कथा हा वाङ्मय प्रकार मौखिक लोकसाहित्याशी संबंधित आहे. त्यातही कथा हा स्त्री-मुखी आविष्कार आहे. आजच्या सारखी प्रचलित प्रसार व रंजन माध्यमं ज्या काळी नव्हती, त्या काळी लहान मुलांना रमवण्यासाठी स्त्रियांनी प्रथम काऊचिऊच्या गोष्टी, पुराणकथा व शूरवीरांच्या कथा ऐकवल्या. या कथा काळाबरोबरच अनेक संस्कार घेत पुढे आल्या. प्राचीन काळात पुराणकथा, मध्ययुगीन काळी उपदेश कथा आणि पेशवोत्तर काळात बोधकथा, ऐतिहासिक कथा आणि कल्पककथा असा स्वरूप बदल होत गेला. परिणामत: पुढे कथा इंग्रजांच्या प्रभावाखालीही वावरली. मग तिचं स्वरूप वास्तवस्पर्शी झालं व पुढे विसाव्या शतकातील कथांमध्ये स्वातंत्र्य, गुलामगिरी, विज्ञानकथा इत्यादी प्रकार हाताळले गेले. स्वातंत्र्यानंतर मात्र कथा अधिकाधिक वास्तवस्पर्शी होत गेली.
स्वातंत्र्यपूर्व कालखंड दिवाकर कृष्ण, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, य. गो. जोशी, वि. वि. बोकिल, द.र. कवठेकर, अनंत काणेकर, र.वा. दिघे, ग.ल. ठोकळ इत्यादींनी आपल्या कथांनी गाजवला. काव्यामध्ये मर्ढेकरांनी वेगळे प्रयोग करून वेगळ्याच प्रतिमा युगात नेले, तर जी.एं.ची कथा स्वतःला इतरांपेक्षा वेगळं ठेवण्यात यशस्वी झाली.
दुसऱ्या महायुद्धातला नरसंहार, माणुसकी व माणूसपण यांचा ऱ्हास, यांचा त्या काळच्या साहित्यावर बराच परिणाम झाला. माणसाचं जगणं पराधीन आहे, अस्तित्व क्षुल्लक आहे, तो विवश होऊन आत्मशोध घेतो, असा धागा धरून साहित्य लिहिलं जाऊ लागलं. खांडेकरांचा उदात्तवाद मागे पडला, फडकेंची योगायोगातून साकारलेली कलावादी कथा मागे पडली, श्री. म. माटेंचा तटस्थ उपेक्षित अंतरंग शोधही तोकडा पडला. पुढच्या काळात मराठी कथेला वास्तवाचं भक्कम अधिष्ठान मिळालं. त्यात व्यंकटेश माडगूळकर व द.मा. मिरासदार यांनी कथेतून वास्तव चित्रण केलं. कथेतला साचेबंदपणा मोकळा झाला. मराठी लघुकथा भाषेच्या, आविष्काराच्या आणि आशयाच्या अंगानं बदलत गेली. त्यात गंगाधर गाडगीळ, वामन चोरघडे, य.गो. जोशी यांच्या कथा परिणामकारक ठरल्या.
तरीही नवी शैली, नव्या अंगानं व नव्या-प्रतिमांसह नवकथाकार म्हणून जी.एं.कडे वेगळ्या दृष्टीनं पहावं लागतं. जी.एं.ची कथा वाचताना वाचक स्तंभित, बधीर होतो आणि अभिमन्यूसारखा अडकून पडतो. गुंतता येतं पण निघता येत नाही, असं काहीसं जी.एं.ची कथा वाचताना होतं. चाकोरी डावलून, चौकट मोडून, प्रभाव आणि अनुकरण यांना अव्हेरून जीएंची कथा नवे परिमाण आणि नवे परिणाम शोधते. ज्या कालखंडात तटस्थ राहून वास्तव उठावदार करण्याकडे बहुतेक कथाकारांचा कल होता, त्याच वेळेस जीएंनी तेच वास्तव प्रतिमांच्या गुंत्यात लपवून अर्थाची सुंदर आणि मुक्त पेरणी केली.
कथा व कथनशैली
जीएंनी साधारणपणे १९५५पासून कथालेखनाला प्रारंभ केला. साहित्य प्रकाशनाच्या तारखेनुसार पाहिलं असता त्यांची कथा १९६०च्या आसपासची. मात्र कोणत्याही साहित्यिकाचं साहित्य व त्याची लेखन प्रक्रिया पाच-दहा वर्षं आधीची असते. म्हणजेच जी.एं.ना दुसऱ्या महायुद्धानंतर विवश व बेबस झालेला माणूस दिसला. नियतीच्या व दुर्दैवाच्या एका फटकाऱ्यानं त्यांनी रचलेल्या आयुष्याचं वारुळ क्षणात उदध्वस्त होतं. असाच नायक, असाच माणूस त्यांनी ‘निळासावळा’ या कथासंग्रहामध्ये उभा केला आहे. पार्थिव व अपार्थिवाची ओढाताण, अस्तित्व आणि नश्वरत्व यातील पराधीनपणा त्यांच्या कथेत अधिक शोधली गेली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यांच्या कथेची केवळ शीर्षकं जरी पाहिली तरी त्यातील रंगप्रतिमा, गूढता जाणवते. ‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’ व ‘काजळमाया’ या शीर्षकांमधून जाणिवेच्या पलीकडील अर्थशोध तर घेतला नाही ना, असं वाटतं. ‘निळासावळा’ हा शब्द बालकवींच्या ‘औदुंबर’मधील गूढता स्पष्ट करतो. जगणं, जगवणं व वाहणं, यांच्यासह निळा आणि सावळा यातील अथांगपण व अनंतपणही दिसतं. या कथासंग्रहातील बहुतेक कथांची कथारूपं अथवा कथाकेंद्रं त्यातील व्यक्तीकडे रोखलेली आहेत. तऱ्हेवाईक, भेसूर व भीषण स्वरूपात जसा त्यांचा कथानायक येतो, तसाच संयमाची क्षमता संपून गेल्यावर परिस्थिती विवश झालेलाही आढळतो. जीएंनी या कथासंग्रहात मानवी भाव-भावनांचे भोगवटे मनस्वीपणे आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीनं मांडले आहेत.
जीएंचं कथाशिल्प जबरदस्त आहे. त्यांच्या रूपकथांमध्ये आविष्कारापेक्षा नियतीच्या विविध अर्थाच्या रीती दडलेल्या दिसतात. त्यांचा ध्यास हा एका संमिश्र यातनासंपन्न व्यक्तिमत्त्वाचा ध्यास आहे. त्यात रूढ सामाजिकतेला अवसर मिळत नाही. सामाजिक मूल्यं आणि संदर्भ म्हणजे एक भयावह हास्यास्पद गुंतागुंत आहे, असं त्यांना वाटतं. नियतीच्या क्रूर खेळाचा तो केवळ दृश्य भाग आहे. जी.एं.चं भावसाफल्य या भयावह गुंतवळीत गुरफटलेलं आहे. ही गुंतवळ जीवघेणी ठरते, ती तिच्या निरर्थकतेमुळे. या निरर्थकतेची शापित, जहरी छाया अवघ्या मानवी जीवनाला व्यापून उरते. तेच त्यांनी काही कथांमधून ठळकपणे मांडलेलं आहे. त्यांच्या कथांना शापित वात्सल्याचा, अंतःकरण पिळवटून टाकणाऱ्या भावबंधांचा उमाळा लागलेला आहे. हा उमाळा जिवंत स्मृतीरूपानं त्यांच्या कथांमधून एकसारखा झरत असतो. आईच्या, बहिणीच्या, अनाथ वृद्ध नातेवाईकांच्या त्यागातून, वात्सल्यातून, दुःखातून व त्याच्या कोरड्या अश्रद्धेनं कोळपलेल्या वृत्तींना संजीवन देत असतो. कधीकधी हे उमाळे अंतःकरण ढवळून टाकण्याइतके अनावर होतात, पण ते कधीच आक्रस्ताळे वाटत नाहीत. या उमाळ्यांना ताज्या, उघड्या जखमेसारखा एक मूक ओलेपणा आहे. या जखमेची दर्शने व स्मृती यांचं अधिष्ठान जी.एं.च्या कल्पना विश्वाला लाभलेलं आहे. त्यामुळे त्याला असाधारण गंभीर व्याप्ती मिळाली आहे. त्याची सकस भावनेनं चिंब झालेली दर्शनं जी.ए. आपल्या कथांमधून घडवतात.
जीएंची शैली विविध भाषांगाचा व वाचांगाचा तोल सांभाळून स्वतःचा असा ताल सहजगत्या साधताना दिसते. हा ताल तिचा अंतर्नाद असतो आणि त्यामुळेही तो काव्याशी जवळीक जोडतो. जी.ए. शब्दांची वाक्यांमधील अपेक्षित जागा अनपेक्षितपणानं बदलून त्याची जातच नव्हे, तर अर्थछटाही बदलून टाकतात. त्यांची शैली कथेची असल्यामुळे कथानिवेदनाला आवश्यक असणारी निवेदनपरता हा तिचा एक विशेष आहे. गोष्ट सांगण्यात या निवेदनपरतेचं बळ खर्ची पडत नाही, तर गोष्ट सांगताना बरंच काही सांगण्याकडे तिचं लक्ष असतं. ते सांगताना एखादं रहस्य, मग ते मानवी मनाविषयी असो अथवा जीवनाविषयी असो, योग्य क्षण येईपर्यंत जपणं आणि तो क्षण आल्यावर ‘उलगडणं’ हे तिला जमतं.
जी.एं.च्या प्रतिमा इतरांपेक्षा वेगळ्याच आहेत. ऊन, पाऊस, झाडं, आकाश या निसर्गप्रतिमा तर आहेतच, पण माणसाच्या मनातील सूक्ष्म चढ-उतार टिपण्यासाठी गटार, डुक्कर, मुंगी, किडे, घाणेरड्या बकाल वस्त्या, चिंध्या, कासव, असंही काहीबाही येत राहतं. काही प्रतिमा आश्चर्यचकित करतात. उदा., ‘चिंध्यांच्या ढिगाखाली लपलेले दुःख’. भिजलेल्या मांजराबद्दल सर्वांना सहानुभूती वाटत असते. ‘चंद्रावळ’मध्ये ते म्हणतात, ‘पण भिजलेल्या मांजराविषयी वाटावी अशी सहानुभूती वाटते’. एखाद्या बैलाच्या कपाळावर कुलक्षणी भवरा असावा, असं माणसाचं दुर्दैवीपणही त्यांनी वर्णिलं आहे. शिवाय आयुष्य म्हणजे ‘धुळीत पडलेलं नाणे’, ‘फाटक्या उशीतून बाहेर पडलेला कापसाचा पुंजका’, असा ते उल्लेख करतात. या प्रतिमांमध्ये माणसाचं नगण्यपण, त्याचं क्षुल्लक व हीन अस्तित्व, कुणालाही आपुलकी न वाटणारं त्याचं जगणं, एवढंच आढळतं.
जी.ए. सवंग धक्कातंत्र वापरत नाहीत, कथेला नवकथेसारखं नाट्यमय वळणही देत नाहीत, अॅरिस्टॉटलला अभिप्रेत असणारं कथाविकासाचे तंत्रही वापरत नाहीत, तसंच निवेदनाच्या दृष्टीनं सोयीस्कर व लोकप्रिय असं फ्लॅशबॅकचंही तंत्र वापरत नाहीत. ते कथेतील मुख्य पात्राला जगाकडे बघणारा तिसरा डोळा मानतात आणि त्या अनुषंगानं माणसांचं अंतरजग भेदक स्वरूपात समोर आणतात.
‘हिरवी मखमल, गोरा हात’ या कथेमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनातील उदात्त स्वप्नं कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत, या अर्थांची प्रतिमा वारंवार येते. “कुठेही मसणांत जा, तिथेही रांग आहेच. जर एखादे वेळी लोकल खाली जीव द्यायची वेळ आली, तर तिथेसुद्धा अगदी नंबरप्रमाणे मरावे लागेल. साले हरामखोर आयुष्य! कंगाल!” हे अशा प्रकारे गर्दीत हरवलेले चेहरे जीवनाविषयी असाच विचार करणार. कारण, माणूस आणि माणूसपण संपून नीतीशून्य स्वार्थाची ओढाताण चालूच आहे.
‘निळासावळा’मध्ये एकूण १२ कथा आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनातील जीवनाविषयी गढूळ भूमिका या कथांमधून गडद होते. जीए मानवी मनाचा शोध आणि कथेतील माणसांचाही स्वतःच्या अस्तित्वाचा सखोल शोध, घेताना दिसतात.
कथेतील नायक
जीएंच्या कथा या प्रामुख्यानं पुरुषप्रधान असल्या तरी पुरुषप्रकृती किंवा स्त्री-पुरुष संबंधाशी त्या बांधलेल्या आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक पुरुषांच्या संवेदनशील अंतःकरणाचा शोध घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे स्त्रियांविषयी सहानुभूती दाखवली जाते, पण ते पुरुषांविषयी सहानुभूती दाखवतात. प्रचलितपणे असं म्हटलं जातं की, स्त्रियांचं अंतःकरण म्हणजे काचेचं भांडं. पण जीएंच्या कथा असं सांगतात की, या काचेच्या भांड्यातील द्रवपदार्थ म्हणजे पुरुषांचं अंतःकरण. भांडं फुटलं तर काचा उचलता येतील, पण द्रव टिपणं अवघड.
‘निळासावळा’मधील स्त्रियांच्या विचित्र वागण्यामुळे पुरुषांना अनेक दुःखं भोगावी लागतात आणि ते ती भोगतातही करतात. ‘चंद्रावळ’मधील सण्ण्या हा त्याचं उत्तम उदाहरण आहे. रममाण होण्याची तिन्ही ठिकाणं हरवल्यानंतर तो यांत्रिकपणे स्वतःला दोष देत स्वतःतील न्यूनत्व शोधतो. ‘राणी’तील मुलगी अकाली जाते आणि आजोबांचं जीवन उदध्वस्त होतं. ‘पडदा’ या कथेत प्रिन्सिपॉलला हवी असलेली कलासक्त स्त्री मिळत नाही, त्या वेळी त्यांची तडफड होते. ‘अवशेष’मधील गोविंदाचार्य तर पुरुष-दुःखाचा कळसच आहेत. ‘सांगाडा’मधील नाडगौडा मास्तरांचं कुणीच ऐकत नाही; तर ‘हिरवी मखमल गोरा हात’मधील दामूला आपण स्वतः नियतीच्या हातातील बाहुले आहोत, असं वाटतं. ही कथा चेहरा हरवलेल्या दामूची आहे. नैराश्य, न्यूनत्व, नश्वरपण आणि आपण कुणीच नाही, ही भावना त्याला शेवटपर्यंत पछाडून टाकते. पण एकमात्र खरं की, दुसऱ्याला आपल्या दुःखाचं कारण मानून ‘निळासावळा’मधील पुरुष मंडळी कधीच आक्रमक होत नाहीत. उलट आपलं दुःख अटळ असून ही दुःखाची झाडं आपणच लावली, असं म्हणत ती आपलं आयुष्य जगत राहतात.
कथासंग्रहातील नायिका
जीएंच्या या कथासंग्रहातील कथेतील सर्व माणसं सर्वसामान्य आहेत. त्यांची नायिका विद्रूप व विकृत दिसतात. पुरुषांचं प्रेम वाट्याला न आलेली स्त्री वारंवार भेटते. यांना जी.ए. कथेत का स्थान देतात? तर अशाच व्यक्ती अस्तित्वाचा शोध घेत असतात. वारंवार नियतीच्या व समाजाच्या दुर्लक्षितपणामुळे ती एकलकोंडी होतात. सर्व चुका आपल्यातच शोधायला लागतात. ‘निळासावळा’मधील सर्व व्यक्तिरेखा जगण्यातील क्षुल्लकपण शोधून आत्मरत होतात. यातील स्त्रिया स्वतःच्या सुखात स्वार्थ शोधणाऱ्या, दुसऱ्यांसाठी त्याग न करणाऱ्या अशा जीएंना दाखवता आल्या असत्या. पण त्या त्यांनी स्त्रीसुलभ इच्छा-आकांक्षेतून दाखवल्या आहेत. आपली जराही उपेक्षा सहन न होऊन प्रिन्सिपॉलशी कधीही जुळवून न घेणारी स्त्री ‘पडदा’ या कथेतून दिसते. ‘चंद्रावळ’मधील गौरी तडफडून मरते. सुखाच्या शोधात ती बाबूला जवळ करते. ‘सूड’मधील स्त्री विकल अंतःकरणानं स्वतःलाच दोष देत निघून जाते. या शिक्षिकेने उगवलेला सूड तिने तिच्यावर उगवला की, तेथील अपेक्षाभंग झालेल्या लोकांवर उगवला अथवा आपल्या विद्रूप सर्वसाधारण दिसण्यावर उगवला, हा गुंता तसाच ठेवून ही कथा वाचकाला गर्दीच्या ठिकाणीही एकांत देते. म्हणजे विचार करायला भाग पाडते. ‘डाग’मधली मुलगी स्वतःला दुसऱ्याच्या दुःखाचं कारण करून घेते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जीएंच्या कथेतील स्त्री ‘बायको’ या रूपातच अधिक येते. भारतीय परंपरेतील स्त्रीचं ‘त्यागाची मूर्ती’ हे उदात्तीकरण ते स्वीकारत नाहीत. उलट ते उदात्ततेच्या नावाखाली तिची होणारी घुसमट कथेतून सोडवतात. परंपरेनं जपलेला नीतीमत्तेचा खोटा मुलामा खोडून आतील भुस्सा व पोकळपणा मांडतात. जीएंच्या कथा स्त्री-पुरुषांच्या भावनांचा अप्रकट तळ शोधतात. थोडक्यात, जीएंची पात्रं अपराधगंडांनी गांजलेली आहेत. माणूस सामर्थ्यवान असला तरी तो पराधीन आहे.
कथांचं वेगळेपण
जी.ए. माणसाच्या मनाच्या तळात चाललेली घुसमट गुंतागुंतीसह मांडतात. त्यांच्यावर कुणाचाही प्रभाव नसला तरी ते गडकरी भक्त होते. बालकवीविषयी त्यांना गाढ प्रेम होते. शिवाय वॉल्टर पॅलर आणि ऑस्कर वाईल्ड या लेखकांच्या शैलीचा अल्पसा अनुनय त्यांनी केला होता. शिवाय त्यांच्या कानडी बोली भाषेच्या व ग्रामीण विनोदाचा मिश्रित आविष्कार त्यांच्या कथेत सुंदर वाटतो. जी.ए. त्यांच्या कथेतून अतिसामान्यांचं आयुष्य उलगडत-उलगडत त्यांच्या जीवनातला वैश्विक अर्थ मांडताना दिसतात. तो इतर कुठल्याच कथाकारांमध्ये दिसत नाही.
जीएंची कथा माणसांच्या जगण्यातील मरण शोधतं. ही माणसं जगतात की, मरत मरत जगतात, या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर न सापडल्यानं वाचक मति गुंग होऊन बसतो, नव्हे तोही अस्तित्वाचे प्रश्न घेऊन एकांत शोधू लागतो. जीएंची शैली त्र्यं. वि. सरदेशमुखांच्या शैलीशी समांतर वाटते. दोघंही एकांतप्रिय. आपल्याच लिखाणावर प्रतिक्रिया न देणारे. एकांतप्रिय व्यक्ती एकतर आत्मशोध घेत घेत लिहिते अथवा कमी अवकाशात जास्त आशय मांडून मनोविश्लेषण करते. जीएंची वर्णन शैली बेढब आकृतीतून अर्थ शोधणारी आहे, त्यातून दिसेल ते किंवा त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं त्यांना दिसतं. त्यांच्या पात्रांची नावंही सर्वसामान्य व अर्थहीन असतात. जाणीवपूर्वक वेगळं राहण्यापेक्षा सहज वेगळी ठरणारी त्यांची नवकथा मराठी नवकथेतील एक मैलाचा दगड आहे, असं म्हणणं अतिशयोक्त ठरणार नाही. त्यामुळे जीएंच्या कथा कृतींना अनेक पैलू पाडून मोठ्या साक्षेपानं घडवलेल्या, घासून कोरलेल्या आणि स्वच्छ केलेल्या आहेत, यात शंकाच नाही. त्यामुळे ती लोलकाच्या अनेक तुकड्यांनी जमवलेल्या प्रचंड झुंबरासारखी दिसते.
एस. डी. इनामदार त्यांना ‘भ्रामक प्रतिमांचा आरसेमहाल’ म्हणोत, रा. ग. जाधव ‘अज्ञेयतेशी झगडणारा सृजन’ म्हणोत किंवा माधव कृष्ण ‘एकांताचा शोधक’ म्हणोत… मला तर जी.ए. म्हणजे जीवनातील, अनाकलनीय भोवऱ्यातील, संभ्रमी वादळातील आणि चपखल वीजेतील संथ अर्थ घेणारा जीवनशोधक वाटतात.
.................................................................................................................................................................
हेही पाहा, वाचा : जीएंची कथा सुखापेक्षा दुःखाला, आशेपेक्षा निराशेला, जिंकण्यापेक्षा हरण्याला आणि जगण्यापेक्षा मरण्याला अधिक प्राधान्य देणारी आहे…
..................................................................................................................................................................
लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.
gavhanenanasahebcritics@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment