संख्यात्मकदृष्ट्या भरपूर सृजन निर्मिती होत असली तरी, सगळाच कलाव्यवहार एका सकस केंद्राकडून ‘मीडिऑक्रिटी’च्या परिघावर स्थिरावत असल्यासारखा दिसतोय...
पडघम - सांस्कृतिक
अमोल पालेकर
  • २०व्या बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचं एक पोस्टर आणि निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता अमोल पालेकर
  • Mon , 22 August 2022
  • पडघम सांस्कृतिक बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन BMM Convention अमोल पालेकर Amol Palekar

‘बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’ ही अमेरिकेतील ५९ मराठी मंडळांची एक शिखर संस्था आहे. दर दोन वर्षांनी अमेरिकेमधील मराठी बांधवांसाठी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन’ (BMM Convention) आयोजित करते. या वर्षीचं २०वं अधिवेशन ११ ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान अमेरिकेत अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथं पार पाडलं. हा केवळ साहित्य मेळावा नसून त्यात अमेरिकेतील आणि जगभरातील नामवंत मराठी शास्त्रज्ञ, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार, अभिनेते इ. विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतात. यंदाचे या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता अमोल पालेकर आणि उद्योजक आनंद देशपांडे. पालेकरांनी या अधिवेशनाचं बीजभाषण केलं. ते संपादित स्वरूपात ‘अक्षरनामा’साठी…

.................................................................................................................................................................

राजकारण्यांपासून स्वत:ला कायमच दूर ठेवल्यामुळे, सत्तेत कोणताही पक्ष असला तरी सरकारच्या अन्याय्य धोरणांविरुद्ध वा चुकांविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क मी आजवर बजावत आलेलो आहे. कलाकार म्हणून ते माझं आद्य कर्तव्य मानतो. मी बाजू घेतो ती लोकशाहीधार्जिण्या न्यायासाठी, सर्वसमावेशक समानतेसाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी! आपल्या सर्वांच्या भारत देशाने - मी ‘हिंदुस्तान’ म्हणत नाहीय - पंचाहत्तरी गाठली आहे. त्याच भारतामधल्या एका सक्षम राज्याने म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ६२ वर्षं पूर्ण केलीत. अजून १० वर्षांनी ‘मराठी सिनेमा’ची शताब्दी साजरी होईल. १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला होता. त्याआधी दोन दशकं भारतीय सिनेमाचा आरंभ करणारा माणूसही मराठीच होता. दादासाहेब फाळक्यांच्या काळात बोलक्या सिनेमाचं तंत्रज्ञान उपलब्ध असतं, तर त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ मराठीतच बनवला असता!

हे सगळे कालबिंदू एकत्र करून भारतातल्या अग्रगण्य राज्याचा गौरव साजरा करण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. कलाकार म्हणून माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या, मराठी भाषेचा - संस्कृतीचा - मानसिकतेचा आदर करणाऱ्या तुम्हा देशबांधवांसोबत हे साजरं करता येणं हे माझं भाग्यच आहे.

साहित्य, संगीत, दृश्यकला, रंगभूमी, चित्रपट अशा कलेच्या विविध प्रकारांसाठी महाराष्ट्रीय आणि मराठी माणसाचं काय योगदान होतं, याचा ओझरता मागोवा घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. त्यानिमित्तानं आपल्या इतक्या वर्षांच्या भवतालाचा आढावा घेणार आहे. अर्थात, वेळेअभावी खूप सखोल पट तुमच्यासमोर मांडता येणार नाही, तरीही फारशा माहीत नसलेल्या किंवा स्मृतीआड झालेल्या काही बाबी मात्र मी आवर्जून सांगणार आहे. थोडक्यात, मी मागे वळून बघणार आहे.

मागे वळून बघण्याची किंवा सिंहावलोकनाची गरज, गेल्या दोन वर्षांत आपल्या सगळ्यांवरच येऊन ठेपली. २०२०चं वर्ष एक महाकाय वादळ घेऊन आलं. त्याचा तडाखा प्रत्येकाला बसला; प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रत्येकालाच त्याची झळ सोसावी लागली. धर्म, जाती, वर्ग-जात-वंश-लिंगभेद, भौगोलिक किंवा वैचारिक मतभेद या साऱ्या परिमाणांपलीकडे जाऊन अख्ख्या मानवजातीलाच करोना विषाणूने ग्रासून टाकलं होतं. आयुष्याची क्षणभंगुरता सातत्यानं जाणवत राहिली. टोकाची भीती, एकटेपणा, असुरक्षितता, वैफल्य अनुभवलं. मृत्यू थेट घराच्या उंबरठ्यावर किंवा अगदी उंबरठ्याच्या आतही येऊन ठेपला. वर्तमान नकोसा झाला, भविष्य अशाश्वत वाटू लागलं. बचत-खाती, आयुर्विमा, भविष्याची स्वप्नं, महत्त्वाकांक्षा सगळं फिजूल वाटायला लागलं. जवळची माणसं गमावली. त्याचमुळे कदाचित, एकमेकांची किंमत जास्त कळली असावी आणि एकमेकांच्या अधिक जवळ आलो; मनोभेद दूर सारून एकमेकांना साथ द्यायला शिकलो; परकेही आपले झाले. एका वेगळ्या पद्धतीनं माणुसकीचा नवा अर्थ मानवजातीला कळला. Covid protocols became our new normal आणि आज या विषाणूशी संग करायलाही आपण शिकलो आहोत. नाहीतर इथे हजारोंनी असे आपण सगळे जमलोच नसतो. we have survived this pandemic आणि हाही एक सोहळ्याचाच क्षण आहे. तुमचं हे कन्व्हेंशन या ही दृष्टीनं महत्त्वाचं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१९६०मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आपल्या साठोत्तरी वैचारिक आणि कलाव्यवहारांच्या विकासाचे टप्पे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडण-घडणीशी संलग्न आहेत. त्यामधले मराठी माणसाचे योगदान जोखताना एक लक्षणीय बाब समोर येते, ती म्हणजे ‘राज्य’ म्हणून घोषित झाले नसलेल्या काळामध्येसुद्धा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, मराठी माणसाचं पाऊल कायमच काळाच्या पुढे होतं.

कालप्रवाहात विसरलेली वा कदाचित तुम्हाला माहीत नसलेली एक ऐतिहासिक घटना सांगतो. २५ नोव्हेंबर १९५५ साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर बुल्गॅनीन आणि कृष्चेव यांचा सत्कार झाला. पुण्याचे तेव्हाचे महापौर बाबुराव सणस यांनी त्या कट्टर कम्युनिस्ट दोघांना गांधी टोप्या घातल्या होत्या, हा black humorचा भाग सोडून देऊ या. पण तेव्हा बुल्गॅनीननी एक फार मोठं विधान केलं. ते म्हणाले की, “राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी, वसाहतवाद आणि साम्राज्यशाहीला विरोध म्हणून सुरू केला. म्हणून भारतवर्ष स्वतंत्र झाल्याचे श्रेय महाराष्ट्रीय माणसाला द्यायला हवे.” म्हणजे समता आणि स्वातंत्र्याचं पुरोगामी वारं शिवाजी महाराजांमुळे या दक्षिण प्रांतात कित्येक शतकं वाहत होतं, हे अधोरेखित होतं. In fact, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कला आणि संस्कृतीसंदर्भात नवे पायंडे पाडण्यामध्ये मराठी माणूस अग्रस्थानी होता. फक्त संगीत क्षेत्रातली थोडी उदाहरणं देतो.

- विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संगीत नाटकांमध्ये स्त्री-पात्र रंगवण्याची जबाबदारी पुरुषांना पेलावी लागायची. १९०५मध्ये कमलाबाई गोखले यांनी स्त्री भूमिका करण्याची तयारी दाखवली, पण त्यांना पुरुष भूमिकाच करावी लागली. त्याच कमलाबाई गोखले, म्हणजे आपल्या लाडक्या विक्रम गोखलेची आजी, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालकलाकार म्हणून ओळखल्या जातात.

- त्याच काळी कुलीन, सर्वसामान्य स्त्रियांनी सार्वजनिक मैफिलीत गाणं म्हणणं, हे निषिद्ध मानलं जायचं. चंपूताई माने म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी, १९२१साली मुंबईतल्या संगीत परिषदेमध्ये अभिजात संगीताची मैफल सजवली. भविष्यातल्या पुढच्या सर्व पिढ्यांमधल्या स्त्रियांना संगीताचं क्षेत्र खुलं करून दिलं ते हिराबाईंनी! खरं तर हिराबाईंची बहीण, कमळाबाई माने यांना स्त्री-पात्र करणारी पहिली महिला म्हणून श्रेय द्यायला हवं; आपण ते हिराबाईंना देतो. या दोघींमुळे रंगभूमी आणि सिनेमा क्षेत्रामध्ये स्त्रियांना मुक्त प्रवेश मिळाला. हिराबाईंची आणखी एक बहीण सरस्वतीबाई यांना प्र. के. अत्र्यांनी त्यांच्या सिनेमासाठी पार्श्वगायनासाठी बोलावलं. भारतातल्या पहिल्या पार्श्वगायनाचं श्रेयसुद्धा सरस्वतीबाईंना म्हणजे मराठी स्त्रीलाच जातं.

- १९१८मध्ये ‘एकच प्याला’ नाटकातल्या पदांच्या चाली सुंदरबाई जाधव या कलावंतीणीनी दिल्या होत्या. - पहिली ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली तीही महाराष्ट्रात, १९०५ साली.

- १९२०च्या सुमारास पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी भारतीय अभिजात संगीताचं स्वरलेखन म्हणजे ‘नोटेशन’ करण्याची पद्धती निर्माण केली. एवढंच नाही, तर देशभरातल्या गावोगावी जाऊन, जवळजवळ १८०० बंदिशींचं स्वरलेखन केलं.

हे झालं फक्त संगीत क्षेत्रामधलं! कलेच्या प्रत्येक प्रकारामध्ये असंच अनन्यसाधारण योगदान महाराष्ट्रीय आणि मराठी कलाकारांनी दिलं. स्वातंत्र्यापूर्वी सव्वाशे मराठी सिनेमे निर्माण झाले होते, हे आपल्याला कदाचित माहीत नसतं. अण्णासाहेब किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, बालगंधर्व, चिंतामणराव कोल्हटकर, राम गणेश गडकरी अशा दिग्गज मराठी कलाकारांनी, स्वातंत्र्यपूर्व काळात रंगभूमी आणि नाटक या दोन्ही कलांवर स्वत:ची अशी खास मोहोर उमटवली.

एवढी उज्ज्वल सांस्कृतिक भरभराट आणि त्यातही महिलांचा मोठा वाटा असणं, हे महाराष्ट्रात का घडू शकलं? याचं मुख्य कारण महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासात सापडतं. महात्मा फुल्यांनी १८४८मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रुजवला. १९१७ साली शाहू महाराजांनी, कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या वंचितांना न्याय, समानता मिळण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शिवाजी महाराजांनी रुजवलेली स्वातंत्र्याची मूल्यं आणि संत-वाङ्मयाकडून मिळालेला वैचारिक वारसा शिक्षणाच्या प्रसारातून सर्वदूर पसरत राहिला. यातून अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या.

१९६० ते ८०मध्ये राष्ट्रवाद, विवेकवाद, किंवा १९८० ते २००० या दोन दशकात शरद जोशींची शेतकरी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, नर्मदा बचाव चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, डाव्या विचारसरणीच्या संघटना, नामांतर चळवळ अशा अनेक चळवळी सुरू झाल्या. त्यांची जुळवणी सामाजिक असली तरी त्यांचे ideological किंवा राजकीय धागे मात्र उघड दिसत होते. हिंदुत्ववादाची नवमांडणीसुद्धा तोपर्यंत सुरू झाली होती. या सगळ्या घटनांचे पडसाद सर्व कलाप्रकारांवर पडत राहिले.

६० ते ७०च्या दशकात जवळजवळ २०० मराठी सिनेमे तयार झाले. १९६५साली दिल्लीत सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ची धुरा सांभाळली होती पु.ल.देशपांड्यांनी! त्यानंतर तीन वर्षांनी ‘दूरदर्शन’ची दुसरी शाखा मुंबईमध्ये सुरू झाली. या दृश्य-श्राव्य माध्यमाची लोकप्रियता वाढल्यामुळे मुख्य धारेची रंगभूमी त्या दशकात जवळजवळ संपली होती. खरं तर, नव्या महाराष्ट्र राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं नाटकांवरील करमणुक कर माफ केला होता.

भांडवलशाहीच्या आणि बाजारपेठेच्या रेट्यामुळे शोषणाची आणि हिंसेची चाहूल लागलेल्या कामगार चळवळीचे हुंदके, आधुनिक रंगभूमीवर ऐकू येऊ लागले. अण्णाभाऊंच्या ‘अकलेची गोष्ट’ या वगानंतर ‘नवे तमाशे’ हा नवा कलाविष्कार समोर आला. तेव्हाच समाजवादी कलापथकांची रंगभूमीदेखील जोरात कार्यरत होती. वसंत बापटांनी त्या प्रयोगांना ‘राष्ट्रीय तमाशा’ असं नाव दिलं. या कलापथकात पु.ल., दादा कोंडके, निळू फुले, वसंत सबनीस यांपासून ते नंतर डॉ. लागू, स्मिता पाटील यांचा सहभाग राहिला.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इथं एक उल्लेख विषादानं करतो की, मराठी रसिकांनी सर्व प्रकारच्या संगीताला प्रेमानं, खोलवर हृदयात रुजवलं, मात्र दृश्यकलांकडे कानाडोळा केला. मासिकांची मुखपृष्ठ-कॅलेंडर-भेटकार्डीवरील चित्रं इतपतच भाव चित्रकलेला मिळाला. चौकातले पुतळे इथंच शिल्पकला थांबली. म्हणूनच पोचखानवालांचे हाजी-अली चौकातलं म्युरल वा प्रफुल्ला डहाणूकरचं वरळी नाक्यावरचं कित्येक मजली उंच भितिचित्र सरकारी धबडग्यात जमीनदोस्त झाली. तेव्हा निषेधासाठी चार-पाच मराठी माणसं जमा झाली. आमचे कान तयार झाले, पण आम्हाला नजरच मिळाली नाही.

धुरंधर, आबालाल रहिमान, अहिवासी, पळशीकर, सडवेलकर, गायतोंडे, रवींद्र मिस्त्री, संभाजी कदम, प्रभाकर बर्वे अशी मोजकी नावं जरी घेतली, तरी बहुतेक जण ‘ही कोण मंडळी आहेत बुवा?’ असाच प्रश्न विचारतील. मुळचा मी स्वत: चित्रकार असल्यामुळे ही खंत मला सतत बोचत राहते. त्यामुळे आज इथेही आपण हे दृश्याकलादालन बंदच ठेवू या.

१९६० साली महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर केवळ ११.७९ टक्के होता. अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षणाच्या प्रसाराची मोहीम जोरदार राबवली होती. या शिक्षण व्यवस्थेतून मराठी मध्यमवर्गाची सुरुवात झाली होती. हा वर्ग उच्चजातीय आणि शहरात राहणारा होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही त्यांच्या ज्ञानपरंपरेमुळे त्यांचं सामाजिक स्थान दृढ होतं. दोन पंचवार्षिक योजना राबवूनही दारिद्र्य हटत नव्हतं, महागाई वाढत होती. समाजवादावरचा विश्वास उडू लागला होता. या सुशिक्षित असंतोषी मध्यमवर्गाने आधुनिक मराठी साहित्याची निर्मिती केली. कथा-कादंबरी या साहित्यप्रकारांतून समकालीन प्रश्न उभे होऊ लागले.

व्यवस्थेविषयीचा अंगार व्यक्त करायला अनियतकालिकांच्या चळवळीसह अनेक बंडखोर साहित्य चळवळी या सुशिक्षित मध्यमवर्गाने सुरू केल्या. पु.भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, दि.बा. मोकाशी असे साहित्यिक समकालीन संवेदना प्रकट करत राहिले. १९६३साली नेमाड्यांची ‘कोसला’ आणि रणजित देसाईंची ‘स्वामी’ या भिन्न स्वभावाच्या कादंबऱ्या, ७८-८०च्या सुमारास ‘बलुतं’ आणि ‘उपरा’ ही दोन विलक्षण आत्मचरित्रं, असे साहित्यातले मैलाचे वाङ्मयप्रकार स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकांत प्रसिद्ध झाले.

याच मध्यमवर्गात एकत्र कुटुंब व्यवस्थेचं विघटन सुरू झाल्याने नात्यातली गुंतागुंत वाढली होती. तेंडुलकरी वास्तववादी रंगभूमी तयार झाली ती या पार्श्वभूमीवर! मानवी नात्यांचा कुरूप चेहरा तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठी माणसासमोर ठेवला. त्या अस्वस्थतेचं शमन काही प्रमाणात पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, बाळ कोल्हटकर यांसारख्या दिग्गज नाटककारांकडून झालं. सुलभ आशय, भावनोत्कट संवाद, ठोस कथासूत्र असलेल्या या नाटकांना जबरदस्त लोकप्रियता मिळाली.

तोपर्यंत बऱ्याच अंशी सवर्ण असलेल्या वाङ्मयाचा पोत अधिक समृद्ध झाला, तो ७५ ते ८०मधल्या विद्रोही, दलित साहित्याच्या निर्मितीतून. सर्व प्रकारच्या शोषणापासून दलितांची मुक्तता कशी होऊ शकते, या मंथनामध्ये दलित राजकारणाची दिशा काय असावी इ. उहापोह ऐरणीवर आला. दलित जाणिवेचं नवं आत्मभान आणि आत्मसन्मानाची प्रचिती देणाऱ्या या दलित साहित्याने जातीबांधवांच्या होणाऱ्या कोंडीला वाचा फोडली. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, लक्ष्मण माने, दया पवार आणि इतर अनेकांनी ही वाट अधिक सकस केली. आजही दलित नाटकाचा प्रवाह सातत्यानं चालू राहिला आहे. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी आणि इतर दलित नाटककार प्रस्थापित उच्चवर्गीय सौंदर्यस्थळांना बदलून स्वत:ची ओळख देण्यात यशस्वी झाले आहेत.

स्त्रीवादी साहित्याचं भरीव योगदानही फार मोलाचं आहे. अगदी विभावरी शिरूरकरांपासून ते मेघना पेठे, लता रविंद्र त्यांच्या लेखनातून स्त्रीवादी जाणीवा ताकदीनं व्यक्त करत राहिल्या. पुरुषसताक रचनेमध्ये घुसमटलेली स्त्रीवेदना, कुटुंबातील असमान-दुय्यम स्थान, असे विषय स्त्री लेखिकांनी कायमच उत्कटतेने हाताळले.

तत्कालीन असंतोषाच्या पार्श्वभूमीवर दादा कोंडके नामक भन्नाट कलाकार त्याच्या रांगड्या विनोदामुळे प्रचंड लोकप्रिय झाला. १९७१ ते १९९६ मधल्या त्यांच्या सिनेमाने, शहरी हिरो बदलून गबाळा, चालू, ग्रामीण हिरो दिला. धोबी, शिंपी, हवालदार, गुराखी असे काहीसे हिरो मटेरियल नसलेले धंदे नायकांना दिले. द्वयर्थी संवाद, ठेक्याची गाणी हा दादांचा फॉर्म्युला हिट झाला.

कलाविकासाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारण १९९० ते २०२०मध्ये जागतिक अवकाशात प्रचंड डचमळ झाली. अनेक युद्धं, दहशतवाद, विभाजनवादी राष्ट्रवाद, कडवा धर्मवाद यातून वाढलेली असहिष्णुता, द्वेष, हिंसा यातून मराठी समाजही विवेकवादापासून दूर होत गेला. एकीकडे जागतिकीकरणामुळे मिळालेली भौतिक सुबत्ता आणि व्यक्तिवादी जीवनपद्धती, तर दुसरीकडे बेलगाम शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, विषमतेला आळा न घालू शकणाऱ्या विकासयोजना, मूलतत्त्ववादी उजव्या विचारसरणीचं सार्वत्रीकरण, यामुळे समाज झपाट्यानं दुभंगत गेला.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशा विचित्र परिस्थितीत महाराष्ट्रातलं कलाक्षेत्रही संभ्रमित राहिलेलं आहे. आता मुक्तपणे काम करणं अवघड झालं आहे. सलमान रश्दींवर झालेला कालचा निंदनीय हल्ला, हे लेखनस्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचं ताजं उदाहरण! बहुमताच्या बाजूची अभिव्यक्ती करणं सक्तीचं वाटण्याइतपत दहशत, कलाकारांमध्ये असल्यामुळे ‘होयबा’ असेल तर चलती असेल. तसंच, कोणत्या गोष्टीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील आणि हात उगारला जाईल, याची कल्पना नसल्यामुळे बोटचेप्या कलेची आणि कचखाऊ कलाकारांची भाऊगर्दी झाली आहे. कलाकारांना समकालीन संवेदनेचा संसर्ग होणं दुर्मीळ झालंय. स्व-संस्कृतीच्या साच्यात, इतिहासाच्या एकांगी पुनर्लेखनाचे आणि कलेच्या शुद्धीकरणाचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यात कला आणि कलाकाराची घुसमट होत आहे. अर्थात खूप नव्या कलाकारांनी याही कालखंडात, लक्षणीय योगदान दिलं. तुम्हा सर्वाची नाळ, या कालखंडातल्या कलाक्षेत्राशी जास्त जोडलेली असल्यानं त्याचा विस्तार मी इथं करत नाही.

या २१व्या शतकाची मूल्यप्रणालीच संपूर्ण बदललेली आहे. ‘सत्य म्हणजे काय बुवा?’ असा प्रश्न एकमेकांना विचारत समोर ठेवलेल्या माहितीची मशागत करत राहण्याला पर्याय उरलेला नाही. संख्यात्मकदृष्ट्या भरपूर सृजन निर्मिती होत असली तरी, सगळाच कलाव्यवहार एका सकस केंद्राकडून मीडिऑक्रिटीच्या परिघावर स्थिरावत असल्यासारखा दिसतोय. अर्थात मधून मधून लक्षणीय प्रयोग होतच राहतात. परंतु ते उचलून धरण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपण कमी पडतो. टी-२० फॉरमॅटची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की, तीन तासाचा सिनेमा, तीन अंकी नाटक, किंवा विलंबित-मध्यलयीचा ख्याल हे सगळं संपलं आहे.

एकीकडे OTT प्लॅटफॉर्म्समुळे वैश्विक कला उंबरठ्यावर येऊन पोहोचली. पण त्याचबरोबर बाजारू, चकचकीत कलेला उठाव मिळून परंपरागत, अभिजात कलेचं विसर्जन झालं. पैसे देऊन किंवा प्रेक्षकांचा अनुनय करून पांडित्य, प्रसिद्धी आणि पैसा मिळू शकतो, हे इंगित आमच्या किशोरीताई-कुमारांना कधी कळलंच नाही. दैनंदिन जीवनात झपाट्यानं आक्रसत जाणाऱ्या मराठी भाषेच्या कक्षा माझ्यासारख्याला क्लेषदायी ठरत आहेत. मी बदललेल्या टेक्नॉलॉजीला सामोरा गेलो; ती आत्मसातसुद्धा करू शकलो. पण सृजनाचे निकृष्ट कोंभ आणि आयुष्याचा कमी झालेला कस मात्र मी स्वीकारू शकत नाही.

वैज्ञानिक प्रगतीनं मानवी अस्तित्व जास्त टिकून ठेवलं आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, कलेचं स्वरूप आणि नीतिमूल्यं बदलली आहेत. २०१८मध्ये ‘खिस्तीज’नी ए.आय. अॅल्गॉरिथमनी तयार केलेलं पहिलं चित्रं ‘Portrait of Edmond de Belamy’ लिलावात जवळ जवळ साडेतीन कोटींना विकलं. १४ ते २०व्या शतकात रंगवलेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या १५,००० पोर्ट्रेट्सचा डेटा अल्गोरिथमला पुरवून त्या चित्राची निर्मिती झाली होती. एवढंच नाही तर ‘algorithm identification’ was seen as the artist’s signature. Technology can emulate human creativity हे तेव्हा अधोरेखित झालं.

Computer creativityच्या पुढे ‘कलाकार’ ही जमातच नष्ट होईल का? २०२९पर्यंत, मानवाएवढी बुद्धिमत्ता कम्प्युटर्सकडे असेल, तर कोणाची कला श्रेष्ठ ठरेल - मानवी सृजनाची का संगणकाची? ‘संगणकाने चालवलेला मानवी मेंदू’, हेच जर भविष्यातलं वास्तव असेल तर त्या तंत्रज्ञानाचा ताबा कोणाकडे असणार? लामडा (LaMDA) म्हणजे यंत्रभाषा आणि ती तयार करणारे गुगलमधले इंजिनियर्स, यातला चालू असलेला वाद आपल्या सगळ्यांपुढे आहेच.

आताच जर आपण इतक्या प्रमाणात सायबॉट्समध्ये रूपांतरित झालेलो आहोत, तर आपले न्यूरॉन्स कोणत्या तरी डिजिटल आदेशानुसार कृती करू लागले, तर आपल्या स्वातंत्र्याचे काय? Privacyचे काय? आपलं स्वातंत्र्य आपण गमावलं आहे, याची जाणीवदेखील जर उरणार नसेल, तर आपल्या शिल्लक राहिलेल्या अस्तित्वाला काय म्हणायचं? A.I. Elites who can keep themselves outside of the digital control, versus those who can be controlled by the Al algorithm, will be the new power structure of human future. The same Technology created by humans to protect themselves will consume them; and may make the human race extinct. ‘Power corrupts’ is proving to be the reality even in this field. A shift from welfare and disease control to police control, from omnipotence to impotence will be the new fearsome normal for the human race. भविष्यात अशा अंतर्विरोधी सत्तासमीकरणाच्या चक्रीवादळात, कलेचं अस्तित्व कोणत्या प्रारूपातून प्रकट होईल, हे सांगता येत नाही.

याही चक्रीवादळात मराठी माणूस नक्की टिकून राहील. कोणी सांगावं, बे. एरियातल्या कित्येकांनी मराठी क्रोमोझोम बीजं आधीच कुठेतरी space travelमध्ये टाकून ठेवली असतील. कदाचित हजारोंनी replicated भीमसेनजी-लताबाई, बर्वे-गायतोंडे, चित्रे-कोल्हटकर, माधुरी-उर्मिला तयार होत असतील. कलेची पारंपरिक सौंदर्यस्थळं बदलून नवे निकष ठरत असतील.

हे सगळे बदल पेलण्यासाठी आपण खचून न जाता, नव्याने स्वतःला सक्षम केलं पाहिजे. या प्रयासातही मराठी माणसाचं पाऊल पुढेच असेल, अशी खात्री व्यक्त करून मी थांबतो. कोणी सांगावं, digitally created अमोल पालेकर भविष्यात तुमच्यासमोर येईल आणि या ए.आय. युगातील मराठी गौरवगाथेचा चरित्रपट उलगडून दाखवेल??!!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......