संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. या पुस्तकातल्या ‘अटकेपार’ विभागातल्या व्यक्तींविषयीचा हा मजकूर...
.................................................................................................................................................................
मोहन मधुकर भागवत : सूत्रधार
मोहन मधुकर भागवत देशातील सर्वांत पॉवरफुल नाव. केंद्रात सत्ता भाजपची, पण लगाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांच्या हाती. पेशाने पशुवैद्य असलेले मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजपर्यंतच्या सर्वांत तरुण सरसंघचालकांपैकी आहेत.
सप्टेंबर २०१८मध्ये मोहन भागवत म्हणाले होते की, संघाने माधव सदाशिव गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मधील काही भाग वगळले आहेत, जे सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत नाहीत. भारतात जन्मलेले सगळेच ‘हिंदू’ आहेत. मुस्लिमांशिवाय ही कल्पनाही मान्य नाही. ‘मॉब लिंचिंग’ या देशाच्या संस्कृतीला मान्य नाही. अशी मांडणी ते करतात, पण ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेला उच्चार पुन्हा पुन्हा करतात. हे ‘हिंदू राष्ट्र’ अर्थातच सावरकरी आणि गोळवलकरी संकल्पनेतलं आहे. देशभर त्या दिशेने वेगवेगळे प्रयोग आणि हालचाली सुरू झाल्या आहेत. १२ हजार वर्षांचा इतिहास पुन्हा लिहिला जाणार आहे. २०२५ संघाचं शताब्दी वर्ष असणार आहे. भागवतांचं लक्ष्य ठरलं आहे.
.................................................................................................................................................................
आमीर खान : पाणीवान
देवानंदचा ‘गाईड’ पाहिलाय? दुष्काळाने त्रस्त झालेल्या त्या गावासाठी राजू गाईड अपघाताने देवदूत बनतो. नाईलाजाने त्याचं उपोषण सुरू होतं. त्याचे प्राण घेत गावावर पाऊस बरसून पडतो. सिनेमा संपतो. आमीर खान महाराष्ट्रासाठी जणू ‘गाईड’ बनले आहेत. ‘पाणी फाऊंडेशन’च्या कामाने आमीर खान महाराष्ट्राच्या खेडापाड्यात पोचलेत. सत्यजित भटकळच्या मदतीने त्यांनी उभं केलेलं हे काम म्हणजे नुसती चळवळ नाही, स्वयंप्रेरणेने दुष्काळग्रस्त गावांना ‘पाणीवान’ बनवणारा हा प्रयोग आहे.
‘लगान’, ‘दंगल’, ‘पीके’, ‘तारे जमीं पे’, ‘थ्री इडिएट्स’ असे एकापेक्षा एक क्लासिकल, पण तितकेच लोकप्रिय, बॉक्स ऑफिसवर तुफान धंदा करणारे चित्रपट दिले आमीर खान यांनी. आमीर खान मुंबईकर आहे. मौलाना आझादांच्या घरातला वारसा आणि विचार जपणाराही आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी त्याने जोडलेलं पाणीदार नातं आमीर खान असण्याचा प्रभाव सांगतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अमिताभ बच्चन : वन मॅन इंडस्ट्री
हिंदी चित्रपटातला सर्वांत पॉवरफुल चेहरा आहेत अमिताभ बच्चन. ‘वन मॅन’ फिल्म इंडस्ट्री. कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा. मुंबईत आला; ‘बीग बी’, ‘महानायक’ झाला. ‘शोले’, ‘कुली’, ‘दिवार’ हे चित्रपट गाजले. अमिताभ घराघरांत पोचले. अभिनेता, चित्रपट निर्माता, टीव्ही होस्ट, गायक आणि राजकीय नेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजत, वाजत राहिली आहे. ८०व्या वर्षी ते सक्रीय आहेत. त्यांचा आवाज ऐकत राहावा असा आहे. संवाद हृदयाला भिडतात. केंद्र सरकारनं ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केलंय त्यांना. जगभर त्यांचे चाहते आहेत. मुंबईत ते राहतात म्हणूनच नाही, मुंबई अन् महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ते समरस झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे ते लता मंगेशकर... महाराष्ट्राशी जोडलेलं हे त्यांचं नातं ‘झुंड’ सिनेमाने आणखी दृढ केलं आहे.
.................................................................................................................................................................
अण्णा हजारे : सत्याग्रही फकीर
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा चेहरा आहेत अण्णा हजारे. महाराष्ट्रासह देशात त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी लढाया लढल्या गेल्या.
‘लोकपाल’च्या आंदोलनात तर सारा देश सहभागी झाला होता. या आंदोलनात नंतर २०१४मध्ये केंद्र सरकारमध्ये तख्तपालट झाला होता. राळेगण सिद्धी हे गाव आदर्श मॉडेल म्हणून अण्णांनी उभं केलं. माहिती अधिकार कायदा, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचा कायदा करायला सरकाराला त्यांच्या आंदोलनामुळेच भाग पडलं. समाजसेवेसाठी योगदान दिलं म्हणून त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. सैन्यातला साधा ड्रायव्हर ते भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा प्रणेता हा अण्णांचा प्रवास विलक्षण आहे.
.................................................................................................................................................................
नितीन गडकरी : रोडकरी
नितीन गडकरी महाराष्ट्रात मंत्री होते, तेव्हा मुंबईत त्यांनी उड्डाणपुल बांधले. मोदी सरकारमध्ये रस्त्याचे मंत्री बनले आणि देशाचे ‘रोडकरी’ बनले. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हासुद्धा त्यांचाच. रस्ते न पाहिलेल्या देशातील अनेक भागांत आज रस्ते पोचले आहेत. सगळेच रस्ते वेगवान आहेत. इलेक्ट्रिक कार आणि बस आणण्याचा आग्रहही त्यांचाच. बायो डिझेलचा पुढाकार त्यांचाच. नव्या नव्या कल्पना ते आणतात. आणि अक्षरशः रस्त्यावर उतरवतात.
भाजपचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हा हा रस्ता त्यांना प्रधानमंत्री बनण्याच्या दिशेने नेईल, असं वाटत होतं. पण न झालेल्या पूर्ती घोटाळ्याने ती स्वप्नपूर्ती झाली नाही. पक्षातल्याच एका लॉबीने त्यांना कात्रजचा घाट दाखवला. ते निराश झाले नाहीत. मिळालेल्या जबाबदारीचं त्यांनी सोनं केलं.
.................................................................................................................................................................
मुकेश धीरूभाई अंबानी : रिलायन्सचे सर्व काही
अदानी जगातल्या पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये पोचलेत. त्या दहात मुकेश अंबानी आता नाहीत. पण देशात आर्थिक उद्योग व राजकीय प्रभावात, क्रिकेट, मीडिया आणि बॉलिवुडमध्येही मुकेश अंबानी अजूनही सर्वांत प्रभावी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा देशभर, जगभर दबदबा आहे. भारतातली ही सर्वांत जास्त किंमतीची कंपनी. आशिया खंडात दोन नंबर. जगात नववा नंबर. वडील धीरुभाई यांच्याकडून कापडधंद्याचा वारसा मिळाला. मुकेश अंबानींनी रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायात भरारी घेतली. आता रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल या त्यांच्या कंपन्यांचा बाजारात बोलबाला आहे. मुंबईकर मुकेश अंबानींना जगातल्या सर्वांत प्रभावशाली लोकांच्या यादीत वरचं स्थान आहे. ‘बँक ऑफ अमेरिके’चे ते संचालक आहेत. हा मान मिळालेले ते पहिले अमेरिकेबाहेरचे व्यक्ती आहेत.
.................................................................................................................................................................
रतन नवल टाटा : उद्योग रत्न
देशाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महापुरुषांच्या यादीत जमशेदजी टाटांचं नाव असतं. त्या घराण्याचा वारसा रतन टाटांनी जपला. पुढे नेला. जगभर शंभर देशांमध्ये टाटा उद्योग समूहाचं साम्राज्य पसरवलं.
नॅनो कार त्यांची संकल्पना. स्टील, मोटार कार, चहा, मीठ या व्यवसायात टाटा समूहाने झेप घेतली. संशोधन, उच्च शिक्षण आणि समाज कार्य या क्षेत्रांत टाटा उद्योगाचा ठसा आहे. त्यामागे रतन टाटा यांची दूरदृष्टी आणि बांधीलकी आहे.
रतन टाटा यांचा त्यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी पहिल्यांदा ‘पद्मभूषण’ आणि नंतर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन केंद्रसरकारने गौरव केलाय.
.................................................................................................................................................................
अनिल काकोडकर : अणुऊर्जावान
भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पूर्ण करू शकेल, असा दृढ विश्वास असणारे शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर. भारताच्या अणु कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी. या आधी होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालकसुद्धा राहिले आहेत. ते भारताच्या १९७४ आणि १९९८च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. कल्पकस आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. अजूनही दिवसाचे १२ तास अणुकोशात राहून भारताच्या अणुऊर्जाविषयक अडचणींची उकल करण्यात ते मग्न असतात. डॉ. काकोडकर हे थोरियम इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात.
.................................................................................................................................................................
रघुनाथ माशेलकर : संशोधन पर्व
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत रघुनाथ माशेलकर. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष.
रघुनाथजी सीएसआयआरचे प्रमुख झाले, त्या वेळी तिथं २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा बसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी ‘व्हिजन’ नावाची योजना आखली. ४० प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने जोडले. त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.
आयुष्यातली सुरुवातीची वर्षे गरिबीत काढली त्यांनी. सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास केला. माशेलकर हे पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय ठरले.
.................................................................................................................................................................
रणवीर सिंग : बाजीराव
हिंदी सिनेमाचा ‘बाजीराव’ झालाय रणवीर एव्हाना. देशभर त्याचा डंका आहेच. पण बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेमुळे अस्सल मुंबईकर असलेला रणवीर सिंग महाराष्ट्राच्या घराघरांत आपला माणूस बनला आहे. ‘बँड बाजा बारात’पासून सुरू झालेली त्याची यशाची बारात अजून सुरूच आहे. बारातीतली सगळी मजा तो मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना देतोच. ‘पद्मावत’मधला खिलजी आणि ‘गली बॉय’मधला मुराद या त्याच्या कसदार भूमिका.
.................................................................................................................................................................
आशुतोष गोवारीकर : भारताचा सिनेमा
‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजो दारो’ आणि ‘पानीपत’... एकाहून एक…. बॉक्स ऑफिसवर हिट होणारे क्लासिकल चित्रपट. आशुतोष गोवारीकरांच्या चित्रपटांत आपलाही रोल असला पाहिजे, असं प्रत्येक हिंदी सुपरस्टारला वाटत असतं. सुपरस्टार असणं वेगळं आणि अभिनेता होणं वेगळं. गोवारीकरांच्या चित्रपटात अभिनय सिद्ध होतो. त्यांच्या चित्रपटात ‘भारत’ असतो. बहुविध संस्कृतीचा पुरस्कार असतो, माणुसकीचा गजर असतो, समतेचा उद्गार असतो, तरीही त्यांचा सिनेमा प्रचारकी होत नाही. ते सिनेमा काढतात. सिनेमा दिग्दर्शकाचा असतो. आशुतोष गोवारीकर केव्हाच दिग्गज झाले आहेत.
.................................................................................................................................................................
नेस नस्ली वाडिया : ९०० वर्षांचा वारसा
१७३६पासून वाडिया उद्योग समूहाचा इतिहास सांगितला जातो. ‘महिकावतीच्या बखरी’चा संदर्भ जोडला तर मुंबईवर वाडियांचं ९०० वर्षं राज्य आहे. बिंबराजा मुंबईत आला शके १०६० मध्ये. माहीमची राजधानी केली. तेव्हा चौलच्या राजाने वाडियांना राजधानी वसवायला आणि जहाजं बांधायला मुंबईत पाठवलं. ब्रिटिशांनी तेच काम दिलं. वाडियांच्या मालकीची जमीन मुंबईभर पसरली आहे. नेस वाडिया आता ‘बॉम्बे डाईंग’ कंपनीचे प्रमुख आहेत. इंडियन प्रिमियर लिगमधील पंजाब किंग्स संघाचे सहमालक आहेत. पाकिस्तानचे संस्थापक महम्मद अली जिना यांचे ते पणतू. कापड उद्योगात जगभर ‘बॉम्बे डाईंग’चं नाव आहे. पण वाडिया आहेत अस्सल मुंबईकर.
.................................................................................................................................................................
आदर पुनावाला : व्हॅक्सीनवाला
कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सीन तयार केली म्हणून नव्हे, तर व्हॅक्सीन निर्मिती क्षेत्रात त्याआधीपासून आदर पुनावाला जानेमाने आहेत. ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
सायरस पुनावला हे आदर यांचे वडील. सायरस यांनी सिरम पुण्यात सुरू केली. बीसीजी लस पुनावाला यांचीच. युरोपातही सिरमच्या व्हॅक्सीनचा बोलबाला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुणेकर आदर यांची दमदर वाटचाल सुरू आहे. ‘सिरम’चं नाव जगात दुमदुमतंय.
.................................................................................................................................................................
प्रफुलभाई पटेल : पवारांचा हात
.................................................................................................................................................................
गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष ते देशाचे विमान मंत्री, अशी विस्मयजनक वाटचाल आहे प्रफुलभाई पटेल यांची. वडिलांकडून उद्योग, राजकारणाचा वारसा त्यांना मिळाला. त्यांनी तो वारसा दिल्लीपर्यंत विस्तारत नेला. ते शरद पवारांचे उजवे हात मानले जातात. राज्यसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. खेळात त्यांना विशेष रुची आहे. फुटबॉल खेळाला आता भारतभर उभारी मिळावी म्हणून ‘इंडियप सुपर लिग’ त्यांनी सुरू केली. आशिया खंड विमान वाहतुकीला चालना दिली म्हणून त्यांचा ‘मिनिस्टर ऑफ द ईयर’ या पुरस्काराने २००४मध्ये गौरव झाला होता.
.................................................................................................................................................................
राजीव बजाज : गांधीयन उद्योजक
भारतातल्या ५० मोस्ट पॉवरफुल व्यक्तींपैकी एक आहेत राजीव बजाज. बजाज उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारतातले आघाडीचे उद्योजक राहुल बजाज यांचे ते पुत्र. बजाज फॅमिली म. गांधींच्या विचाराने प्रेरित झालेली. गांधीयन पद्धतीने धंदा करून या कुटुंबाने उद्योग जगतात स्वतःचं साम्राज्य उभं केलं. राजीव यांनी ‘पल्सर रेंज’ ही मोटारसायकल भारताच्या आणि जगभरच्या बाजारात लोकप्रिय केली. हे त्यांचं बजाज ऑटो उद्योगाला मोठं योगदान ठरलं. त्यांचा हा इनिशिएटीव भारतातल्या टु व्हीलर मार्केटला संजीवनी देणारा ठरला.
.................................................................................................................................................................
डॉ. अभय फिरोदिया : नेक समाजभान
स्वातंत्र्यसेनानी, उद्योजक नवलमल फिरोदियांचा लोकसेवेचा वारसा डॉ. अभय फिरोदिया पुढे नेताहेत. फोर्स मोटर्स लिमिटेड या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन आहेत. नेकीने त्यांनी उद्योग वाढवला. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी, भांडरकर संशोधन संस्था, नवल विरायतन अशा संस्थांना मदत करतात. फिरोदिया ट्रस्ट, मुलचंद बोरा ट्रस्ट या संस्थांमार्फत आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत सामाजिक कार्य करतात. अण्णा हजारे यांच्या मागे सुरुवातीपासून ते उभे आहेत. दाता उद्योजक अशी त्यांची ख्याती आहे.
.................................................................................................................................................................
आनंद तेलतुंबडे : बंदिवान विचारवंत
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मार्क्स-फुले-आंबेडकर यांचे भाष्यकार आहेत आनंद तेलतुंबडे. मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय विचारवंत अशा बहु ओळखी आहेत त्यांच्या. प्रकाश आंबेडकरांचे ते मेहुणे आहेत.
कोरेगाव भिमा येथील दलित-बौद्धांविरुद्ध झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर राज्य सरकारची खप्पामर्जी झाली. नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या संशयावरून त्यांना बंदिवान बनवलंय सरकारने. काळ न्याय देईल त्यांना. तोपर्यंत स्वतंत्र विचार करण्याची किंमत चुकवण्याचा तेलतुंबडेंचा निर्धार आहे.
.................................................................................................................................................................
राजदीप सरदेसाई : पॉवरफुल न्यूज अँकर
भारताचे भारताचे सर्वांत प्रभावशाली न्यूज अँकर म्हणून बोलबाला आहे राजदीप सरदेसाईंचा. टीआरपी आणि तत्त्व सांभाळणारे संपादक आहेत ते. मुंबईतून ‘टाइम्स ऑफ इंडिया’त पत्रकारिता सुरू केली आणि दिल्लीत स्थिरावले. ‘एनडीटीव्ही’त त्यांनी इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता सुरू केली. संपादक म्हणून ठसा उमटवला आणि ‘सीएनएन आयबीएन’ या सर्वांत मोठ्या न्यूज नेटवर्कचे प्रमुख झाले.
गुजरात दंग्यांत राज्य सरकारला त्यांनी आरसा दाखवला. सेक्युलर भूमिकेशी कधी तडतोड केली नाही. नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनात त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन केंद्र सरकारची दादागिरी उघड केली. सध्या ते ‘इंडिया टुडे ग्रुप’चे सल्लागार संपादक आहेत. मराठी मातीतले राजदीप देशभरच्या पत्रकारांचे रोल मॉडेल बनले आहेत.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मेधा पाटकर : संघर्ष नायिका
विषमता आणि शोषणाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या नेत्या. शेकडो जनसंघटना, विस्थापन विरोधी संस्था, संघटनांच्या संघटक, जनांदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या मार्गदर्शक. नर्मदा धरणासारख्या मोठ्या धरणाविरोधात लढत ‘पर्यायी विकास नीती’चा आवाज जगभर मेधा पाटकर यांनी पोचवला. आदिवासी विस्थापितांच्या प्रश्नांची चर्चा त्यांनी जगाच्या वेशीवर नेली. ३२ वर्षांपूर्वी त्यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलन’ ही जनचळवळ सुरू केली होती. हे आंदोलन जगभर गाजले. भूसंपादन, हॉकर्स, झोपडपट्टीवासीय, वनजमीन या प्रश्नांवर मेधाताईंनी संघर्ष केला. आदर्श सोसायटी, लवासा मेगासिटी आणि हिरानंदानी (पवई) प्रकल्प या विरोधात त्यांनी आवाज उठवला. ‘आम आदमी पक्षा’तर्फे त्यांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली. निवडणुकीच्या राजकारणात मात्र त्या अपयशी ठरल्या.
.................................................................................................................................................................
चिन्मय टुंबे : अर्थशास्त्रज्ञ
रुईयाचे विद्यार्थी असलेले चिन्मय टुंबे सध्या आयआयएम अहमदाबादमध्ये सर्वांत तरुण प्राध्यापक आहेत. ‘इंडिया मूव्हिंग’ (स्थलांतराचा इतिहास) या पुस्तकाने जगात गाजत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थलांतरित मजुरांची भूमिका आणि स्थान यावरील त्यांच्या तुलनात्मक अभ्यासाची दखल देशभर घेतली गेली आहे. हे स्थलांतरित वंचित मजूर भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करत आहेत, ही मांडणी आणि दृष्टीकोन चिन्मय टुंबे यांना भारताचा ‘नवा अर्थशास्त्रज्ञ’ म्हणून ओळख देणारा ठरला.
.................................................................................................................................................................
‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर
लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई
पाने - १४०
मूल्य - २००० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment