‘बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’ ही अमेरिकेतील ५९ मराठी मंडळांची एक शिखर संस्था आहे. दर दोन वर्षांनी अमेरिकेमधील मराठी बांधवांसाठी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन’ (BMM Convention) आयोजित करते. या वर्षीचं २०वं अधिवेशन ११ ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान अमेरिकेत अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथं पार पाडलं. हा केवळ साहित्य मेळावा नसून त्यात अमेरिकेतील आणि जगभरातील नामवंत मराठी शास्त्रज्ञ, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार, अभिनेते इ. विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतात. यंदाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे संस्थापक डॉ.आनंद देशपांडे. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चा संस्थापक म्हणून तुम्ही मला बोलावलं, हा केवळ माझा नाही तर गेल्या ३२ वर्षांत काम करणाऱ्या ४० हजार कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे. त्यांच्या कठीण परिश्रमामुळेच पर्सिस्टंटला हे यश मिळालं. आणि त्यामुळेच मी आज इथं उपस्थित आहे. मी तसा वक्ता वगैरे नाही. एवढ्या मोठ्या मराठी समुदायासमोर भाषणाचीही ही माझी पहिलीच वेळ आहे.
सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाच्या इतिहासातील एक विलक्षण अशी घटना आहे, प्रगतिचा आलेख आहे. १९९०मध्ये सर्व भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राची उलाढाल जेमतेम १०० मिलियन डॉलर्सची होती. आज भारतीय भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राने २५० बिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. भारताच्या जीडीपीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा हा १० टक्क्यांपेक्षा जास्त, तर निर्यातीमध्ये २५ टक्के आहे.
या प्रवासात मला अगदी पहिल्या दिवसांपासून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि गेल्या ३२ वर्षांत हा बदलता इतिहास मला प्रत्यक्ष अनुभवता आला, त्यासाठी मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. ईश्वराच्या कृपेनं मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. अमेरिकेत असलेल्या तुम्हा मंडळींचं यात खूपच मोठं योगदान आहे. मी जेव्हा तुम्हा सगळ्यांना बघतोय, तेव्हा माझं मन अभिमानानं भरून आलंय. तुमच्या या योगदानामुळेच जगात भारतीयांची प्रतिष्ठा उंचावली आहे.
पर्सिस्टंटच्या गेल्या ३२ वर्षांच्या अनुभवातून मला बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातल्या काही तुमच्याशी आज शेअर करत आहे.
थोडी पार्श्वभूमी
भोपाळमधल्या भेल टाऊनशीपमध्ये माझं बालपण गेलं. माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. शालेय शिक्षण भोपाळमधल्या कॅम्पियन स्कूलमध्ये व त्यानंतर १९८४मध्ये आयआयटी, खरगपूरमध्ये बी.टेक कम्प्युटर सायन्स केलं. भारतात कम्प्युटर सायन्स नुकतंच सुरू झालं होतं. आयआयटीमधली आमची तिसरीच बॅच होती.
बी.टेक झाल्यानंतर अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये माझी पुढची इनिंग सुरू झाली. नंतर ब्लुमिंगटनमध्ये १९८९ साली मी कम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी. केली व कॅलिफोर्निया इथल्या Hewlett-Packard Laboratoriesमध्ये जॉईन झालो. त्या वेळेस माझ्याकडे स्टुडंट व्हिसा होता. त्यावर मी १८ महिने ट्रेनिंग घेऊ शकत होतो. त्यानंतर वर्क परमिट व ग्रिन कार्ड हा सरळ मार्ग माझ्यासाठी होता, पण मी त्या मार्गावर न जाण्याचे ठरवले.
X+1 Syndrome
१९८८मध्ये ‘X+1 Syndrome’ हा राजगोपाल यांनी लिहिलेला एक लेख ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी त्याची खूपच चर्चा होती. आजच्या भाषेत सांगायचं तर तो लेख एकदम ‘व्हायरल’ झाला होता. त्याचं थोडक्यात सार असं होतं की, ८०च्या दशकात भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भारतात परत जाण्याबद्दल कायम चर्चा असायची. ‘हे झालं की, मी भारतात परतणार’ असं ठरवलं जायचं. त्याआधी असायचं ‘शिक्षण पूर्ण झाल्यावर परत जाणार’, नंतर ‘जॉब करून काही दिवसांनी’, मग ‘ग्रीन कार्ड मिळाल्यावर’, मग ‘लग्न झाल्यावर’, लग्नानंतर ‘मूल झाल्यावर’ अशी कारणं दिली जात असत. परतण्याचा तो ‘X’ कधीच यायचा नाही आणि भारतात न परतताच बहुतांश भारतीय अमेरिकेतच स्थायिक व्हायचे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या सापळ्यात अडकायचं नाही, असा निश्चय मी त्या वेळी केला होता. एकतर लवकर परत जायचं किंवा अमेरिकेतच आपलं बस्तान थाटायचं, असं मी मनात घट्ट ठरवलं होतं. विचारांचं चक्र सुरू होतं. खूप काही प्लॅनिंग केलेलं नव्हतं, पण ठरवलं की, भारतात परत जायचं आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. त्यातूनच ‘पर्सिस्टंट’चा जन्म झाला. त्या वेळी अमेरिकेत माझ्या बरोबरच्या काही मित्रांनी भारतात येऊन ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’मध्ये माझ्यासोबत काम करण्याचं मान्यही केलं होतं, पण ‘X+1 Syndrome’मध्ये ते अडकले आणि भारतात परतलेच नाहीत. अमेरिकेत राहून त्यांनी उत्तम काम केलं.
J-1 व्हिसावर सुरू असलेलं १८ महिन्यांचं माझं प्रत्यक्ष ट्रेनिंग संपलं आणि ऑक्टोबर १९९०मध्ये मी भारतात परत आलो. तेव्हा भारतात प्रचंड राजकीय अस्थिरता होती. मी परत आलो, तेव्हा विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान होते. मंडल कमिशनच्या अंमलबजावणीमुळे त्यांची जास्त चर्चा झाली. मी परत आल्यानंतर आठवडाभरातच लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा सुरू झाली. नंतरच्या राजकीय घडामोडींमुळे विश्वनाथ प्रतापसिंग यांचं सरकार कोसळलं आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्या वेळी भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. परकीय गंगाजळी आटत चालली होती. ती परिस्थिती सावरण्यासाठी ब्रिटनकडे सोनं गहाण ठेवून आपल्याला कर्ज घ्यावं लागलं होतं.
पहिला धडा
त्यामुळे मला पहिला धडा हाच मिळाला की, व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठलाही काळ वाईट नसतो. सुरुवातीची वर्षं कठीण होती, परीक्षा पाहणारी होती. पण माझा निर्धार पक्का होता. आपली अर्थव्यवस्था मुक्त होण्याच्या आधीचा तो काळ होता. बँक ऑफ इंडियाकडून पहिलं सात लाखांचं कर्ज मिळायला आम्हाला सहा महिने लागले. कर्ज मंजूर झालेलं असलं तरी आरबीआयच्या रेपोरेट चेंजमुळे ते ड्रॉ करू शकत नव्हतो.
त्या काळात फोन आणि कन्युनिकेशनच्या पायाभूत सुविधांची स्थिती फारच वाईट होती. साधा फोन मिळायला तीन महिने लागायचे. आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण ९६०० baud rateच्या मॉडेमवर पुण्याहून मुंबईला फोन करण्यापेक्षा, पुण्याहून मुंबईला NCSTमध्ये प्रत्यक्ष जाऊन मेल चेक करणं स्वस्त होतं. माझ्याकडे त्या वेळी पुणे-मुंबई रेल्वेचा सेकंड क्लासचा मासिक पास होता. त्यासाठी १८४ रुपये लागायचे.
त्या वेळी फ्रान्समधली O2 Technologies आणि ब्लुमबर्ग इंडियानामधली Data Parallel Systems या कंपन्यांनी मला काम देण्याची तयारी दाखवली होती. काम सुरू करण्यापूर्वी STPमध्ये जागा मिळणं अत्यंत आवश्यक होतं. तेव्हा कॉम्प्युटरच्या साहित्यावरचं आयात शुल्क तब्बल ३०० टक्के होतं. आणि भारतात कॉम्प्युटर्स उपलब्ध नव्हते. सरकारने देशात तीन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू केले होते. पुण्यातला पार्क हा त्यातला पहिला. हे पार्क म्हणजे, भोसरीतल्या इलेक्ट्रॉनिक सदन दोनमधले दोन मोठे गाळे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या अख्ख्या STPमधली एकूण जागा फक्त ८,००० स्क्वेअर फूट एवढीच होती आणि ती जागा १४ कंपन्यांना वाटून दिली होती. पण त्यात पर्सिस्टंटचा समावेश नव्हता.
या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये आम्हाला जागा कशी मिळाली, त्याचीही एक नाट्यमय कहाणी आहे. त्या अनुभवातूनही मला खूप काही शिकायला मिळालं. पुण्याच्या पार्कमध्ये जागा मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो, कारण व्यवसाय सुरू करायला त्या पार्कमध्ये जागा आवश्यक होती. सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की, आणखीन दोन गाळे लवकरच घेणार आहोत व त्यात तुम्हाला जागा नक्की मिळेल. मार्च १९९१ उजाडला होता, पण काहीच लक्षणं दिसत नव्हती. मला परत येऊन सहा महिने उलटून गेले होते. काम लवकर सुरू व्हावं, असं आमच्या सगळ्या ग्राहकांना वाटत होतं. त्या सगळ्याचा दबावही माझ्यावर वाढत होता. पण जागा काही केल्या मिळत नव्हती.
श्री एन. विठ्ठल हे त्या वेळी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सचिव होते. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क या योजनेचे ते एक मुख्य शिल्पकार. मार्च १९९०मध्ये ते अमेरिकेत बे एरियात आले होते व इथल्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांसमोर समोर त्यांनी भाषण केलं होतं. त्यात ‘भारतात परत या आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये व्यवसाय सुरू करा’ असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यामुळे शेवटी मी एन. विठ्ठल यांना पत्र लिहायचं ठरवलं. चार पानी पत्र लिहून माझी निराशा व्यक्त केली. रविवार, १० मार्च १९९१ रोजी, मी त्यांना पत्र लिहिलं आणि स्पीड पोस्टानं सोमवारी दिल्लीला पाठवलं.
मंगळवारी दुपारी त्यांना ते पत्र पोहोचलंदेखील. त्याच दरम्यान मंगळवारी दुपारी मला एस. एस. ओबेरॉय यांचा फोन आला. इलेक्ट्रॉनिक्स विभागात ते अतिरिक्त सचिव होते. त्यांनी मी पत्रात लिहिलेल्या मुद्द्यांबाबत विचारलं. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या सॉफ्टवेअर पार्कचे संचालक डॉ.ए. बी. पत्की यांना दिल्लीत भेटीला बोलावलं.
पुण्यातून दिल्लीत त्या काळी दररोज फ्लाईट्स नव्हत्या, आठवड्यात तीनच फ्लाईट्स होत्या. डॉक्टर पत्की गुरूवार सकाळच्या फ्लाईटने दिल्लीत गेले आणि दुपारी त्यांनी सचिवांची भेट घेतली. ज्या १४ कंपन्यांना त्यांनी जागा दिली होती, त्यापैकी एकाही कंपनीचं प्रत्यक्ष तिथून कामकाज होत नव्हतं. विठ्ठल यांनी डॉक्टर पत्की यांना त्यांचं स्वतःचं ऑफिस रिकामं करून त्याच्या चाव्या पर्सिस्टंटच्या कामासाठी द्यायला सांगितल्या.
ताबा न घेतल्या रिकाम्या ऑफिसेसमधून तात्पुरतं काम करा, असंही विठ्ठल यांनी डॉक्टर पत्की यांना सांगितलं. अतिशय अफलातून असा तोडगा त्यांनी शोधला होता. अशा प्रकारे आमची सुरुवात होण्यास विठ्ठल हे कारणीभूत ठरले. १५ मार्च १९९१ रोजी शुक्रवारी पत्की यांनी भोसरीत बोलावून घेतलं आणि त्यांच्या ऑफिसच्या चाव्या मला सुपूर्द केल्या.
पर्सिस्टंटची सुरुवात…
त्यानंतर दोनच दिवसांनी, १७ मार्च १९९१ रोजी गुढीपाडवा होता. या पवित्र दिवशी सत्यानारायण पूजा करून पुण्याच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये ३५० स्वेअर फुटाच्या ऑफिसात पर्सिस्टंट सिस्टिम्सची सुरुवात झाली. ‘गुढीपाडवा’ हा आमच्यासाठी खूपच खास दिवस ठरला. तेव्हापासून दर गुढीपाडव्याला ऑफिसमध्ये सत्यनारायण पूजा करण्याची प्रथाच सुरू झाली. त्या दिवशी आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह ऑफिसमध्ये निमंत्रित करतो. पर्सिस्टंटमधली ही खूप चांगली प्रथा आहे. त्यामुळे कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचंही कंपनीशी एक नातं तयार झालंय.
त्यातून मी एक धडा शिकलो की, मदत मागण्यासाठी कधी संकोच करायचा नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्याचं आपल्याला वाटतं, अशा प्रत्येक वेळी अशी चांगली माणसं भेटतात, जी तुमच्यासाठी नवे मार्ग खुले करतात. योग्य वेळी मी योग्य ठिकाणी होतो, हे मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं. ते अगदी खरं असलं तरी १९९१मध्ये तुम्ही माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना विचारलं असतं, तर ते म्हणाले असते की, मी जो काही निर्णय घेतला तो मूर्खपणाचा आहे, आणि अवघ्या काही महिन्यांत मी पुन्हा अमेरिकेत परत येईन याची त्यांना खात्री होती.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्यामुळे पुढचा धडा आहे की, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असलात तर त्याचा नक्कीच फायदा होतो. पण दुर्दैवानं तुम्ही योग्य ठिकाणी आहात, असं त्या वेळी तुम्हाला माहीत नसतं. ते तुम्हाला नंतर कळतं. वादळांना सामोरं जाताना खूप मोठं निर्धार असणं गरजेचं असतं. त्यातून तुम्ही सहीसलामत बाहेर पडलात की, भविष्यात त्याचे फायदे तुम्हाला निश्चितपणे मिळतात. जसं मी या आधी उल्लेख केला होता, O2 Technologies आणि Data Parallel Systems हे आमचे पहिले दोन ग्राहक. आमच्या तिसऱ्या ग्राहकाची स्टोरीही खूपच लक्षवेधी आहे आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं.
O2 Technologies आणि Data Parallel Systems हे छोटे स्टार्टअप्स होते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारं फंडिंग हे काही फारसं स्थिर नव्हतं. माझा नवीन ग्राहकांसाठी शोध सुरू होता. डिसेंबरच्या १९९१ सुरुवातीलाच मी अमेरिकेत आलो आणि अनेक कंपन्यांना भेटून काही काम मिळतं का, याची चाचपणी केली. त्या वेळी सॉफ्टवेअर आऊटसोर्स ही नवी संकल्पना होती. त्यात भारतातून ऑफशोअर सॉफ्टवेअर डेव्हलप करणं म्हणजे खुळ्यातला विचार होता. भारतात पायाभूत सुविधांची स्थिती अत्यंत वाईट होती. संपर्काची साधनं आणि पायाभूत सुविधा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत होत्या.
एक अनुभव सांगतो, म्हणजे ही स्थिती नेमकी कशी होती ते कळेल. –
आम्हाला सॉफ्टवेअर्सच्या फाईल्स ३० Kilo byteच्या चंक्समध्ये पाठवाव्या लागायच्या. ३० Kilobytes ट्रान्सफर व्हायला किमान पाच मिनिटं तरी लागायची. त्यातही लाईन्स वारंवार ड्रॉप व्हायच्या. मग सगळी प्रोसेस पुन्हा करावी लागायची. अशी सगळी स्थिती असताना अमेरिकेतल्या कंपन्यांना आम्ही भारतातून हे प्रोजेक्ट करणार आहोत, हे पटवून देणं खूपच अवघड काम होतं.
मी माझ्या सर्व मित्रांशी संपर्क साधला, त्यातलीच एक म्हणजे lauren Feaux. ती त्या वेळी मायक्रोसॉफ्टमध्ये होती. माझ्या विनंतीवरून तिने तिच्या मॅनेजरशी मला कनेक्ट करून दिलं. दुसऱ्या दिवशी मी तिच्या मॅनेजरशी फोनवर बोललो आणि काम मिळावं, यासाठी त्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याने मला प्रपोजल पाठवायला सांगितलं. काही तासांमध्येच मी त्याला प्रपोजल पाठवलं.
थोडी खात्री पटल्यावर त्याने एक प्रोजेक्ट देण्याचं मान्य केलं. मायक्रोसॉफ्टच्या Fortran Compilerसाठी ग्राफिक्स लायब्ररीज या १६ bit असेंम्बलीमधून ३२ bit असेम्बलीमध्ये मायग्रेट करणं असं ते काम होतं. हा प्रोजेक्ट आमच्यासाठी नवसंजीवनी देणारा ठरला. मायक्रोसॉफ्ट- सारख्या मोठ्या कंपनीसोबत जर आम्ही काम करू शकतो, तर इतर कंपन्यांनासुद्धा आमचं काम नक्कीच आवडेल, असा आत्मविश्वास मला त्यातून मिळाला.
आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यातून शिकायला मिळाली. बऱ्याच वेळा छोट्या कंपन्या या आपल्या क्षमतांबाबत साशंक असतात, मोठ्या कंपन्यांना कामासाठी संपर्क करावा की नाही, असं त्यांना वाटतं असतं. पण तुमच्याकडे योग्य प्रस्ताव असेल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असेल तर मोठ्या कंपन्यासुद्धा छोट्या कंपन्यांबरोबर काम करायला तयार होतात, ही गोष्ट मी यातून शिकलो.
मायक्रोसॉफ्टचा हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिलं नाही. आपला व्यवसाय टिकेल, एवढंच नाही, तर वाढेल याचाही आत्मविश्वास मला त्यातून मिळाला.
‘माझ्या कंपनी’पासून ‘आपल्या कंपनी’पर्यंत
आता, तुम्हाला पर्सिस्टंटच्या सर्वांत मोठ्या स्थित्यंतराविषयी मला सांगायचं आहे. हा बदल आहे ‘my Company’ to ‘our Company’, म्हणजेच ‘माझ्या कंपनी’पासून ‘आपल्या कंपनी’पर्यंतचा. कंपनीच्या प्रगतीसाठी हा बदल खूपच महत्त्वाचा होता.
ही १९९७ची गोष्ट आहे. त्या वेळी आम्ही पर्सिस्टंटमध्ये फक्त ६० जण होतो. व्यवसाय उत्तम चालला होता. आमच्याकडे चांगल्या दर्जाचं काम होतं आणि ग्राहकही आमच्या कामावर खूश होते. आमच्या टीममध्ये चार जण पीएच.डी. झालेले होते. नफाही उत्तम मिळत होता, आयुष्यही मस्त चाललं होतं.
आम्ही आणखी कामं मिळवू शकत होतो, पण त्यासाठी माझं ‘हो-नाही’ सुरू असायचं. कारण कंपनीला जास्त काम म्हणजे मला जास्त काम करावं लागणार होतं. विविध प्रोजेक्ट्ससाठी कोडिंग करण्यात मला आनंद वाटत होता. कंपनी वाढवून काय फायदा होता, तर कामाचा ताण वाढणार होता. त्या वेळेस पर्सिस्टंट ही फक्त माझीच कंपनी आहे, असा विचार मी करत होतो. टीममधल्या इतर सदस्यांचा विचार त्या वेळी माझ्या मनात नव्हता.
एका मिटिंगमध्ये आमच्या एका इंजिनिअरने प्रश्न विचारला. त्या एका प्रश्नाने माझे डोळे उघडले. त्याचा प्रश्न होता, ‘इथलं वर्क कल्चर चांगलं आहे, मनाप्रमाणे कामही करायला मिळतं. हे सर्व ठीक आहे, पण माझ्या प्रगतीचं आणि नव्या संधी मिळण्याचं काय? माझं भविष्य काय असेल?’ त्याच्या या थेट प्रश्नाने माझे डोळे उघडले, आत्तापर्यंत फक्त मी माझाच विचार करत होतो, हा विचार स्वार्थी होता. ही माझी कंपनी आहे की आपली? ही जर सगळ्यांची कंपनी असेल, तर मग मी कंपनीची प्रगती का थांबवून ठेवतोय? टीममधल्या सगळ्या सदस्यांची प्रगती व्हायची असेल, तर कंपनीचीसुद्धा भरभराट होणं गरजेचं आहे. अशा असंख्य प्रश्नांनी माझ्या मनात घर केलं. त्यावर मी विचार करू लागलो.
ही फक्त ‘माझी कंपनी’ नसून ती ‘आपली कंपनी’ आहे, हा विचार पक्का व्हायला मला सहा महिने लागले. हा विचार सुरू असताना पुण्यात ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’च्या एका कार्यक्रमात मला एक सद्गृहस्थ भेटले. ते एका Boutique firmचे संस्थापक आणि सीईओ होते. खूप प्रसिद्ध आणि उद्योजकतेमध्ये त्यांचं मोठं नाव होतं. १९८३च्या उन्हाळ्यात मी त्यांच्या कंपनीत दोन महिने इंटर्नशिपही केली होती. आमच्या बी.टेकच्या अभ्यासक्रमाचा तो एक भाग होता.
१९७३-९७ या २४ वर्षाच्या काळात त्यांच्या कंपनीत कधीच २०पेक्षा जास्त इंजिनीयर्स नव्हते. त्यांच्याकडे खूप चांगले ग्राहक होते, कामही उत्तम होतं. माझ्या दोन महिन्याच्या इंटर्नशिपच्या काळात त्यांच्या टीममधल्या अनेक हुशार सदस्यांसोबत मला बोलायला मिळत होतं. त्यांचे बहुतांश कर्मचारी इथे अनुभव घ्यायचे आणि नंतर ती कंपनी सोडून दुसरीकडे जायचे किंवा स्वत: नवा व्यवसाय सुरू करायचे. भारतातल्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक कंपनी ही या फर्मच्या माजी सदस्यांनी स्थापन केलेली आहे. पण ही कंपनी मात्र कायम संस्थापकांचीच राहिली.
पर्सिस्टंटची भरभराट हवी असेल तर मला माझी भूमिका बदलणं आवश्यक होतं. या बदलासाठी माझं मन तयार करावं लागणार होतं. ‘माझी कंपनी’ ते ‘आपली कंपनी’ हा बदल स्वीकारणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण हा बदल करायचा असा निर्णय मी घेतला. तेव्हा मला जाणीव झाली की, जरी कोडिंग करणं मला आवडत असलं तरी कंपनीसाठी मी सेल्स करणं जास्त गरजेचं होतं.
यातून मी शिकलेली गोष्ट अशी की – कंपनीचा सीईओ म्हणून जर मला काम करायचं असेल कंपनीची भरभराट हेच माझं कर्तव्य असले पाहिजे. त्याचबरोबर माझ्या वैयक्तिक हितापेक्षा कंपनीचं हित कसं होईल, याला मी प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. कंपनीचं हित आणि माझं हित जुळत नसेल तर कंपनीचा सीईओ म्हणून राहण्याचा मला अधिकार नाही. पुढची २० वर्षं हेच तत्त्व कायम लक्षात ठेवून मी काम केलं.
२००८चं आर्थिक संकट
त्या वेळी पर्सिस्टंटमध्ये २५०० कर्मचारी आणि २०० कस्टमर्स होते. हे संकट जसं वाढायला लागलं, तसं कस्टमर्स आमच्याकडे डिस्काउंट मागायला लागले. प्रोजक्ट्समध्ये टीम मेंबर्स कमी करा, असंही त्यांचं म्हणणं होतं. २००१मध्ये ‘डॉट कॉम’चा फुगा फुटला आणि मी एक गोष्ट शिकलो. डिस्काउंट द्यायचा असेल तर तो कंपनीच्या सर्वांत ज्येष्ठ व्यक्तीलाच बोलून दिला पाहिजे. आयडियली कंपनीच्या सीईओंना भेटूनच डिस्काउंट द्यायला पाहिजे.
त्यामुळे २००८च्या जागतिक मंदीच्या काळात मी खूप प्रवास केला आणि आमच्या कस्टमर्सच्या यादीत असलेल्या कंपन्यांच्या १००पेक्षा जास्त सीईओंना भेटलो. या भेटींमधून मला खूप काही शिकायला मिळालं. सीईओ काम कसं करतात हेही मी यातून शिकलो. त्यामुळे मला सीईओ म्हणून अधिक चांगलं काम करता आलं. त्याचबरोबर सिनियर एक्झिक्युटीव्हज बरोबरच्या मिटिंग्जसुद्धा कशा मॅनेज कराव्या, हे शिकायला मिळालं.
आज आपल्या ऑडियन्समध्ये बरेच पोटॅन्शियल आणि फ्युचर सीईओंज आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतो
१) सीईओ हे कायम महत्त्वाच्या निवडक गोष्टींवरच लक्ष ठेवतात आणि इतर गोष्टी दुसऱ्यांवर सोपवतात. आपल्याला जर सीईओंसोबत काम करायचं असेल, तर त्यांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांच्यासोबत जुळणाऱ्या गोष्टीच त्यांना ऑफर केल्या पाहिजे. अर्थात आपल्याला सीईओ व्हायचं असेल तर इतरांवर विश्वास टाकून ते काम त्यांच्याकडून करून घेता आलं पाहिजे.
२) सीईओचा फोकस हा कायम टॉप लाईनवर असतो. किमतीत सुधारणा करण्यापेक्षा, त्यांचं महसूल कसा वाढेल यावर लक्ष असतं. हे लक्षात आल्यावर आम्ही पर्सिस्टंटच्या ऑफरिंग्ज या महसूल वाढवण्यासाठी कशा उपयुक्त आहेत, यावरच फोकस केल्या.
३) सीईओंचा कल हा ट्रान्झिशन ओरियंटेड नसून रिलेशनशिप ओरियंटेड असतो. ते दीर्घकाळचा विचार करतात व त्यांना नेटवर्किंग करणं आवडतं.
मार्केट डाउन असताना मी सीईओंना भेटणं हा खूपच चांगला निर्णय ठरला. या काळात ग्राहकांना खासकरून सीईओंना भेटणं ही फायद्याची गुंतवणूक ठरली. जेव्हा मार्केट सुरळीत सुरू झालं, तेव्हा याचा आमच्या कंपनीला खूप फायदा झाला. त्यानंतरच्या वर्षांमध्ये आम्ही खूप चांगली वाढ नोंदवली.
सीईओ ते चेअरमन
मी आणखी एका बदलाबद्दल तुम्हाला सांगतो. हा बदल आहे सीईओच्या भूमिकेपासून ते चेअरमनच्या पदापर्यंतचा. कंपनीचा संस्थापक म्हणून माझ्यासाठी हे खूप कठीण स्थित्यंतर होतं. तब्बल ३० वर्षं मी कंपनीत होतो आणि या काळात बाकी दुसरं काहीच मी केलं नव्हतं. मी स्वत:ला प्रश्न विचारला की, आपली पुढची ३० वर्षं कशी असतील? उत्तर स्पष्ट होतं! केवळ पर्सिस्टंटचा सीईओ म्हणून निश्चित ती भूमिका नव्हती. आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ होती.
माझ्या एक लक्षात आलं आहे की, व्यवसायातली वाढ ही सरळ रेषेत कधीच होत नाही. व्यवसायाची वाढ ही S-curvesसारखी होत असते. कंपनीत काही नवे उपक्रम सुरू असले की, एक मोमेंटम तयार होतो. त्यानंतर काही वर्ष वेगाने वाढ होते. नंतर त्याच मार्गानं जात राहिल्यास वाढ मंदावते, चढता आलेख राहत नाही. एका S-curveमधून दुसऱ्या S-curveकडे जाताना कंपनीत काही परिणामकारक बदल करणं गरजेचं असतं. हे बदल कठोर असू शकतात, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात.
आम्ही त्या वळणाच्या टॉपवर होतो. पुढच्या S-curveमध्ये जायचं असेल तर नव्या टीमची गरज होती. मी नवीन सीईओला आणून हा बदल करायचा ठरवलं. आणि कंपनीसाठी तो निर्णय हितकारक ठरला. संदिप कालरा हे आता सीईओ म्हणून अतिशय उत्तम काम करत आहेत. गेली तीन वर्षं जेवढी आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या होती, ती संख्या आता जवळपास दुप्पट झालीय. मागच्या तिमाहित आम्ही २४१ मिलियन डॉलर्सचा व्यवसाय केला. आता वर्षभरात एक बिलियन डॉलर्सचा व्यवसाय करण्याच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत.
सीईओ ट्रान्झिशन कठीण आहे. माझ्या ज्या मित्रांनी हा बदल पूर्ण केला, त्यांनी मला आधीच एक खूप महत्त्वाचा सल्ला दिला होता. ते म्हणाले, स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी पुढे काय करायचं याच्या योजना तयार कर आणि त्यात गुंतवून घे. म्हणजे, मन पर्सिस्टंटमध्ये गुंतून राहणार नाही आणि कंपनीच्या कामातही ढवळाढवळ तू करणार नाहीस. पर्सिस्टंट व पर्सिस्टंटच्या बोर्डाचा मी खूप आभारी आहे, कृतज्ञ आहे, त्यांनी मला समाजाच्या व्यापक हितासाठी काम करण्याची संधी दिली. सीईओ ते चेअरमन हे स्थित्यंतर मला खूप काही शिकवून गेलं.
Learn – Earn and Return
सामाजात व्यापक प्रभाव पडेल, बदल घडेल असं काम करण्याचं मी ठरवलं. आपण तीन टप्प्यांमधून जात असतो- Learn Earn And Return.
ज्या समाजानं मला दिलं, त्या समाजासाठीसुद्धा आपण काहीतरी द्यावं, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. मी सध्या बऱ्याच अभिनव अशा प्रोजेक्ट्सवर काम करतोय. हे उपक्रम तीन कॅटेगरीजमध्ये विभागता येतील-
१) Entrepreneurship – उद्योजकता
२) Data – माहिती आणि त्याचं विश्लेषण
३) Continuous Learning and Higher education – नव्या गोष्टी शिकणं आणि उच्च शिक्षण
आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या प्रश्नांनावर मी कधीच काम करू शकलो नाही, त्यासाठी मी आता काम करायचं ठरवलंय. त्यासाठी तुमचं किंवा तुमच्या नेटवर्कमधल्या कुणाचंही मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यास मला नक्कीच ते घ्यायला आवडेल.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
deAsra फाउंडेशन
२०१३मध्ये मी पन्नाशी ओलांडली होती. चांगलं काम करायला निवृत्त होण्याची वाट पाहायची नसते, हे मी बिल गेट्सकडून शिकलो.
देश देशपांडे हे माझे एक मेंटर आहेत. यांच्या देशपांडे फाउंडेशनच्या कामाबद्दल मला माहीत होतं. मी जेव्हा deAsra फाऊंडेशनची स्थापना केली, तेव्हा सर्वांत आधी मी त्यांच्याशी भेटून चर्चा केली. आजही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं.
deAsra फाउंडेशनमधली पहिली दोन अक्षरं ‘de’ हे Deshpande या आमच्या आडनावामधून घेतली आहेत. तर ASRA म्हणजे आनंद, सोनाली, रिया आणि अरूल या माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची आद्याक्षरं आहेत.
भारताची १३५ कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. त्यात तरुणांची संख्या सर्वांत जास्त. त्यांच्या हाताला काम पाहिजे. त्यासाठी नोकऱ्यांची गरज आहे. सरकार आणि मोठ्या कंपन्या नोकऱ्या देतात. पण गरज एवढी जास्त आहे की, त्यांनाही मर्यादा येतात. सर्वांत जास्त नोकऱ्या तयार होतात त्या छोट्या उद्योगांमध्ये. त्यामुळे deAsra फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती करणाऱ्या छोट्या उद्योगांना मदत करण्याचा उपक्रम घेतला आहे. पाच लाख ते एक कोटीपर्यंतचे हे उद्योग असतात. १ ते १० कर्मचारी त्यात काम करतात.
आकडेवारी जर बघितली तर असं लक्षात येतं की, भारतातल्या रजिस्टर केलेल्या ९५ टक्के उद्योगांमध्ये २०पेक्षा कमी कर्मचारी आहेत. आणि त्यातले जवळपास ६० टक्के कर्मचारी अशा छोट्या उद्योगांमध्ये आहेत. पण त्यांच्यासाठी दुर्दैवानं फारसं कुणी काही करत नाही. अशा छोट्या उद्योजकांसाठी deAsra फाऊंडेशन काम करतं. आमची ४० लोकांची टीम आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की, एवढ्या वर्षांत आम्ही दीड लाख छोट्या उद्योजकांना मदत केली. त्यामुळे त्यांची भरभराट झाली, नवे रोजगार निर्माण झाले.
deAsra फाऊंडेशन नेमकं काय करतं?
छोट्या उद्योगांना नेमकी कशाची गरज आहे? त्यांना काय पाहिजे? याचा आम्ही अभ्यास केला. ज्या गोष्टींची जास्त गरज असते, अशी ८० ते १०० कारणं आम्ही शोधून काढली.
या उद्योजकांना मुख्य गरज असते ती-
- नव्या संधी
- सुलभ कर्ज
- ग्राहक मिळवणं
- आणि मार्केटशी जोडून घेणं
याबाबतची सगळी माहिती आमच्या https://www.deasra.in या वेबसाईटवर आहे.
यात भर म्हणजे, पुण्यातल्या प्रसिद्ध गोखले राज्यशास्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये (Gokhale Institute of Politics and Economics) deAsra फाउंडेशनच्या मदतीने आम्ही deAsra centre for excellence in nano entrepreneurship स्थापन करतोय. हे सेंटर प्रामुख्याने अतिशय छोट्या उद्योगांवर संशोधन करणार असून धोरण ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलेच संशोधन केंद्र आहे.
‘यशस्वी उद्योजक’
त्याचबरोबर ‘यशस्वी उद्योजक’ (https://www.yashaswiudyojak.com) हे आमचं मराठी पोर्टल आहे. गेली सात वर्षं ‘यशस्वी उद्योजक’ हे प्रिंट स्वरूपात होतं. पण गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पूर्णपणे डिजिटलवर शिफ्ट झालोय. यात उद्योजकांच्या यशोगाथा, त्यांच्या मुलाखती अशा खूप गोष्टी असतात.
Data Research Projects
मी माझ्या दोन डेटा प्रोजेक्टबद्दल सांगतो. यासाठी मी डॉक्टर्स, कॉम्प्युटर सायन्समधले संशोधक, सामाजिक भान असलेले उद्योजक आणि सरकारी अधिकाऱ्यांबरोबर काम करतोय.
१) ICGA Foundation
मी Indian Cancer Genome Atlas म्हणजेच ICGA Foundationच्या बांधणीसाठी मदत करतोय. हा पब्लिक प्रायव्हेट समाजउपयोगी पार्टनशिप प्रोजक्ट आहे. यात आम्ही कॅन्सरवरच्या संशोधनासाठी जिनोमिक डेटा सेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. ब्रेस्ट कॅन्सरच्या डेटापासून याची सुरुवात झालीय. नंतर इतरही गोष्टी आम्ही त्यात घेणार आहोत. आम्ही या फाउंडेशनसाठी नुकतीच COOचीसुद्धा नियुक्ती केलीय. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि दिल्लीतल्या ‘एम्स’कडूनही याला लवकरच मंजूरी मिळण्याची आशा असून ते काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
२) डायबेटिजवर संशोधन
दुसरा प्रोजेक्ट हा रिसर्च सोसायटी ऑफ डायबेटिजसोबत आहे. यात डायबेटीजच्या संशोधनासाठी आम्ही मोठा डेटा गोळा करून त्याची वर्गवारी करतोय.
हे दोनही प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. यामुळे केवळ भारतातच नाही तर जगातल्या सर्व भारतीयांना त्यांच्या आजारांवर उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी मला तुमची मला मदत मिळाली, तर ती घेण्यास मला नक्कीच आनंद वाटेल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment