृती’ आणि आरक्षण या संदर्भातील ही उलटी-सुलटी वक्तव्ये बघितली की, आधुनिक भारतातील राजकीय परिस्थिती हाताळताना संघाची कशी फरफट होते आहे, हे आपल्या लक्षात येते.
उत्तर प्रदेश किंवा कुठल्याही राज्यातील भाजपच्या उमेदवारांची यादी पाहिली, तर किमान ६० टक्के ओबीसी दिसून येतात. पंतप्रधान मोदी स्वतः ओबीसी आहेत. त्यांच्या उदयानंतर भाजप फक्त उच्चवर्णीयांचा आणि बनियांचा पक्ष राहिलेला नाही, तो ओबीसींचाही पक्ष झाला आहे, असे भल्याभल्यांना वाटू लागले आहे. हे सर्व चित्र बघता, सत्ता आणि जनसमर्थन सांभाळण्याच्या नादात संघाला काँग्रेसच्याच मार्गावर चालायला लागते आहे की काय, असे अनेकांना वाटू लागले आहे.
मात्र देवनुरू महादेव यांनी असे चित्र रंगवले आहे की, संघ संपूर्ण देश ताब्यात घेऊन सगळ्या मध्यम आणि खालच्या जातीतील लोकांना पुन्हा एकदा अस्पृश्यतेच्या जोखडात ढकलणार आहे. परंतु, ‘मनुस्मृती’ आणि आरक्षण याबद्दलचे व्यामिश्र चित्र बघता देवनुरू महादेव यांच्या विधानात फारसा अर्थ असल्याचे दिसत नाही. त्यांना आक्रस्ताळेपणा करायची अनावर ऊर्मी आली, एवढाच फार तर त्यांच्या प्रतिपादनाचा अर्थ निघू शकतो!हीच अवस्था बऱ्याच उदारमतवाद्यांची आहे. संघ हा एक वाघोबा आहे आणि तो लवकरच भारतीय लोकशाहीच्या कोकराला गिळंकृत करणार आहे, अशी भीती उदारमतवाद्यांना वाटत आहे. पण लोकशाहीच संघाला गिळंकृत करू शकते, ही शक्यता देवनुरू महादेव यांच्यासारखे उदारमतवादी गृहित धरतच नाहीत. ओबीसी, दलित आणि संघ यांच्या संदर्भात येथे अजून एक ‘डायनॅमिक्स’ काम करते आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. प्रसिद्ध समाजशात्रज्ञ एम.एन. श्रीनिवास यांनी ‘संस्कृतायझेशन’ ही संकल्पना मांडली आहे. ही जातीपातींनी पिचलेल्या भारतीय समाजात दिसून येणारी प्रक्रिया आहे. यात खालच्या जातीतील लोक वरच्या जातींच्या रूढींचे आणि जीवनशैलींचे अनुकरण करत जातीच्या पायऱ्या चढू लागतात (अपवर्ड कास्ट मोबिलिटी!). याच भावनेपोटी अनेक ओबीसी आणि दलित यांना संघाच्या ब्राह्मणी विचारशैलीचे आकर्षण वाटते. हे लोक संघाचा अनुनय केवळ या आकर्षणापोटी करत आहेत.
कांचा इलय्या शेफर्ड लिहितात की, “मुस्लीमविरोधी लढाया मुख्यत्वेकरून ओबीसी आणि दलित लढतात. त्यांना असे वाटत असते की, संघाच्या पाठिंब्यावर आपल्याला या समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल. भाजप सत्तेत आल्यावर हिंदू धर्मामध्ये आपल्याला समान हक्क प्राप्त होतील, असे या लोकांना वाटत असते. आणि जर ते मिळाले नाहीत, तर हेच लोक संघावर आणि त्याच्या ‘ब्राह्मणवादा’वर उलटू शकतात.” (संदर्भ - द प्रिंट, १७ ऑगस्ट २०२१).
थोडक्यात, आपल्या ओबीसी आणि दलित अनुयायांना संघाने हातोहात फसवले, असे होऊ शकत नाही. तसे फसायला ओबीसी आणि दलित म्हणजे काही ‘आर्मचेअर उच्चवर्णीय’ नाहीत. राजकारणामध्ये आर्मचेअर उच्चवर्णीयांच्या फक्त उथळ भावना पणाला लागलेल्या असतात. या लोकांचे बाकी सगळे अगदी व्यवस्थित चाललेले असते. त्यामुळे त्यांना आरक्षणाच्या विरोधात एखादे वाक्य बोलून फसवता येते. अगदीच वेळ आली की, आता ‘पाकव्याप्त काश्मीर घेऊन टाकायची वेळ आली आहे’, असे सांगून टाकायचे. तेवढ्यावर वर्षभर हे लोक आपल्या मिशीला तूप लावून फिरत राहतात.
सर्व परिस्थिती अशी असताना श्री देवनुरू महादेव लिहितात की, बजरंग दल आणि श्रीराम सेनेसारख्या संघप्रणित संघटना खालच्या जातीतील तरुणांना हिंसाचारासाठी वापरत असतात. खालच्या जातीतील तरुणांना आर्थिकदृष्ट्या खालच्या जातींमध्येच डांबून ठेवण्याचा हा डाव आहे, असे प्रतिपादन देवनुरू महादेव यांनी केले आहे. विषारी प्रचारामुळे काही तरुण भडकतात हे खरे, पण सगळेच तरुण कसे भडकतील? देवनुरू महादेव भारतीय राजकारणाचे फार सोपे चित्र रंगवतात. त्यांना बहुतेक वाटत असावे की, खालच्या जातीतील तरुणांना काहीच कळत नाही. त्यांचे जे काही असेल ते असो, पण, बजरंग-दल तरुणांना वापरत असेल, तर ते तरुणसुद्धा बजरंग दलाला वापरत असतात, हे एम.एन. श्रीनिवास वाचलेल्या लोकांना कळत असते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
देवनुरू महादेव हे मोठे लेखक असले तरी, एखाद्या राजकीय कार्यकर्त्यासारखे लिहितात. राजकीय कार्यकर्त्याला सोपे बोलावे लागते. विचारांची सोपी मांडणी करावी लागते हे खरे, पण सोपेपणा साधण्यासाठी खोटेपणा कशाला करायचा?
चातुर्वर्ण्याची धारणा ही संघाची मुख्य धारणा आहे आणि त्यासाठी कर्नाटकात शाळेमध्ये ‘गीता’ शिकवण्याचा घाट घातला गेला आहे, असे देवनुरू महादेव यांचे म्हणणे आहे. गीतेमध्ये चातुर्वर्ण्य सांगितला आहे आणि म्हणून गीता संस्कारक्षम वयात शिकवली गेली, तर चातुर्वर्ण्य समाजात रुजेल, असा संघाचा विचार आहे, असे देवनुरू महादेव यांना वाटते.
हे समजावून सांगताना देवनुरू महादेव गोळवळकर गुरुजींनी उदधृत केलेल्या ‘पुरुषसुक्ता’मधील समाजपुरुषाची संकल्पना सांगतात. त्यानुसार समाजपुरुषाच्या मस्तकापासून ब्राह्मण तयार झाला, बाहूंपासून क्षत्रीय तयार झाला, मांड्यांपासून वैश्य तयार झाला आणि पायांपासून शूद्र तयार झाला. पुरुषसुक्तातील हा समाजपुरुष हाच संघाचा देव आहे, असे देवनुरू महादेव सांगतात.
देवनुरू महादेव पुढे लिहितात, “समाजपुरुषाच्या बाबतीत बोलायचे तर ब्राह्मणाने हुकूम करावा, त्याप्रमाणे क्षत्रियाने राज्य करावे, वैश्याने व्यवसाय करावा आणि शूद्राने सर्वांची सेवा करावी. आरएसएसच्या मते हाच सामाजिक न्याय आणि हीच सामाजिक समरसता. हेच त्यांच्या देवाचे समूर्त दर्शन. खरेच केवढे जागृत दैवत! ही सगळी शिकवण, लहान मुलांच्या मनांवर बिंबवण्यासाठी भाजपशासित राज्यांत त्यांनी शाळेत भगवद्गीता शिकवण्यास सुरुवात केली आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्ण जो परमेश्वराचा अवतार आहे, तोच घोषित करतो की, चातुर्वर्ण्याचा जन्म माझ्यापासूनच झाला…” (पान २४)
खरं सांगायचं तर, कुणीतरी शाळेमध्ये ‘कुराण’ शिकवतो, म्हणून कुणाला तरी ‘गीता’ शिकवायची असते. याबाबतीत प्रतिगामी लोकांना मूलतत्त्ववादाला प्रतिक्रिया दिल्यावाचून राहवत नाही, एवढेच खरे असते. संघ जर ‘गीता’ शिकवत असेल, तर ‘पुरुषसूक्त’ का नाही शिकवत, असा प्रश्नसुद्धा आपल्या मनात उपस्थित होतो.
हे सगळे बघितले तर देवनुरू महादेव यांचे लिखाण किती भोंगळ आहे, हे लक्षात येते. असल्या लिखाणातून उदारमतवादी लोकांचा ‘गीते’ला विरोध आहे, एवढाच संदेश सामान्य लोकांमध्ये जातो. देवनुरू महादेव यांचे लिखाण उच्चवर्णीय आणि ओबीसींमधले तरुणसुद्धा वाचतात. या असल्या विचारामुळेच उदारमतवादी स्वतःला सामान्य जनतेपासून दूर नेऊ लागले आहेत. श्रद्धा ही सामान्य माणसासाठी अनिवार्य असते, हे या लोकांच्या लक्षात का येत नाही?
देवनुरू महादेव यांच्यासारख्यांच्या लिखाणावर संघ एक शब्दसुद्धा बोलत नाही, याचे एक कारण हेच आहे. उदारमतवादी आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतील, तर संघ त्यांना कशाला अडवायला जाईल?
तुम्ही उच्चवर्णवादी असा अथवा समतावादी असा, इथून पुढच्या राजकारणाची मदार ओबीसी आणि दलितांची मने जिंकण्यावर असणार आहे. आणि हीच खरी लढाई आहे, याची जाण संघनेतृत्वाला आहे. या उलट दलितांचे समर्थन उदारमतवादी गृहित धरत आहेत, ही फार मोठी चूक आहे. दलितांच्या आर्थिक आकांक्षा उदारमतवाद्यांना कळत आहेत, परंतु, त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक आकांक्षा समजून घेण्यात उदारमतवादी कमी पडत आहेत, असे आजकाल वाटू लागले आहे. अरविंद केजरीवाल हा एकटाच उदारमतवादी राजकारणी सध्या असा आहे की, जो ही सगळी व्यामिश्रता लक्षात घेऊन आपली पावले टाकतो आहे. इतरांनी केजरीवाल यांच्याकडून धडे घ्यायला पाहिजेत.
भारतीय संकृतीमध्ये राजकारण धर्माच्या भाषेत सांगावे लागते, हे गांधीजींना जसे कळले होते, तसे दुसऱ्या कुठल्या उदारमतवादी नेत्याला कळले आहे, असे वाटत नाही. मार्क्सवादातील समानतेचा विचार गांधीजींना आवडला होता, पण त्यांनी मार्क्सचा आंधळा अनुनय केला नाही. भारतात तेव्हा समानतेची लढाई जमीनदारांविरुद्ध लढली जाणार होती, म्हणून गांधीजींनी मार्क्सची समता ‘सब भूमी गोपालकी’ या घोषणेत मांडली. त्यातूनच पुढे भूदान चळवळ उभी राहिली. असो.
एम.एन. श्रीनिवास यांच्या ‘संस्कृतायझेशन’ या संकल्पनेप्रमाणे हळूहळू एक ‘स्टँडर्ड ब्राह्मिनिकल कल्चर’ भारतात तयार होऊ शकते. पण या स्थित्यंतरास काही शतके लागू शकतात. संघाला असे ‘स्टँडर्डायझेशन’ हिंदू धर्माबद्दल हवे आहे आणि ते लगोलग हवे आहे. आपली जबरदस्त प्रचारयंत्रणा चालवून आपण हे साध्य करू असे संघाला वाटते. त्याच्या या अजेंड्याची अनेक विचारवंतांना मोठी भीती वाटत असते. पण गंमत अशी की, सगळ्या जाती कुठल्या तरी एका जातीमध्ये ‘स्टँडर्डाइझ’ झाल्याशिवाय हिंदू धर्म ‘स्टँडर्डाइझ’ कसा होईल? या प्रश्नाचे संघाकडे सध्या तरी उत्तर आहे, असे दिसत नाही.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पंतप्रधान मोदी यांनी खोटे बोलून लोकांना फसवता येते, हे अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्यामुळे तर उदारमतवाद्यांना संघाच्या खोट्या प्रचाराची जास्त धास्ती वाटू लागली आहे. यावर त्यांनी निष्कर्ष काढण्यापूर्वी थोडा संयम दाखवायला हवा. लोकांना फसवता येते, हे सगळ्यांनाच माहीत झाले आहे, पण किती काळ फसवता येते, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
देवनुरू महादेव लिहितात - “आरएसएसची लढाई दोन बाजूंवर चालते. एका बाजूला चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आपला देव मानणारी आरएसएस, भारतातच जन्मलेल्या पण जन्मतःच चातुर्वर्ण्याच्या विरोधात असलेल्या जैन, बुद्ध, लिंगायत अशा धर्मांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करते. चातुर्वर्ण्याच्या रक्षणासाठी आणि जपणुकीसाठी ती या धर्मांचे खच्चीकरण करते. हे साध्य करण्यासाठी ती हे सर्व धर्म विशाल हिंदू धर्माचाच भाग आहेत, असा दावा करते आणि त्या नावाखाली त्यांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सामील करून घेते.” (पान २९)
जैन, बुद्ध आणि लिंगायत हे धर्म विशाल हिंदू धर्माचा भाग आहेत असे संघ म्हणत असतो हे खरे आहे, पण असे म्हटल्याने या धर्मांचे खच्चीकरण होईल हे कसे म्हणता येईल? एक वेळ त्यांचे खच्चीकरण झाले असे म्हणू, पण हे धर्म हिंदू धर्माचाच भाग आहेत, असे म्हटल्याने त्यांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सामील करून घेतले, असे कसे म्हणता येईल?
उदारमतवाद्यांनी एकवेळ संघाला विरोध केला नाही तरी चालेल, पण त्यांनी ‘सत्याचे ट्रस्टी’ असलेच पाहिजे. फार काही न करता, सत्यावर केवळ अविचल श्रद्धा ठेवल्यामुळेसुद्धा खोटेपणाचा पराभव होतो, हे इतिहासाने अनेक वेळा दाखवून दिलेले आहे.
‘आरएसएस - खोली आणि व्याप्ती’ - देवनुरू महादेव
मराठी अनुवाद - प्रा. दत्ता दंडगे
मधुश्री पब्लिकेशन, पुणे
पाने - ६४
मूल्य - १०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment