पंतप्रधान मोदी ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते’ आहेत हे नक्की, परंतु त्यासंदर्भातल्या बातम्या देताना एक प्रचंड मोठे ‘अर्धसत्य’ लोकांच्या माथी मारण्यात आले आहे...
पडघम - माध्यमनामा
रवि आमले
  • मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीचे बोधचिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 01 September 2022
  • पडघम माध्यमनामा नरेंद्र मोदी Narendra Modi मॉर्निंग कन्सल्ट Morning Consult

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय जागतिक नेते’

‘पीएम मोदी रिमेन्स मोस्ट पॉप्युलर ग्लोबल लीडर’

‘दुनिया के सबसे लोकप्रिय नेता हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’

गेल्या सप्ताहातील या बातम्या. विविध दैनिकांत, वृत्तवाहिन्यांच्या वेबआवृत्त्यांत त्या झळकल्या होत्या. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर त्या आधारलेल्या होत्या. त्यानुसार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ॲप्रूव्हल रेटिंग’ ७५ टक्के असून, ते जगातील अन्य कोणत्याही नेत्याच्या रेटिंगहून जास्त आहे. ते पाहून आपली प्रसारमाध्यमे अगदी हरखून गेली. अनेकांनी ‘दुनिया में फिर दिखी भारत की धाक’, ‘फिर लहराया भारत के पीएम का परचम’ अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला. समाजमाध्यमांतील मोदीभक्त आणि भाजपचे नेते, कार्यकर्ते कसे मागे राहतील? त्यांनीही मोदींचे भरभरून गौरवगान केले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तर या सर्वेक्षणाचा हवाला देऊन मोदींची थेट महात्मा गांधींशी तुलना केली. महात्मा गांधींनंतरचे ते एकमेव असे नेते आहेत की, ज्यांना लोकभावना समजते. आणि म्हणूनच ते आज जगातील सर्व नेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे राजनाथसिंह म्हणाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या सर्व बातम्या आणि चारणभाटांची गौरवगीते वाचल्यानंतर कोणासही असेच वाटेल की, पंतप्रधान मोदी हे खरोखरच जगभरात लोकप्रिय आहेत. पण खरोखरच हे खरे आहे काय? ज्या पद्धतीने विविध माध्यमांनी या बातम्या दिल्या, त्यांत तथ्य आहे का?

तथ्य आहे. मॉर्निंग कन्सल्टचे सर्वेक्षण सांगते की, मोदी यांचे ॲप्रूव्हल रेटिंग ७५ टक्के आहे. आणि त्यांची ही लोकपसंतीची टक्केवारी अन्य नेत्यांच्या टक्केवारीहून जास्त आहे. याचा अर्थ मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. वरवर पाहता हे असेच आहे. परंतु या बातम्या देताना एक मोठी लबाडी करण्यात आली आहे. एक प्रचंड मोठे अर्धसत्य लोकांच्या माथी मारण्यात आले आहे. ते समजून घेण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टच्या त्या सर्वेक्षणावर नीट नजर टाकावी लागेल.

मुळात हे सर्वेक्षण नेत्यांची जागतिक लोकप्रियता आजमावण्यासाठी करण्यात आलेले नव्हतेच. त्याचा हेतू राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती मोजणे हा होता. यात किती देशांतील राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती पाहण्यात आली, तर अवघ्या २२. म्हणजे यास जागतिक वगैरे म्हणता येणार नाही.

दुसरी बाब म्हणजे ही लोकपसंती काही जागतिक स्तरावर मोजण्यात आलेली नाही. ती त्या-त्या नेत्याची त्यांच्या-त्यांच्या देशातील लोकपंसती आहे. म्हणजे मोदींचे ‘ॲप्रूव्हल रेटिंग’ हे फक्त भारतातीलच आहे. बातम्यांचे मथळे वाचून कोणाचाही असा समज होईल की, मोदी अन्य देशांतही लोकप्रिय आहेत, पण तसे नाही. त्यांच्या नावास केवळ भारतातील ७५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून, २० टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे. याच प्रकारे या यादीत ज्यांची नावे आहेत, त्या २२ राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती ही त्यांच्या-त्यांच्या देशातील आहे. मोदींनंतर ‘जागतिक लोकप्रिय’ नेत्यांच्या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचे नाव येते. आपल्याकडील बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा, तर मग असे म्हणावे लागेल की, लोपेझ ओब्राडोर हे जगभरातील ६३ टक्के लोकांना पसंत आहेत.

खरे तर मॉर्निंग कन्सल्टनेच या सर्व नेत्यांच्या लोकपसंती टक्केवारीची एकमेकांशी तुलना करून लबाडी केलेली आहे. मोदींची भारतातील लोकप्रियता आणि जो बायडन यांची अमेरिकेतील लोकप्रियता यांची तुलनाच होऊ शकत नाही. तसे करणे हे तर्कदुष्ट आहे. पण नेमके तेच करण्यात आले आहे.

आता हे लोकपसंतीचे मापन कसे करण्यात आले आहे, तेही समजून घ्यावे लागेल. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत त्या-त्या देशांत ही पाहणी करण्यात आली. त्या सर्वेक्षणासाठी अमेरिका वगळता अन्य देशांतील ५०० ते पाच हजार नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. आता भारतातील ‘सँपल साईज’ नेमकी किती होती, ते काही स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु अगदी कमाल संख्या धरली, तरी १३० कोटींच्या भारतात पाच हजार नागरिकांची मते घेण्यात आली, असे म्हणता येईल.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

थोडक्यात काय, तर पंतप्रधान मोदी हे भारतात लोकप्रिय आहेत आणि अन्य नेते त्यांच्या देशात जेवढे लोकप्रिय आहेत, त्याहून मोदी भारतात अधिक लोकप्रिय आहेत, याबाबत कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. मुद्दा एवढाच आहे की, ते जगात सर्वांत लोकप्रिय आहेत, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असू शकत नाही. आणि म्हणूनच मोदींच्या लोकप्रियतेबाबत देण्यात आलेल्या या बातम्या ‘फेक न्यूज’ याच सदरात मोडणाऱ्या आहेत.

प्रोपगंडाचे एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. प्रोपगंडाचा पाया हा नेहमीच सत्याचा, तथ्यांचा असावा आणि त्यावर अर्धसत्य, अपमाहिती यांची इमारत रचली जावी, हा नियमच आहे. प्रोपगंडापंडित हेच सांगत. मोदींविषयक बातम्यांतून तेच प्रोपगंडा तत्त्व दृगोचर होते. अशा बातम्या अनेक वृत्तपत्रांनी, संकेतस्थळांनी प्रसिद्ध केल्या, याचा अर्थ काय, असा एक प्रश्न यातून समोर येतो.

त्याचे उत्तर असे की, काहींनी प्रोपगंडा वा भाटगिरीच्या हेतूने त्या दिल्या आणि बाकीच्यांनी त्या बातमीच्या, त्यातील माहितीच्या खोलात न जाता, त्यांचा नेमका अर्थ समजून न घेता, पुन्हा भाटगिरी म्हणून त्या ठोकून दिल्या. भाषिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळे यांतील हल्लीचे उपसंपादक वा पत्रकार यांच्या भंपकतेची उंची लक्षात घेता, ती अशा बाबतीत नेहमीच आघाडीवर असणार हे वेगळे सांगावयास नको. अपमाहिती पसरत जाते ती अशीच आणि अशांमुळेच. आणि ‘विश्वगुरु’त्वाकर्षणाने झपाटलेले बिचारे वाचक मात्र त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यांना खरेच वाटते की, आपल्या पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचा ‘परचम’ सगळ्या जगात लहरत आहे.

................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......