ज्ञानदेवांच्या दृष्टान्ताप्रमाणे, मुलगा वडिलांच्या ताटात जेवायला बसतो आणि त्यांच्या ताटातलं त्यांनाच जेवू घालतो. माझं तुमच्यासमोर बोलणं तशा प्रकारचं आहे...
पडघम - साहित्यिक
दासू वैद्य
  • १०व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची निमंत्रणपत्रिका आणि संमेलनाध्य प्रा. दासू वैद्य
  • Sat , 20 August 2022
  • पडघम साहित्यिक १०वे अंबाजोगाई साहित्य संमेलन 10th Ambajogai Sahitya Sammelan दासू वैद्य Dasoo Vaidya

१०वे अंबाजोगाई साहित्य संमेलन १९, २० व २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश

.................................................................................................................................................................

खूप लहानपणापासून अंबाजोगाई गावाची धुसर चित्रं माझ्या मनात आहेत. वडिलांचे आई-वडील त्यांच्या न कळत्या वयातच वारले. नांदेडला महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत वडिलांना आश्रय मिळाला. अंबाजोगाईत देशपांडे गल्लीतील काकाजी वाडा म्हणजे वडिलांच्या मावशीचं घर. या वाड्यात आम्हाला सख्खं प्रेम मिळालं. बरेचदा सुट्टीमध्ये काकाजी वाड्यात आमचा मुक्काम असे. मुदखेड ते परभणी, परभणी ते परळी असा रेल्वेचा प्रवास व परळीहून बसने अंबाजोगाई गाठणे एवढा द्राविडी प्राणायाम होता. प्रवासात सोबत कपड्यांची वळकटी, लोखंडाची पेटी (संदूक), पाण्यासाठी फिरकीचा तांब्या आणि माझ्यासारखी हट्टी लेकरं घेऊन आई-वडील अंबाजोगाई गाठत. एका प्रवासात गंगाखेडच्या रेल्वे स्टेशनवर टरबूजाच्या कापलेल्या लालबुंद फोडीसाठी मी हट्ट केला होता, पण ‘उघड्यावरचे खायचं नाही’ म्हणून माझी मागणी धुडकावून लावण्यात आली. रेल्वे हलेपर्यंत खिडकीतून त्या टरबुजाच्या फोडीकडे डबडबलेल्या डोळ्यांनी मी पाहत राहिलो. तो कापलेल्या फोडींचा लालबुंद रंग आजही माझ्यात ‘सेव्ह’ आहे.

असंच आपल्या खडकपुर्‍यावरचं एक दृश्य माझ्या मनात रुतून बसलंय. आरंभी काही वर्षं आम्ही देशपांडे गल्लीत राहत होतो. कृषिसंस्कृतीचा प्रभाव असलेल्या गावात माझा जन्म झाला. त्यामुळे पोळा सणाबद्दल मला आकर्षण. एका पोळ्याला बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी खडकपुर्‍याच्या मारोतीजवळ जाऊन बसलो. सजलेल्या बैलजोड्या मारोतीला प्रदिक्षणा घालत. गर्दी वाढलेली. पुंगी-डफड्याचा आवाज टिपेला गेलेला. रेटारेटीत बैलांची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चढाओढ लागलेली. पळता-पळताच मंदिरालगत असणार्‍या वेशीच्या भल्या मोठ्या चिरेबंदी भिंतीवर सोललेले नारळ भिरकावले जायचे. गतीने आदळल्यामुळे भिंतीवर नारळ फुटायचे. चिरेबंदी भिंतीवरून त्या नारळाच्या पाण्याचे ओघळ खाली घरंगळत यायचे. नारळ फुटण्याचा आवाज आणि पाण्याचे ओघळ असा लोभस क्षण मी विसरू शकत नाही. आता पोळ्याला असं दृश्य असतं की नाही, माहीत नाही. असेल तर ते दृश्य पुन्हा एकदा अनुभवायला पाहिजे.

योगेश्वरी महाविद्यालयात अकरावी-बारावी करताना इथली शिस्त, अभ्यासाचं वातावरण माझ्यासाठी नवीन होतं. गणिताशी दोस्ती नसल्यामुळे मेडिकलला नंबर लागण्यासाठी खूप प्रयत्न केले. ड्रॉप घेतला. क्लास, ट्यूशन केली, पण यश आलं नाही. या धडपडीत बी.जी. कुलकर्णी सरांसारखे मनस्वी शिक्षक मनात कायमघर करून राहिले. प्रयत्न करूनही आलेल्या अपयशामुळे मन निराश झालं. बी. एस्सी डेअरी सायन्सला प्रवेश घेतला. घरून संपूर्ण पाठिंबा होताच. सैरभैर मन स्वस्थ बसेना. दासोपंत-मुकुंदराज समाधी परिसरात जाऊन एकटाच भटकायचो. अशा वेळी मनःशांतीसाठी मला एक सुंदर ठिकाण सापडलं. ते म्हणजे भाजी मंडईतलं साहित्य निकेतन ग्रंथालय! इथं मला विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, आरती प्रभू, महेश एलकुंचवार, रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, बाबुराव बागूल, जयवंत दळवी, व.पु. काळे, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, जी.ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर, श्री.ना. पेंडसे, दिलीप चित्रे, इंदिरा संत, नरहर कुरुंदकर, ग्रेस, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, पु.शि. रेगे, शांता शेळके, रत्नाकर मतकरी… अशी अनेक मंडळी भेटत गेली. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वयसुलभ भावनेनं सोबतचे मित्र संध्याकाळी देवीच्या रस्त्यावर ‘हिरवळ’ पाहण्यासाठी जात. माझं मन मात्र साहित्य निकेतन ग्रंथालयात रमलं होतं. विज्ञान शाखेच्या पदवीसाठी शिकत होतो, वाचन मात्र मराठी साहित्याचं सुरू होतं. वाचण्याचा आणि लिहिण्याचा सपाटा लावलेला. लिहिलेलं वर्तमानपत्रांच्या पुरवण्यातून छापून येऊ लागलं. लिहिणार्‍या-वाचणार्‍या मित्रांचा आमचा एक ग्रुपच तयार झाला. उमेश मोहिते, अशोक मस्के, विलास पाटील, सुधीर धावडकर, विलास इंगळे, अनंत लोकरे, भागवत मसने अशी नव्याने लिहिणारी मित्रमंडळी तावातावाने साहित्यावर चर्चा करायची. रोज संध्याकाळी भेटण्याची जागा म्हणजे साहित्य निकेतन ग्रंथालय. प्रत्येकाचे लिहिण्याचे प्रयत्न सुरूच होते. कविता/कथा स्वीकारल्याचं ज्याला संपादकीय पत्र आलं, त्यानं सर्वांना चहा पाजायचा; पुरस्कार मिळाला तर कांदापोह्याची पार्टी द्यायची असा नियमच झाला. अर्थात तेव्हा हेही कोरड्या खिशांना झेपणारं नव्हतं. पण साहित्य छापून येण्याचा आनंद थोर असे. स्वत:चं छापील नाव पाहण्याचा छंदच जडला. साभार परत आलेल्या साहित्याने विचार करायला भाग पाडलं. साहित्य स्वीकृतीचं पत्र एकमेकांना कौतुकानं दाखवण्याचे ते दिवस होते. आज पत्रंच गायब झाली आहेत. पानच्या पानं भरभरून पत्र लिहिण्याचे दिवस संपून दुसर्‍याचे मेसेज तिसर्‍याला फॉरवर्ड करण्याचा काळ आला आहे.

अशा भारलेल्या वातावरणात मी लिहू लागलो. माझ्या कविता वाचून प्रा. सुधीर वैद्य सरांनी युवक महोत्सवासाठी माझ्याकडून एकांकिका लिहून घेतली. ते माझं पहिलं नाट्यलेखन! पुढे आम्ही एकांकिका स्पर्धा केल्या, मदतिनधीसाठी एकांकिकेचे तिकीट लावून प्रयोग केले. युवक महोत्सवात एकांकिकेचा नंबर जाऊ दिला नाही. प्रा. सुधीर वैद्य, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. केशव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्यस्पर्धा केली. याचं फलित म्हणजे आज मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीला संजय कुलकर्णी सुगावकरसारखा नट मिळाला. महाविद्यालयातील विद्यार्थी संसद निवडणुकीतल्या मारामार्‍या बघून तरुणाईवर तळमळीने मी एक लेख लिहून काढला. तो ताजा ताजा लेख संपादक अमर हबीब यांच्याकडे नेऊन दिला. ‘अंबाजोगाई परिसर’मध्ये छापूनही आला. पुस्तकं वाचून लेखकांना पत्रं लिहायचो. व.पु. काळे, फ.म. शहाजिंदे, विजय तेंडुलकर, महावीर जोंधळे अशा लेखकांशी पत्राने संवाद व्हायचा. तेंडुलकरांचे पिवळ्या कार्डावर वळवळणारे काळे शब्द मी अजून जपून ठेवले आहेत. शिवाजी चौकातल्या पोस्टात रोज हमखास चक्कर असे. त्या चौकात एक लाईटचा खांब होता. या खांबावर अनेक रंगांचे, अनेक राजकीय पक्षांचे झेंडे लावलेले असत. या झेंड्याच्या गर्दीत बिचारा दिवा गुदमरून गेला होता. तेव्हा या खांबावर मी एक कविता लिहिली होती- ‘स्ट्रीट पोल’...

 ऐन रस्त्यातला खांब

 मला म्हणाला थांब,

 मी थबकलो

 तारांनी जखडलेला

 आणि झेंड्यांनी लखाटलेला

 देह सावरीत

 खांब बोलू लागला,

 ‘अरे, तुमच्या जयंत्या होतात,

 मिरवणूका, जलसे निघतात

 प्रत्येकाचे झेंडे मात्रआम्हाला लागतात

 भगवा, हिरवा, निळा, पिवळा तर कधी काळाही

 प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी ऐटीत

 बाबांनो, आमचे दिवे काढा

 नाही तर बरबटलेले झेंडे फाडा

 एक तर आम्ही दिव्यांचे खांब राहू

 नाही तर चक्क ध्वजदंड होऊ

 एक दिवस या झेंड्यांच्या ओझ्यानं

 आमचे देह खालावतील

 मग कुणाच्या भावना दुखावतील

 नंतरचा रक्तपात पाहता पाहता

 आमचे दिवेच मंदावतील

 म्हणून आता ठरवूनच टाका

 हवेत दिवे

 का झेंडेच हवे’

 ..

 ऐन रस्त्यातला खांब

 मला म्हणाला थांब.

का कुणास ठाऊक, पण ही कविता मी माझ्या कुठल्याच संग्रहात समाविष्ट केली नाही. पण औरंगाबादला विद्यापीठात शिकायला जाताना अशा कवितांची शिदोरी सोबत होती. अनेक स्पर्धांतून या कवितेला पारितोषिकं मिळत गेली. रोख बक्षिसांमुळे थोडीफार आर्थिक मदतही तेव्हा झाली. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे, ही सुरुवात अंबाजोगाईने करून दिली.

रामकाका (मुकादम)सारखा मर्मज्ञ पाठीराखा इथेच मिळू शकतो. त्या वेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेने माझा कवितासंग्रह संस्थेतर्फे प्रकाशित करण्याचा ठराव पास केला होता. पण ग्रंथप्रकाशनासाठी माझ्या कविता मलाच अपरिपक्व वाटल्यामुळे मी नम्र नकार दिला होता. न पटलेली गोष्ट स्पष्टपणे सांगणे, पण पटलेल्या गोष्टीच्या पाठीशी मन:पूर्वक उभे राहणे, हा या मातीचा स्वभाव माझ्याप्रमाणेच अनेकांनी अनुभवलेला आहे. म्हणून प्रत्येकाला अंबाजोगाईची दाद हवी असते. गावाचं नाव, ‘अंबाजोगाई’ असं सांगितलं तरी समोरच्याच्या चेहर्‍यावर दाद देणारा कौतुकमिश्रीत भाव आजही पहायला मिळतो.

इथल्या कर्तृत्ववान लोकांनी तयार केलेली गावाची प्रतिमा जनमानसात आजही उजळ आहे. सर्व विचारांना थारा देणारी ही सर्वसमावेशक भूमी आहे. देशात कुठेही निघालेल्या राजकीय पक्षाचा एखादा तरी समर्थक इथे हमखास असतोच. इथल्या बुद्धीवैभवाचे अनेक दृष्टान्त आजही जनलोकात ऐकायला मिळतात. मतभेद कायम ठेवून सर्व विचारधारेची माणसं एकत्रगप्पा-गोष्टी-विनोद करताना मनभेद करत नाहीत, हे वेगळेपण अभिमानास्पद आहे.

वैचारिक लढाई वैचारिक पातळीवरच लढायची असते, हे शहाणपण या गावाला अंगभूत आहे. शांतता आणि सद्भाव हे या गावाचं भूषण आहे. जात, धर्म, विचारसरणी ओलांडून प्रस्थापित होणारा संवाद हे या गावाचं सामर्थ्य आहे. माणसं वादविवाद करतात, पण संवाद सोडत नाहीत. म्हणून हे गाव मनोहर आहे. थोडासा आत्मस्तुतीचा प्रमाद माझ्याकडून झाला असेल. पण हे सर्व मोकळेपणाने तुमच्यासमोर सांगताना माझ्या जडणघडणीत अंबाजोगाईच्या भूमीचे अढळ स्थान अधोरेखित करण्याचा माझा प्रांजळ हेतू आहे.

‘सह यत तत् साहित्यम’ म्हणजे जीवनाच्या जे जे सोबत येतं त्याला साहित्य म्हणतात. अशा व्याप्त दृष्टीने साहित्याकडे पाहायचं तर भोवताल समजावून घ्यावा लागतो. ज्या शिक्षणामुळे आपली प्रगती झाली, त्या शिक्षणाची काय अवस्था आहे?

‘आधी सोवळ्यात ठेवलेलं शिक्षण आज आपण विकायला काढलं आहे.’ हे बाबा आढावांचं निरीक्षण समजावून घ्यावं लागेल. विनाअनुदान शिक्षणाची काय अवस्था आहे? वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवायची असेल तर पन्नास लाख दक्षिणा मोजावी लागते. खासगी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर व्हायचं असेल तर दोन कोटी रुपये मोजावे लागतात. या प्रकारात सर्वसामान्य विद्यार्थी असूच शकत नाही. शिवाय असे दक्षिणा गोळा करणारे संस्थाचालक शिक्षणसम्राट म्हणून समाजात राजरोस मिरवत असतात. मराठी साहित्यात शिक्षणाच्या अध:पतनाचं किती प्रतिबिंब उमटलं आहे? विनाअनुदान शिक्षणाचे वाभाडे काढणारं विजय तेंडुलकरांचं ‘पाहिजे जातीचे’ नाटक सोडलं तर थेट जाब विचारणारी साहित्यकृती का निर्माण झाली नाही? मराठी साहित्य व्यवहारात अधिक प्राध्यापक आहेत, म्हणून हा विषय जोर धरत नसेल का? अध:पतनाचं आपण समर्थन करतो आहोत काय? असे अनेक प्रश्न फेर धरतात.

भविष्याच्या काळजीमुळे आपण मुलांना इंग्रजी शाळेत भरती करतो. पण खेडोपाडी निघालेल्या इंग्रजी शाळेतील अध्यापनाची अवस्था चिंताजनक आहे. चांगल्या मराठी शाळा दुर्मीळ होतायत. कित्येक मराठी शाळा बंद पडतायत. ही इंग्रजी शाळेत शिकलेली मुलं मराठीपासून तुटतात आणि इंग्रजीतही पारंगत होत नाहीत. अधांतरी लटकणारी ही बहुतांश मुलं मराठी साहित्य वाचत नाहीत. मग उद्या मराठी साहित्याचा वाचक कोण असेल, याचा विचार होणे आवश्यक आहे.

याबाबतीत एक छोटीशी घटना तुमच्या पुढ्यात ठेवू इच्छितोय. काही दिवसांपूर्वी मला एका मराठीच्या हितचिंतक विदुषीचा फोन आला. एका दिवंगत साहित्यिकाच्या सुनेने सासर्‍याने जमवलेली ग्रंथसंपदा निकामी म्हणून रद्दीत टाकली होती. त्यात मराठीतील मानदंड असलेले ग्रंथ होते. ती साहित्यसंपदा रद्दीतून परत मिळवायची होती. ते ग्रंथ आम्ही मिळवले. जत्रेत हरवलेल्या लेकराप्रमाणे घाबरलेले ग्रंथ आज माझ्याकडे सुरक्षित आहेत. त्या दिवसापासून जमवलेल्या माझ्या पुस्तकांची मला काळजी वाटते आहे. पण अशा घटना घडू द्यायच्या नसतील, तर मराठीचे नवे वाचक निर्माण करणे, ही आपली जबाबदारी आहे. याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल

‘भाषा मरता देशही मरतो

संस्कृतीचा मग दिवा विझे’

हा कुसुमाग्रजांचा इशारा आपण समजून घेऊन कृती केली पाहिजे. मराठी साहित्य वाचणारा शेजारच्या घरात जन्मावा असं म्हणून चालणार नाही.

एकूण आपल्या वाचनाबद्दलच चिंता करावी अशी बाब आहे. टीव्ही, मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली. धर्माज्ञा असल्याप्रमाणे या माध्यमाचा आपल्यावर प्रभाव आहे. पांढरे कपडे धुण्यासाठी वापरायची ‘अशोक निळ’ आपण विसरून गेलो. कारण ‘उजाला निळ’ची आकर्षक जाहिरात तिन्ही त्रिकाळ आपल्यावर थोपवली जाते. पाल्य पालकांचं ऐकत नाहीत, पण त्यांचं अनुकरण करतात. अशा वेळी आई-वडील एखादं पुस्तक वाचतायत, पुस्तकावर चर्चा करतायत असं दृश्य मुलांनी कधी पाहिलेलंच नसतं. मग मुलं वाचनाकडे कसे वळतील. १८९६ साली शंकर वावीकर यांनी ‘वाचन’ नावाची पुस्तिका लिहिली होती. यातही शिक्षक, प्राध्यापक वर्ग वाचत नाही अशी नोंद केलेली आहे. आज तर सहा महिन्याच्या लेकरानं खाद्य नीट खावं म्हणून त्याची आई त्याच्या पुढ्यात मोबाईल ठेवते. इथून तो प्रवास सुरू होतो. चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठीच आपला जन्म झाला असावा, अशी परिस्थिती आहे.

माध्यम कुठलंच वाईट नसतं. त्याचा योग्य वापर करता यायला हवा. खरं तर संवादाची ही माध्यमं विचारपूर्वक वापरली तर विधायक आहेत. किती तरी ग्रंथ या माध्यमात उपलब्ध आहेत. पण वाचनाबद्दलची अनास्था वाढतेच आहे. अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचणं हे वाचन नव्हे. चौफेर वाचन ही सवय व्हायला हवी. आपल्या मासिक खर्चाच्या तरतुदीमध्ये पुस्तक खरेदीसाठी काही रक्कम नियोजित ठेवली जाईल, तो सुदिन असेल. हे जरा रोमँटिक वाटलं तरी अशक्य नाही. आज आपण संवादासाठी हजारेक रुपयांची मासिक तरतूद (मोबाईल रिचार्ज) करतोच की! संवादाच्या नावाखाली आपण या माध्यमाचा कसा उपयोग करतो, ही वेगळी गोष्ट. अष्टौप्रहर खुडखुड वाजणार्‍या व्हॉट्सअपमुळे आपलं अवधान खंडित झालंय का? आपण सलग विचार करू शकतो का? असे अनेक प्रश्न स्वतःच स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

समाजमाध्यमावर लोक व्यक्त होतायत ही चांगली गोष्ट आहे. लेखक-कवींना मुक्त व्यासपीठ मिळालं. नाही तरी मराठी नियतकालिकांची स्थिती नेहमीच व्हेंटिलेटर लावल्यासारखीच असते. ‘सत्यकथा’ जुन्या काळात बंद पडलं असं म्हणताना आजच्या काळात कुठलं नियतकालिक सुस्थितीत आहे? वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादक अंक चालवतानाचं रडगाणं ऐकवून थकले आहेत. दहा-अकरा कोटी मराठी माणसांत एक हजार पुस्तकांची आवृत्ती संपत नाही. नव्या लेखक-कवींना लिहिण्यासाठी व्यासपीठ नाही. उलट या समाजमाध्यमामुळे काही चांगले कवी-लेखक पुढेही आले. यातून काही वेळा ‘कुणीही उठून कविता लिहू लागलंय’ अशी कुजबूज ऐकू येतेय. पण कुणीही कविता का लिहू नये? लिहिणं-व्यक्त होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाची गरज आहे. अर्थात प्रत्येक लिहिणारा महाकवी होत नसतो, पण अनेकांच्या लिहिण्यातून एक घुसळण होते. अशा काही शतकांच्या घुसळणीतून एखादा ज्ञानेश्वर, एखादा तुकाराम जन्माला येतो. त्यामुळे आपण ज्ञानेश्वर-तुकाराम नसलो, तरी त्या दिंडीत चालणारे सर्जक आहोत, ही भावनाही आनंददायी आहे. म्हणून प्रत्येकानं व्यक्त झालं पाहिजे. फक्त व्यक्त होताना जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. समाजमाध्यमावर संवादापेक्षा विसंवादच अधिक दिसतोय. द्वेष ओकला जातोय. किती खालच्या स्तराला जाऊन लोक व्यक्त होतायत. एकमेकाला रक्तबंबाळ करण्यात धन्यता मानतात..

‘कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर

म्हणून शब्दांना धार लावत

बसलेत लोक घरोघर,

किती जन्मांचा गिळलाय द्वेष

जो ओकला जातोय

पायर्‍यापायर्‍यांवर’

समाजमाध्यमाचा दुसरा एक धोका आहे. त्याकडे आपले लक्ष मी वेधू इच्छितो. समाजमाध्यमामुळे कवींना मुक्त व्यासपीठ मिळालं. कविता उमटू लागल्या. छापणार्‍यांची मक्तेदारी संपली. ‘लाईक’चा पाऊस पडू लागला. अंगठे दाखवले जाऊ लागले. वॉव, एक्सलंट, नाईस, ऑसम, व्हेरीगुड… अशी प्रशस्ती मिळू लागली. पसंती देणारे सगळेच रसिक जाणकार नसतात. या ‘लाईक’ करण्यामध्ये बहुतांश वेळा गांभीर्य नसतं. पण आपल्या किवतेला चार-पाचशे लाईक्स मिळवलेला कवी सुखावून जातो. त्यातून खरी प्रतिक्रया कळत नाही. कविता नाकारण्याचा तर प्रश्नच नाही. अशा वेळी कविता साभार परत येण्याचंही महत्त्व लक्षात येतं. ‘हरीण शावकाला जेव्हा नव्यानं शिंग फुटतात, तेव्हा ते ज्याप्रमाणे इथे-तिथे ढुशा मारत फिरत असतं, तसाच उत्पात मी माझ्या नव्यानं प्राप्त झालेली काव्यशक्ती घेऊन सुरू केला,’ हा रवींद्रनाथ टागोरांचा अनुभव प्रांजळ असला तरी कवीला (साहित्यिकाला) सजग व्हावं लागतं. कच्चं, अपरिपक्व लेखन प्रतिष्ठित होतंय याचा मोठा धोका असतोच. गोडगोड प्रतिक्रयांमुळे लिहित्या कवी-लेखकाचं नुकसानही होऊ शकतं.

समाजमाध्यमावर मुक्त स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्यात संभाव्य धोकाही लपलेला असतो. समाज माध्यमावर वाट्टेल तशी, वाट्टेल तेव्हा कविता झळकवता येते. मनात आले तर नव्या छपाई तंत्रज्ञानातून आकर्षक पुस्तक छापता येते. वर्तमानपत्रे कौतुक छापायला तयार असतात. गल्लोगल्ली पुरस्कारही तयार असतात. हा मोहक प्रवास मनाला भुरळ पाडणारा आहे. इतर कलांमध्ये उमेदवारी नावाची पायरी असते. म्हणजे नर्तक व्हायचे असेल तर किमान बारा वर्षे साधना करावी लागते. मग त्या साधकाला रंगमंचावर सादरीकरणाची परवानगी गुरू देतात. संगीतातही टप्पे ओलांडत रियाज करावा लागतो. वेगवेगळ्या मैफलीत साथ-संगत करावी लागते. तेव्हा कुठं स्वतंत्रपणे गायची मुभा मिळते. कवितेत मात्र पहिली कविता लिहिली की, ‘कविवर्य’ होता येतं. इथे रसिकांनी कवीवर (साहित्यिकावर) टाकलेला विश्वास म्हणावा का? पण या झटपट प्रसिद्धी देणार्‍या माध्यमांचे धोके साहित्यिकाने जाणले पाहिजेत.

आज आपण तंत्रस्नेही झालो आहोत. ते महत्त्वाचंही आहे. मानवाने शेकडो वर्षांच्या रियाजाने स्मरणशक्ती, एकाग्रता, संयम, शोधक वृत्ती अशा क्षमता स्वतःमध्ये विकसित केल्या आहेत. पण गुगलच्या उपलब्धतेमुळे अनेक गोष्टी आपण विसरायला सुरुवात केली आहे. कारण कुठलीही माहिती बोटांच्या टोकावर उपलब्ध असताना लक्षात का ठेवायची? अनेक फोन नंबर पाठ असणारे आपण मोबाईल आल्यापासून स्वतःचा नंबर विसरायलाही मागे-पुढे पाहत नाही. शोधक वृत्तीही कमी होते आहे. एकाग्रता तर विखंडित झाली आहेच. शेपटीचा वापर कमी होत गेल्यामुळे मानवाची शेपूट गळून गेली. तसं स्मरणशक्तीचं, एकाग्रतेचं झालं तर काय होईल? अशा प्रश्नांना पुढच्या काळात सामोरं जावं लागेल. साहित्यविचार म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेला जगण्याचा विचार असावा.

निसर्गापासून दूर जाणारी जीवनशैली, निसर्गाला ओरबाडण्याचा मानवी हव्यास वाढतच जातोय. विज्ञान, तंत्रज्ञान, विकास महत्त्वाचाच आहे. पण ‘सूज’ आणि ‘बाळसं’ यातील फरक लक्षात यायलाच हवा. आपण सहजीवनात जगणारी माणसं आहोत. खेड्यातला शेतकरी तोंडात घास घेण्याआधी गोठ्यातल्या गुरांना चारा टाकला की नाही? गुरांना पाणी दाखवलं की नाही? याची विचारपूस करतो. नसेल तर गुरांना चारा-पाणी देऊनच स्वतः जेवण करतो. मला आठवतंय लहानपणी राहत्या वाड्यात आमच्या बरोबरीने अनेक जण गुण्यागोविंदाने राहत होते. गाय, कुत्रा, मांजर, पाल, ढेकूण, कोळी, झुरळ, मुंग्या, चिलटं, मुंगळे, चिमण्या, कबूतर, सांळुकी, सापसुरळी, गांडूळ, सरडा, चिचुंद्री, गोगलगाय, बेडूक, मुंगुस, उंदीर, विंचू... असं ते सहजीवन होतं. आज आपल्या फ्लॅटमध्ये मुंग्यानाही थारा नाही, आम्ही लागलीच औषध फवारतो. ही पृथ्वी माणसाप्रमाणे इतर पशू पक्ष्यांची आहे, हे आपण विसरत चाललो आहोत. गावाची समृद्धी म्हणून आपण नदीचा गौरवाने उल्लेख करतो. नदीच्या काठावर संस्कृती विकसित झाल्याचे दाखले देतो. पण आपल्याकडच्या कुठल्याही नदीची आजची अवस्था काय आहे? गावची गटारं सोडण्याची सोय म्हणजे नदी. व्यवस्थेला शरमिंदं करून वाळू मिळवण्याचं ठिकाण म्हणजे नदी. करोना काळात प्रेतं वाहून नेण्याचं कामही आपण नदीवर सोपवलं होतं. अशा अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांचं काय करायचं? त्यासाठीच कवी-लेखक भोवतालाला पुन्हा पुन्हा तपासत असतो.

आपण मराठी भाषक आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण नुसताच अभिमान बाळगून कसं चालेल? मराठी भाषेसाठी नुस्त्या घोषणा देऊन, रस्ता रोको करून भागणार नाही. मराठी भाषा व्यवहाराची भाषा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न हवेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. तो मिळेलही. पण तेवढ्यावर भागणार नाही. जोपर्यंत आपल्या भाषेवर आपण मनापासून प्रेम करणार नाही, तोपर्यंत ती खर्‍या अर्थाने गौरवीत होणार नाही.

आपण मराठी साहित्य वाचतो का? मराठी पुस्तकं विकत घेतो का? मराठी नाटक-चित्रपट पाहतो का? मराठी गाणी ऐकतो का? आपण आपली स्वाक्षरी मराठीतून करतो का? आपल्या घरावरची नावाची पाटी मराठीत आहे का? आपण शक्य तिथे आवर्जून मराठी बोलतो का? असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. अर्थात असं केलं म्हणजेच आपण मराठी आहोत असा अट्टाहास नाही. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं मराठीपण उजागर होऊ शकतं. मुख्य म्हणजे, भाषा वापरात असणं महत्त्वाचं आहे. सायकल सहा महिने न वापरता घरात नुसतीच ठेवून दिली तर, काही दिवसांनी तिच्या चाकातली हवा आपोआप कमी होते. धुळीनं, कोळीष्टकानं भरून जाते. गंजून जाते. हळूहळू निकामी होते. भाषेचं सायकलपेक्षा वेगळं नाही. संस्कृत भाषेचं उदाहरण आपल्यासमोर आहे.

इंग्रजी शब्दकोशात दर दोन वर्षांनी नवनव्या शब्दांची भर घातली जाते. नवे शब्द शोधताना अनेक प्रादेशिक भाषांतील लोकप्रिय शब्द ‘ढापले’ जातात. उदाहरणार्थ, जबरदस्त, गुरू, अण्णा, अब्बा, जुगाड, चमचा, फंडा, दादागिरी, सूर्यनमस्कार.. असे कितीतरी आपले शब्द आज इंग्रजी शब्दकोशात सुखनैव विराजमान झाले आहेत. ते त्यांनी ढापले. आपल्याला अजून व्यावसायिक अभ्यासक्रम (मेडिकल, इंजीनिअरिंग इ.) मराठी माध्यमातून सुरू करता आलेले नाहीत. निजामाच्या राजवटीत असे अभ्यासक्रम उर्दू माध्यमातून सुरू होते, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे मराठी भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला की सर्व प्रश्न संपून आनंदीआनंद होईल असे नाही. भाषेसाठी आपल्याला गांभीर्याने काम करावे लागेल. माझा सूर जरा नकारात्मक वाटला तरी वास्तव मांडू पाहणारा आहे. चरितार्थासाठी अन्य भाषेचा सहारा घ्यावा लागला तरी आपली स्पंदनाची भाषा मराठी आहे, तोपर्यंत मायमराठीची चिंता नाही. पण व्यवहाराची भाषा मराठी होण्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तशा प्रयत्नांचा भाग म्हणजे हे साहित्य संमेलन आहे. हे संमेलन फक्त एक उत्सव न राहता एक गरज बनेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सभा-संमेलनात, खासगीत बोलताना अंबाजोगाईची सांस्कृतिक महत्ता प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे मान्य करतो. पण ही भावना शासकीय पातळीवरून फलद्रूप होणे आवश्यक आहे. या गावाचा मराठी भाषेशी असलेला अनुबंध पाहता, इथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे ही जुनीच रास्त मागणी आहे. दुबई येथे पार पडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात तसा ठरावही करण्यात आला होता. मसापचे कौतिकराव ठाले पाटील, माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विद्यमान संमेलनाध्यक्ष भारत सासणे अशा धुरीणांनी मराठी विद्यापीठ चळवळीसाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे हा लढा अवघ्या मराठवाड्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा होईल. म्हणून या संमेलनाच्या व्यासपीठावरून अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ व्हायलाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी मी शासनाकडे करतो आहे.

‘पुस्तकाचं गाव’ या महाराष्ट्र शासनाच्या योजनेत अंबाजोगाईचा समावेश व्हावा, याकरता राज्य मराठी विकास संस्थेचा मी हट्टाने पाठपुरावा केला. संस्थेचे संचालक सन्मित्र संजय कृष्णाजी पाटील यांनी माझ्या हट्टाला प्रतिसाद देत ‘पुस्तकाचं गाव’ होण्याच्या दृष्टीने कार्यवाही तत्परतेने सुरूही केली. शासनाचे लोक इथे येऊन सर्वेक्षण करून गेले आहेत. या तत्परतेमुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. आपण पाठपुरावा करत राहू. या गावात गेली ३८ वर्षे यशवंतराव चव्हाण समारोह होत आहे. असा समारोह महाराष्ट्रात अन्यत्र कोठेही होत नाही. या समारोहाने अंबाजोगाईची रसिकता जपलीच नाही तर तिचे संवर्धनही केले आहे. अमर हबीब यांच्या पुढाकारातून इथे अनोखं ‘आद्यकवी मुकुंदराज कविता ग्रंथालय’ आहेच. या ग्रंथालयामुळे आद्यकवी मुकुंदराजांच्या दरबारात कवितेची बाग फुललेली आहे. लवकरच ही अंबानगरी ‘पुस्तकाचं गाव’ होईल असा मला विश्वास वाटतोय.

आपल्या भोवताली होत जाणारा सहिष्णुतेचा संकोच, कुठल्याही राजवटीत त्रस्त असणारा सर्वमान्य माणूस, न थांबणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, सत्तापिपासू राजकारण, सैरभैर तरुणाई असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात पिंगा घालत आहेत. लांबलेल्या भाषणामुळे मी आता आवरते घेतो. ज्ञानदेवांच्या दृष्टान्ताप्रमाणे, मुलगा वडिलांच्या ताटात जेवायला बसतो आणि त्यांच्या ताटातलं त्यांनाच जेवू घालतो. माझं तुमच्यासमोर बोलणं तशा प्रकारचं आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घेतलंत, त्याचा आनंद मी कायम जपून ठेवीन. माझ्या मातीनं केलेला माझा सन्मान मला बळ देणारा आहे. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी थांबणार आहे. पण शेवटी तुमच्यासमोर एक कविता ठेवतो. खरं तर अध्यक्षीय भाषण म्हणून एवढी कविता वाचली तरी माझ्या मनीचा भाव तुमच्यापर्यंत पोहचू शकतो. कवितेचं नाव - मागणं.

‘कुणाच्याही गळ्यात

गुदमरू नये गाणं,

जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात,

अवेळी आलेल्या भुकेल्यासाठी

कोरभर कविता

झाकून ठेवलेली असावी घरोघर,

खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात

खुळखुळणारी नाणी असावीत

पोरांना भिरिभरं घेण्यासाठी,

चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत

चॉकलेट गोळ्यांनी,

सकाळी वेचलेल्या पारिजातकाचा वास

पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर,

लटकलेल्या येळणीत

पाणी प्यायला चिमण्या याव्यात,

दिवसांच्या भाकरीबरोबर

खायला असावं यच्चयावत प्रार्थनांचं

खमंग पिठलं,

जेवणानंतर धुवायचे हात

वाळून जावेत गप्पांच्या नादात,

तहानलेली ओंजळ भरावी

हापशाच्या टपोरे धारेनी,

बंदुकीच्या नळकांडीत

चिमणीनं करावा खोपा,

बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे,

झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वार्‍याची,

लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर,

अंधारातलं कण्हणं ऐकू यावं उजेडात,

जागतिक संगीताचा गोपाळकाला केल्यावर

सापडावी लय श्वासाची,

पृथ्वी नावाचा गोलगप्पा

टम्म भरलेला असावा

जगण्याच्या आंबट-गोड पाण्यानी,

लई नाही, लई नाही मागणं

फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत

दोन कोवळी पानं

आणि

माती कंटाळू नये

झाडाच्या बाळंतपणाला.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......