‘मोदी महाभारत’ : सद्यकाळात वागळे यांच्यासारख्या निर्भीड आणि खंबीर पत्रकाराचं म्हणणं गांभीर्यानं समजून घेण्याची निकड, गरज आणि आवश्यकता आहे!
ग्रंथनामा - आगामी
राम जगताप
  • ‘मोदी महाभारत’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 27 August 2022
  • ग्रंथनामा आगामी मोदी महाभारत Modi Mahabharata निखिल वागळे Nikhil Wagle डायमंड पब्लिकेशन्स Diamond Publications

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत : वेध मोदीपर्वातल्या राजकीय घडामोडींचा’ हे पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१.

साधारणपणे दीड-दोन वर्षांपूर्वी पत्रकार संपादक सुनील कर्णिक यांनी व्हॉट्‌सॲपवर मेसेज पाठवून विचारलं होतं, ‘‘अत्रे- वागळे-केतकर या संपादक त्रयींवर पुस्तक लिहायला आवडेल का?’’ तिन्ही संपादक आवडते, पण आवडणारी प्रत्येक गोष्ट झेपतेच असं नाही. त्यामुळे कर्णिकांना ‘‘शक्य नाही,’’ असं उत्तर देऊन टाकलं; पण तो विषय पुढे बरेच दिवस मनात घोळत होता. तिघेही ‘निर्भीड’ पत्रकार! अत्रे बऱ्याच आधीच्या पिढीतले, पण केतकर-वागळे तसे जवळपास एकाच पिढीतले म्हणता येतील. त्यातही कर्णिकांच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘‘आचार्य अत्रेंनंतर निखिल वागळे यांच्यासारखा झुंजार पत्रकार महाराष्ट्राने पाहिला नाही.’’

अत्रेंच्या निधनानंतर जवळपास ११ वर्षांनी माझा जन्म झाला. त्यामुळे त्यांची पत्रकारिता पाहण्याची किंवा त्यांच्या सोबत काम करण्याची शक्यता नव्हतीच, पण केतकर-वागळे यांची संपादकीय कारकिर्द आधी वाचक आणि नंतर पत्रकार म्हणून काही काळ पाहायला मिळाली. केतकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण वागळे यांच्या सोबत मिळाली.

वर्ष २००७. राजन खान यांच्या ‘अक्षर मानव’ या संस्थेच्या वतीने श्रीराम लागू व विजय तेंडुलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झाला. त्या कार्यक्रमाच्या संयोजनात मी सहभागी होतो. त्यावेळी वागळे यांना पहिल्यांदा भेटण्याची संधी मिळाली. वागळे यांच्या झुंजारपणाबद्दल, आक्रमकतेबद्दल आणि निर्भीडतेबद्दल आम्ही ऐकून होतो, पण ते मनानेही इतके उदार, प्रांजळ आणि निर्मळ आहेत, हे त्यावेळी पाहायला मिळाले. हे आमच्यासाठी नवीन होतं.

संध्याकाळी वागळे यांच्या सोबत जेवण करतानाही इतरांचं शांतपणे ऐकून घेणाऱ्या आणि अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींबाबत तत्परतेनं नापसंती दर्शवणाऱ्या त्यांच्या नम्र व रोखठोक स्वभावाचं दर्शन घडलं. निरोप घेऊन निघताना त्यांनी मला सांगितलं, ‘‘मी लवकरच एका नव्या मराठी वृत्तवाहिनीचा संपादक म्हणून जॉइन होतोय. तू इथं पुण्यात काय करतोयस? पत्रकारितेत ये. एक मेनंतर मला फोन कर.’’

ही ऑफर माझ्यासाठी एक प्रकारे सुवर्णसंधीच ठरली. ठरल्याप्रमाणे वागळे यांनी ‘आयबीएन-लोकमत’मध्ये नोकरी दिली, पत्रकारितेचा फारसा अनुभव नसताना थेट मुंबईत, वृत्तवाहिनीत काम करण्याची संधी दिली. प्रत्यक्षात माझ्यासारख्या कितीतरी नवख्या, होतकरू आणि गरजू तरुण पत्रकारांची वागळे यांनी महाराष्ट्रभरातून निवड केली होती. मुलांच्या जवळपास बरोबरीनं मुलींचाही, तसेच ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांतल्यांचा समावेश होता. प्रस्थापित, कुशल आणि वाकबगार पत्रकारांपेक्षा नव्या, अर्धकुशल आणि अननुभवी पत्रकारांना सोबत घेऊन एका नव्या वृत्तवाहिनीची उभारणी करणं, ही तशी जोखमीचीच गोष्ट होती; पण जोखीम पत्करणार नाहीत, धोका ओढवून घेणार नाहीत आणि प्रस्थापित संकेत, प्रथा-परंपरा, व्यक्ती-संस्था यांच्याशी पंगा घेणारे नाहीत, ते वागळे कसले!

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘आयबीएन-लोकमत’मध्ये वागळे यांची आम्हां सगळ्या सहकाऱ्यांवर बारीक नजर असे. कुणीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. सगळ्यांना ते ‘ओळखून’ होते. त्यामुळे गाफील राहणाऱ्यांना, चुका आणि कामचुकारपणा करणाऱ्यांना ते वेळीच ‘सरळ’ करत. काम, कामाची गुणवत्ता याच्याशीच त्यांना कर्तव्य असे. अमुक बातमी करू नका, तमुक माणूस नको, फलाणा विषय नको- असं त्यांनी कधीही आम्हां कुणाला सांगितल्याचं स्मरत नाही. रोज मीटिंग होत. त्यांत सर्वांना बोलण्याची संधी असे. ‘‘चर्चेच्या पातळीवर लोकशाही, निर्णयाच्या पातळीवर हुकूमशाही,’’ असं ते काहीसं गमतीनं म्हणत. वागळे यांचा आमच्यावर धाक होता, जरबही होती, पण दहशत नव्हती. ते हुकूमशाही वृत्तीचे संपादक नव्हते; नाहीत. त्यांनी कधीही आपले आग्रह आमच्यावर लादले नाहीत. आपली मतं आम्हांला स्वीकारायला भाग पाडलं नाही. उगाच दार्शनिकाचा आव आणून आम्हांला कधी तत्त्वज्ञान झोडलं नाही. ‘कामाचं बोला आणि विषय संपवा,’ हा त्यांचा सर्वसाधारण खाक्या होता. वागळे संपादक म्हणून चांगलं काम करणाऱ्याचं जाहीरपणे, मुक्त कंठानं कौतुक करत आणि चुका करणाऱ्यांची तशाच प्रकारे तासम्‌पट्टीही!

‘कनिष्ठांशी मुजोरी आणि वरिष्ठांशी लाचारी’ या वृत्तीचे संपादक मराठी पत्रकारितेत अनेक आहेत; पूर्वीही होऊन गेलेत. हल्ली तर तो संपादकांचा ट्रेडमार्कच झाला आहे, पण याला वागळे सणसणीत अपवाद आहेत. उलट वरिष्ठांच्या चुकीच्या निर्णयांना भीक न घालणारा, पण आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना एक प्रकारे कुटुंब मानून जातीनं त्यांतल्या प्रत्येकाच्या कामाकडे लक्ष ठेवणारा, त्याच्या कामाची वास्तपुस्त करणारा, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा, रागाच्या भरात वाट्टेल ते बोलणारा, पण नंतर त्या व्यक्तीनं सोडून जाऊ नये किंवा गेला असेल, तर परत यावं, यासाठीही प्रयत्न करणारा, आपल्या गुणवान सहकाऱ्यांची कदर करणारा आणि ते सोडून गेल्यावरही त्यांचं, त्यांच्या कामाचं कौतुक करणारा असा संपादक मी पाहिलेला नाही.

वागळे यांचे राग-लोभ जरा तीव्र आहेत, तशीच त्यांची गुणग्राहकताही. ते तोंडानं फटकळ आहेत, तसेच प्रेमळही आहेत. बोलतात तेव्हा निर्भीडपणे बोलतात, पण इतरांचं निर्भीड बोलणं ऐकूनही घेतात; टीकाही सहन करतात. ज्याचं पटत नाही मग ती व्यक्ती जवळची असो वा लांबची तिच्यावर टीकाही करतात (मग ते - विजय तेंडुलकर असोत वा कुमार केतकर). ते लोकप्रिय पत्रकार आहेत, पण लोकानुनयी नाहीत. ते स्वच्छतावादी आहेत, पण तुच्छतावादी नाहीत. ते स्वतःला पत्रपंडित, स्टॉलवर्ट मानत नाहीत, इतकंच काय, पण बहुतांश मराठी वर्तमानपत्रांच्या व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना स्वतःला ‘विचारवंत’ म्हणून घ्यायला आवडतं, तसंही त्यांचं नाही.

महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक-कलावंत यांच्याबद्दल वागळे यांना आस्था आहे. त्यांच्या योग्य कामांची ते दखल घेतात, कौतुक करतात आणि चुकीच्या वेळी स्पष्टपणे विरोधही करतात. वागळे यांच्याकडे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याकडे असतो तसा आवेश, आक्रमकता दिसते, पण ते केवळ आवेशी, आक्रमक नाहीत. व्यवस्थेतल्या, संस्थेतल्या, व्यक्तीतल्या उणिवा त्यांना डाचतात आणि त्या ते स्पष्टपणे नोंदवतात. आपल्या आवडत्या माणसांचं आणि संस्थेचं उणेपण सांगायलाही ते कचरत नाहीत, पण सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याचदा दिसणारा ‘विरोधासाठी विरोध’ हा प्रकार वागळे यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. ते सत्याची चाड बाळगणाऱ्या पत्रकारितेचं बोट कधीही सुटू देत नाहीत.

२.

अग्रलेख, लेख, सदरं त्यांनीही लिहिली आहेत. ‘आपलं महानगर’चे संपादक असताना त्यांनी कितीतरी उत्तम अग्रलेख लिहिलेत. त्याची बरीच पुस्तकं त्यांना करता आली असती, पण ती त्यांनी केली नाहीत. त्यांचं ‘कॅलिडोस्कोप’ हे सदर तर खूपच लोकप्रिय होतं. त्यातल्या लेखांचे पाच-सहा खंड त्यांना नक्कीच प्रकाशित करता आले असते. निदानपक्षी ‘निवडक कॅलिडोस्कोप’ म्हणून एखादा जाडजूड खंड तरी नक्कीच काढता आला असता, पण तेही त्यांनी मनावर घेऊन केलं नाही, असंच दिसतं. इतकंच नाही, तर त्यांनी प्रसिद्ध अमेरिकी पत्रकार विल्यम शिरर यांच्या ‘गांधी अ मेमॉर’ या पुस्तकाचा ‘महात्मा आणि माणूस’ या नावानं संक्षिप्त व स्वैर मराठी अनुवाद केला आहे. तो साप्ताहिक ‘माणूस’मध्ये १९८२मध्ये क्रमश: प्रकाशित झाला आहे. त्याची राजहंस प्रकाशनाने ‘माणूस’च्या १ जानेवारी १९८३च्या अंकात ‘आगामी प्रकाशन’ म्हणून जाहिरातही केली होती. मात्र हे पुस्तकही आजवर प्रकाशित होऊ शकलेलं नाही, असं दिसतं.

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वागळे यांना ‘पुस्तकी मनसबदार’ होण्याची इच्छा वा महत्त्वाकांक्षा नाही, हे एक वेळ ठीक मानलं, तरी त्यांच्या पुस्तकांबाबत समाजातूनही फारसा दबाव त्यांच्यावर आलेला दिसत नाही. अन्यथा असं घडता कामा नये. त्यामागे दोन-तीन कारणं दिसतात. वागळे यांच्यासारख्या काहीशा आक्रमक, झुंजार, व्यवस्थेशी पंगा घेणाऱ्या संपादकाकडून लोकांचीही फारशी पुस्तकांची अपेक्षा नसते; निदान महाराष्ट्रीय तरी. पुस्तकी मनसबदारीनं पछाडलेला पत्रकार हा सहसा हस्तिदंती मनोऱ्यात राहणारा असतो आणि वागळेंना तर त्याची ॲलर्जी आहे. सामान्य लोकांशी संवाद करण्यात, त्यांना भेटण्यात, त्यांचे प्रश्न समजून घेण्यात आणि त्यांच्या वतीनं व्यवस्थेशी, राज्यकर्त्यांशी भांडण्यातच त्यांना खरं स्वारस्य असल्याचं दिसतं.

त्यामुळेच ३०-४० वर्षं पत्रकारितेत काम करूनही वागळे यांच्या नावावर किती पुस्तकं आहेत? मोजून तीन. ‘श्रीकृष्ण अहवाल : एक विश्लेषण’, ‘ग्रेट भेट’ आणि ‘स्पष्ट बोलायचं तर...’ पैकी पहिलं पुस्तकं डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या काळात मुंबईत झालेल्या भीषण दंगलींच्या संदर्भातलं छोटं १००-१२५ पानांचं पुस्तक आहे. वागळे पत्रकार आहेत म्हणजे नेमके काय आहेत, हे ज्यांनी वागळेंची कारकिर्द पाहिलेली नाही, त्यांना जाणून घ्यायचं असेल, तर त्यांनी ‘श्रीकृष्ण अहवाल : एक विश्लेषण’ हे पुस्तक जरूर वाचावं. देशभर गाजलेल्या या अहवालाचं इतकं वस्तुनिष्ठ व सडेतोड विश्लेषण मराठीत वा इंग्रजीत इतर कुणी केल्याचं दिसत नाही.

‘आयबीएन-लोकमत’मध्ये असताना २००८ ते २०१३ या काळात वागळे यांनी घेतलेल्या निवडक २५ मुलाखतींचं ‘ग्रेट भेट’ हे पुस्तक आहे. ‘ग्रेट भेट’ हा वागळे यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता. ‘आठवड्याला एक मुलाखत’ या क्रमानं वर्षभरात जवळपास ५२ मुलाखती ते घेत. पाच वर्षांत अडीचशेहून अधिक मुलाखती त्यांनी घेतल्या. त्यांतल्या केवळ २५ मुलाखतींचा समावेश या पुस्तकात आहे. २०१३नंतरही हा कार्यक्रम काही काळ सुरू होता, पण त्या मुलाखतींचा पुढचा संग्रह झालेला नाही. अजून तरी प्रकाशित झालेला नाही.

‘स्पष्ट बोलायचं तर’ हे वागळे यांचं तिसरं पुस्तक. ते मार्च २०१९मध्ये प्रकाशित झालं. गुजरातचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींची काहीशी आश्चर्यकारकरीत्या २०१४4च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपकडून निवड झाली. निवडणूक प्रचाराच्या काळात मोदींची भाजपकडून ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा निर्माण करण्यात आली. त्यांच्या ‘गुजरात मॉडेल’चा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्यात आला. अतिशय प्रभावी प्रचारतंत्राच्या माध्यमातून मोदींच्या कणखर, खंबीर आणि कार्यक्षम नेतृत्वाचा गवगवा करण्यात आला. एकट्या मोदींच्या नावावर भाजपने ही निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमतानं जिंकलीही, पण एक ‘नवी आशा’ म्हणून प्रोजेक्ट केलेल्या मोदींच्या नेतृत्वानं पहिल्या १०० दिवसांतच भ्रमनिरास करायला सुरुवात केली. तेव्हा सप्टेंबर २०१४पासून वागळे यांनी दै. ‘दिव्य मराठी’मध्ये मोदींच्या कारभाराची चिकित्सा करणारं ‘कॅलिडोस्कोप’ हे साप्ताहिक सदर लिहायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ त्यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ या पोर्टलवरही सदरलेखन केलं. या तिसऱ्या पुस्तकात त्यांनी या दोन्ही सदरांत सप्टेंबर २०१४ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत लिहिलेल्या निवडक ५४ लेखांचा समावेश आहे. थोडक्यात, पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या तीन वर्षांच्या सत्ताकाळातल्या प्रमुख घडामोडींविषयीचं लेखन या पुस्तकात आहे.

३.

आता प्रस्तुत पुस्तकाविषयी. २५ जानेवारी २०१८ ते ६ जून २०१९ या कालावधीत वागळे यांनी ‘अक्षरनामा’ या फीचर्स पोर्टलवर ‘सडेतोड’ हे साप्ताहिक सदर लिहिलं. त्याचं हे पुस्तकरूप. यात एकंदर ५० लेखांचा समावेश आहे. सोयीसाठी त्यांची ‘मोदी-भारत’, ‘उर्वरित भारत’, ‘गोदी मीडिया - भारत’ आणि ‘फडणवीस-महाराष्ट्र’ अशा चार विभागांत मांडणी केली आहे. या पुस्तकात सदरातील केवळ चार लेख वगळले आहेत.

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या पुस्तकाची काही वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. यात पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळातल्या-२०१८-१९ या काळातल्या प्रमुख राजकीय घडामोडींचा समाचार आहे. याचा अर्थ असा नाही की, या पुस्तकात केवळ पंतप्रधान मोदी, त्यांचं सरकार, त्यांच्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणं यांवरच टीकाटिप्पणी आहे. विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यावरही प्रसंगोपात योग्य तिथं टीका आहे. अगदी थेटच सांगायचं तर भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, समाजवादी आणि इतर प्रादेशिक पक्षांवरही वागळेंनी लिहिलं आहे. मात्र केंद्रात आणि देशातल्या अनेक राज्यांत भाजप सत्ताधारी असल्यानं त्यावर आणि त्याच्या नेत्यांवर लिहिलेल्या लेखांची संख्या जास्त आहे, आणि ते साहजिकही आहे, कारण ‘सत्ताधाऱ्यांच्या ध्येयधोरणांचीच पत्रकारानं जास्त दखल घ्यायची असते’ या तत्त्वाला ते धरून आहे. राजकीय लेखांचं प्रमाण सर्वाधिक असलं, तरी काही सामाजिक सांस्कृतिक विषयांवरचे लेखही आहेत.

या पुस्तकातला ‘मोदी-भारत’ हा पहिला विभाग सर्वांत मोठा आहे. त्यात तब्बल २७ लेखांचा समावेश आहे. त्यातले सर्व लेख पंतप्रधान मोदी व त्यांचं सरकार याविषयी आहे. ‘उर्वरित भारत’ हा दुसरा विभाग १५ लेखांचा असून त्यात इतर राजकीय पक्ष, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत घडलेल्या घडामोडी याविषयीच्या लेखांचा समावेश आहे.

‘गोदी मीडिया - भारत’ या विभागात केवळ चार लेखांचाच समावेश आहे. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा ‘गोदी मीडिया’ नावाचा भारतीय पत्रकारितेचा एक नवाच नमुना २०१४नंतर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या विभागातल्या लेखांतून पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात भारतीय प्रसारमाध्यमांची कशी दुरवस्था झाली, याची अगदी यथोचित कल्पना येते.

‘फडणवीस-महाराष्ट्र’ या विभागात १४ लेख आहेत. ‘मोदी-भारत’ नंतरचा हा या पुस्तकातला सर्वांत मोठा विभाग. या काळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सेना-भाजप युतीचं सरकार होतं. त्यामुळे केंद्र सरकारनंतर राज्य सरकारच्या कारभारावरच्या लेखांची संख्या सर्वाधिक आहे.

थोडक्यात, या पुस्तकातून जानेवारी २०१८ ते जून २०१९ या काळातल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातल्या काही प्रमुख घडामोडी जाणून घेता येतात. ‘‘राजकीय स्वरूपाच्या लेखनाला तात्कालिकतेची मर्यादा असते,’’ असं म्हणतात ते काही अंशी खरंही आहे. पण प्रस्तुत पुस्तक त्याला अपवाद आहे. कारण हा एक प्रकारे जानेवारी २०१८ ते जून २०१९ या काळाचा दस्तऐवज आहे. या काळात भारतीय राजकारण नेमकं कसं होतं, त्यात काय काय घडत होतं हे ज्या कुणा अभ्यासक, पत्रकार आणि वाचक यांना यापुढच्या काळात जाणून घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी हे पुस्तक मोलाचं आणि महत्त्वाचं आहे.

किंबहुना असंही म्हणता येईल की, ‘स्पष्ट बोलायचं तर’ आणि ‘मोदी-महाभारत’ ही एक प्रकारे जोड पुस्तकं आहेत. या दोन्हींतून पंतप्रधान मोदी यांच्या सप्टेंबर २०१४ ते जून २०१९ या सत्ताकाळातल्या प्रमुख घटना घडामोडी जाणून घेता येतात.

‘‘वागळे आक्रमक पत्रकार संपादक आहेत. त्यांच्या लेखनात आणि बोलण्यात आक्रमकता असते,’’ हा केवळ काही शहरी, टिपिकल, सुशिक्षित बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांचाच आरोप आहे असं नाही, तर वागळे यांच्या काही समकालीन पत्रकारांचंही हेच मत आहे. ‘महानगर’पेक्षा ‘आयबीएन-लोकमत’ची त्यांची कारकिर्द जास्त आक्रमक होती, असं म्हटलं जातं. टीव्ही हे मुळातच लाउड माध्यम आहे, त्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असावा, असं वाटतं. पण असो. त्याचा प्रतिवाद करण्याची ही जागा आणि वेळ नाही. मात्र इतकं नक्की म्हणता येईल की, महाराष्ट्रातली बहुजन पत्रकारितेची परंपरा सुरुवातीपासून आक्रमकच राहत आली आहे; आणि आक्रमक आहे म्हणून ती तत्त्वनिष्ठ, सत्यनिष्ठ आणि तटस्थ नाही, असं समजायचं कारण नाही. फुले-आंबेडकर यांच्यापासून आचार्य अत्रे यांच्यापर्यंत आणि ‘दीनमित्र’कार कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील यांच्यापासून ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे यांच्यापर्यंत अनेक उदाहरणं सांगता येण्यासारखी आहेत.

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे’ या मध्यमवर्गीय मानसिकतेला अशी पत्रकारिता फारशी रुचत नाही. बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी वर्ग हाच प्रामुख्यानं ‘ओपिनिअन मेकर’ असतो. त्यामुळे त्याच्या सदसद्विवेकाला आवाहन करणं, हेच जास्त उचित मानलं जातं; पण महाराष्ट्रात अगदी सुरुवातीपासूनच अभिजन साहित्याप्रमाणे ‘अभिजन पत्रकारिता’ जशी चालत आली आहे, तशीच जनसामान्यांच्या साहित्याप्रमाणे बहुजन पत्रकारिताही. सुरुवातीच्या काळात साहित्यात व पत्रकारितेत जनसामान्यांचं प्रतिबिंब कमी होतं. ही परिस्थिती ६०च्या दशकापासून झपाट्यानं बदलत गेली. गेल्या तीसेक वर्षांत तर इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे पत्रकारितेच्या क्षेत्रांतही बरंच ‘स्पेशलायझेशन’ झालं आहे, पण तरीही जन-अभिजन या दोन वर्गवाऱ्याच सर्वाधिक प्रबळ दिसतात. साहित्यिक काय किंवा पत्रकार काय, त्यांनी तळातल्या माणसाच्या बाजूनं असलं पाहिजे. भारतीय राज्यघटना आणि त्यातल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा पुरस्कर्ता असलं पाहिजे. वागळे यांच्या पत्रकारितेत ते स्पष्ट, स्वच्छ आणि लख्खपणे दिसतं. केवळ बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी यांचीच वाहवा मिळवण्यात धन्यता मानण्यापेक्षा त्यांना जनसामान्यांचे प्रश्न उचलून धरायला, त्यासाठी शासनकर्त्यांशी भांडायला जास्त आवडतं. त्यांच्याशी अनेकांचे मतभेद असू शकतात; मात्र त्यांच्या विश्वासार्हतेवर, सच्चेपणावर आणि त्यांनी अंगीकारलेल्या पत्रकारितेच्या नीतिमूल्यांवर सहसा कुणाला शंका घेता येणार नाही.

थोडक्यात, ज्यांना वागळे पत्रकार म्हणून माहीत आहेत, त्यांना या पुस्तकातून त्यांच्या पत्रकारितेचा पुनःप्रत्यय येईल, तर ज्यांना त्यांची संपादकीय कारकिर्द केवळ ऐकून माहीत आहे, त्यांना या पुस्तकातून तिचा बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो. २०१४पासून भारतीय पत्रकारिता सत्ताधाऱ्यांच्या रोषाला सातत्यानं बळी पडते आहे. अशा काळात वागळे यांच्यासारख्या निर्भीड आणि खंबीर पत्रकाराचं म्हणणं गांभीर्यानं समजून घेण्याची निकड, गरज आणि आवश्यकता आहे, या बाबत सहसा दुमत होऊ नये.

‘मोदी महाभारत’ : निखिल वागळे

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

पाने : २८०, मूळ किंमत : ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......