एक भारतीय भाषा म्हणून संस्कृतने स्वातंत्र्य चळवळीत काय कामगिरी बजावली?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • तिरंग्याचे एक प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 27 August 2022
  • पडघम देशकारण संस्कृत Sanskrit स्वातंत्र्य लढा Independence movement स्वातंत्र्य चळवळ Freedom movement

संस्कृतचा अन् माझा कधीही संबंध आला नाही. उदगीरच्या शाळेत आठवीला उच्च गणित की संस्कृत, असा पर्याय समोर आल्यावर मी आणि सर्व वर्गाने उच्च गणित निवडले होते. तेव्हाच संस्कृत एक मृत भाषा आहे, निरुपयोगी आहे, असे कानावर पडले. पुढे ही मते चुकीची आहेत, हे समजून आले. भारताची ती एक भाषा आहे, मात्र अन्य भाषांची ती जननी आहे किंवा ती फार समृद्ध आहे, असे दावे काही पटले नाहीत. संस्कृत लोकभाषा नव्हती, ना ती सर्वमान्य होती. ती ब्राह्मण व उच्च वर्ण वापरत. त्यामुळे अशी महत्त्वाची, मानाची अन् मोक्याची भाषा भारतीय समाजजीवनापुढचे प्रश्न सोडवण्यात कितपत वापरली जाई, याचा अभ्यास करायला हवा. तो तसा मला तिच्या अज्ञानामुळे शक्य नाही. त्यासाठी त्या भाषेच्या जाणकारांकडेच पाहावे लागणार. त्यांनी तरी संस्कृत आणि स्वातंत्र्य चळवळ असा शोध घेतला का, ते पाहावे लागेल.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५व्या वर्षांत सरकारकडून अपरंपार स्वागतसमारंभ आणि संप्रेषण झाले. पण त्यामानाने स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्ये कशाकशाची असतात, ती अधिकाधिक भक्कम कशी होत जातील आणि ती कायम कशी टिकतील, यांची ना मोदी सरकारने मांडणी केली, ना सरकारी विद्वान व विचारक यांनी! वृत्तपत्रे दरदिवसाआड एकेक स्वातंत्र्य गमावत गेली, तरी त्यांनीही ना आवाज काढला, ना कुजबुज केली. मात्र संस्कृत भाषेचा आग्रह म्हणा, तिची सक्ती म्हणा किंवा दडपशाही, गेल्या वर्षांपासून संस्कृत भाषेत उच्च शिक्षण, संशोधन, प्रचार यांना भरपूर संधी दिली गेली. तसे कशासाठी केले जात आहे, याची चर्चा अर्थातच सरकारी भयामुळे कोठे झाली नाही.

संस्कृतबद्दलचा पुळका, कळवळा अन् हव्यास दाखवणारे भाजपचे सरकार वैदिक संस्कृती, ब्राह्मणी परंपरा, हिंदुत्ववादी राजकारण, मुस्लीमद्वेष यांसाठी संस्कृतची घुसखोरी करतेय, हे दिसत होतेच. पण त्याचा परिणाम एकेक प्रश्न जन्मण्यातही झाला. त्यातला सर्वांत महत्त्वाचा म्हणजे संस्कृतची भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातली कामगिरी काय?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

म्हटले तर असा प्रश्न एकदम फजूल आहे. कारण स्वातंत्र्य चळवळ सुरू करणारे बहुतेक सर्व संस्कृत जाणत. ‘उद्दंत मार्तंड’ ते ‘केसरी’, ‘इंदुप्रकाश, ‘दर्पण’ आदी अगणित पत्रांची नावे, भाषा, संपादक, वाचक आरंभी संस्कृतोद्भव होते. बहुतेकांच्या अग्रस्थानी संस्कृत श्लोक असत. संस्कृत भाषेतल्या कथा, कविता, दृष्टान्त, सुविचार आदींचा यथेच्छ वापर करून स्वातंत्र्याबद्दलची जागृती ही पत्रे व पत्रकार करत. ‘वंदे मातरम्’ ही संस्कृतमधली पण एका बंगाली कादंबरीतली कविता अवघ्या देशाची झाली. ‘गीते’मधले श्लोक चळवळीसाठी उद्धरले जाऊ लागले. आपल्या भाषणांची सुरुवात असंख्य वक्ते संस्कृत श्लोकांनी करत. लेख व अग्रलेख संस्कृत शीर्षकांनी सजवत. काही वाद उद्भवल्यास पुराणे, धर्मग्रंथ आदींचे दाखले दिले जात. थोडक्यात, संस्कृतचा वरवरचा वावर स्वातंत्र्य चळवळीत होता.

कारण संस्कृत लोकभाषा कधीच नव्हती. अन्य भारतीय भाषांसारखी ती बहुजनांची, सामान्यांची, बाजाराची भाषा नव्हती. तिच्या सौंदर्याचा अथवा चपखलतेचा मुद्दा येथे नाही. ती अत्यंत मर्यादित व मूठभर लोकांची भाषा होती. त्या संख्येला म्हणजे तिच्या अल्पसंख्याक अवस्थेला वर्ण, जात, धर्म, सोवळेपणा, पावित्र्य, शुद्धता अशा काही गोष्टी चिकटलेल्या होत्या. व्याकरण ज्ञात असल्याशिवाय तिचा वापरच शक्य नसे. साहजिकच संस्कृत एक अभिजन भाषाच राहिली. कारण ती होतीच तशी! सबब ती जाणणारेसुद्धा आपला प्रचार सर्वसामान्यांच्या भाषेत करत.

अशा संस्कृतचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले स्थान आणि कर्तृत्व अत्यंत तोकडे आहे ते यामुळे. कदाचित यांमुळेच संस्कृत आणि स्वातंत्र्य आंदोलन याविषयी पुस्तके, अभ्यास, संशोधन, नोंदी यांचा प्रचंड तुटवडा आहे. आजचे संघपरिवारातले सत्ताधारी संस्कृत भाषेचा एवढा आग्रह धरण्यामागे हेही एक कारण आहे. त्यांची लाडकी देवभाषा आणि ते स्वत: स्वातंत्र्य चळवळीत अदृश्य होते. भाषेला स्वयंसिद्ध मर्यादा होत्या, तर संघपरिवार स्वातंत्र्यच चाहत नव्हता. स्वातंत्र्य चळवळीतून जी समता, बंधुता, न्याय, लोकशाही आदी मूल्ये निपजत होती, ती आपल्याला पुनरुज्जीवित करावयाच्या समाजव्यवस्थेला सुरूंग लावणारी आहेत. म्हणून तीत सामील न होणेच बरे, असे संघपरिवाराने ठरवले. संस्कृतात या मूल्यांचा समावेश अशक्य, कारण ती इंग्रजीमधून, पाश्चात्यांकडून आली, असे संघ माने. संघाला संस्कृत जवळची वाटते, ती या कारणाने.

संस्कृत जाणणाऱ्या व्यक्तींचा स्वातंत्र्य आंदोलनात असलेला सहभाग वेगळा आणि संस्कृत भाषेतून प्रकाशित होणारी पत्रकारिता, साहित्य यांचा सहभाग वेगळा. उघड आहे, संस्कृत भाषा अत्यंत तुटपुंजी ठरणार. आपण तोच शोध घेऊ पाहतो. मी काही या भाषेचा तज्ज्ञ नाही. त्यामुळे दुय्यम स्त्रोत व अप्रत्यक्ष साधने यांचाच आधार घ्यावा लागणार. कारण स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य चळवळीविषयी पुष्कळ साहित्य संस्कृतात अवतरल्याचे आढळते. ‘स्वतंत्रता आंदोलने में संस्कृत साहित्य की भूमिका’ हा शास्त्री कौशलेन्द्र यांचा लेख गुगलशास्त्रींनी ‘वन इंडिया’ या आंतरजालीय मंचासाठी लिहिल्याचे दाखवले. ११ ऑगस्ट २०२२ रोजीच तो प्रसिद्ध झाला आहे. स्वामी भगवदाचार्य यांनी ‘भारतपारिजातम्’, ‘पारिजातापहारम्’ आणि ‘पारिजातसैरभम्’ असे तीन काव्यखंड स्वातंत्र्य चळवळीवर लिहिले. इंग्रजांच्या बंधनांमुळे या खंडांचे प्रकाशन दक्षिण आफ्रिकेत झाले होते. लेखक सांगतात की, गांधींना नायकत्व देऊन संस्कृतात अनेक काव्ये, नाटके, चरित्रे रचली गेली. त्यातले बरेच ग्रंथ अप्रकाशित आहेत म्हणे!

दक्षिण भारतात संस्कृतचे प्रभुत्व असल्याने त्या भागात उत्तरेच्या मानाने अधिक साहित्य लिहिले गेले. त्यात ठळक म्हणजे कवयित्री पंडिता क्षमा राव यांनी ‘सत्याग्रहगीता’ आणि ‘स्वराज्यविजय:’ अशी काव्ये लिहिली. सुब्रमण्यम भारती हे महाकवीही स्वातंत्र्य चळवळीविषयी लिहीत. ते विख्यात आहेत.

शास्त्रीजी असेही नमूद करतात की, इंग्रज अनेक संस्कृत विद्वानांना ‘महामहोपाध्याय’ यांसारख्या पदव्या देऊन आपलेसे करत. त्यामुळे ब्रिटिशांची प्रशंसा करणारे असंख्य संस्कृत ग्रंथ लिहिले जात. ‘राजभक्तिप्रकाश:’ आणि ‘जॉर्जचरितम्’ ही त्याची उदाहरणे. बलदेवानंद सागर नामक आकाशवाणीचे एक वृत्तनिवेदक आहेत. त्यांचा एक निबंध सापडला. त्यात ते संस्कृत पत्रकारितेचा थोडक्यात आढावा घेतात. ते म्हणतात की, लाहोर येथून १८७२ साली ‘विद्योदय’ नावाचे पत्र सुरू झाले. ते खरे पत्रकारिता करू लागले. ‘संस्कृतचंद्रिका’ नावाचे पत्र आधी कोलकाता व नंतर कोल्हापूर येथून प्रकाशित होऊ लागले. ते राजकीय लेखन करत असल्याने संपादक अप्पाशास्त्री राशिवडेकर यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. ‘सुहृदय’ नावाचे आणखी एक पत्र स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणारे होते. स्वातंत्र्य चळवळीतच ‘आनंद पत्रिका’, ‘गीर्वाण’, ‘शारदा’, ‘श्री’, ‘उषा’, ‘संस्कृतग्रंथमाला’, ‘भारतश्री’ इत्यादी नियतकालिके जन्मली. मात्र ती चळवळीत उतरली होती की माहीत नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राधावल्लभ त्रिपाठी नामक एक विद्वान आहेत. त्यांचा एक लेख साहित्य अकादमीच्या ‘समकालीन भारतीय साहित्य’ या द्वैमासिकात (सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९) प्रसिद्ध झाला आहे. तो ‘संस्कृत कविता : नई चेतना की अर्धशती’ या शीर्षकाचा आहे. या गृहस्थाची अकादमीत बरीच वट दिसते. त्यांचे माझ्याकडील एक पुस्तक त्यांचा परिचय देताना सांगते की, त्यांची १६७ पुस्तके असून २२३ संशोधन निबंध व टीका प्रसिद्ध आहेत! ३० संस्कृत नाटकांचे अनुवादही त्यांनी केले. त्या लेखात त्रिपाठींचा दावा असा आहे की, १७७३ साली बंगालमध्ये वॉरेन हेस्टिंग्ज गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने हिंदू धर्मशास्त्रांचा आधार न्यायनिवाडे करायला घेतला. अनेक संस्कृत पंडित कामाला लावले. तेथपासून संस्कृत साहित्यात नवचेतना व नवी राजकीय दृष्टी शिरली. त्यामुळे इंग्रजांचे गुणगान करणारे संस्कृत साहित्यही भरपूर उत्पन्न झाले. ‘आंग्लसाम्राज्यम्’ असे महाकाव्यच केरळच्या राजराज वर्मा यांनी लिहिले, तर उर्वीदत्त शास्त्री यांनी ‘एडवर्डवंश’ हे महाकाव्य लिहिले. बंगाली कवी नारायण चंद्र यांनी गव्हर्नर अॅश्ले इडन यांच्यावर ‘इडनचरितम्’ लिहिले. गलगली रामाचार्य यांनी ‘स्वदेशीयलहरी’, ‘श्रीगान्धीटोपीलहरी’, ‘श्रीचक्रलहरी’, ‘बहिष्कारलहरी’ आणि ‘कारागृहलहरी’ अशी पाच लहरी-काव्ये रचली. पहिली लहरी १९२१ साली रचण्यात आली. प्रभुदत्त ब्रह्मचारी यांच्या नावे ‘गांधीनान्दीश्राद्धामृतम्’, ‘चर्खावंदनामृतम्’, ‘राष्ट्रध्वजामृतम्’ आदी काव्ये आहे. मात्र ती १९४७ पूर्वीची आहेत का, सांगितलेले नाही. पंडिता क्षमा राव यांचाही उल्लेख त्रिपाठी यांनी केला असून त्यांचेही कार्य स्वातंत्र्य चळवळीत अवतरल्याचे नमूद केले आहे.

संस्कृत भाषेला वर्ण व जात चिकटवल्याचा परिणाम असा झाला की, त्या त्या जातीच संस्कृतची भलामण, गौरव आणि प्रचार करत सुटल्या. ज्यांना वर्णजातीव्यवस्था मंजूर आहे, त्यांनाच या भाषेचे कौतुक असते. अभ्यास म्हणून ही भाषा आत्मसात करणे वेगळे आणि जात्याच ती आपली आहे, असे गृहित धरून तिचा कैवार घेणे वेगळे. हिंदुत्ववादी पक्ष आणि व्यक्ती स्वत: या भाषेचे कितपत ज्ञानी आहेत, ते कळत नसताना त्यांनी संस्कृतची सक्ती करावी, याचा अर्थ काय?

महाराष्ट्राचे एक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांनी ‘हॅलो’ न म्हणता ‘वंदे मातरम्’चा फोनवर प्रतिसाद द्यावा, असा फतवाच काढला. हा असा अतिरेकी आग्रह हिंदू राष्ट्रवाद्यांनी अन्य गोष्टींचा करणे समजू शकते, पण ते संस्कृतच्या आडून अथवा संस्कृतच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे, ते वैदिक पुनरुज्जीवन करू पाहत आहेत. म्हणजे संस्कृतचा अप्रस्तुत वापर ते करत आहेत, असेच ना?

सिमोन साहनी या अभ्यासिकेने आपल्या ‘द मॉडर्निटी ऑफ संस्कृत’ (युनिर्व्हसिटी ऑफ मिन्नेसोटा प्रेस, २००९) या पुस्तकात तर हिंदुत्ववाद्यांनी संस्कृतचे अपहरण केल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यांनी प्रस्तावनेत म्हटले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हापासून मी संस्कृतचा अभ्यास, वाचन सुरू केले. हिंदू राष्ट्रवाद समजावून घ्यायचा तर संस्कृत अभ्यासली पाहिजे, असे त्या म्हणतात. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे हा संस्कृतवर कबजा करण्यासारखेच मानले पाहिजे आणि संस्कृत महाकाव्यांची सांधेजोड विसाव्या शतकातल्या निवडणूक राजकारणाशी करण्याचा जो मस्तवाल पंथ तयार झाला, तेही लक्षात घेतले पाहिजे.

संस्कृत भाषेला भाजपमुळे अचानक जो राजकीय दर्जा आला, त्यावर साहनी यांनी भर दिलेला आहे. एक परंपरा म्हणून ही भाषा मान्यता पावली असताना गेल्या काही वर्षांत ती हिंदू राष्ट्रवादाची एक वाहिनी बनली आहे. त्यामुळे ही भाषा शिकवणाऱ्या बहुतकरून संस्था हिंदुत्ववाद्यांच्या असतात, असे त्या सांगतात. एकदा का तुम्ही संस्कृतचे कैवारी झालात की, प्राकृत भाषा गावंढळ, अध:पतीत ठरतात. म्हणजेच संस्कृतचे एका अर्थाने हे ब्राह्मणी सत्तेला मिळणारे समर्थन आहे, असा त्यांचा दावा आहे.

राजा राममोहन राय यांनी तेव्हाच्या शिक्षणातून संस्कृत हद्दपार करून इंग्रजी आणली होती. त्यांचा ब्राह्मो समाज हिंदू धर्मातल्या सर्व सत्तांच्या विरोधात होता. नुकतीच म्हणजे २५ ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी गुलबर्गा विद्यापीठात बोलताना ‘संस्कृत राष्ट्रीय भाषा केली जावी’, अशी मागणी केली. आता हे असे विधान शुद्ध राजकीय तर आहेच, ते धोक्याचेही आहे. कारण एका संवैधानिक पदावरील व्यक्तीचे असे विधान भारतीय संविधानाच्या विरोधात जाते. संविधानसभेत पुष्कळ सदस्य संस्कृत जाणकार होते. मात्र त्यांनी अशी एक राष्ट्रभाषा कोणतीही केलेली नाही. ज्ञान, नैतिकता, चारित्र्य, पावित्र्य अन राष्ट्रीयत्व अशी काही मूल्ये एकाच भाषेला कशी काय प्राप्त असतात? उघड आहे, ती भाषा बोलणाऱ्या जातीने आत्मगौरवार्थ स्वत:च पेरलेली आहेत. संस्कृत बोलता येणे, म्हणजे ब्राह्मणीकरण होणे, असा एक अर्थ आपोआपच व्यक्त होत गेलेला आहे.

साहनी यांच्या या पुस्तकाचे परीक्षण त्रिपाठी यांनी जाने-जून २०१३च्या ‘प्रतिमान’ या अंकात (विकासशील समाज अध्ययन पीठ, नवी दिल्ली, पान ३७०) केले आहे. संस्कृतचे ते पक्षपाती असल्याने त्यांनी संस्कृत भाषेची अतीतोन्मुखी संकुचित, संप्रदायवादी दृष्टी मान्य करूनही नंतर संस्कृतने आधुनिक ज्ञानविज्ञाने कशी आत्मसात केली, ते सांगितले आहे. त्रिपाठी असे म्हणतात की, हिंदुत्वने व्यापक रूप से संस्कृत भाषा और संस्कृत साहित्य का समायोजन अपने पक्ष में कर लिया.’ (पान ३७२) पण त्रिपाठी हिंदुत्ववादाचेही पक्षधर असल्याने त्यांचा दावा असा की, संस्कृतमध्ये आधुनिक, प्रगतीशील परंपराही होत्या आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमधला राष्ट्रवाद उभा केला. मात्र हे सांगताना ते अशा विचारांची उदाहरणे मांडत नाहीत.

ज्या भाषेत ‘इतरां’ना मनाईच होती, ती भाषा तिचा करणाऱ्यांनीच प्रगत विचारांनी समृद्ध केली, असे म्हणणे म्हणजे संस्कृतसह तिचे वापरकर्ते, लवचीक, परिवर्तनशील होते असे मानणे. तसे ठोस काही मिळत नाही, म्हणून त्रिपाठी आधुनिक, स्वातंत्र्य चळवळीला बळकट करणारी आणि तरीही लोकप्रिय अशी उदाहरणे देत नाहीत. अर्थ माहीत नसताना ‘वंदे मातरम्’ म्हणणारे करोडो आहेतच की! त्यातही कोणी नऊ कडव्यांचे संपूर्ण काव्य गात बसत नाही. संघाच्या कार्यक्रमांत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणायचा प्रघात आहे, तो मग कशामुळे? स्वातंत्र्यासाठी काहीही करायचे नाही, वर ‘वंदे मातरम्’ संपूर्ण म्हणत श्रोत्यांना खोळंबून ठेवायचे अन् आपण किती राष्ट्रीय, राष्ट्रवादी वगैरे आहोत, याचा बनाव करायचा, ही यांची राष्ट्रभक्ती!

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वेंडी डॉनिजर या लेखिका संस्कृतपंडित आहेत. त्या म्हणतात की, फक्त ब्राह्मणांनीच संस्कृत साहित्यात कामगिरी बजावली नाही, तर अनेक जाती त्या कामी वेळोवेळी पुढे येत गेल्या. ब्राह्मण पोकळीत लिहीत नव्हते, ना सारेच फार अव्वल होते. ब्राह्मणांच्या नावावर खपणारी ही भाषा इतरांनीही समृद्ध केली. मात्र त्यांना नावे नाहीत. ते सारे अज्ञात, अनामिक आहेत.

हे मान्य केले तरी मूळ प्रश्न राहतोच. तो म्हणजे भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गाभ्याची भाषा होऊन बसलेली संस्कृत राजकारणाची व राजकीय स्वातंत्र्याची भाषा का नाही बनली? आपल्या अंगभूत मर्यादांनीच तिला चळवळीत उतरायला मना केले गेले ही शक्यता तर आहेच, पण अभिजनांची ही भाषा स्वातंत्र्याच्या आंदोलनात मलिन झाली असती, अशुद्ध व भ्रष्ट झाली असती, असे भय ती वापरणाऱ्यांना वाटले असावे. म्हणूनही संस्कृतचा स्वातंत्र्य चळवळीतला वावर अत्यल्प, तोकडा दिसतो.

सर्व सरसंघचालक संस्कृत श्लोक आपल्या भाषणांत पेरतात. गोळवलकर यांची भाषणे व लेख संकलित असल्याने ते सतत संस्कृत काही तरी बोलतात, लिहितात ते कळले. मोदींनाही ती सवय आहे. म्हणजे त्यांचा संस्कृतचा राजकीय वापर चालूच आहे. अन्य कोणताही राजकीय नेता (शरद पवार, नीतीशकुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक, स्टालिन, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे) संस्कृतच्या वाटेलाही जात नाही.

आमच्यासारखे अजाणही गेले नसते, पण सहज सुचवले व सहभागाविषयी प्रश्न विचारला. आता ज्या संस्कृतप्रेमींना, अभ्यासकांना संस्कृतवरचा हिंदुत्ववाद्यांचा कबजा मोकळा करून ती ‘खरीखुरी सेक्युलर’ भारतीय भाषा म्हणून स्वीकारायचीय, त्यांनी कामाला लागावे. अन्यथा आमच्यासारखे संघद्वेष्टे संस्कृतचाही द्वेष करू लागतील. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ अशा अर्थाने नव्हे, तर ‘विषाची परीक्षा’ त्याची चव घेऊन करायची नसते, या अर्थाने!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

hrishi rajul

Mon , 29 August 2022

ajun kahi vinodi lekhan asel tar karave


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......