बहुजनांचा पंडित, सांस्कृतिक बंडखोर, लढणारा लेखक, फुल्ल टीआरपीवाला, ‘पानिपत’कार, सत्यशोधक संपादक, पहिली सुपरस्टार, नटसम्राट, बुद्धिमान नटरंग...
ग्रंथनामा - झलक
संपादक राजा कांदळकर
  • ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 29 August 2022
  • ग्रंथनामा झलक १०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे 101 Prabhavshali Maharashtriyan aani 21 Ugavate Tare राजा कांदळकर Raja Kandalkar

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. या पुस्तकातल्या या २० ‘सर्जनशील’ व्यक्ती...

.................................................................................................................................................................

डॉ. आ. ह. साळुखे : बहुजनांचा पंडित

महाराष्ट्राला सांस्कृतिक धोरण देणारा बहुजनांचा पंडित. महाराष्ट्र ‘तात्या’ म्हणून ओळखतो त्यांना. डॉ. आण्णासाहेब हरी साळुखे त्यांचं पूर्ण नाव. अत्यंत सोपं बोलणारा प्राच्यविद्यापंडित. संस्कृतचे गाढे अभ्यासक. ‘विद्रोही तुकाराम’ने महाराष्ट्रात ते गाजले. ‘बळीवंश’, ‘सर्वोत्तम भूमिपूत्र - गौतम बुद्ध’ या पुस्तकांनी देशात त्यांची कीर्ती झाली. ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ त्यांनी बहुजनांना उलगडून दाखवली. आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल अशा हाक बहुजन तरुणांना घातली. गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्याचा धर्म एक नसतो, हे आवाहन केलं. अंधाराचे बुरुज ढासळवण्यासाठी त्याच लेखन अन् संशोधन सुरूच आहे.

.................................................................................................................................................................

भालचंद्र नेमाडे : सांस्कृतिक बंडखोर

‘देशीवादा’ची मांडणी करत भालचंद्र नेमाडे यांनी भारतीय साहित्यात सांस्कृतिक बंडखोरी केली. ‘कोसला’, ‘हिंदू’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. पण त्यांची मराठी साहित्यातली वैचारिक भूमिका आजही गर्जत आहे. नेमाडे इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांनी हट्टाने सर्व साहित्य मराठीत लिहिलं. त्यांचा ‘देखणी’ हा कवितासंग्रह गाजला. कविता, कादंबरी, वैचारिक, स्फुट लेखनाने त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. साहित्य विश्वात स्वतःचा संप्रदाय तयार केला. म्हणूनच त्यांच्या लेखनाचा ज्ञानपीठाने गौरव झाला.

.................................................................................................................................................................

दत्तप्रसाद दाभोळकर : विवेकानंदांचा भाष्यकार

मूळचे शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक. पण दत्तप्रसाद दाभोलकरांची खरी ओळख आहे- स्वामी विवेकानंदांचा भाष्यकार अशी. महाराष्ट्राला त्यांनी ‘समाजवादी विवेकानंद’ सांगितला. ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे त्यांचं पुस्तक मराठीत प्रचंड गाजतंय सध्या. कवी, बाललेखक, ललित लेखक, अशी वेगवेगळी रूपं आहेत त्यांची. लोकमनाला भिडणारं बोलतात. सत्य बोलणारे विचारवंत आहेत ते. ‘राजधानी इंद्रप्रस्थ’, ‘माते नर्मदे’, ‘ना डावं ना उजवं’ ही पुस्तकं गाजली त्यांची.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

श्रीपाद हळबे : देणारा हात

गांधी, विनोबाजींच्या संस्थांपासून शरद पवारांच्या मुंबई क्रिकेट क्लबपर्यंत... नुसता वावर नाही, त्यांचा प्रभाव आहे. ते नाव म्हणजे श्रीपाद रामचंद्र हळबे. जॉर्ज फर्नांडिस आणि राहुल बजाज यांचे एकाच वेळी घट्ट मित्र. मुंबई क्रिकेट क्लबमध्ये पवारांना आणणारे हळबेच. आणि पुन्हा त्यांच्या समोर प्रश्न उभे करणारे हळबेच. महाराष्ट्रातील एक, दोन नाही, तर शेकडो सामाजिक संस्थांना, शैक्षणिक प्रयोगांना मदतीचा हात देणारे. देणग्या देणारे. देणग्या मिळवून देणारे. माणदेशात दुष्काळात जनावरांच्या छावण्या उभ्या करणारे. ‘ग्रंथाली’च्या प्रयोगात पुढाकार घेणारे. पुस्तकांचं नुसतं वेड नाही. चांगली पुस्तकं यावीत, ती पोचावीत यासाठी मदत करणारे. एवढं करूनही स्वतःचं नाव कुठेही येऊ न देणारे. इतकी निःस्वार्थ आणि निरलस सेवा हळबेच करू जाणे. ते रूढार्थाने स्वतःला समाजवादी किंवा गांधीवादी मानत नाहीत. पण त्या परिवारात त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे.

.................................................................................................................................................................

फादर फ्रान्सिस दिब्रिटो : लढणारा लेखक

फादर दिब्रिटो आहेत कॅथलिक फादर. पण राज्यभर त्यांची ओळख आहे लढणारा लेखक, कार्यकर्ता म्हणून. मराठीत बायबलचं ‘सुबोध बायबल’ रूपांतर केलं त्यांनी. वसईत (जि. पालघर) राहतात. ‘हरीत वसई’ या चळवळीचं नेतृत्व केलं त्यांनी. पर्यावरणाच्या संरक्षणासाठीची ही चळवळ देशभर गाजली. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मिळाला त्यांना महाराष्ट्र सरकारचा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. अकादमी पुरस्काराने देशातल्या महत्त्वाच्या साहित्यिकांत स्थान मिळालं. ‘सुवार्ता’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेकांना लिहितं केलं. पत्रकार, लेखक, कार्यकर्ता. वसईसाठीच नाही तर पर्यावरणवाद्यांसाठीही हा फादर बापमाणूस आहे. त्याग आणि चारित्र्य यांचा दीपस्तंभ आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो.

.................................................................................................................................................................

जयराज साळगावकर : ‘कालनिर्णय’कार

कालनिर्णयने मराठी घरात भिंतीवर मान मिळवला होताच. संपादक जयराज साळगावकरांनी कालनिर्णय भारतभर नेलं. सर्व प्रमुख भारतीय भाषांत ते निघतं आता. कालनिर्णयची दिनदर्शिका आणि पंचांग जगप्रसिद्ध झालंय. उद्योजक म्हणून जयराज यांची ही किमया. हे पंचांगवाले ज्युनिअर साळगावकर पक्के इहवादी आहेत. लोकायतवादी विचारवंत, संशोधक आणि वक्तेही आहेत. ‘कर्झनकाळ’, ‘जगप्रवाह’, ‘सारस्वताचा इतिहास’, ‘मुंबई शहर गॅझेटीयर’ ही त्यांची पुस्तकं गाजली आहेत.

.................................................................................................................................................................

निखिल वागळे :  फुल्ल टीआरपीवाला

फुल्ल टीआरपीवाला आक्रमक अँकर अशी ओळख आहे निखिल वागळे यांची. राज्यात आणि देशात पहचान आहे त्यांची. सत्तेला टोकदार प्रश्न विचारणारा संपादक, पत्रकार म्हणून. ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. न्यूज पेपर, न्यूज चॅनल, मल्टिमिडिया वेब, सोशल मीडिया अशा सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे पत्रकारिता केली त्यांनी. ‘आपलं महानगर’, ‘आयबीएन लोकमत’, ‘महाराष्ट्र वन’चे संपादक म्हणून ते गाजले. एकेकाळची मिळमिळीत पत्रकारिता वागळेंच्या दुनियेत आक्रमक झाली. निर्भीड बनली. वागळे सध्या फेसबुक, ट्विटरवर ॲक्टिव्ह असतात. सोशल मीडियात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. पुस्तक प्रकाशन, लेखन, अनुवाद, वक्तृत्व या क्षेत्रातही त्यांचा बोलबाला आहे.

.................................................................................................................................................................

गिरीश कुबेर :  दबदबा

मराठी मीडियात ‘लोकसत्ता’चा दबदबा आहे. अरुण टिकेकर मध्यममार्गी होते. कुमार केतकर पक्के डावे. त्यांच्या नंतर संपादक म्हणून आलेले गिरीश कुबेर ना डावे, ना मानत स्वतःला उजवे. तटस्थता, चिकित्सा आणि व्यासंग यामुळे ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. जगाच्या अर्थकारणाचे विश्लेषण करणारी नजर आहे त्यांच्याजवळ. तेलाचं राजकारण ते सहज उलगडून सांगतात. इंग्रजी पत्रकारितेतही त्यांचं नाव आहे. वादांची वादळे अंगावर घेतात कुबेर. ‘अधर्मयुद्ध’, ‘एका तेलियाने’, ‘टाटायन’, ‘युद्ध जिवांचे’ ही पुस्तके गाजलीत.

.................................................................................................................................................................

राजीव खांडेकर :  ‘माझा’कार

मराठीत लोकप्रिय न्यूज चॅनलचा मान एबीपी माझाचा. संपादक राजीव खांडेकरांच्या किमयागार संपादन शैलीने ते शक्य झालं. २५ वर्षांहून अधिक काळ ते ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘ईटीव्ही’मध्ये काम करत होते. आता ‘एबीपी माझा’चा म्होरक्या म्हणून स्थिरावलेत. ‘हार्ट टू हार्ट’ हे राजीव यांचं पुस्तक शैलीदार लेखनाचा नमुना आहे. मार्मिक राजकीय विश्लेषण, संयमी मांडणीची पद्धत ही राजीव यांची खासीयत आहे. ‘माझा कट्टा’ हा एबीपीवरचा कार्यक्रम त्यांच्या कल्पकतेतून गाजला.

.................................................................................................................................................................

नितीन वैद्य : नवा रणनीतीकार

आधी पत्रकार होते नितीन वैद्य. मग चित्रपट निर्माते झाले. झी वाहिनीचे आणि नंतर स्टार वाहिनीचे प्रमुख झाले. टीव्हीवरच्या मराठी इंडस्ट्रीचा विस्तार झाला त्यांच्या स्क्रिप्टमुळे. आता ते ॲग्रो इंडस्ट्रीत उतरले आहेत. राष्ट्र सेवा दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परिवर्तनवादी चळवळीच्या विस्ताराचे स्क्रिप्ट लिहिताहेत. त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनाची सुरुवात ‘छात्र भारती विद्यार्थी संघटने’तून केली. लहानपणापासून ते राष्ट्र सेवा दलाच्या समाजवादी आंदोलनात आणि चळवळीत सहभागी होते. डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. सध्या देशभरात सुरू असलेल्या गांधीवादी आणि आंबेडकरी चळवळीशी ते जोडले गेले आहेत. राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त म्हणून काम करताना देश पातळीवर ‘फ्रायडे फ्लेम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समविचारी संघटना आणि विचारवंतांना एकत्र आणण्यात त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला लोकशाही समाजवाद हेच उत्तर आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि त्यादिशेने देशभरातील परिवर्तनवादी चळवळींना एकत्र आणण्याची रणनीती ते आखत आहत.

.................................................................................................................................................................

ज्ञानेश महाराव : सत्यशोधक संपादक

‘चित्रलेखा’ ज्ञानेश महारावांच्या नावाने ओळखतात मराठी लोक. जगभर वाचला जातो मराठी समाजात. सत्यशोधक पत्रकारिता असते त्यात. बुवाबाजी, राजकीय ढोंग, शेटजी-भटजींची कावेबाजी यांचा भांडाफोड म्हणते ‘चित्रलेखा’ची पत्रकारिता. ‘आजकाल’ हे महारावांचे संपादकीय वाचले नसेल असा मराठी वाचक सापडणार नाही. रिपोर्ताज, लेख झणझणीत असतात. महाराव प्रभावी नाटककार, वक्ते आहेत. गायक, शाहीर, अभिनेते आहेत. आचार्य अत्रेच्यानंतर एवढा बहुरूपे असणारा संपादक महाराष्ट्राने पाहिला नसेल.

.................................................................................................................................................................

विश्वास पाटील : ‘पानिपत’कार

मराठीतले सर्वाधिक वाचले जाणारे कादंबरीकार आहेत विश्वास पाटील. ‘पानिपत’कार ही त्यांची ओळख. ‘पानिपत’ कादंबरी नाही असं ग्रंथालय महाराष्ट्रात नसेल. कुसुमाग्रज एकदा म्हणाले होते, ‘सुंदर भाषा आणि भव्य वर्णन करणारी शैली म्हणजे विश्वास पाटील यांचं लेखन.’ ‘झाडाझडती’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. विस्थापित शेतकरी मजुरांचं जीवन एवढ्या नेमकेपणाने मराठी कादंबरीत पहिल्यांदा आलं ‘झाडाझडती’त. कादंबरीकार विश्वास पाटील ख्यातनाम झाले. निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. छत्रपती संभाजी, सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या.

.................................................................................................................................................................

भारत सासणे : महालेखक

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. बिनविरोध निवड झाली भारत सासणे यांची. निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. देशातले ते मोठे कथालेखक. पारंपरिकता आणि प्रयोगशीलता यांचं मिश्रण आहे कथेत त्यांच्या. व्यक्तीच्या मनातला गुंतागुंत, गूढ, ताणतणाव बेमामूमपणे उलगडवून दाखवतात. राज्य सरकारचा २०२२चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्यांना. तीसेक दीर्घ कथासंग्रह आहेत नावावर त्यांच्या. महाराष्ट्राचा महालेखक म्हणता येईल एवढं प्रचंड लेखन आहे हे.

.................................................................................................................................................................

अजय - अतुल : फटका आणि फटाका

‘कोंबडी पळाली’ हे गाणं भोंग्यांवर बाजू लागलं. तेव्हाच अजय-अतुल या संगीतकारांची जादू जगजाहीर झाली. १८व्या शतकात अनंत फंदींच्या ‘फटका’ची महाराष्ट्रावर जादू होती. अजय – अतुलच्या गाण्यांनी संगीताचा तो ‘फटका’ अन् फटाका महाराष्ट्र आज अनुभवतो आहे.

लावणी, तमाशा, फटका, शाहीरी, गोंधळ अशा लोककलांच्या संगीताच्या पायावर अजय-अतुल उभे राहिले. हिंदीत झेपावले. ‘अग्नीपथ’, ‘सिंघम’, ‘बोल बच्चन’ या सिनेमांतून त्यांचं संगीत देशमान्य झालं. ‘नटरंग’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या गाण्यांनी त्यांनी स्वतःचा कित्ता घडवला

.................................................................................................................................................................

आदर्श शिंदे : शिंदेशाही

‘गाणं वाजू द्या’, हे गाणं ऐकावं. आदर्श शिंदेचं गाणं, संगीत आपला ताबा घेतं. त्यांची आंबेडकरी गीतं तर कमाल आहेत. तरण्याताठ्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना ठेका धरायला लावतात.

आजोबा प्रल्हाद शिंदे आणि बाप आनंद शिंदे दोघेही गायक. त्यांच्या खांद्यावर उभा आहे आदर्श. आदर्शचं गाणं वाजत नसेल असं घर महाराष्ट्रात सापडणार नाही. हिंदीतही त्याचा बोलबाला आहे. १५०० गाणी आणि शेकडो अल्बम नावावर आहेत.

.................................................................................................................................................................

माधुरी दीक्षित नेने : पहिली सुपरस्टार

हिंदी सिनेमावर राज्य करणारी पहिली मराठी सुपरस्टार म्हणजे माधुरी दीक्षित. मधुबाला, नूतन, नर्गिस, हेमामालिनी या चौघींचंही प्रतिबिंब माधुरीच्या सौंदर्यात आणि अभिनयात आहे. या ‘धकधक गर्ल’ने आजही आपली जादू कायम ठेवली आहे. हिंदीतल्या दिग्गज आणि सगळ्या सुरपस्टार्स सोबत तिने तोडीस तोड काम केलं. मराठी मुलगी म्हणून प्रत्येक मराठी घरातल्या मनात तिचं स्थान आजही अढळ आहे.

.................................................................................................................................................................

नाना पाटेकर  : नटसम्राट

नटसम्राट या मराठी चित्रपटात काम केलं २०१६ साली. त्याआधी नाना पाटेकर त्यांच्यातला नट मराठी, हिंदी चित्रपट गाजवून अभिनयसम्राट झाला होता. मराठी नाटकातला श्रीराम लागू नंतरचे नाना हे एकमेव अभिनेते जे हिंदीत स्थिरावले, टिकले, गाजले, नटसम्राट झाले. नाना नटसम्राट, पण नाटकी नाही. संवेदनशीलता आणि माणुसकीचे ढग दाटून भरलेले आहेत नानाच्या हृदयात.

मिरजेहून रेल्वेने जेवढं पाणी लातूरला नेलं नसेल, तितकं मदतीचं पाणी नाना पाटेकरांनी दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात नेलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना नानांनी थोरल्या भावाचा आधार दिला. त्यांच्या पोरक्या लेकरांना आपल्या मांडीवर घेतलं. मकरंद अनासपुरेंसोबत मराठवाड्यातल्या अनेक खेड्यांमधल्या दु:खांना फुंकर घालण्याचं काम नानांनी केलं. बाबा आमटे आणि प्रकाश आमटेंच्या कामाशी आधी ते जोडले होते. करुणेची ती वाट त्यांनी स्वतःच प्रशस्त केली.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रशांत दामले :  नाटकातला सुपरस्टार

नव्या शैलीचा मराठी अभिनेता. मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालनाची स्वतंत्र छाप आहे त्यांची. प्रशांत दामलेंची मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील त्यांची कारकीर्द १९८३मध्ये सुरू झाली. ‘टूरटूर’ या मराठी नाटकापासून दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’ ही पाककृती मालिका फार लोकप्रिय झाली.

‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस् नोंदले गेले आहेत. दामले फॅन फाऊंडेशन’च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. पुण्यात प्रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची प्रशिक्षण संस्था आहे.

.................................................................................................................................................................

अतुल कुलकर्णी :  बुद्धिमान नटरंग

‘हे राम’ आणि ‘चांदणी बार’मधून अतुल कुलकर्णी हिंदीत घराघरांत पोचले. मराठी चाहत्यांना मात्र त्यांचा ‘नटरंग’ भावला. हिंदी, मराठीसह पाच दक्षिणी भाषांमध्ये ते काम करतात. अभिनेता, निर्माता, पटकथालेखक अशी त्यांची विविध रूपं त्यांच्या चाहत्यांनी पाहिलीत. राजकीय भूमिका असलेले अभिनेते म्हणून त्यांची कीर्ती आहे. शिक्षण क्षेत्रात मुलांसोबत विविध प्रयोग करतात. अत्यंत शिस्तबद्ध आणि बुद्धिमान नट असा त्यांचा बोलबाला आहे.

.................................................................................................................................................................

नागराज मंजुळे : सिनेमा बदलवणारा

‘सैराट’ चित्रपट गाजला. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे मराठी घराघरांत पोचले. अमिताभ बच्चन यांना घेऊन नागराज यांनी ‘झुंड’ हा हिंदी सिनेमा केला. तो ही गाजला. नागराज देशभर पोचले. प्रस्थापित दिग्दर्शकांपेक्षा स्वतःची वेगळी दिग्दर्शक स्टाईल हा नागराज यांचा युएसपी आहे. ‘फॅण्ड्री’, ‘पिस्तुल्या’ हे सर्व चित्रपट गाजले. दबलेल्या लोकांचा आवाज चित्रपटांतून नागराज सर्वांपर्यंत पोचवतात, हे त्यांचं दिग्दर्शक म्हणून नजरेस भरणारं वैशिष्ट्य. मराठी सिनेमाच त्यांनी बदलून टाकला.

.................................................................................................................................................................

‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर

लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई

पाने - १४०

मूल्य - २००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......