प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘शिक्षणाच्या कविता’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 24 August 2022
  • ग्रंथनामा झलक शिक्षणाच्या कविता Shikshanachya Kavita उमेश घेवरीकर Umesh Ghevrikar हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

‘शिक्षणाच्या कविता’ हा उमेश घेवरीकर यांचा कवितासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

कोणत्याही विषयावर चर्चा व्हायची असेल, त्यातील प्रश्न सुटायचे असतील, तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते; अन्यथा ते प्रश्न, त्यातील भावभावना फक्त त्या क्षेत्राशी संबंधित लोकांभोवतीच फिरत राहतात, समाजातील विचारी लोकांपर्यंत किंवा निर्णय प्रक्रियेतील लोकांपर्यंत ते पोचत नाहीत. दलित साहित्य हे त्याचे सर्वांत प्रभावी उदाहरण आहे. ते निर्माण झाल्यानंतर दलितांच्या प्रत्यक्ष संघर्षाला बळ मिळाले. विचारी वर्गात दलितांच्या प्रश्नाबद्दल जागृती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत निर्माण झालेल्या साहित्यामुळे त्या संवेदना विचारी वर्गापर्यंत पोचल्या व सरकारला निर्णय घेणे भाग पडले.

शिक्षणक्षेत्राबद्दलही असेच आहे. मागील पिढीतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लेखन केले, पण आता हे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. जुन्या पिढीच्या शिक्षकांनी आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. तो त्या पिढीचा इतिहास ठरला. त्यातून त्या पिढीची बांधीलकी अधोरेखित होऊन आजच्या पिढीपर्यंत संक्रमित झाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परदेशातील शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके आज मराठीतील सर्वांत लोकप्रिय साहित्य ठरले आहे. ‘तोत्तोचान’, ‘नीलची शाळा’, ‘टीचर’, ‘टू सर विथ लव्ह’, ‘सडबरी स्कूल’ अशी कितीतरी पुस्तके सांगता येतील. ती कुणी तज्ज्ञांनी लिहिलेली नाहीत, तर प्रत्यक्ष शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांचे अनुभव संकलित केले आहेत आणि त्या आधारे ही पुस्तके लिहिली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांवर चित्रपट निघाले. त्यातून शिक्षणाचे चित्र समाजापर्यंत नेमकेपणाने पोचण्यास मदत झाली.

महाराष्ट्रात मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांनी निर्माण केलेले साहित्य तुलनेने खूप कमी झाले आहे. शिक्षकांकडून कथा, कादंबऱ्या लिहिल्या जात असताना कविता मात्र तुटक-तुटकपणे लिहिल्या जात आहेत. शिक्षक असणारे कवी त्यांच्या कवितेतील एखादी कविता शिक्षणावरही लिहितात.

या पार्श्वभूमीवर शिक्षक असलेले उमेश घेवरीकर यांनी फक्त शिक्षणाविषयी ३६ कविता लिहिल्या आहेत. हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. यातून शिक्षकांच्या मनाच्या स्पंदनांचा, विद्यार्थ्यांच्या मनातील भावकल्लोळाचा व शिक्षणप्रक्रियेतील जिवंतपणा प्रत्यय वाचकांना येत राहतो. शिक्षणावर कविता येत राहतात, याचे एक कारण घुसमट हेही असते.

प्रत्यक्ष काम करताना आपण या यंत्रातील एक स्क्रू असतो, हे नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते. त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुरटले जाते व संपूर्ण व्यवस्थेत आपण नगण्य आहोत, ही भावना आत्मसन्मानाला धक्का मारते. मनाला लागणाऱ्या टोचणीतून शिक्षकाची चिडचिड व्हायला लागते. त्यातून उमेशसारखा एखादा शिक्षक शब्दांचे रूप देऊन आपली अस्वस्थता मांडत राहतो आणि वास्तव आपल्यासमोर उलगडतो. म्हणून या कविता शिक्षक-प्रक्रियेचा आरसा आहेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे.

घेवरीकर यांच्या कवितेचा पट विस्तृत आहे. शिक्षणविषयक समज-गैरसमज, शाळेतील व शालाबाह्य मुलांचे भावविश्व, महापुरुषांचे विचार व आजचे वास्तव, गळती झालेली, कष्टकरी झालेली मुले भेटल्यावर होणारी घुसमट, शासकीय योजना व त्यांची तपासणी, बाहेरच्या जगाचे वास्तव व शाळेच्या आतले सुरक्षित जग, झाड आणि शाळा यातील समानता, आपली सारी बडबड निरर्थक वाटणारी हताशा, प्रत्यक्ष वर्गातील विविधांगी अनुभव, शिक्षकांचे पसायदान, शिक्षकांच्या जगण्यातील कृतार्थता, सुंदर क्षण अशा विविध रचना या कवितांमध्ये आहेत.

त्याचबरोबर कवितेची शैली कवितेच्या आशयानुसार बदलत जाते. आजच्या फुगलेल्या निकालासंदर्भात कवी लिहितो-

‘असा निकाल निकाल

नेटवर पसरला

गुणवत्तेचा महापूर

ब्रेकिंग बनून बरसला’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी आता लिहिते व्हायला हवे. नवीन नोकरीला लागलेले शिक्षक मला ‘आम्ही काय करावे?’ असे विचारतात, तेव्हा मी त्यांना ‘डायरी लिहा’ असे सांगतो. रोज मनात  येणारी स्पंदने, येणारे अनुभव, अधिकारी वर्गाकडून होणारी उपेक्षा, पालकांची उदासीनता व त्यांचा जीवनसंघर्ष, हे सारे लिहून काढणे आणि वेळ  येईल तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बाज आहे, त्याप्रमाणे वैचारिक किंवा ललित लेखनातून ते उतरवणे, असे करायला हवे.

शिक्षणक्षेत्रातील आज लिहिलेले साहित्य हा उद्याचा इतिहास म्हणून वाचला जाणार आहे व शिक्षणतज्ज्ञांना, मानसोपचारतज्ज्ञांना प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेचे चित्रण समजून घ्यायला व उपाययोजना सुचवायला नक्कीच मदत होणार आहे.

त्या अर्थाने या कविता स्वागत कराव्यात; अशाच आहेत. शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी त्या वाचायलाच हव्यात; पण शिक्षण क्षेत्राबाहेरील व्यक्तींनीही आपल्या बालपणाचे चित्रण पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी या कवितांच्या मांडवाखालून जायला हवे.

शिक्षक समुदायाला आत्मसन्मानाची, कृतार्थतेची भावना अनुभवायला देत, त्यांच्याच अनुभवाला शब्दरूप देत आहे, असे  वाटताना या कविता अंतर्मुखही करतात. कवी साने गुरुजींना उद्देशून लिहितो-

‘या धडपडणाऱ्या मुलांना  सावरणारे, घडवणारे

तुमच्या विचारांचे मातृहृदयी, सेवाभावी, हाडाचे शिक्षक

नेमक्या कितव्या वेतन आयोगानंतर

लाभणार आहेत या निरागस लेकरांना?

प्लिssज  सांगा ना गुरुजी...’ 

‘शिक्षणाच्या कविता’ - उमेश घेवरीकर

ग्रंथाली, मुंबई

मूल्य - ८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......