‘देशद्रोह्यां’ना धर्म, जात, पंथ वा पक्ष असतो?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 16 March 2017
  • पडघम देशकारण देशद्रोही Deshdrohi भाजप Bharatiya Janata Party नरेंद्र मोदी Narendra Modi अँडी टेररिस्ट स्क्वाॅड Anti Terrorist Squad एटीएस ATS ध्रुव सक्सेना Dhruv Saxena

मध्य प्रदेशातील आतंकवाद विरोधी दलाने आपल्या राज्यातील ११ जणांना भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये तेथील भाजपच्या मुख्यमंत्र्यापासून प्रदेश सचिवापर्यंत संबंध असलेल्यांचा समावेश आहे. ध्रुव सक्सेना हा भाजपाच्या युवक आघाडीच्या आय.टी.सेलच्या - ज्यात मुख्यतः ट्रोलचं म्हणजे विरोधकांना फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअॅप ग्रुपवर शिव्या घालण्याचं काम केलं जातं- प्रमुख पदावर होता. या पदावर राहून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचा. अटक केलेल्या या सर्वांवर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयला भारतीय सैन्याची ठिकाणं आणि त्यांच्या हालचालींची माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी समांतरपणे गुप्त टेलिफोन एक्सचेंज स्थापन केलं होतं. अशी एक्सचेंज राज्यातील भोपाळ, ग्वाल्हेर व जबलपूर इथं सापडली आहेत. त्याद्वारे ते इंटरनेट कॉलचं रूपांतर सेल्यूलर कॉलमध्ये करत होते. त्यामुळे पाकिस्तानात ते कोणाशी बोलत आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता, अशी माहिती एटीएस प्रमुख संजीव शमी यांनी दिली आहे.

या कामासाठी आरोपींना वेळोवेळी हवालामार्फत प्रचंड रकमेचा मोबदला मिळत होता. याबाबतचं तीन कोटी रुपयांचं हवाला प्रकरण उघड झालं आहे. याशिवाय दरमहा प्रत्येकी ४० हजार रुपये वेतन मिळत होतं, ते वेगळंच. या नेटवर्कशी संबंधितांवर एटीएसनं मारलेल्या छाप्यात ३,००० सिम कार्डस् व ३५ सिम बॉक्स सापडले आहेत. छाप्यात मिळालेल्या लॅपटॉप व इतर सामग्रीमधून याबाबतची बरीच महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहासह इंडियन टेलिफोन अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजीव शमी यांनी असंही सांगितलं की, नोव्हेंबर २०१६ मध्ये जम्मू इथून सतविंदर आणि दादू यांना अटक करण्यात आली होती. सतविंदर पाकिस्तानी एजंटांना भारतीय सैन्याची माहिती एकत्रित करून पाठवत होता. त्याचा मोबदला त्याच्या बँक खात्यावर सटन्याचा बलराम सिंह जमा करत होता. या एजंटांना पकडण्यासाठी केंद्रीय टेलिकॅाम मंत्रालयातील टीईआरएम सेलनं मदत केली आहे.

जानेवारीमध्ये उत्तर प्रदेश एटीएसनेही यासारख्याच ११ जणांना अटक केली होती. उत्तर प्रदेश एटीएसने दिल्लीतील महारोली इलाख्यातून अटक केलेल्या गुलशन सेनकडूनच मध्य प्रदेशातही पाकिस्तानी आयएसआयचं असं जाळं असल्याची माहिती मिळाली होती. हरियाणा, महाराष्ट्रासह इतर काही राज्यातही असं जाळं असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणातील आरोपी ध्रुव सक्सेनाच्या फेसबुक प्रोफाइलवरून त्याचे भाजपाच्या अनेक नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असल्याचे फोटो आढळले आहेत. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, प्रदेश महासचिव विजयवर्गीय, महापौर आलोक शर्मा, खासदार आलोक संजर यांच्याबरोबर तो व्यासपीठावर मिरवत होता. लॅपटॉपवरून आईटीचं प्रेझेंटेशनही करत होता. संपूर्ण भोपाळमध्ये या राजकीय नेत्यांबरोबर छायाचित्र असलेले त्याचे फ्लेक्स लागत असत. वर्तमानपत्रांतून त्याचे फोटो अजूनही उपलब्ध आहेत. भाजपाचा उदयोन्मुख नेता अशी त्याची प्रतिमा निर्माण केली जात होती. परंतु आता भाजपने ध्रुव सक्सेनाशी कोणताही संबंध असल्याचं नाकारलं आहे. पण ध्रुवची आई रंजना सक्सेना व वडील महेंद्र सक्सेना हे पूर्णपणे त्यांच्या मुलाच्या पाठीशी आहेत. त्यांच्या मते काँग्रेस-भाजपच्या राजकारणात आपल्या मुलाचा बळी देण्यात आला आहे. ध्रुवने अनेक वर्षं भाजपचं काम इमानेइतबारे केलं आहे. भाजपच्या अनेक सभा-समारंभ व रॅल्यांसह इतर व्यवस्थाही तो करत होता. त्याने शहरात ओळखीपाळखी वाढवून आपली स्थिती चांगलीच मजबूत केली होती, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी म्हटलं आहेत की, “माझ्या मुलासोबत कायम वावरणारे भाजपचे पुढारी आता कोठे आहेत? आता तर ते त्याच्या जवळपासही फिरकायला तयार नाहीत.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपल्या मुलाला माफ करण्याबद्दल विनंतीवजा पत्र पाठवलं आहे. तसंच ध्रुवच्या कॉलनीतील सर्व शेजारी तो भाजपचा कार्यकर्ता म्हणूनच सर्वांना माहीत असल्याचं सांगतात.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या या ११ पैकी दुसरा एक आरोपी जितेंद्र ठाकूरला एटीएसनं ग्वाल्हेरमधून ताब्यात घेतलं आहे. त्याची भावजय तेथून भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. जितेंद्रनेच त्यांना भाजपचं तिकीट मिळवून दिलं होतं. या ११ पैकी सटना इथून अटक केलेला बलराम सिंह नावाचा आणखी एक आरोपी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. त्याने बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांचं बॅंक खातं उघडलं होतं. त्यात आयएसआयकडून रकमा जमा होत होत्या, असं तपासात उघड झालं आहे. त्याच्याशी संबंधित ४६ जणांचं मोठं रॅकेटच उघडकीस आलं आहे. शहरातील दोन डॉक्टर्सही यात सामील असल्याची त्यानं कबुली दिली आहे. त्याचा भाऊ विक्रमलाही एटीएसनं ताब्यात घेतलं असून, पठाणकोट हवाई अड्ड्यावरील पाकिस्तानी हल्ल्याशी या टोळीचा संबंध आहे की काय, या दिशेनंही कसून चौकशी चालू आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या प्रकरणाच्या तपासातील सर्वच बाबी जाहीर केल्या जातील असं नव्हे, पण देशभक्तीच्या नावाखाली कसा ‘देशद्रोह’ही केला जाऊ शकतो, याचं हे एक ताजं उदाहरण आहे.

या बाबीवरून ध्यानात घ्यावं ते असं की, देषद्रोह्यांना कोणताही धर्म, जात, पंथ वा पक्ष नसतो. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही साधनांचा वापर करून ते देशाशी कोणत्याही रीतीची गद्दारी करू शकतात. मध्य प्रदेषातील अशा घटनेत एकही मुस्लीम अथवा जेएनयुचा विद्यार्थी नाही. तसं असतं तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित इतर संघटनांनी किती गहजब केला असता? त्याचबरोबर प्रसारमाध्यमांची भूमिका काय राहिली असती? त्यांनी आपल्या वृत्तवाहिन्यांमधून संपूर्ण देशभर आगडोंब उठवून या घटनांवर अग्निहोत्र घडवून आणलं असतं? 

 भगवा शर्ट असलेला ध्रुव सक्सेना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासोबत एका व्यासपीठावर                      

चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू असताना एखादी म्हातारी व्यक्ती उभी राहू न शकल्यास त्याला ‘देशद्रोही’ म्हणून मारहाण करणं कितपत देशभक्तीपूर्ण आहे? ‘भारत माता की जय’ अथवा घसा कोरडा करून ‘वंदे मातरम्’ म्हणणं हीच फक्त देशभक्तीची कसोटी आहे काय? एखादा नामवंत लेखक, साहित्यिक अथवा कलावंतांने असहिष्णुता, खाणंपिणं अथवा पेहरावाबद्दल मतभेद व्यक्त केल्यास त्याला सरळ ‘पाकिस्तानात जा’ म्हणून सांगणं ही उथळ देशभक्ती नव्हे काय? गांधी हत्येनंतर संघाने नथुरामशी आपला कोणताही संबंध असल्याचं नाकारलं होतं, पण सत्ता मिळाल्यानंतर आता त्याची मंदिरं उभारण्याविषयी बोललं जात आहे. तेव्हा केवळ ध्रुव सक्सेनाशी संबंध नाकारल्यानं आपली जबाबदारी झटकून टाकता येत नाही. बजरंग दलाशी संबंधित असलेल्या बलरामचं काय? की त्याचंही नथुरामप्रमाणेच मंदिर उभारलं जाणार आहे?

लेखक मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......